कोरोनाच्या संकटाने उघडली नव्या संधींची विविध कवाडे!

विवेक मराठी    02-Sep-2020
Total Views |
@संजय देवधर

कोरोनाचे संकट जसे आरोग्याशी संबंधित आहे, तसाच जगातील सर्व देशांच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा मोठा परिणाम झाला. या काळात अर्थव्यवस्था ठप्प होऊन मनुष्याचे दैनंदिन जीवनही विस्कळीत झाले. पण अशा या संकटातही नाशिक येथील काही जणांनी संधी शोधली आणि त्या संधीचे सोने करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.

seva_1  H x W:

कोरोनाचे संकट मार्च महिन्यात अचानक व अकल्पितपणे धडकले. उद्योग-धंद्यांचे कंबरडे मोडले. त्यामुळे अर्थव्यवस्था कोलमडली. अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. रोजगारांवर गदा आली. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाउनचा उपाय अवलंबावा लागला. परिणामी छोट्या गावापासून दिल्लीपर्यंत सर्वत्र व्यवहार ठप्प झाले. अनेक जण बेरोजगार झाले. पाहता पाहता सहा महिने उलटले, पण हे संकट कधी दूर होईल ते अजूनही कोणीच सांगू शकत नाही. मात्र संकटे येताना आव्हानांचे काळे ढग घेऊन येतात, तशीच त्यांना आशेची सोनेरी किनारही असते. धडपडी माणसे स्वस्थ न बसता अडचणीतून मार्ग काढतातच. कोरोनाच्या संकटानेही नव्या संधींची विविध कवाडे उघडली. अनेक स्त्री-पुरुषांनी त्या संधीचे सोने करून इतरांनाही प्रेरणा दिली.

लोकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन, नव्या संधी ओळखून त्याचे सोने करतो त्याला नक्कीच यश मिळते. कोरोनाला आपत्ती न मानता अनेकांनी नवे व्यवसाय सुरू केले. त्यात यश मिळवत इतरांनाही सामावून घेतले. या काळात सांस्कृतिक व कलाक्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. नाट्यव्यवसायात अभिनेते-अभिनेत्रींपासून नाट्यगृहाच्या डोअरकीपरपर्यंत अनेक जणांचे व त्यांच्या कुटुंबाचे पोट नाटकांवर अवलंबून असते. नाट्यव्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. तसेच गायन मैफली, नृत्याचे व सर्वच सांस्कृतिक कार्यक्रम बंद आहेत. नाट्यगृहे, चित्रपटगृहे, सभागृहे बंद असल्याने त्यावर ज्यांची रोजीरोटी अवलंबून आहे, ते सगळेच बेकारीचा सामना करीत आहेत. चित्रकला, शिल्पकला या व एकूणच कलेच्या क्षेत्रात नवनिर्मितीत गुंतणाऱ्या हातांना सध्या काम नाही. त्यामुळे एक प्रकारची पोकळी निर्माण झाली. शैक्षणिक क्षेत्रातही नर्सरी ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपासून त्यांना शिकविणारे शिक्षक, प्राध्यापक व संबंधित सर्वच घटकांना कोरोनाच्या संकटाने त्रस्त केले. बऱ्याच ठिकाणी सुरुवातीच्या काळात गरजूंना पैशांचे व मदतीचे वाटप करण्यात आले. मात्र अनेकांनी स्वाभिमानी वृत्तीने अशी मदत घेणे नाकारले. मदतीलाही मर्यादा असतात, त्यामुळे पुढे तीही आटली. जसजसे लॉकडाउनचे नियम शिथिल होऊन 'मिशन बिगिन अगेन'ची तुतारी वाजली, तसे नवचैतन्य पसरू लागले. अनेकांनी आपले आधीचे व्यवसाय तात्पुरते बाजूला ठेवून पुनश्च हरिओम म्हणत नव्याने प्रारंभ केला. या काळात वर्क फ्रॉम होम ही नवी संस्कृती उदयाला आली. हॉटेल्स, रेस्टॉरंट अजूनही बंदच आहेत. त्यावर पोट अवलंबून असणाऱ्यांंचे खूपच हाल होत आहेत. त्यामुळेच नाश्त्यापासून दोन वेळच्या जेवणापर्यंत घरपोच डबा देणारे अनेक हात पुढे आले. कोणतेही काम हलके किंवा कमी दर्जाचे नसते, असा विचार करून नव्याने सुरुवात करून त्यात जम बसविण्यात यश मिळविण्याऱ्यांची नाशिकमधील ही काही प्रातिनिधिक उदाहरणे. त्यांच्याच शब्दातील मनोगतांंमधून इतरांनाही नक्कीच प्रेरणा मिळेल.


