आखातात घोंघावतेय ‘बदलांचे' वारे!

विवेक मराठी    28-Sep-2020
Total Views |

आखातातील राजकारण इस्रायल आणि अरब देश यांच्यामधील शत्रुत्वाने ओळखले जाता प्रामुख्याने शियापंथीय विरुद्ध सुन्नीपंथीय अशा पद्धतीने राजकारण केले जावे, असे अमेरिकेला वाटते. त्यासाठी इस्रायलविरुद्ध एकत्र आलेल्या अरब देशांना इराणविरुद्ध एकत्र आणणे गरजेचे आहे. त्यासाठीही इस्रायल आणि अरब देश यांच्यामध्ये समेट घडवून आणणे गरजेचे आहे. ताज्या कराराने याची सुरुवात करण्यात आली आहे



iran_2  H x W:

इस्रायल, संयुक्त अरब अमिराती आणि बहारिन यांच्यामध्ये नुकताच एक करार करण्यात आला आहे. अरब-इस्रायल संघर्षाच्या दृष्टीकोनातून हा करार अत्यंत महत्त्वाचा आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील विशेषतः दुसर्या महायुद्धानंतरचे जागतिक - विशेषतः आखाती प्रदेशातील राजकारण हे अरब-इस्रायल संघर्षाने प्रभावित झालेले होते. इस्रायलची निर्मिती, पॅलेस्टाइनची निर्मिती, त्यांना राजकीय मान्यता देण्याचे विषय, त्यावरून इस्रायलचे अरब देशांशी झालेले संघर्ष यामुळे दोघांमधील शत्रुत्व प्रचंड वाढले होते. यामध्ये अनेक महासत्ताही गुंतल्या होत्या. आखाती प्रदेशाशी काहीही संबंध नसूनही तेथे आपला प्रभाव वाढवण्यासाठी अमेरिकेनेही त्यात प्रवेश केला. याखेरीज अरब देशांना समर्थन देणारे देश किंवा इस्रायलला समर्थन देणारे देश यामुळे ही दरी वाढत गेली.

पुढे एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीनंतर अमेरिकेला आखातामध्ये नव्या शत्रूच्या रूपाने एक देश पुढे येऊ लागला. तो देश होता इराण. परिणामी, अमेरिकेने आपल्या धोरणांना मुरड घालत अरब-इस्रायल संघर्षापेक्षा इराणचा प्रतिबंध करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट बनवले. इराण हा अणवस्त्रप्रसारबंदी करारावर स्वाक्षरी करणारा पहिला देश होता. पण करारावर स्वाक्षरी करूनही इराणने गुप्तपणे अण्वस्त्र विकसित करण्याचा कार्यक्रम सुरू केला होता. अर्थातच अमेरिकेला तो मान्य नव्हता. त्यामुळेच अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध लादले. पण बराक ओबामा यांनी एक आण्विक करार करून इराणवरील निर्बंध काढून टाकले. यासाठी इराणने अण्वस्त्रांचा विकास करणार नाही, अशी हमी दिली होती. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर हा करार मोडीत काढला. इराण पूर्ण आखातामध्ये दहशतवाद पसरवत आहे, अनेक देशांमधील दहशतवादी संघटनांना इराणचे फार मोठे समर्थन मिळते आहे, इराणकडून क्षेपणास्त्र विकास केला जातो आहे अशा अनेक सबबीवजा आरोप ट्रम्प यांनी केले. इराणला कोंडीत पकडण्यासाठी इतर देशांवरही ट्रम्प यांनी दबाव टाकायला सुरुवात केली.

