युरोपची दुखरी नस – मुस्लीम स्थलांतरित

विवेक मराठी    04-Sep-2020
Total Views |
तथाकथित उजव्या विचारसरणीच्या लोकांनी कुरआन शरीफ जाळणे, फाडणे अशा घटनांमधून त्याचे प्रतिबिंब पडते आहे. ते स्वीकारार्ह नसले, तरी नॉर्वे, स्वीडन यासारख्या दोन पिढ्या पूर्णपणे सेक्युलर राहिलेल्या देशांमध्ये केवळ ३-४ वर्षांत का घडते आहे, याचा विचार प्रथम तर तेथील प्रशासनाने आणि फार मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित झालेल्या मुस्लिमांनी केला पाहिजे.

musalim_1  H x

दि. २८ ऑगस्टला ऐन शुक्रवारी मालमो, स्वीडन येथे घडलेल्या घटनांनी युरोपची दुखरी नस अधिक दुखावली. तथाकथित उजव्या विचारसरणीच्या लोकांनी मुस्लीमबहुल वस्तीच्या शेजारी कुरआन शरीफची प्रत उघड्यावर जाळली. त्यांच्या विचारसरणीचा पाठीराखा असलेल्या रासमुस पालुदान या नेत्याने स्वीडनमध्ये येऊ नये, यासाठी मुस्लीम स्थलांतरितांनी निदर्शने केली. ती हिंसक झाली नसती तरच नवल ठरते. सुमारे तीनशे मुस्लीम बुरखाधारी तरुण निदर्शक अवघ्या काही मिनिटांत मुख्य रस्त्यावर जमले. त्यांनी रस्त्यावर टायर जाळले, मोटारी जाळल्या, दुकाने फोडली. सर्व कसे अपेक्षित घडले. दुसरे दिवशी ओस्लो येथे प्रदर्शन करणाऱ्या स्थलांतरितांनी पोलिसांच्या गाड्यांवर हल्ले केले. निदर्शने करणाऱ्या मुस्लिमांसमोरच एका महिलेने त्यांचा निषेध करत कुरआन शरीफची पाने फाडली. त्यामुळे तर निदर्शक अधिकच चेकाळले. निदर्शनांचे लोण स्थानिक प्रशासनाने इतरत्र पसरू दिले नाही. इथे एक प्रथमच स्पष्ट केले पाहिजे की प्रत्येक धर्माच्या अनुयायांना त्यांच्या धर्मग्रंथाचा आदर राखला जावा असे वाटणे साहजिकच आहे. तसे व्हायला पाहिजे. त्यामुळे कुरआन शरीफ जाळणे अथवा फाडणे हे निंदनीयच ठरते. त्याचा निषेध केलाच पाहिजे.

इथे प्रश्न उद्भवतो की हा आदर राखणे हे काय फक्त बिगर-मुस्लिमांसाठीच आहे काय? मुस्लीम समाजावर त्याच तऱ्हेने इतर समाजांच्या सामाजिक भावनांचा आदर करण्याची जबाबदारी नसते का? अगदी हाच प्रश्न युरोपमध्येच नाही, तर भारतातल्या बिगर-मुस्लीम समाजांसमोर आहे. बेंगळुरूला पै. महंमदांच्या संदर्भात केलेल्या विधानामुळे हिंसक हल्ले आणि जाळपोळीची घटना थेट मालमोप्रमाणेच घडली होती. मागच्याच आठवड्यात एका मुस्लीम युवतीने हिंदू देवतांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या विरोधात हिंदूंनी तक्रार नोंदविली. कुठेही दंगा झाला नाही. हेच बेंगळुरू किंवा मालमो आणि ऑस्लो येथेही का घडले नाही? यामागची मुस्लीम मानसिकता ना हिंदूंनी, ना युरोपातील देशांनी जाणण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.

 
musalim_1  H x

इस्लाममध्ये धर्मनिंदेची शिक्षा

अगदी क्षुल्लक कारणावरून कोणत्याही ठिकाणचा विशेषकरून तरुण मुस्लीम हिंसा करण्यावर का उद्युक्त होतो, याचे कारण थेट पैगंबरांच्या मदिनेतील वास्तव्याच्या काळापर्यंत जाते. पै. मुहंमद आणि त्यांच्या अनुयायांना मक्केतील वास्तव्यादरम्यान सामाजिक संघर्ष, बहिष्काराबरोबरच छळाला सामोरे जावे लागले. शेवटी त्यांनी मदिनेला पलायन – हिजरा करण्याचा निर्णय घेतला. 