'नाशिकमार्ट' - आम्ही आहोत ना!
सिद्धेश आडगावकर


seva_1  H x W:

पारंपरिक सराफी पेढी असूनही प्राप्त परिस्थितीत मार्ग काढणे गरजेचे होते. त्यातूनच नाशिकमार्ट ही संकल्पना सुचली. लॉकडाउनमुळे घरोघरी अडकलेल्यांंना 'आम्ही आहोत ना' हा विश्वास दिला. घरपोच वस्तू पुरविण्यास प्रारंभ केला. प्रत्येक घरात दैनंदिन लागणारा दर्जेदार भाजीपाला, फळे, बेकरी उत्पादने, दूध व दुग्धजन्य पदार्थ, स्नॅक्स, शीतपेये घरपोच पुरविली जातात. ३००पेक्षा जास्त उत्पादनांचा त्यात समावेश आहे. www.nashikmart.com या वेबसाइटवर व ऍप डाउनलोड करून ऑर्डर नोंदविता येते. हस्तस्पर्शाशिवाय सुरक्षित पॅकिंग करून, कोणतेही जादा चार्जेस न आकारता ग्राहकांच्या थेट दारापर्यंत ती ऑर्डर पोहोचविली जाते. त्याशिवाय ५ ते २५ टक्के सवलतही देण्यात येते. सध्या श्रावण महिना सुरू असून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गणेशोत्सवासाठी सत्यनारायण व गणेशपूजन किट्स उपलब्ध आहेत. त्यात फुले, दूर्वा व सर्व पूजासाहित्य अंतर्भूत आहे. येत्या काळात नव्याने अनेक उत्पादने सामील करण्यात येतील. माझा मित्र विशाल पाटील याचीही खूप मदत मिळते.


ग्राहकांशी 'सूर' जुळले
आनंद ओक


seva_1  H x W:

संगीतकार म्हणून अनेक वर्षांपासून सांस्कृतिक क्षेत्रात माझा वावर आहे. सोनी मराठी वाहिनीवरील सावित्रीज्योती या मालिकेला संगीत देण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले असतानाच मार्च महिन्यात कोरोनाचे संकट आदळले. १५ मार्चपासून सगळे व्यवहार ठप्प झाले. 'संगीत देवबाभळी' नाटकाचा नियोजित अमेरिका दौराही रद्द झाला. अशा वेळी करायचे काय? असा प्रश्न उपस्थित झाला, तेव्हा सुगरण आईचा छंद मदतीला धावून आला. आईच्याच मार्गदर्शनाखाली थालीपीठ भाजणी, सातू पीठ, आंबोळी पीठ तयार करून घरोघरी जाऊन पोहचवले. चांगला प्रतिसाद मिळू लागला. समाधानी ग्राहकांशी 'सूर' जुळले. गेल्या महिन्यात देवबाभळीमधील अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिच्याशी विवाह झाला. त्यामुळे आणखी दोन हात मदतीला आले आहेत. लवकरच इन्स्टंट ढोकळा पीठ, तसेच इतरही काही उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचतील. दोन-तीन कलाकार मित्रही मला जॉइन झाल्याने शहरातील विविध भागात आम्ही पोहोचू.


घरपोच मास्क्सना, पर्सेसना मागणी
प्राची शिंत्रे

seva_1  H x W:  

दोन वर्षांपासून मी विविध ठिकाणी फिरून, वेगवेगळ्या प्रदर्शनांत सहभागी होऊन पर्सेस, पिशव्या विक्रीचा व्यवसाय करीत आहे. कोरोनाच्या संकटाने मीदेखील सर्वांप्रमाणे घराच्या चार भिंतीत अडकले. यातून कसा मार्ग काढावा या चिंतेत असतानाच होम डिलिव्हरीची कल्पना सुचली. दोन महिन्यांपासून पर्सेस, पिशव्या ग्राहकांना घरी पोहोचवते. मास्क्सची मागणी आल्याने त्यांचाही पुरवठा सुरू केला. सध्या वारली डिझाइन्सच्या व पैठणी पर्सेसना जास्त पसंती मिळते. व्हॉट्स ऍपवरून, फेसबुकवरून ऑर्डर्स मिळतात. कोरोनाच्या संकटाने नवी वाट मिळवून दिली, असेच म्हणावे लागेल.