सद्य परिस्थितीतील राजकारण पाहता, आखातातील राजकारण इस्रायल आणि अरब देश यांच्यामधील शत्रुत्वाने ओळखले जाता प्रामुख्याने शियापंथीय विरुद्ध सुन्नीपंथीय अशा पद्धतीने राजकारण केले जावे, असे अमेरिकेला वाटते. त्यासाठी इस्रायलविरुद्ध एकत्र आलेल्या अरब देशांना इराणविरुद्ध एकत्र आणणे गरजेचे आहे. त्यासाठीही इस्रायल आणि अरब देश यांच्यामध्ये समेट घडवून आणणे गरजेचे आहे. ताज्या कराराने याची सुरुवात करण्यात आली आहे, असे म्हणता येईल.


iran_1  H x W:
iran_3  H x W:

थोडक्यात, आखातात आता नव्या प्रकारचे राजकारण आकाराला येते आहे. त्यात इस्रायल हा देश अरब देशांबरोबर असेल आणि इराण हा त्या सर्वांचा सामाईक शत्रू असणार आहे. इराणला लक्ष्य करण्यासाठी अरब देश आणि इस्रायल यांच्यामधील शत्रुत्त्व पूर्णपणे नष्ट करणे हे अमेरिकेचे उद्दिष्ट आहे. अलीकडेच समोर आलेल्या वृत्तानुसार, उत्तर कोरियाचा प्रमुख किंम जोंग याच्या मदतीने इराणने अण्वस्त्रांचा विकास पुन्हा सुरू केला आहे. अमेरिकेसाठी ही नक्कीच डोकेदुखी आहे. अमेरिकेचे धोरण इस्रायलधार्जिणे राहिले आहे. अमेरिकेच्या सांगण्यावरूनच हा करार करण्यात आला आहे. या करारामधून अरब देशांच्या मनात इस्रायलविषयी चांगली भावना निर्माण व्हावी, इस्रायलविषयीचे शत्रुत्व कमी व्हावे असा अमेरिकेचा हेतू आहे. थोडक्यात, आखातातील संपूर्ण राजकारणाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न ट्रम्प करताहेत.


हा सर्व प्रकार करत असताना मूळ पॅलेस्टिनी लोकांचा प्रश्न दुर्लक्षित राहतो आहे. इस्रायलच्या निर्मितीनंतर प्रामुख्याने पॅलेस्टिनी लोकांवर अन्याय झाला आहे. परंतु हा करार करतानाही अरब देशांनी पॅलेस्टिनी लोकांचाच बळी दिला आहे. आजपर्यंत अरब देश पॅलेस्टाइनबरोबर होते. परंतु आता ते इस्रायलशी हातमिळवणी करत असतील तर पॅलेस्टाइनची बाजू कोण मांडणार, त्यांच्यावरचा अन्याय कोण दूर करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पॅलेस्टाइनचा बळी देऊन हा करार करण्यात आला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. इस्लामी देशांमध्ये धार्मिक भावनेपेक्षा आर्थिक गोष्टींना प्राधान्य दिले जात असल्याचे या करारातून समोर आले आहे.
 

iran_4  H x W:

संयुक्त अरब अमिराती आणि इस्रायल यांच्यात राजकीय संबंध नव्हते. १९७१मध्ये संयुक्त अरब अमिरातीची निर्मिती झाली. पण संयुक्त अरब अमिरातीने इस्रायलला राजकीय मान्यता दिली नव्हती. इस्रायलमध्ये यूएईचा दूतावासदेखील नव्हता. आता या कराराने त्याची सुरुवात होऊ शकते. ही भूमी अरबांची आहे, इस्रायल बाहेरून आला आहेअसे म्हणणारे अरब देश आता इस्रायलला राजकीय मान्यता देण्याच्या प्रक्रियेत येऊ लागले आहेत. ताज्या करारानंतर इस्रायलविषयी सॉफ्ट कॉर्नर किंवा सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. परिणामी, अरब देशांचा इस्रायलकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलू लागेल. संयुक्त अरब अमिरातीने इस्रायलला राजकीय मान्यता दिल्यास अरब-इस्रायल संघर्षाचा पायाच खचून जाईल. गेल्या ५० वर्षांपासून सुरू असलेला पॅलेस्टाइन लिबरेशन फोर्स किंवा पॅलेस्टाइन मुक्तिसंघर्ष निरर्थक ठरेल. अमेरिका स्वतःचे राजकारण पुढे नेण़्यासाठी जाणीवपूर्वक हा सर्व खटाटोप करत आहे.


