आपण सारेच मूलनिवासी...

विवेक मराठी    09-Aug-2020
Total Views |
@महेश काळे

आज नऊ ऑगस्ट. संपूर्ण जगात ‘विश्व मूलनिवासी दिवस’ साजरा होतोय. आपल्या भारतात राहणारा प्रत्येक जण ‘मूलनिवासी’ वा ‘आदिवासी’च असल्याने खरं तर आपल्या देशाला हा दिवस लागू होतच नाही, पण हिंदू समाजात फूट पाडण्यासाठी चर्च प्रेरित शक्तींनी गेल्या काही वर्षांपासून ‘आदिवासी दिना’चा हा घाट घातला आहे. 


seva_1  H x W:

अमेरिका, ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझिलंड यासारख्या देशांमध्ये ज्या पद्धतीने तेथील मूलनिवासींना त्यांच्या जन्मभूमीतून हाकलून त्यांच्या भूमीवर युरोपियन मंडळींनी कब्जा केला, तसाच प्रकार भारतातही झाला असून ‘बाहेरून’ आलेल्या आर्यांनी इथल्या आदिवासींना जंगलात जाण्यास प्रवृत्त केल्याचा सिद्धान्त काही समाजविघातक मंडळींनी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चालवला आहे. दुर्दैवाने जनजाती समाजातील तरुण, सुशिक्षित मंडळींनादेखील या षड्यंत्राची कल्पना नसल्याने तेदेखील आपल्या जनजाती बांधवांचा दिवस साजरा करण्याच्या भाबड्या कल्पनेने हा दिवस साजरा करताना दिसत आहेत.

एक लक्षात घेतले पाहिजे - ९ ऑगस्टचा दिवस हा ‘विश्व मूलनिवासी दिवस’ आहे. अमेरिकेसारख्या साम्राज्यवादी देशांनी विविध देशांमध्ये आपल्या वसाहती स्थापन करताना तेथील मूलनिवासींचे मोठ्या प्रमाणात शिरकाण केले, त्यांच्या हक्कासाठी संयुक्त राष्ट्राने घोषित केलेला हा दिवस आहे. आज जगभरात मूलनिवासींची संख्या लक्षणीय आहे. मूलनिवासींच्या हक्कांबाबत संयुक्त राष्ट्राने काढलेल्या जाहीरनाम्यावर २००७ सालीच भारतानेदेखील स्वाक्षरी केली आहे. अर्थात ‘मूलनिवासी’ ही संकल्पनाच भारताला लागू नसून भारतातील निवास करणारे सर्व जातिधर्मांचे लोक येथील ‘मूलनिवासी’ असल्याचे स्पष्ट करण्यास देखील भारत विसरला नाही. मुख्य म्हणजे या जाहीरनाम्यामध्ये मूलनिवासींना जे हक्क देण्याची अपेक्षा करण्यात आली आहे, ते बहुतेक हक्क भारतीय संविधानाने इथल्या जनजाती बांधवांना १९५१ सालीच बहाल केले आहेत.
 
 
या जाहीरनाम्यात फक्त एक कलम असे आहे, जे अत्यंत धोकादायक आहे, ते म्हणजे ‘स्वयंनिर्णयाचा आधिकार’! म्हणजे त्या त्या ठिकाणच्या मूलनिवासींना इच्छा असेल तर त्यांना वेगळे होण्याचा, दुसर्‍या देशांची मदत घेण्याचा अधिकार या कलमाद्वारे मान्य करण्यात आला आहे. ख्रिश्चन मिशनऱ्यांची आणि डाव्या संघटनांची जी धडपड चालू आहे, ती केवळ या कलमावर डोळा ठेवून चालू आहे. ‘तुम्हीच या देशाचे खरे मूलनिवासी आहात’ हे इथल्या जनजाती समाजाच्या मनावर ठसविण्यासाठी 'आदिवासी-मूलनिवासी’ दिन धडाक्यात साजरा करण्याचा त्यांचा उद्देश आहे. एकदा का इथल्या जनजाती समाजास ‘मूलनिवासी’ म्हणून मान्यता मिळाली की जनजाती क्षेत्रात ज्या ज्या ठिकाणी फुटीरतावादी कारवाया चालू आहेत, त्या अधिक गतिमान करून पुढच्या टप्प्यात या देशापासून वेगळे निघण्याची मागणी करायची, हा या शक्तीचा डाव आहे.
 
 
एक मात्र खरेच आहे की, जगात मूलनिवासींवर भयानक अत्याचार झाले आहेत. याचे एक ढळढळीत उदाहरण म्हणजे अमेरिकेतील चॅरोकी, चिकासॉ, चोक्ताव, मास्कोगी व सेमिनॉल या पाच प्रमुख जनजाती. सध्याच्या अमेरिकेत १८३०च्या पूर्वीपर्यंत या जनजातींची स्वत:ची छोटी राष्ट्रे होती. या जनजाती अत्यंत गुण्यागोविंदाने आपल्या हक्काच्या भूमीत राहात होत्या. मात्र आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्याच्या हव्यासापायी युरोपियन लोकांनी हळूहळू या देशात घुसखोरी करण्यास सुरुवात केली. काही वर्षांमध्येच युरोपियन लोकांनी आपल्या १३ वसाहती या मूलनिवासींच्या देशात स्थापन केल्या.

