पहिल्या स्वातंत्र्यलढ्याची कहाणी 'स्पार्टाकस'

विवेक मराठी    08-Aug-2020
Total Views |
स्पार्टाकसचे जीवनच स्वातंत्र्याच्या बिंदूभोवती फिरत आहे. तेरा वर्षांपासून गुलामीचे संस्कार होऊनही त्याचा आत्मा स्वतंत्र आहे. ही आस व्यक्तिगत नाही. प्रत्येक माणूस हा स्वतंत्र माणूस म्हणून जन्माला यावा आणि स्वतंत्र म्हणून जगावा, हे त्याचे ध्येय आहे. त्यामुळे कितीही अडचणी असो, कितीही प्रलोभने असो, तो आणि त्याची माणसे स्वातंत्र्याच्या कल्पनेने भारली गेली आहेत.
 
 The story of the first f

शेतीचा शोध इसवी सनपूर्व १२०००मध्ये लागला. या शोधामुळे माणूस स्थिर झाला आणि जमिनीचा मालकी हक्क ही संकल्पना उदयाला आली. जसा जमीनदार वर्ग शक्तिशाली होत गेला, तसे कमी खर्चात उपलब्ध होणारे मजूर मिळवण्याची निकड भासू लागली. यातूनच समाजबाह्य आणि समाजांतर्गत व्यक्तींनाही गुलाम बनवण्याचा मोह निर्माण झाला. जमिनीत श्रम करण्यासाठी माणसांची आवश्यकता असल्याने आक्रमण करून लोकांना पकडून आणले गेले. कर्जबाजारी किंवा गुन्हेगार व्यक्तींना गुलाम बनवणे सोपे होते. गुलामगिरीची अमानवी प्रथा अशा तऱ्हेने समाजात रुजली. एका मनुष्याला दुसऱ्या मनुष्यावर केवळ मालमत्तेप्रमाणे अधिकार चालवण्यास समाजमान्यता मिळाली.
दास्यत्वाची प्रथा इतिहासात जगभर आढळून येते. गुलामांची खरेदी-विक्री व्हायची. त्यांचे बाजार भरायचे. आधुनिक काळात समतेची कल्पना युरोपमध्ये जन्माला आली असली, तरीही एकेकाळी गुलामगिरी हा प्राचीन काळात सर्वात सुसंस्कृत मानल्या गेलेल्या आणि युरोपियन संस्कृतीचा पाळणा मानल्या गेलेल्या ग्रीकांच्या राज्यांचा आर्थिक पाया होता. या देशात लोकशाही होती, नागरिकांना मताचा हक्क होता, पण कष्ट करण्यासाठी मात्र त्यांच्या दिमतीला गुलामांचा वर्ग होता. पुढे प्रगत अशा रोममध्येसुद्धा गुलामगिरीची प्रथा चालूच राहिली.
 
आजच्या यंत्रयुगातसुद्धा मानवी श्रम आहेत, पण त्या श्रमांचे आर्थिक मूल्य आहे, मात्र प्राचीन काळातील गुलामगिरीत जे क्रौर्य होते, ते नाही. तेव्हा गुलामांना कसलेच हक्क नव्हते. त्यांच्या जीवनाला किंमत नव्हती आणि मृत्यूला प्रतिष्ठा नव्हती. या जाचातून सुटका करून घेण्यासाठी या काळात गुलामांनी तीन वेळा उठाव केले. यातला सर्वात महत्त्वाचा उठाव झाला तो इ.स.पू. ७३मध्ये. स्पार्टाकस या गुलामाने या उठावाचे नेतृत्व केले. हा उठाव केवळ व्यक्तिगत नव्हता. ह्याच्यामागे एक भव्य स्वप्न होते - 'गुलामगिरीचा अंत'. त्यानंतर जगभरात घडलेल्या अनेक उठावांना या लढ्याने प्रेरणा दिली. जगातील प्रत्येक माणूस हा स्वतंत्र म्हणून जगावा, हे स्वप्न पुरे होण्यासाठी मात्र वीस शतके जावी लागली.


