सांगलीतील माणुसकीचा 'ऑक्सिजन'

विवेक मराठी    29-Sep-2020
Total Views |

कोविड-१९च्या विविध लक्षणांपैकी एक लक्षण श्वसनातील अडथळा आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होणे होय. त्यामुळे वैद्यकीय ऑक्सिजनची उपलब्धता हे सर्वच रुग्णालये, आरोग्य प्रशासन यांच्यासामोरचे महत्त्वाचे आव्हान ठरत आहे. यासाठीचा एक उपाय म्हणजे ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मशीन. ज्या रुग्णांमध्ये ऑक्सिजन पातळी घटली आहे, मात्र व्हेंटिलेटरवर ठेवण्याची गरज नाही, अशांना या उपकरणाद्वारे आपली ऑक्सिजन पातळी वाढवता येऊ शकते. सांगलीतील एक स्वयंसेवी गट सांगली सायकल स्नेही ग्रूपने हा उपक्रम हाती घेतला आहे, राष्ट्रीय संघटन मंडळ ही संस्थाही त्यात सहभागी झाली.

'Oxygen' of humanity in S

कोविड-१९च्या साथीचा मुक्काम जसजसा वाढतोय, तसतशा त्याच्याशी संबंधित समस्या अधिक गंभीर रूप धारण करत आहेत. याचेच उदाहरण म्हणजे गेल्या काही आठवड्यांत सातत्याने रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा, ऑक्सिजन सिलिंडरची चोरी, तस्करी अशा घटना वारंवार ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे वैद्यकीय ऑक्सिजनची उपलब्धता हे सर्वच रुग्णालये, आरोग्य प्रशासन यांच्यासामोरचे महत्त्वाचे आव्हान ठरत आहे, तर दुसरीकडे उद्योगांच्या हिश्श्याचा ऑक्सिजनही कोविड रुग्णांच्या उपचारासाठी वापरावा लागत असल्याने उद्योग क्षेत्रातही चिंतेचे वातावरण आहे.

श्वसनातील अडथळा आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होणे ही कोविड-१९च्या विविध लक्षणांपैकी महत्त्वाची लक्षणे आहेत. अनेक रुग्णांमध्ये Happy hypoxia आढळून येतो. यात रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले, तरी त्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्या व्यक्तीला श्वसनाचा कोणताही त्रास होत नाही. मात्र ऑक्सिजनची पातळी हळूहळू अधिकच खालावून रुग्णाला गंभीर अवस्थेत नेण्यासाठी ही बाब कारणीभूत ठरू शकते. अपुऱ्या ऑक्सिजनमुळे फुप्फुसाचा संसर्ग होऊन कित्येक कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागत आहे. जिथे कोरोना रुग्णांसाठी बेडच अपुरे पडत आहेत, तिथे पुरेसे व्हेंटिलेटर कुठून उपलब्ध होणार? अनेक रुग्णालयांत व्हेंटिलेटर मिळवण्यासाठी रुग्णांना नंबर लावावे लागत आहेत. सगळ्याच शहरांमध्ये थोड्याबहुत फरकाने ही परिस्थिती आढळून येत आहे. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याचे निदान झाल्या झाल्या त्वरित त्यावर उपाय करता आल्यास पुढचा धोका टळू शकतो. यासाठीचा एक उपाय म्हणजे ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मशीन. ज्या रुग्णांमध्ये ऑक्सिजन पातळी घटली आहे, मात्र व्हेंटिलेटरवर ठेवण्याची गरज नाही, अशांना या उपकरणाद्वारे आपली ऑक्सिजन पातळी वाढवता येऊ शकते. हे छोटेखानी उपकरण घरच्या घरीही वापरता येते. मात्र त्याची किंमत ४५-५० हजारांच्या घरात असते. म्हणजे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच. सांगलीतील एका स्वयंसेवी गटाने मात्र हे उपकरण अल्प भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिले आहे.

हा उपक्रम हाती घेणारे लोक आहेत 'सांगली सायकल स्नेही' या ग्रूपचे सदस्य. १०० लोकांचा हा ग्रूप असून त्यात वेगवेगळ्या क्षेत्रांतील, वेगवेगळ्या वयोगटातील लोकांचा सहभाग आहे. सायकल सहलींचे आयोजन करणे, सायकलिंगच्या माध्यमातून गो ग्रीनची संकल्पना लोकांना पटवून देणे हे या ग्रूपचा मुख्य उद्देश. त्याच्या जोडीला या ग्रूपचे प्रतिनिधी सातत्याने लोकोपयोगी उपक्रम राबवत असतात आणि सर्व सदस्यही त्यात उत्स्फूर्त सहभाग घेतात. निवडणूक काळात मतदानाविषयी जनजागृती करणे असो, आरोग्य शिबिरे असोत किंवा पाणी फाउंडेशनच्या कामातील सहभागमाणुसकी जपण्याचे छोटे छोटे प्रयत्न ही मंडळी करत असतात.