आत्मविश्वास वाढला, 'आत्मनिर्भर' होणार!
कौस्तुभ परांजपे


seva_1  H x W:
 
माझी परांजपे प्रोफेशनल अकॅडमी आहे. आठवी ते एम.कॉम.पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवतो. सुमारे ३५० विद्यार्थी शिकतात. मार्चपासून कोचिंग क्लासेस बंद करावे लागले. अशा वेळी खाद्यपदार्थ तयार करून घरपोच देण्याची कल्पना समोर आली. 'परांजपे खाद्यतृष्णा' व्यवसायाचा शुभारंभ झाला. रबडी, खरवस, पाणीपुरी हे सहज घरपोच न मिळणारे पदार्थ जून महिन्यापासून सुरू केले. ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माझ्याजवळ विद्यार्थ्यांचा डेटा तयारच असल्याने त्याचाही फायदा झाला. मी मूळचा अंमळनेरचा आहे. घरी आई उत्तम पदार्थ करायची. बहीण नसल्याने मी आईला स्वयंपाकात मदत करायचो. त्याचा आत्ता फायदा झाला. पत्नी रेवती व मी पदार्थ तयार करतो. भाऊ सुमंत घरोघरी ऑर्डर्स पोहोचवतो. मदर्स डेअरीचे व अजिंक्य विसे यांच्याकडचे दूध वापरतो. खरवसाचा उद्योग 'पाटणकर फूड्स' नावाने सुरू केला आहे. क्लासमधले सहकारी अंकुश जोशी यांनाही माझ्या नव्या उद्योगात सामावून घेऊन अर्थार्जनाची संधी दिली आहे. दोन महिन्यात आत्मविश्वास वाढला असून स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.


कलेला वाव मिळाला!
सायली कुलकर्णी

माझी आई शरयू पाराशरे आणि मी दोन वर्षांपूर्वी छोट्या प्रमाणात घरीच केक करायला सुरुवात केली. लोकांना आवडल्याने त्याचे व्यवसायात रूपांतर झाले. कोरोनाच्या काळात बर्थडे केकच्या ऑर्डर्स खूपच वाढल्या. विक्रीत ५० टक्के वाढ झाली आहे. जेव्हा ग्राहकांना त्यांच्या पसंतीचा केक वेळेवर घरपोच मिळतो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर पसरणारा आनंद आमचे बळ व समाधान वाढवतो. मी केक बनवायला शिकवतेदेखील, त्यालाही प्रतिसाद वाढतो आहे. मध्यंतरी सोशल डिस्टन्सिंग पाळून केकचे क्लासेस घेतले. तरुण मुली-महिलांनी सध्या असलेल्या वेळेचा सदुपयोग करीत केक शिकून घेतले. अनेकांच्या मागणीनुसार केकला लागणारे सर्व साहित्य घरपोच पुरवले जाते.


विदेशातील शिष्यांंना संगीताचे धडे
अनिरुद्ध भूधर

 
seva_1  H x W:
 
गेल्या वर्षी मी व माझ्या मित्रांनी स्कूल ऑफ म्युझिकची स्थापना केली. तबला, बासरी, गिटार, ड्रम्स, पियानो अशी विविध वाद्ये व शास्त्रीय गायन शिकायला ५० विद्यार्थी यायचे. कोरोनाच्या संकटाने लॉकडाउन सुरू झाले. सूर हरवतात की काय अशी भीती वाटायला लागली. पण त्यावर मात करीत ऑनलाइन क्लासच्या संकल्पनेतून पुन्हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो. आता विदेशातील काही शिष्यांंना संगीताचे धडे देत आहोत. फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, यूके येथील ८ विद्यार्थी पियानो व गिटार शिकत आहेत. याखेरीज सुमारे ३० विद्यार्थी ऑनलाइन संगीतशिक्षण घेत आहेत. मी स्वतः ड्रम्स शिकवतो, संजू घ्याले (गिटार), वैभव गरजमल (पियानो), ओमकार अपस्तंभ (तबला), सुधीर गुरव (बासरी) ही वाद्ये शिकवतात. रसिका नातू आणि पल्लवी दांडेकर शास्त्रीय गायन शिकवतात. सोशल मीडियावर मार्केटिंग केल्याने सर्वांपर्यंत सहज पोहोचता येते.


वारली चित्रांना मिळाले नवे रूप
कृष्णा भुसारे (विक्रमगड)


seva_1  H x W:

मी आदिवासी आहे. लहानपणापासून वारली चित्रे रंगवतो. चित्रकलेची आवड असल्याने त्यातच करिअर करायचे ठरवले. मी जी.डी आर्ट कोर्स करत आहे. कोरोनाने कॉलेज बंद झाले. मग घरी बसून वारली पेंटिंग सुरू केले. मला मुंबईहून १०० छत्र्यांवर वारली चित्रे रंगवून देण्याची ऑर्डर मिळाली. महिला बचत गटाने तयार केलेल्या मास्कवर वारली चित्रे रंगवून दिली. आता परत ऑर्डर मिळत आहेत. पारंपरिक वारली चित्रकलेला या निमित्ताने वेगळे नवे रूप देण्याची संधी मिळाली. एप्रिलमध्ये माझे नाशिकला वारली चित्रांचे प्रदर्शन ठरले होते. आता कोरोनाचे संकट दूर झाल्यावर मी रसिकांसाठी माझी चित्रे घेऊन नाशिकला येईन.
 
 
९४२२२७२७५५