गोष्ट एका आत्मनिर्भर महिलेची

विवेक मराठी    12-Sep-2020
Total Views |
उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरेवाडीतील माधुरी सलगर या महिलेने कोरोनाच्या महासंकटात संधी शोधून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला आहे. माधुरीताईंची ही उद्यमशीलता अनेकींना आत्मनिर्भरतेची प्रेरणा देत आहे.


 atmnirbhar woman_1  

संपूर्ण जगभर कोरोना महामारीने उच्छाद मांडल्याने सर्वच उद्योग-व्यवसायांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अनेकांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरांतून अनेक चाकरमानी नोकरी, व्यवसाय बंद झाल्याने गावाकडे आले आहेत. 'आत्मनिर्भर' हा शब्द माहीत नसलेले, पण त्याचा अर्थ पुरेपूर समजलेले काही चाकरमानी शहरातला रोजगार बुडाला म्हणून हताश न होता नवा मार्ग निवडत आहेत. त्यांच्यात काहीतरी करण्याची जिद्द निर्माण होत आहे. 'आत्मनिर्भर' व्हावे यासाठी धडपड करत असलेले असंख्य तरुण-महिला खेडोपाडी दिसताहेत. या प्रत्येकाची कहाणी आणि संघर्ष वेगळा आहे, पण प्रत्येकाची वाट सकारात्मक आहे. त्यात धमक आहे, प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द, चिकाटी आणि मेहनत तर आहेच, शिवाय व्यवसायिक दृष्टीकोनही ठासून भरलेला आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे माधुरी पंडित सलगर होय.

मराठवाड्यातील एका छोट्याशा गावातील माधुरीताईंची कहाणी कित्येकांसाठी प्रेरणादायक ठरत आहे. त्यांच्या कथेत अनेक चढउतार आणि यशापयश आहेत. भटक्या समाजातल्या माधुरीताईंच्या घरात कोणताही व्यावसायिक वारसा नसताना त्यांनी देशी कुक्कुटपालन व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली आहे.

आत्मनिर्भरचा असा एक प्रवास

बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या माधुरीताईंचे माहेर सोलापूर जिल्ह्यातील आचेगाव, तर सासर कोरेवाडी (ता. तुळजापूर) हे गाव. पंधरा वर्षांपूर्वी पंडित सलगर यांच्याशी माधुरीताईंचा विवाह झाला. घराची सोळा एकर जिरायती शेतजमीन आहे. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नात घरखर्च शक्य नसल्याने पंडित यांनी पंधरा वर्षांपूर्वीच गावाकडून शहरात स्थलांतर केले. ते पुण्यातील कोंढवा भागात भाड्याने घर घेऊन रिक्षा चालवू लागले.

घरची जबाबदारी, मुलांचे संगोपन यामुळे पैशाची बचत करणे अवघड जात होते. बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याची मोठी ओढताण होत असे. याच दरम्यान माधुरीताई कोंढवा (पुणे) इथल्या कोलते-पाटील सोसायटीमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करू लागल्या. पैशाची बचत करून सलगर दांपत्याने मोठ्या कष्टाने कोंढवा भागात स्वतःच्या कमाईचे घर घेतले. घराचे आणि रिक्षाचे हप्ते भरणे सुरळीत सुरू असताना कोरोनाच्या महासंकटाने त्यांच्यासमोर आव्हान निर्माण केले.


women_1  H x W:

आता पुढे काय करावे? या विवंचनेत असताना माधुरीताईंच्या मनात गावाकडे जाऊन कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्याचा विचार सुरू झाला. या अगोदर गावाकडे असताना त्यांनी सोलापूर जिल्हा उद्योग केंद्रातून तीन दिवसांचे कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षण घेतले होते. कुक्कुटपालनातील बारकावे आणि अर्थकारणाचे धडे माधुरीताईंना मिळाले होते. पती पंडित यांनाही ह्या व्यवसायाचे महत्त्व पटले. पुण्यातच या व्यवसायाच्या हालचालींना गती मिळाली. पण पुरेसे आर्थिक भांडवल जवळ नव्हते. या काळात कोणीही मदतीला धावून आले नाही. माधुरीताईंच्या निश्चयापुढे नियतीनेसुद्धा हार मानली. शेवटी अवघ्या वीस हजार रुपयांच्या भांडवलावर कुक्कुटपालन व्यवसाय उभा राहिला. पती पंडित यांच्या प्रोत्साहनामुळेच ही आत्मनिर्भर सखी गावखेड्यातही ताठ मानेने उभी आहे.

माधुरीताई सांगतात, "कोरोनाने मला संधीची वाट मोकळी करून दिली. शहरातून गावाकडे आलेली मी आता नव्या वाटेवर चालण्याचे धाडस करतेय. पहिला लॉकडाउनचा काळ सुरू व्हायच्या थोडे आधी आम्ही शहरातून आमच्या मूळ गावाकडे परतताना खडकी (पुणे) येथील अंडी उबवणी केंद्रातून कावेरी जातीची शंभर पिल्ले खरेदी केली. सर्व पिल्ले रिक्षात बसवली होती. गावाकडे येताना खूप अडचणी आल्या, रस्त्यावर कुठेही प्यायला पाणी मिळाले नाही. त्यामुळे आमचेच काय, पिल्लांचेही खूप हाल झाले. गावात प्रवेश केल्याच्या पहिल्याच दिवशी कुक्कुटपालनचा नवा व्यवसाय सुरू केला.

