आनंदवनभुवनी!

विवेक मराठी    08-Aug-2020
Total Views |
अत्यंत नीटनेटकं नियोजन, प्रत्येक गोष्ट ठरलेल्या वेळेप्रमाणे आणि साऱ्या कार्यक्रमाला असलेलं कल्पकतेचं एक सुरेखसं कोंदण! कोरोनामुळे केंद्र शासनाच्या सर्व सूचना नीट पाळून घडवून आणलेला हा कार्यक्रम.


modi_1  H x W:

पाच ऑगस्टला अभिजित मुहूर्तावर, अर्थात दुपारी ठीक १२ वाजून ४४ मिनिटे आणि ८ सेकंदांवर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘इमां शिलां अत्र सुप्रतिष्ठितामस्तु…’ असं म्हणून श्रीराममंदिराच्या त्या नऊ विटांवर अक्षता वाहिल्या, त्याच क्षणी या देशात एक फार मोठा इतिहास लिहिला गेला!

अयोध्येतील श्रीराममंदिराच्या निर्माणकार्याच्या शुभारंभाचा हा नेत्रदीपक सोहळा अक्षरशः अभूतपूर्व होता. डोळ्यांची पारणं फेडणारा होता. एका नव्या युगाची सुरुवात करणारा होता. हा कार्यक्रम जगभर बघितला गेला. संपूर्ण भारत तर राममय झाला होताच. त्यामुळे भारतात घराघरात ह्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण बघितलं गेलं. मात्र संपूर्ण जगातही, सर्वात जास्त दर्शकसंख्या असणारे जे कार्यक्रम होऊन गेले, त्यात ह्या कार्यक्रमाचा समावेश होतो.

अत्यंत नीटनेटकं नियोजन, प्रत्येक गोष्ट ठरलेल्या वेळेप्रमाणे आणि साऱ्या कार्यक्रमाला असलेलं कल्पकतेचं एक सुरेखसं कोंदण! कोरोनामुळे केंद्र शासनाच्या सर्व सूचना नीट पाळून घडवून आणलेला हा कार्यक्रम.


Anandvanbhuvani in Ayodhy
 
४९२ वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर अवतरलेल्या ह्या सोनेरी दिवसासाठी अयोध्या नगरी नटली होती, सजली होती, शृंगारलेली होती. अयोध्येने सौंदर्याचे सर्व प्रतिमान आणि सर्व उच्चांक मोडीत काढले होते. तयारी तर अनेक दिवसांपासून होत होतीच. तीन ऑगस्टला मुख्य सोहळ्याच्या पूजा–अर्चांना सुरुवात झाली. चार ऑगस्ट हा अयोध्यावासीयांच्या अंतिम तयारीचा आणि लगबगीचा दिवस. संध्याकाळी शरयू तीरावर जणू रामयणकाळ जिवंत झाला होता. उद्याच्या दिवाळीची, शरयूच्या आरतीची तयारी अंतिम टप्प्यात होती. त्या रात्री पूर्ण अयोध्या जागी होती, एक सुखद बेचैनी अनुभवत!

पाच ऑगस्टच्या पहाटेपासून अयोध्यावासी आपापल्या घरांसमोर रांगोळी काढण्यात मग्न होते. अधिकांश घरं भगव्या पताकांनी आणि धर्मध्वजांनी सजली होती. कोरोनामुळे लोकांना समारोहाच्या जागी जाणं निषिद्ध होतं. त्यामुळे टीव्ही बघत, घराघरातून रामधून चालली होती. मानस भवनमध्ये आणि कारसेवकपुरममध्ये आलेल्या, विश्व हिंदू परिषदेच्या काही निवडक कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचा आणि कृतार्थतेचा आनंद दिसत होता. अयोध्येच्या रस्त्यांवर आणि गल्ल्यांमध्ये ३६ आध्यात्मिक परंपरांच्या पीठाधीश्वरांनी आपापल्या मठांना ध्वज आणि पताकांनी सजवलं होतं. हे पीठाधीश्वर जेव्हा भगव्या ध्वजांनी सजवलेल्या गाड्यांमधून प्रमुख सोहळ्याच्या ठिकाणी जायला निघत होते, तेव्हा त्रेतायुगातली ऋषिकुल परंपरा परत एकदा जिवंत झाल्याचा साक्षात्कार होत होता.

