भुकेची काळजी केल्याचे समाधान - खा. सुधाकर शृंगारे

विवेक मराठी    07-Aug-2020
Total Views |
कोरोना संकटकाळात सर्वच बाबतीत बंधने आली आहेत.अशा काळात कोणी भुकेने मरणार नाही आणि कोणी उपचाराअभावी मरणार नाही, असा संकल्प केला. या संकल्पाला लातूरच्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी साथ दिली. भुकेेेल्याला अन्न आणि वैद्यकीय सुविधा पुुुरविल्याचे यामुळे समाधान लाभले.

seva_1  H x W:
कोरोना विषाणूच्या या अत्यंत वेगळ्या साथीच्या काळात कोणी कोणाला साथ द्यावी, असा प्रश्न होता. माणसांच्या जगण्यासाठी जगण्याला बंधने आली आहेत. या बंधनाच्या काळात कोणीही माणूस भुकेला राहू नये, असा माझा संकल्प होता. भारतीय जनता पार्टीच्या लातूर मतदारसंघातील आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही तो संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.

 
टाळेबंदीच्या काळात भाजपा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अन्नधान्य वाटप करण्याचे नियोजन केले होते. लातूर शहर, जिल्ह्यातील उदगीर, चाकूर, लोहा सगळ्याच ठिकाणी त्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी गरज ओळखून गरजूंना अन्नधान्याचे किट तयार करून दिले. या किटमध्ये तांदूळ, डाळ, तेल आदी दैनंदिन लागणाऱ्या साहित्याचा समावेश होता.

 
जिल्ह्यातील मागणी मोठी असली, तरी नेमकी गरज कोणाला आहे याची माहिती घेऊन २५ हजार किट्स तयार करून त्यांचे वाटप केले. त्याचा फायदा असा झाला की, ज्या लोकांचा रोजगार बुडत आहे, ज्यांच्याकडे अन्नधान्याचा साठा कमी आहे, जे बाहेर पडू शकत नाहीत किंवा ज्यांच्यापर्यंत कोणी जात नाही, अशा अडल्यानडल्यांना हे किट पोहोचवता आल्याचे समाधान आहे. टाळेबंदीच्या काळात मदतकार्य करायचे होतेच, ते करीत असतानाही योग्य व्यक्तीला ती मदत पोहोचली पाहिजे याकडेही लक्ष दिले आहे.

ज्यांच्याकडे सहज कोणाचे लक्ष जात नाही, अशा दिव्यांग बांधवांना टाळेबंदीच्या काळात त्रास होऊ नये यासाठी अहमदपूर चाकूर तालुक्यात घरपोच सेवा देण्याचे काम माझ्या हातून झाले, याचे मला समाधान आहे. कारण धड़धाकट माणसे कुठूनही आणून भूक भागवतील, परंतु दिव्यांगांचा प्रश्न वेगळा होता. त्यांकडे मी कार्यकर्त्यांनाही विशेष लक्ष देण्यासाठी सूचना केल्या होत्या.

seva_1  H x W:
 
लातूर जिल्ह्यातील दिव्यांगांना त्यांच्या आवश्यकतेनुसार काठी, कानासाठी श्रवणयंत्र, तीनचाकी स्वयंचलित सायकल, विविध उपकरणे केंद्र सरकारच्या माध्यमातून वितरित केली जाणार आहेत. आमचे नेते माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील हे जेव्हा जिल्ह्याचे पालकमंत्री होते, त्या वेळी त्यांनी दिव्यांगांचे सर्वेक्षण केले होते. त्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार जिल्ह्यासाठी ५३ ट्रक भरून साहित्य आले आहे. टाळेबंदीचा काळ असला, तरी आमचा या विषयातील पाठपुरावा कायम होता. लवकरच पंतप्रधानांची तारीख मिळताच त्याचा समारंभ करून ते वितरित करणार आहोत.

कोरोना विषाणूचा खरा लढा तर डॉक्टर लढत होते. त्यांच्या सहकारी नर्सेसची, इतर कर्मचाऱ्यांची त्यांना साथ होती. त्या सगळ्यांचा गौरव करावा, त्यांना आवश्यक ते साहित्य मिळते की नाही हे पाहावे म्हणून लातूर, उदगीर इथल्या रुग्णालयांना भेटी दिल्या. लातुरातील रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेससाठी आवश्यक ते मास्क, पीपीई किटचे वाटप केले
.
या लढ्यात पोलीसही असेच जिवावर उदार होऊन कार्य करत होते. त्यामुळे लातुरातील पोलीस ठाण्यात जाउन त्यांच्या भेटी घेतल्या, त्यांनाही मुबलक प्रमाणात सॅनिटायझरचा, मास्क्सचा पुरवठा केला आहे.

seva_1  H x W:

सगळ्यात महत्त्वाची आणि समाधानकारक एक गोष्ट या काळात घडली, ज्या कामात यश आले, ते म्हणजे अत्यवस्थ रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी लागणारे व्हेंटिलेटर शासकीय रुग्णालयात केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देता आले. केंद्रीय आरोग्य मंत्री, सामाजिक न्याय मंत्री यांच्याकडे लातूर जिल्ह्यासाठी व्हेंटिलेटरची मागणी केली होती. पंतप्रधान कार्यालयाकडेही त्याचा पाठपुरावा केला. त्याला यश आले. पंतप्रधान साहायता निधीतून ६० व्हेंटिलेटर मंजूर झाले. त्यापैकी ४५ व्हेंटिलेटर लातुरात पोहोचले आहेत. १५ लवकरच मिळणार आहेत. कोणी भुकेने मरणार नाही आणि कोणी उपचाराअभावी मरणार नाही याची काळजी मला घेता आली, याचे मोठे समाधान आहे.


कोरोना विषाणूची साथ रोखण्यासाठी आता सरकारने, समाजाने एकत्रितपणे गावोगावी जनजागृतीचा वेग वाढवावा लागणार आहे. मास्क बांधणे का आवश्यक आहे, समाजात अंतर ठेवून सहभागी होण्याची गरज का आहे, या कोरोनाचा विळखा किती भयानक आहे, आपल्या माणसाला कोरोना झाला आणि तो मेला, तर त्याचे शवसुद्धा आपल्याला मिळत नाही याची जाणीव करून द्यावी लागणार आहे. या साथीची दाहकता लक्षात आणून देण्यासाठी गावोगावी पथनाट्ये, गाणे, भारूड यांच्या माध्यमातून प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मला वाटते.


शब्दांकन - संग्राम वाघमारे
पत्रकार, चाकूर.