'Oxygen' of humanity in S

कोरोनाच्या संकटाने जेव्हा सामाजिक विलगीकरणाच्या भिंती बांधल्या, तेव्हा त्या भिंतीतूनही माणुसकीचे हे झरोके आपले काम करत राहिले. कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळातच सांगली सायकल स्नेही ग्रूपचे सदस्य स्वयंसेवकांच्या भूमिकेत शिरले. त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना तशी कल्पना देऊन प्रशासनाला लागेल ती मदत करण्याची तयारी दर्शवली. प्रत्यक्ष कृतीतून कामाला लागले. सुरुवातीला पीपीई किटवर घालायचे फेस शील्ड तयार करून ते पोलीस, डाॅक्टर, आरोग्य सेवक, मेडिकल दुकानदार यांना वाटले. याबाबत माहिती देताना सांगली सायकल स्नेही ग्रूपचे प्रतिनिधी भूषण रत्तू यांनी सांगितले की, "सुरुवातीला अनेक डाॅक्टरांनी भीतीपोटी प्रॅक्टिस बंद केली होती. आम्ही OHP शीट, स्पंज, इलॅस्टिक आदी साहित्य आणून स्वत: फेस शील्ड्स तयार केले. ते डॉक्टरांना देऊन त्यांना सांगितले की तुम्ही घाबरू नका. प्रॅक्टिस करा. फील्डवर काम करणाऱ्या पोलिसांनाही फेस शील्ड्स वाटले."

अशा उपक्रमाच्या जोडीला या मंडळींनी ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. एकीकडे शासकीय, खासगी सर्वच रुग्णालयांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत होते. केवळ श्वसनातील अडथळ्यांमुळे किंवा शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे अनेक रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागते. घरातच विलगीकरण करून या लक्षणांवर उपाय करता आले - म्हणजेच शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवता आली, तर रुग्णालयांतील रुग्णसंख्या कमी होईल व साहजिकच त्यांच्यावरील ताण कमी होईल या विचारातून सांगली सायकल स्नेही ग्रूपने हा उपक्रम हाती घेतला. राष्ट्रीय संघटन मंडळ ही संस्थाही त्यात सहभागी झाली.

ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटरच्या खरेदीसाठी ग्रूपमधील सदस्यांनी आपापल्या कुवतीनुसार वर्गणी गोळा करून योगदान दिले. त्यातून भारतीय बनावटीचे १० ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर खरेदी केले आणि ते रुग्णांना किमान भाड्यात उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.

हे ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर नक्की काम कसे करते आणि त्याची उपयुक्तता कशी आहे, हे पाहू. ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर हे अतिशय कमी जागा व्यापणारे पोर्टेबल उपकरण असून त्यासाठी सिलिंडर किंवा तत्सम आधाराची गरज नसते. हे उपकरण हवेतील नायट्रोजन गाळून जास्तीत जास्त ऑक्सिजन श्वसनावाटे शरीरात जाण्यास मदत करते.

या उपक्रमाचा अनुभव सांगताना भूषण रत्तू म्हणाले, "आमच्याकडे सुरुवातीला आलेल्या एका रुग्णाची ऑक्सिजन पातळी ८०पर्यंत कमी आली होती. त्याची अॅन्टीजेन टेस्ट निगेटिव्ह आली होती, पण स्वॅब टेस्टचा रिपोर्ट दोन दिवसांनी येणार होता. अशा रुग्णांनी काय करायचं? कारण टेस्ट पाॅझिटिव्ह न आल्याने त्यास कोविड रुग्णालयांमध्येही घेत नव्हते आणि नाॅनकोविड रुग्ण म्हणूनही दखल घेतली जात नव्हती. त्या वेळी आम्ही आमच्याकडचा ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर त्याला देऊन त्याची ऑक्सिजन पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न केले.

कोरोनावर उपचार होऊन बऱ्या झालेल्या अनेक रुग्णांना घरी आल्यानंतर ऑक्सिजन पातळी चांगली ठेवण्यासाठी या उपकरणाची मदत होते.
आम्ही या उपकरणाच्या वापराबाबत काही नियमावली तयार केली आहे. डाॅक्टरांच्या शिफारसपत्राशिवाय आम्ही हे उपकरण देत नाही. तसेच त्या रुग्णाला किती आणि किती वेळ ऑक्सिजन द्यायचा, याबाबतही त्या रुग्णाच्या कुटुंबीयांनी डाॅक्टरांच्या सूचनांचे पालन करणे अपेक्षित असते. आम्ही केवळ उपकरण उपलब्ध करून देतो."

केवळ ३०० रुपये या दराने भाडे आकारून लोकांना हे उपकरण उपलब्ध करून दिले जात आहे. पैसा मिळवणे हा उद्देश नसल्याने या उपकरणांच्या भाड्यातून जो काही पैसा मिळतो, तो पुन्हा समाजकार्यासाठीच वापरला जातो. तसेच या उपकरणाच्या मेंटेनन्ससाठीही हा पैसा वापरला जातो. जर रुग्णाची परिस्थिती नसेल, तर त्याच्याकडून एक रुपयाही घेत नसल्याचे रत्तू सांगतात.

आता हे १० ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर किती जणांना पुरणार.. माहीत नाही. अधिकाधिक लोकांना या उपकरणाचा लाभ व्हावा, यासाठी ही सायकलप्रेमी सांगलीकर मंडळी प्रयत्नशील आहेत. त्यांचे हे प्रयत्न पाहता पुढच्या काळात त्यांच्याकडील या उपकरणांच्या संख्येत वाढही होईल. मात्र हे छोटेसे पाऊल अन्य लोकांनाही या कठीण काळात माणुसकीचा ऑक्सिजन पसरवण्याची प्रेरणा देईल.