 
१९६०मध्ये प्रदर्शित झालेला स्टॅन्ले क्युब्रिक दिग्दर्शित 'स्पार्टाकस' हा चित्रपट ही या उठावाची कहाणी. चित्रपटाच्या सुरुवातीला सांगितले जाते, स्पार्टाकस वयाच्या तेराव्या वर्षी गुलामगिरीत ढकलला गेला. मिठाच्या खाणीत काम करणे सोपे नसते. माथ्यावर तळपणारा सूर्य, शरीराला होणाऱ्या जखमा, त्यातून एकमेकांत मिसळलेले रक्त, घाम आणि त्याचा उग्र दर्प. कष्टाने पोसलेले शरीर मात्र बळकट होते. त्या काळात उच्चवर्गीयांच्या करमणुकीसाठी अनेक खेळ खेळले जात. त्यातला एक आवडीचा खेळ होता गुलामांचे द्वंद्व. कुणा एकाचा जीव जाईपर्यंत खेळले जाणारे युद्ध. या योद्ध्यांना 'ग्लॅडिएटर' असे संबोधले जाई. काम करणाऱ्या गुलामांपेक्षा त्यांचा दर्जा थोडा वरचा असे. त्यांना चांगले अन्न, दारू आणि स्त्रीसुखाचा लाभ दिला जाई. एक प्रकारे बळी जाणाऱ्या बोकडाला कसे पोसतात, तसाच हा प्रकार.
 
 
मिठाच्या खाणीत काम करणाऱ्या स्पार्टाकसची निवड कापुआ येथील ग्लॅडिएटर अकादमीत होते. बळकट शरीराला युद्धाचे प्रशिक्षण मिळायला सुरुवात होते. हळूहळू एक नामांकित योद्धा बनण्याकडे स्पार्टाकसची वाटचाल सुरू होते. इथेच व्हर्निया नावाच्या एका गुलाम तरुणीशी त्याची ओळख होते. खरे तर तिच्याबरोबर संबंध ठेवणे त्याला शक्य असते. नियमांनुसार त्यात काही वावगेही नसते. पण स्पार्टाकसला स्त्रियांचा अनुभव नसतो, स्त्रीसुखाची ओळख नसते. तो तिच्या प्रेमात पडतो.
.

seva_1  H x W:
 
याच वेळी क्रेशिअस नावाचा एक रोमन सेनापती आपल्या परिवारासह अकादमीत येतो. त्याच्या पत्नीच्या करमणुकीसाठी दोन गुलामांच्या द्वंद्वयुद्धाची मागणी होते. स्पार्टाकसपुढे उभा असतो ड्राबा नावाचा धिप्पाड काळा योद्धा. जिवावर उठण्याएवढे वैर असतेच कुठे! पण उपाय नसतो. स्पार्टाकस जेव्हा या योद्ध्याला त्याचे नाव विचारतो, तेव्हा तो म्हणतो, “एकमेकांच्या नावाशी काय देणे-घेणे! ग्लॅडिएटर मित्र करत नाहीत. समोर येणाऱ्या योद्ध्याला ठार मारणे एवढेच त्यांचे प्राक्तन असते." धारदार शस्त्रांनी एकमेकांवर आघात करताना स्पार्टाकस खाली पडतो. ड्राबा त्याला त्रिशूळाने भोसकणार, तोच उत्साहाने चेकाळणाऱ्या राजस्त्रिया ओरडतात, “किल हिम, किल हिम!” मृत्यूच्या तांडवातसुद्धा आनंदाने निथळणाऱ्या या लोकांची घृणा आणि स्वतःबद्दल पराकोटीची हतबलता या संमिश्र भावनेने ड्राबा राजपरिवाराकडे आपला मोर्चा वळवतो. एवढ्यात एका पहारेकऱ्याचा भाला त्याच्या पाठीत घुसतो. जखमी ड्राबाची मान क्रेशिअस आपल्या सुऱ्याने छाटून टाकतो.
अनोळखी माणसासाठी स्वतःचे प्राण देणाऱ्या ड्राबाचे बलिदान व्यर्थ जात नाही. स्पार्टाकसला आपल्यासारख्या निरपराधी माणसांवर होणाऱ्या अन्यायाची जाणीव होते. याच वेळी व्हर्नियाला, क्रेशिअसला विकण्याची बातमी त्याला समजते. हृदयातील ठिणगी आता वणव्याचे रूप धारण करते. तो गुलामगिरीच्या बेड्या तोडून टाकतो. अकादमीच्या पहारेकऱ्यांना ठार मारून, बाहेरील काटेरी कुंपण मोडून स्पार्टाकस आणि त्याचे साथीदार स्वतःची मुक्तता करून घेतात. या धावपळीत व्हर्नियाचीसुद्धा सुटका होते.
इटलीच्या गावागावातून बंडाचा नारा दिला जातो. आता त्यांचे लक्ष्य असते, अत्याचारी रोमन.
इटलीत लुटालुटीला सुरुवात होते. सैन्य उभे करण्यासाठी पैशाची गरज असतेच. यातून पाचशेच्या वर लढाऊ जहाजे खरीदली जातात आणि सुरुवातीला रोमच्या सैन्याचा पराभव करण्यात स्पार्टाकस यशस्वी होतो. आत्मविश्वासाने भारलेल्या स्पार्टाकसला समुद्रावरील एक चाचा सांगतो, “आता जरी जिंकला असाल, तरी रोम राज्य सत्तेपुढे तुमचा पराभव अटळ आहे. तरीही तुम्ही लढणार आहात?”
 