त्यांची हाव वाढतच गेली आणि या मूलनिवासींवर डोळे वटारण्यास त्यांनी सुरुवात केली. १८३०ला अँड्र्यू जॅक्सन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि त्यांनी ‘इंडियन रिमूव्हल अ‍ॅक्ट’ पारित करून घेतला. या कायद्यानुसार तेथील सर्व मूलनिवासींना आपला हजारो वर्षांपासून राहत असलेला देश सोडावा लागला. या सर्वांना बंदुकीच्या धाकावर अमेरिकन सैन्याने हजारो कि.मी. दूर पश्चिम भागात पाठवले. ही सर्व मंडळी त्या काळात चालत गेली होती. त्यामुळे या घटनेचे वर्णन ‘अश्रूंची रांग’ (ट्रेल्स ऑफ टिअर्स) असे केले गेले. त्यातले हजारो मूलनिवासी रोग होऊन गेले, तर अनेक जण सैनिकांच्या अत्याचाराला बळी पडले. बर्‍याच जणांना बुडवून मारण्यात आले. त्या काळातील हा सर्वात मोठा वर्णसंघर्ष होता, असे मानले जाते. मूलनिवासीपैकी खूपच कमी लोक त्यांना देण्यात आलेल्या भूमीवर परत जाऊ शकले.
 
आज गंमत म्हणजे मूलनिवासींच्या जमिनीवर कब्जा करून, हजारो मूलनिवासींना यमसदनी धाडून हीच अमेरिका संपूर्ण जगाला शांततेचा संदेश देत आहे. याच इंग्लंड, अमेरिकेसारख्या देशांनी जगातील मूलनिवासींची परिस्थिती सुधारली पाहिजे, त्यांच्या हक्कांकडे जगाचे लक्ष गेले पाहिजे यासाठी त्यांना ९ ऑगस्टचा दिवस बहाल केला आहे.
अर्थात १८३०नंतर अमेरिकेतील मूलनिवासींची जी स्थिती झाली, त्यापासून आपण भारतीयांनी मात्र बोध घ्यायला पाहिजे. राष्ट्र संघटित नसेल व घुसखोरीकडे दुर्लक्ष करणारे असेल, तर त्याची किती मोठी किंमत मोजावी लागू शकते याचे अमेरिकेतील पाच मूलनिवासी असलेल्या जनजाती एक मोठे उदाहरण आहे. प्रत्येक जागृत भारतीयाला तर हे उदाहरण कायम लक्षात ठेवावे लागेल.

 
'आदिवासी दिना'च्या निमित्ताने इथला जनजाती समाज एकत्र येत असेल व आपल्या प्रगतीबाबत विचार करत असेल तर त्याचे स्वागतच व्हायला हवे. दुर्दैवाने तसे होताना दिसत नाहीये. इथली शासन-प्रशासन व्यवस्था याविरोधात इथल्या जनजाती तरुणांना भडकवण्याचे काम काही संघटना करीत आहेत. हिंदू धर्माशी आपला काहीही संबंध नाही, राम आपला देव नाही, रावण आपली देवता आहे. महिषासुर, रावण, शूर्पणखा आपले आदर्श आहेत अशा प्रकारचे संभ्रमाचे वातावरण जनजाती समाजात निर्माण केले जात आहे. समाजात फूट पाडण्यासाठी या दिवसाचा उपयोग केला जात आहे, ही बाब गेल्या काही वर्षांत लक्षात आली आहे.
 
खरे तर जनजाती समाजाला एकूणच खूप मोठ्या गौरवशाली परंपरेचा वारसा लाभलेला आहे. कारण अनेक क्रांतिकारकांनी या देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात आपले योगदान दिलेले आहे. अनेकांनी इंग्रजांच्या विरोधात लढताना प्रसंगी बलिदानदेखील केलेले आहे. केवळ जनजाती समाजालाच नव्हे, तर संपूर्ण देशाला वंदनीय ठरतील अशा या महापुरुषांबद्दल संपूर्ण समाजातच एक आदराची भावना आहे. या महापुरुषांचा जन्मदिवस व बलिदान दिवस हे एका अर्थाने संपूर्ण समाजासाठी गौरवाचे असे दिवस आहेत. त्या दिवशी जनजाती गौरव दिवस साजरा करण्यास काय हरकत आहे? पण दुर्दैवाने ज्या अमेरिकेसारख्या महासत्तांनी तिथल्या कोट्यवधी मूलनिवासीचे शिरकाण केले व त्यांची भूमी हस्तगत करून त्यांना जंगलात जाण्यास प्रवृत्त केले, त्याच वसाहतवादी देशांनी जगातील मूलनिवासींना ९ ऑगस्ट हा दिवस बहाल केला आहे. एका अर्थाने वसाहतवाद्यांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या कोट्यवधी मूलनिवासीना श्रद्धांजली वाहण्याचा हा दिवस आहे. म्हणजे शोक दिवस आहे. असा दिवस भारतातील जनजाती समाजासाठी गौरवशाली दिवस कसा असू शकतो, याचा विचार जनजाती समाजातील युवकांनी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे या भारतात राहणारे आपण सर्व जण ‘मूलनिवासी‘ आहोत व एकाच गौरवशाली परंपरेचे, संस्कृतीचे घटक आहोत आणि मुख्य म्हणजे ‘आपण सारे भारतीय आहोत’ हा भाव समाजातील प्रत्येकाने जर मनात बाळगला, तर समाजात कुठलाही संघर्ष निर्माण होणार नाही.
 
तूर्तास...
वसाहतवाद्यांच्या हव्यासापायी बळी पडलेल्या कोट्यवधी मुलनिवासींना ९ ऑगस्टच्या निमित्ताने भावपूर्ण श्रद्धांजली!!
या भारत देशातील 130 कोटी मूलनिवासी आपल्या हक्कासाठी चाललेल्या लढाईत सदैव आपल्यासोबत आहेत.