इस्रायल हा तंत्रज्ञान, विज्ञान यामध्ये खूप प्रगती केलेला देश आहे. अरब देशांना अशा प्रकारची प्रगती करायची आहे, इस्रायलच्या या सर्व प्रगतीचा फायदा अरब देशांनाही करून घेता येईल, असे कारण सांगून हा करार कऱण्यात आला आहे. या करारामुळे इस्रायल आणि अरब देश यांच्यामधील विज्ञान, तंत्रज्ञान यांच्यातील सहकार्य वाढेल असे सांगितले जात आहे. परंतु आर्थिक, व्यापारी सहकार्य, संशोधन सहकार्य हा केवळ दिखावा किंवा मुलामा आहे. अरब देशांच्या मनातील इस्रायलविषयी घृणा, तिरस्कार कमी करणे आणि इराणविरुद्ध रोष निर्माण करणे हे मूळ कारण आहे.

एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी - या त्रिपक्षीय करारामध्ये सौदी अरेबियाचा समावेश नाही. वस्तुतः, सौदी अरेबिया हा इस्लामी देशांचे नेतृत्व कऱणारा देश आहे. परंतू त्यांना बगल देत संयुक्त अरब अमिराती, बहारिन यासारख्या लहान देशांनी हा करार केला आहे. त्यामुळे या कराराचा आखाताच्या राजकारणावर फार मोठा प्रभाव पडेल असे मुळीच नाही. तथापि, अरब देशांची मानसिकता बदलत आहे, हे यातून निश्चितच स्पष्ट होत आहे.

येणार्या काळात कदाचित सौदी अरेबियादेखील यात सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात सौदी अरेबियाला उघडपणे यात सामील होता येणार नाही, कारण तुर्कस्तान हा सौदी अरेबियाचा प्रतिस्पर्धक आहे. आखाती प्रदेशात या दोन देशांमध्ये सध्या नेतृत्वाचे भांडण सुरू आहे. तुर्कस्तान कट्टर इस्लामी भूमिका घेत अरब देशांचे नेतृत्त्व आम्हीच करू शकतो असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी तुर्कस्तानचे प्रमुख काश्मीर मुद्द्यावर जाणीवपूर्वक बोलत आहेत. सौदी अरेबिया जर या करारात सहभागी झाला, तर त्यांच्या नेतृत्त्वपदाला धक्का लागू शकतो. इस्लामी जगतामध्ये सौदी अरेबियाचे महत्त्व कमी होऊ शकते. म्हणूनच तो आजमितीला यापासून लांब आहे.

भविष्यातील चित्र मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुनर्निवडीवर अवलंबून आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प पुन्हा निवडून आले, तर ते निश्चित आखाती प्रदेशाला आपल्या राजकारणाचे केंद्र बनवतील. त्यांचे प्रमुख दोन शत्रू आहेत - एक म्हणजे उत्तर कोरियाचा किम आणि दुसरा इराण. इराणमध्ये कोणत्याही परिस्थितीत सत्तांतर घडवून आणणे हा ट्रम्प यांचा प्रमुख अजेंडाच आहे. त्यासाठी ते काहीही करू शकतात. भारताला आणि इतर देशांना इराणवर आर्थिक निर्बंध टाकण्यास जसे भाग पाडले, त्याच पद्धतीने इस्रायलला आणि इतर अनेक देशांना एकत्र आणून आखातात इराणला एकटे पाडू शकतात. त्यासाठीच ही राजकीय पुनर्मांडणी सुरू आहे. म्हणूनच हा करार सत्तापालटासाठीचे चित्र बदलणारा आहे. नव्या समीकरणांची नांदी म्हणून या कराराकडे पाहावे लागेल. पुढे जाऊन जॉर्डन, इजिप्त, सौदी अरेबिया हे या करारात सामील झाले आणि इस्रायलची भूमिका बदलली, तर पॅलेस्टाइनचा बळी जाणार, हे अटळ आहे. त्यामुळे हा करार पॅलेस्टाइनसाठी धोक्याची घंटा आहे.


त्रिपक्षीय करारामध्ये सौदी अरेबियाचा समावेश नाही