अयोध्येत आल्यावर पंतप्रधान मोदी सर्वप्रथम हनुमानगढीत दर्शनाला गेले. ही अयोध्येची परंपरा आहे. असं म्हणतात, लंकेहून अयोध्येला परत आल्यावर, सोबत असलेल्या हनुमंताला प्रभू रामचंद्रांनी अयोध्येचा कोतवाल केलं. अर्थात अयोध्येला आल्यावर सर्वप्रथम हनुमानजींची अनुज्ञा घ्यायची. आजही ही प्रथा पाळली जाते. मोदींनी मुख्यमंत्री योगींसह ह्या हनुमानगढीत हनुमानजींना प्रणिपात करून कार्यक्रमासाठी त्यांची परवानगी घेतली. येथील महंत प्रेमदास यांनी मोदींना साफा आणि चांदीचा मुकुट दिला, जो मोदींनी घातला. हनुमानगढीला जाण्यासाठी ७६ पायऱ्या आहेत. जाताना मोदींनी मागील बाजूने हनुमानजींच्या दरबारात प्रवेश केला. मात्र बाहेर निघताना त्यांना ७६ पायऱ्या उतराव्या लागल्या.

मंदिर निर्माणकार्याच्या शुभारंभाचा विधी सुमारे तासभर चालला. कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य श्री स्वामीजी यांनी पूजनसामग्री स्वतः सिद्ध करून दिलेली होती. सोबत एका चांदीच्या पट्टिकेवर ह्या सोहळ्याचे विधी त्यांनी कोरून पाठवले होते. प्रत्यक्ष पूजेत मदत करायला गोविंददेवगिरींसारखं व्यक्तिमत्त्व होतं. पूजास्थानाभोवती पंतप्रधानांसोबत सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्यगोपालदास यांची उपस्थिती होती. अक्षरशः अंगावर रोमांच आणणारा हा सोहळा होता. या पूजनाचं यजमानपद स्वीकारलं होतं स्व. अशोक सिंघलजींचे पुतणे ललित सिंघल यांनी.

भूमिपूजन झाल्यानंतर जो प्रकट कार्यक्रम झाला, त्यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांनी, नव्वदच्या दशकातील कारसेवेच्या वेळी सरसंघचालक असलेल्या बाळासाहेब देवरसांची एक आठवण सांगितली. त्या काळी बाळासाहेब कार्यकर्त्यांना सांगायचे, "हे राममंदिर काही लगेच होणार नाही. पुढील वीस–तीस वर्षं आपले कार्यकर्ते या मुद्द्याचा सतत पाठपुरावा करत राहिले, तरच जन्मभूमीवर राममंदिर शक्य आहे."

डॉ. भागवत पुढे म्हणाले, “ह्या मंदिराचे निर्माण म्हणजे ‘अनेक मंदिरांसारखे हेही मंदिर’ असे नाही. आज कित्येक शतकांचे स्वप्न पूर्ण होत आहे. पण मोठा आनंद आहे तो देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी ज्या आत्मविश्वासाची आवश्यकता होती, ज्या आत्मभानाची आवश्यकता होती त्याचे सगुण साकार अधिष्ठान निर्मितीच्या कार्याला आज प्रारंभ होत आहे.

