शैलीदार, समन्वयी संपादक - मामासाहेब घुमरे

विवेक मराठी    18-Sep-2020
Total Views |
दैनिक तरुण भारतचे माजी मुख्य संपादक व कथालेखक दिगंबर भालचंद्र उपाख्य मामासाहेब घुमरे यांचे शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारा लेख.

seva_1  H x W:


सामान्यत: असे दिसते की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सर्वोदयी विचारधारा यांच्यात काही समन्वय असला, तरी या विचारधारा समांतर प्रवास करीत असतात. त्यांच्यात समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न करणारे चिंतक, विचारवंत पत्रकार संपादक म्हणजे दिगंबर भालचंद्र घुमरे. शैलीदार लेखनासाठीही ते ज्ञात होते. मामासाहेब या उपनावाने सर्वख्यात असलेले मामासाहेब हे दै. तरुण भारतचे प्रदीर्घ काळ कार्यकारी संपादक व ४-५ वर्षे मुख्य संपादक होते.

मामासाहेब लहानपणापासून संघस्वयंसेवक होते. पदवी घेतल्यावर काही काळ त्यांनी शिक्षण खात्यात नोकरी केली. लॉची पदवी घेऊन वकिली व्यवसायाला प्रारंभ केला. वकिली करण्याचा त्यांचा पिंड नव्हता. भाऊराव देवरस यांच्या सूचनेवरून ते सुरुवातीला हिंदुस्थान समाचारमध्ये व नंतर तरुण भारतमध्ये पत्रकार म्हणून रुजू झाले. भरपूर व्यासंग, वाचन व लेखनाची साधीसोपी सरळ शैली यातून त्यांच्याकडे पत्रपंडित भाऊसाहेब माडखोलकर यांचे उत्तराधिकारी म्हणून बघितले जाऊ लागले. आपण तरुण भारतचे संपादक होणार याची मामासाहेबांनाही कल्पना असावी, पण बाळासाहेब देवरस यांनी मा.गो. वैद्य यांना या जबाबदारीसाठी आणले. बाबूराव वैद्यही सुरुवातीला उपसंपादक म्हणून रुजू झाले व नंतर संपादक झाले. मामासाहेब स्वत: व तरुण भारतचा पूर्ण चमू त्यांनी बाबूरावांच्या पाठीशी उभा केला. हे करताना आपणावर अन्याय झाला अशी भावनाही त्यांनी कधी व्यक्त केली नाही. संघस्वयंसेवक म्हणून हा आदेश मनोमन मानला. बाबूराव मुख्य संपादक झाल्यावर मामासाहेब कार्यकारी संपादक झाले. बाबूराव संपादक असेपर्यंत त्यांनी स्वत:ला तरुण भारतशी बांधून घेतले. ना कुठल्या स्तंभाची जबाबदारी स्वीकारली, ना स्वत:ची पुस्तके काढली. मामासाहेब भाषण द्यायलाही कुठे बाहेर जात नसत. एवढे त्यांचे तरुण भारतशी समर्पण होते.
 
 विनोबा व त्यांचा परंधाम आश्रम, सर्वोदयी विचारधारा यांच्याशी कायम संपर्क होता. आचार्य दादा धर्माधिकारी, त्यांचे पुतण्या, चंद्रशेखर धर्माधिकारी, रा.कृ. पाटील, बाबा आमटे या सर्वांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. त्यांचा एकूण पोषाख वगैरेदेखील सर्वोदयी कार्यकर्त्याला शोभेल असा होता. भाऊसाहेबांची लेखनशैली राबवीत असताना त्यांनी त्या शैलीतील खंडसळपणा पणा अलगद बाजूला काढला होता. त्यांचे चिंतन, मनन, लेखन हे कायम समन्वयवादी राहिले. संघसंस्कार कायम ठेवीत सर्वोदयातील करुणा, सेवा हा भाव त्यांनी त्यांचा स्थायिभाव म्हणून स्वीकारला होता. या विचारधारा समांतर न जाता त्यात समन्वय व्हावा, असे विचारसूत्र त्यांनी कायम आपल्या लेखनात स्वीकारले होते.
 