“मृत्यू हे प्रत्येक माणसाचे गंतव्य आहे. तरीही एक गुलाम आणि एक स्वतंत्र माणूस यांच्या मरणात फरक आहे. जीवन गमावणे जरी दोघांसाठी अटळ असले, तरीही स्वतंत्र माणूस जीवनाचा आनंद गमावतो. गुलामाची अत्याचारातून मुक्तता होते. त्याच्या वेदना संपतात. जीवनाचा अंत हा आमचा स्वातंत्र्यदिन. मरणाची भीती मला नाही, म्हणून लढण्याची चिंता मी करत नाही.” ज्यांचे जीवन एखाद्याच्या मर्जीवर अवलंबून होते, जे वस्तूप्रमाणे वापरले जात होते, ज्यांचे मरण हा मनोरंजनाचा विषय होता, त्यांच्यासाठी दोनच पर्याय होते - शत्रूवर विजय मिळवणे किंवा मरून मुक्ती मिळवणे.
 
एका गुलामाकडून पराभव स्वीकारणे रोमच्या सिनेटला मान्य नव्हतेच. लढाईचे नेतृत्व क्रेशिअसच्या हातात येते. स्पार्टाकसच्या पराभवापेक्षा महत्त्वाचे होते ते गुलामांच्या मनातल्या जागृत झालेली स्वातंत्र्याची जाणीव चिरडणे. स्पार्टाकस हा त्याच्या हयातीतच एक दंतकथा बनून राहिला होता. गुलामगिरीचे अस्तित्व राहण्यासाठी त्याचे मरण आवश्यक होते. या सुमारास व्हर्निया, जी त्याची पत्नी होते, गरोदर असते. येणाऱ्या जिवाचे काय भवितव्य असेल ही चिंता स्पार्टाकसला जाळत असते. भावनेच्या भरात तो आपल्या पत्नीला म्हणतो, “गुलामासाठी कोणता देव उभा राहील? हे बाळ तरी गुलामीपासून मुक्त होवो, ही माझी मनापासून इच्छा आहे."
 
 
स्पार्टाकसचे जीवनच स्वातंत्र्याच्या बिंदूभोवती फिरत आहे. तेरा वर्षांपासून गुलामीचे संस्कार होऊनही त्याचा आत्मा स्वतंत्र आहे. ही आस व्यक्तिगत नाही. प्रत्येक माणूस हा स्वतंत्र माणूस म्हणून जन्माला यावा आणि स्वतंत्र म्हणून जगावा, हे त्याचे ध्येय आहे. त्यामुळे कितीही अडचणी असो, कितीही प्रलोभने असो, तो आणि त्याची माणसे स्वातंत्र्याच्या कल्पनेने भारली गेली आहेत.
 