हे अधिष्ठान आहे आध्यात्मिक दृष्टीचे. सियाराम मय सब जग जानी! सारे जग आपल्यात आणि साऱ्या जगात आपण आहोत असे समजण्याची भारताची दृष्टी आहे. त्यामुळे येथील सर्वांचा जगाशी असणारा व्यवहार हा सर्वाधिक सज्जनतेचा आहे. या देशाचा सर्वांशी सामूहिक व्यवहार वसुधैव कुटुंबकम असा आहे. परमवैभव संपन्न आणि सर्वांचे कल्याण करणारा भारत निर्माण करण्याचा हा शुभारंभ आहे. या निर्माणाचे व्यवस्थात्मक नेतृत्व ज्यांच्या हाती आहे, अशा त्या नेतृत्वाच्या हस्ते हा कार्यक्रम होत आहे याचाही आनंद आहे.

सध्या कोरोनाचा काळ सुरू आहे. संपूर्ण विश्व अंतर्मुख झाले आहे. विचार करत आहे की काय चुकत आहे? कोणता मार्ग निवडावा? दोन मार्ग तर आपण शोधले. तिसरा मार्ग आहे का? असे अनेक प्रश्न आहेत. तिसरा मार्ग आपल्याकडे आहे. आपण तो देऊ शकतो. ते काम आपल्याला करायचे आहे. त्याची तयारी करण्याचा, संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे. त्यासाठी आवश्यक तो पुरुषार्थ आपण केला आहे. श्रीरामांच्या चरित्रापासून आजपर्यंतचा इतिहास पाहिला, तर लक्षात येते की सारा पुरुषार्थ, पराक्रम, वीरवृत्ती आपल्या नसानसांत आहे. ती आपण गमावलेली नाही. आपण सुरुवात तरी करू, कार्य पूर्णत्वास जाईल असा विश्वास, असे स्फुरण, प्रेरणा आजच्या या दिवसाकडून आपणां सर्व भारतीयांना मिळते. यात कोणीही अपवाद नाही कारण सगळेच रामाचे आहे. सगळ्यांतच राम आहे.

modi_1  H x W:  

इथे आता मंदिर उभे राहील. भव्य मंदिर तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जबाबदाऱ्यांचे विभाजन झाले आहे. प्रत्येक जण आपापले काम करेल. त्यात आपले काम काय असेल? आपल्याला आपल्या मनातील अयोध्या सजवायची आहे. या भव्य कार्यासाठी प्रभू श्रीराम ज्या धर्माचे विग्रह मानले जातात, तो जोडणारा धर्म सर्वांची उन्नती करणारा धर्म आहे, त्याचा ध्वज आपल्याला आपल्या खांद्यावर घेऊन संपूर्ण विश्वाला शांती देणारा भारत आपल्याला उभा करायचा आहे. त्यासाठी आपल्याला मनात अयोध्या तयार करायची आहे. इथे जसजसे मंदिर उभे राहील, तसतशी ही अयोध्याही उभी राहिली पाहिजे. मंदिर पूर्ण होण्याच्या आत आपले मनमंदिर उभे राहणे गरजेचे आहे. त्याची आवश्यकता आहे. कसे असेल हे मनमंदिर?

काम क्रोध मद मान न मोहा
लोभ न छोब न राग न द्रोहा
जिनके कपट दंभ नही माया
तिनके हृदय बस हुं रघुराया

जात पात धनु धर्म बढाई
प्रिय परिवार सदन सुखदाई
सब कछी तुम हुं उर लायी
ते ही के हृदय रहुं रघु राई

आपल्या हृदयात रामाचा निवास असला पाहिजे. म्हणूनच सर्व दोष, रोष, विकारांपासून, द्वेषापासून, शत्रुत्वापासून ते मुक्त असले पाहिजे. भव्य राममंदिर निर्माणाचे कार्य हे भारतातील अनेक मंदिराप्रमाणे एखादे मंदिर उभे करण्यासारखे नाही. त्या सर्व मंदिरांच्या मूर्तींच्या आशयाचे पुन:स्थापन आणि पुन:प्रकटीकरण करण्याचा हा समारंभ समर्थ हातांनी संपन्न झाला आहे.”