 

तत्पूर्वी कोंबड्यांसाठी शेडही उभारली नव्हती. तीन-चार दिवस पिल्लांना पुरेसे अन्नही मिळाले नाही. अशातच संरक्षणाअभावी ३० पिल्ले मरण पावली. त्यामुळे मला पंधरा-वीस हजाराचा मोठा फटका बसला. पहिल्याच टप्प्यात असा कटू अनुभव आला, पण डगमगले नाही. मनात निश्चय करून कुक्कुटपालन यशस्वी करण्यासाठी धडपडू लागले. शेड उभारणीसाठी आमच्याकडे पैसेही नव्हते. शेडऐवजी तारेचे कुंपण तयार करून घेतले. गळ्यातले सोने गहाण ठेवून पिल्लांसाठी चारा आणि औषधे खरेदी केली. यामुळे पिल्लांना वेळोवेळी लसीकरण करता आले. विशेष म्हणजे त्यांचे चांगले संगोपन आणि व्यवस्थापन केले. तीन-चार महिन्यांत कोंबड्यांची चांगली वाढ झाली. मोकळ्या माळरानावर आता कोंबड्यांचा चिवचिवाट ऐकू येतोय. हा व्यवसाय पाहण्यासाठी शेजारच्या आयाबायांचे, शेतावरून जाणार्‍या प्रत्येकाचे पाऊल इकडे वळत आहे."

स्वतः माधुरीताई यांनी स्वतःला एक नियम घालून दिलेला आहे, तो म्हणजे स्वतःच्या कामात झोकून देणे. नियोजन आणि अंमलबजावणीमुळे माधुरीताईंच्या व्यवसायाला हळूहळू आकार येत आहे.

women_1  H x W: 

जागेवरच कोंबड्यांची विक्री

विक्रीच्या नियोजनाबाबत माधुरीताई म्हणाल्या की, "टाळेबंदीच्या काळात कोरेवाडीसारख्या दीड हजार लोकसंख्या असलेल्या गावात येऊन आमच्या कोंबड्या कोण खरेदी करील, असा प्रश्न आमच्यासमोर होता. आकाड (आषाढ) महिन्यात कोंबड्यांना मागणी वाढू लागली. त्यामुळे आमच्यासमोरचा कोंबडी विक्रीचा प्रश्न सुटला. गावातील ग्राहक शेतात येऊन कोंबड्यांची खरेदी करू लागले. पिल्ले खरेदी आणि खाद्य व्यवस्थापनाचा खर्च वजा जाता मला चार-पाच महिन्यात सोळा ते सतरा हजारांचा नफा झाला. दररोज पंधरा ते वीस अंडी निघतात. एक अंडे दहा रुपयांना विकले जाते. त्यातून दररोज दोनशे रुपये मिळतात. अडचणीच्या या काळात कोंबडीपालनाने आर्थिक शाश्वत मार्ग सापडला आहे."

आता स्थलांतर नाही

स्थलांतराबाबत माधुरीताई म्हणाल्या की, "कुक्कुटपालन हा शाश्वत उत्पन्न देणारा व्यवसाय असल्याने आर्थिक फटका कमी असतो. देशी कुक्कुटपालन केल्यास अधिक उत्तम, म्हणूनच मी देशी कोंबड्यांकडे वळले. अवघ्या पाच महिन्यांत मला या व्यवसायातून गावातच चांगला रोजगार मिळाला. गावपातळीवरच हाती जास्तीचे चार पैस मिळू लागले आहेत. एका कुटुंबाचा खर्च भागेल इतके पैसे मिळत असताना पुन्हा शहराचा रस्ता का पकडायचा?

कोरोनामुळे आम्ही शहरातून गावाकडे आलो. गावानेच आम्हाला जगणे शिकवले, तर मग आता गाव का सोडायचे? गावातच खरी शाश्वती आहे. भविष्याचा विचार केला असता गावातच राहून आत्मनिर्भर व्हायचे, असा ठाम निश्चय मी केला आहे."

भविष्यातील उपक्रम

भविष्यातील वाटचालीच्या संदर्भातील नियोजन सांगताना माधुरीताई म्हणाल्या की, "गावात रस्त्यांचा व विजेचा अभाव, अन्य पायाभूत सुविधा नसल्या तरी गावात राहून खूप काही करता येते. ज्याच्याकडे शेती, पाणी आहे आशांसाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत. मला तर मोकळ्या जागेचे, शेतीचे महत्त्व पटू लागले आहे, म्हणूनच बँकेतून कर्ज काढून माझा हा व्यवसाय वाढवण्याचे नियोजन सुरू आहे. यात होणारा फायदा आणि आर्थिक व्यवस्थापनाची पूर्ण काळजी घेत शेळी व म्हैसपालन करण्याचा विचार सुरू आहे.

ग्रामीण महिलांमध्ये काहीही करून दाखवण्याची धमक आहे. गांडूळ खत, शेती व शेतीपूरक उद्योग, कुटिरोद्योग, सामूहिक शेती, कुक्कुटपालन, शेळी व म्हैस पालन, मळणीयंत्र, घरगुती पदार्थ आदी अनेक प्रकारच्या व्यवसायांतून महिला आर्थिक सक्षम होऊ शकतात, त्यासाठीच या महिलांना बचत गट स्थापन करून त्यांना एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्नात आहे."

माधुरीताई यांच्या व्यवसायाची तत्परता, जिद्द, चिकाटी आणि यश पाहून गावखेड्यात माधुरीताई हा कौतुकाचा विषय ठरला आहे.

संपर्क
माधुरी पंडित सलगर - ७७६७९०५७९७