आता अंतिम युद्धाला सुरुवात होते. रोमची बलाढ्य सेना आणि स्पार्टाकसची चिवट फौज यातील अंत निश्चित असतो. ऐन वेळी पॉम्पेची मदत मिळाल्याने स्पार्टाकस हरतो. मुडद्यांच्या राशीमध्ये स्पार्टाकसला शोधताना जी काही पाचशे-एक माणसे हातात सापडतात, त्यांना क्रेशिअस जीवनाची लालूच दाखवून स्पार्टाकसला त्याच्या हातात देण्याचे आव्हान देतो, पण स्पार्टाकसच्या प्रेमापुढे मृत्यूची भीती हरते. फौजेतील प्रत्येक माणूस ताठ मानेने सांगतो, “आय ऍम स्पार्टाकस.” आयुष्यभर गुलामीत खितपत पडलेली ही माणसे मृत्यूच्या दर्शनानेसुद्धा घाबरत नाहीत. त्यांचे धैर्य, त्यांची एकी त्यांना मरणाला सामोरे जाताना सोबत करते. इथे स्पार्टाकस व्यक्ती म्हणून राहत नाही. तो स्वातंत्र्याचे प्रतीक बनतो. जन्माला येताना तो एकटाच असतो, पण त्याच्याबरोबर, त्याच्यासाठी मरणाला कवटाळायला शेकडो लोक तयार असतात.
 
शेवटी स्पार्टाकस शत्रूच्या हातात सापडतो. सूडाने पेटलेला क्रेशिअस, स्पार्टाकस आणि त्याच्या मुलाप्रमाणे असलेल्या अँटोनिअस यांच्यामध्ये द्वंद्वयुद्ध लावून देतो. दोघेही एकमेकांवर तुटून पडतात. उद्देश एकच - समोरच्या व्यक्तीला सुळावर चढवण्याच्या वेदना सहन कराव्या लागू नयेत.
अखेरीस स्पार्टाकस जिंकतो आणि त्याला सुळावर चढवले जाते. व्हर्निया मात्र निसटण्यात यशस्वी होते. रोमधून बाहेर पडताना, जिवंत सुळावर चढवलेल्या, मृत्यूच्या सावलीत असलेल्या स्पार्टाकसला ती त्याचा मुलगा दाखवून सांगते, “बघ, तुझा मुलगा स्वतंत्र आहे आणि स्वतंत्र म्हणून जगणार आहे. आता सुखाने प्राणत्याग कर.“ 
'स्पार्टाकस' ही कहाणी आहे स्वातंत्र्याची, प्रेमाची, एकनिष्ठेची आणि समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी दिलेल्या लढ्याची. चित्रपटाचा कॅनव्हास अतिशय मोठा आहे. स्टॅन्ले क्युब्रिकच्या उत्तम चित्रपटांमध्ये याचा समावेश होतो. बुद्धिमान, कल्पक स्टॅन्लेची सिनेतंत्रावर असलेली पकड याच्या चित्रीकरणात दिसून येते. चित्रपटाची कथा हॉवर्ड फास्ट याच्या 'स्पार्टाकस' या जगप्रसिद्ध कादंबरीवर बेतली आहे. चित्रपटाचा प्राण आहे तो अभिनयात. क्लार्क डग्लस (स्पार्टाकस), लॉरेन्स ओलिव्हिए (क्रेशिअसं) या भूमिका तर गाजल्याच, त्याचबरोबर जीन सिमन्सने व्हंर्नियाच्या भूमिकेत कमाल केली आहे.
 
चित्रपटाची तुलना अर्थातच तेथील नागरी हक्क चळवळीशी केली गेली. स्वातंत्र्य, वांशिक भेदभाव निर्मूलन आणि मानवतावाद यावर आधारभूत असलेला हा चित्रपट अमेरिकन लोकांना जवळचा वाटला. जागतिक इतिहासात स्पार्टाकसच्या उठावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अर्थात स्पार्टाकस हरला, उठाव मोडला गेला, गुलामी संपली नाही, तरीही रोमनांना त्यांच्या अन्यायाची जाणीव करून देऊन गेला. अन्यायाची परिसीमा झाली तर गुलाम जागृत होऊ शकतात आणि राज्यसत्तेला आव्हान देऊ शकतात, हे या उठावाने सिद्ध केले. उमरावांचे आपल्या गुलामांप्रती असलेले वर्तन सुधारले. गुलामांना काही हक्कसुद्धा देण्यात आले. स्पार्टाकसच्या मृत्यूने, त्याच्या बलिदानाने, त्याच्या धैर्याने त्याला अमर केले. क्रेशिअस, पॉम्पे आणि अनेक सरदार उमराव काळाच्या ओघात नष्ट झाले, पण स्वातंत्र्याची तुतारी फुंकणारा स्पार्टाकस पुढील अनेक पिढ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा बनला.