या कार्यक्रमातील मोदींचे भाषण हे श्रीरामचंद्रांवरील एक अत्यंत अभ्यासपूर्ण असं भाषण होतं. शंभरपेक्षा जास्त संदर्भ तोंडपाठ असणं, श्रीरामांची वैश्विक व्याप्ती, उदाहरणांनी समजावून देणं, हे सारं अफाट होतं.

Anandvanbhuvani in Ayodhy 

मोदी आपल्या भाषणात म्हणाले, “आज राममंदिराचे स्वप्न साकार झाले आहे. भगवान राम प्रत्येकाच्या आत आहेत. आणि ते सर्वांचे आहेत. संपूर्ण भारत आज राममय झाला आहे. राममंदिर हे देशाच्या एकात्मतेचे आणि अखंडतेचे प्रतीक बनेल. राम आपल्या मनात आहे. जर आपल्याला काही काम करावयाचे असेल, तर प्रेरणा म्हणून आपण भगवान रामाकडेच पाहतो. भगवान रामाची अद्भुत शक्ती पाहा. इमारती उद्ध्वस्त झाल्या. अस्तित्व मिटविण्याचे बरेच प्रयत्नही झाले. पण राम अजूनही आपल्या संस्कृतीचा आधार आहे.”

ते पुढे म्हणाले, “श्रीरामाचे हे धोरण होते की ‘भय बिन न होय प्रीती’. म्हणुनच आपला देश जितका ताकदवर होईल, तितकेच प्रेम आणि शांतीही नांदेल. हे श्रीराममंदिर आपल्या संस्कृतीचे आधुनिक प्रतीक बनेल, आपल्या चिरंतन विश्वासाचे प्रतीक बनेल, आपल्या राष्ट्रीय भावनेचे प्रतीक बनेल आणि हे मंदिर, कोट्यावधी लोकांच्या सामूहिक संकल्प शक्तीचेही प्रतीक बनेल!”

मोदींनी आपल्या भाषणात देशविदेशात असलेल्या रामायणाचं आणि श्रीरामावरील श्रद्धेचं वर्णन केलं.

Anandvanbhuvani in Ayodhy 

साधारण पावणेदोनशे आमंत्रित पाहुणे ह्या सोहळ्यात सामील झाले. रामजन्मभूमी आंदोलनात अग्रभागी असलेले बरेच चेहरे या सोहळ्यात उपस्थित नव्हते. ह्या आंदोलनाच्या काळात हिंदू समाजाला मार्गदर्शन केलेले तीन सरसंघचालक - बाळासाहेब देवरस, रज्जूभैय्या आणि सुदर्शनजी आज आपल्यात नाहीत. अशोक सिंघल, राजमाता शिंदे यांच्यासारखी व्यक्तिमत्त्वही नाहीत. मात्र या सोहळ्याला साध्वी ऋतंभरा, उमा भारती, बाबा रामदेव, स्वामी अवधेशानंद गिरी, चिदानंद महाराज आणि अनेक संत उपस्थित होते. संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी, सह सरकार्यवाह दत्तात्रेयजी, कृष्ण गोपालजी इत्यादी विशेष आमंत्रितांमध्ये सामील होते.

संध्याकाळी अयोध्या जणू स्वर्गनगरी भासत होती. प्रत्यक्ष श्रीराम वनवासातून अयोध्येला परत आल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. शरयू तीरावरील सायंआरतीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत स्वतः उपस्थित असल्याने तेथे दिवाळीसारखं वातावरण होतं.

ह्या पाच ऑगस्टला अयोध्येच्या इतिहासात आणि भूगोलात आमूलाग्र परिवर्तन तर केलंच, तसंच ह्या दिवसाने भारताच्या भवितव्याची दिशा आणि रेषाही बदलली. पाच ऑगस्टनंतरचा भारत हा जास्त आत्मविश्वासाने भरलेला आणि जास्त शक्तिशाली असेल, हे निश्चित..!