 
१९७५ साली आणीबाणी लागली. २-४ महिन्यांत त.भा.चे मुख्य संपादक बाबूराव वैद्य यांना ‘मिसा’खाली स्थानबद्ध करण्यात आले. तरुण भारतचे प्रकाशन करणारे श्री नरकेसरी प्रकाशनाचे अनंत अधिकारी स्थानबद्ध झाले. फक्त प्रबंध संपादक खांडकेकर व कार्यकारी संपादक मामासाहेब घुमरे बाहेर होते. बाहेरचे सर्व वातावरण विरोधी होते. सरकारी जाहिराती बंद झाल्या होत्या. व्यावसायिक जाहिरतादारांना धमकाविले जात होते. फक्त इतकेच नाही, तर बाहेर साम्यवादी पक्ष फॅसिस्टविरोधी संमेलने आयोजित करून तरुण भारत बंद करावे. तरुण भारतवर बंदी घातली जावी अशी मागणी करीत होते. त्या काळात मामासाहेबांनी अतिशय धीरोदात्तपणाने तरुण भारत सुरू ठेवले. सरकारची वक्रदृष्टी होणार नाही याची काळजी घेत असताना स्वयंसेवकांलाही बट्टा लागू दिला नाही.
 
 
आणीबाणी काळात डॉ. हेडगेवार यांची जयंती आली, त्या वेळी लेखकवर्गापैकी कुणीही संघाशी जवळीक दाखवायला तयार नव्हते, म्हणून यांनी बालवीर बाबूराव हरकरे  यांना लेख लिहायला सांगितला. बाबूराव हरडरे यांनी सुरुवात केली, ‘डॉ. हेडगेवार माझे मित्र आहेत. त्यांच्या सगळ्या मतांशी मी सहमत नाही, पण ते मूलत: काँग्रेसी होते हे मी विसरू शकत नाही.' या प्रारंभामुळे तो लेख प्रसिद्धिपूर्व नियंत्रणातून अलगद पसार झाला.
 
 
तरुण भारतवर सरकारची वक्रदृष्टी होऊ नये, म्हणून मामासाहेबांनी इंदिरा गंधी यांच्या २० कलमीवर एक निबंध स्पर्धा आयोजित केली होती. एकाही काँग्रेसी वृत्तपत्राने, सरकारनिष्ट वृत्तपत्रांनी २० कलमीवर स्पर्धा वगैरे घेतली नाही, म्हणून त्यांना सरकारी व पक्षीय दट्ट्याही मिळाला होता. मामासाहेबांनी सर्वोदयवादी व परंधाम आश्रमाशी असलेल्या संधानातून आचार्य विनोबा भावे यांचे मौन सुटताना ते या स्थितीत आणीबाणीचे समर्थन करणार नाहीत याची काळजी घेतली होती. सर्वोदयी परिवारातील अनेक विचारवंतांना त्यांनी तरुण भारतमध्ये लिहिते केले. त्याच वेळी आणीबाणी विरोधी लढ्यात एसेम जोशी यांची सभा नागपूरला घेण्यासाठी ज्यांनी प्रयास केले होते, त्यातील एक मामासाहेब होते. संपूर्ण अंधारात रात्री ती सभा झाली होती.
बाबूरावांनंतर मामासाहेब मुख्य संपादक झाले, पण त्यांनी स्वत:चा डिंडिम वाजविला नाही. राजीव गांधी पंतप्रधान असताना ओमानला जाणार
 
 
होते. त्या दौर्‍यासाठी सरकारविरोधी विचारधारेच्या वृत्तपत्रांना आमंत्रित केले होते. वास्तविक मामासाहेब त्या वेळी निवृत्तीच्या सीमेरेषेवर होते. अन्य कुणीही संधी सोडली नसती, पण मामासाहेबांनी संस्थेचे हित लक्षात घेऊन भावी संपादक लक्ष्मणराव जोशी यांना त्या विदेश दौर्‍यात पाठविले.
 
 
तरुण भारतमधून निवृत्त झाल्यावर त्यांनी एखाद्या स्वयंसेवकांप्रमाणे स्वत:ला विश्व हिंदू परिषदेच्या कामात झोकून दिले. श्रीरामजन्मभूमी आंदोलनावर त्यांनी लिहिलेले पुस्तक आजही संदर्भग्रंथ म्हणून वापरले जाते. निवृत्तीनंतर त्यांनी कथालेखन सुरू केले. अतिशय दर्जेदार, कसदार कथा त्यांनी तरुण भारतमधून वाचकांना दिल्या. या सर्व कथांतून आपण जणू ग.त्र्यं. माडखोलकर यांचे साहित्य वाचतो आहे, अशी अनुभूती येते.
 
 
श्रीराम कारसेवेसाठी मामासाहेब स्वत: एक कारसेवक म्हणून अयोध्येला गेले होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांना त्यांची स्मृती दगा देऊ लागली होती. त्यातच विदेशात नैरोबीला आपल्या मुलाकडे गेले. तेथून परत येताच अवघ्या ८ दिवसांत मृत्यूने त्यांना गाठले.
 
 
मामासाहेबांच्या निधनाने एक शैलीदार संपादक महाराष्ट्राने गमावला आहे.