मदिनेला प्रस्थापित होण्याच्या दरम्यान सशस्त्र संघर्षात मुसलमानांना बद्रच्या लढाईत प्रथम विजय मिळाला. त्यानंतरही पै. मुहंमदांच्या विरोधात उभे राहणारे काही लोक होतेच. त्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी पै. मुहंमदांच्या संमतीने जे जालीम उपाय अमलात आणण्यात आले, ते इथे The Life of Muhammad, ले. Muhammad Husayn Haykal आवृत्ती क्र. ८मधून दिले आहेत. मदिनेचा एक नागरिक अबू अफ्क हा कवी होता. तो प्रथमपासून पै. मुहंमद आणि इस्लाम यांचा टीकाकार होता. त्याने बद्रच्या विजयानंतर आपले टीकास्त्र थांबवावे, असे अपेक्षित होते. तसे घडले नाही, तेव्हा पै. मुहंमदांचा अनुयायी सालिम इब्न उमयरने त्याचा आवाज बंद पाडण्याची कामगिरी स्वीकारली. अबू अफ्क त्याच्या स्वत:च्या अंगणात झोपेत असताना सालिमने त्याचा खून केला. दरम्यान मरवानची मुलगी अस्मा हीदेखील पै. मुहंमदांच्या विरोधात कविता करत असे. तिला लहान मुले होती. तिचा आवाज बंद पाडण्यात उमयर इब्न अफ्क याने पुढाकार घेतला. अस्मा आपल्या बाळला रात्री जवळ घेऊन झोपली असता उमयरने तिच्या बाळाला हळुवारपणे बाजूला करून तिला ठार मारले. तसेच काब इब्न अल अश्रफ हा एक विरोधक बद्रच्या विजयानंतर मक्केला पळून गेला. तेथे त्याने पै. मुहंमदांच्या विरोधात कविता प्रसृत करायला सुरुवात केली. त्याचा नायनाट करण्यासाठी पै. महंमदाचा अनुयायायी अबू नैला तयार झाला. तो अमलात आणण्यासाठी पैगबरांची निंदानालस्ती करण्याची परवानगी मागून घेतली. त्यानंतर त्याने मक्केला जाऊन काबचा विश्वास संपादन केला. अबूने काबकडून पैसे उधार मागण्यासाठी त्याला घराबाहेर बोलावले. त्याला बोलण्यात गुंतवून दूर नेले. नंतर मित्रांच्या मदतीने अबू अफ्कने तलवारींनी त्याचा खून केला. हे करताना “देवशत्रूला मारून टाका” असे अबूने त्याच्या मित्रांना सांगितले (चरित्र पृ. २४३-२४४).

काही वर्षांनी पै. मुहंमदांचे लष्करी सामर्थ्य वाढले. त्यांनी मक्केवर स्वारी केली. विजय मिळविला. त्या वेळी जे शरण आले, त्यांनी धर्म स्वीकारताच त्यांना माफ करण्यात आले. अब्दुल्ला इब्न अबू अल स-ह आणि अब्दुल्ला इब्न खतल या दोघांनी पूर्वी इस्लाम स्वीकारला होता. नंतर ते फिरले. त्यांनी पैगंबरांचा विरोध सोडला नाही. अब्दुल्ला इब्न खतलने आपल्या दोन दासींनाही गाण्यांमधून पैगंबर विरोध करण्यास आज्ञा दिली. तेव्हा दासींसकट त्यांची कत्तल करण्यापूर्वी एक दासी पळून गेली होती. तिला पकडून आणल्यावर तिने माफी मागितल्यावर तिला सोडण्यात आले. तिने इस्लाम स्वीकारला का? याची माहिती हायकलने जरी दिली नसली, तरी तीने धर्म स्वीकारला असण्याची शक्यता अधिक आहे. प्रारंभीच्या काळात अनुयायी वाढविणे हे धोरण असल्याने त्याला अनुसरून तिला सोडले असावे.

ईशद्रोह्यांच्या हत्येचा पायंडा

अगदी प्रथमपासून पै. मुहंमदांची निंदा आणि इस्लामला विरोध या गोष्टीसंदर्भात मुस्लिमांमध्ये आत्यंतिक आततायी भावना निर्माण झाल्या आहेत. ईशद्रोह्यांच्या (Blasphemy) हत्येचा पायंडा तसाच सुरू राहिला आहे. कुरआन शरीफच्या प्रारंभाच्या काळापासून सर्वसामान्य मुस्लिमांच्या संकल्पना अश्मीभूत (fossilized) झाल्या आहेत, हे जगाने - विशेषत: अरबी वसंत - खरे तर उन्हाळा - दरम्यान आणि अबू बक्र बगदादीच्या खिलाफत कारकिर्दीदरम्यान अनुभवले आहे.

याउलट युरोपच्या बाबतीत दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमध्ये जो सामाजिक आणि मानसिक बदल घडून आला, त्यामुळे ख्रिश्चन धर्म आणि धर्मसंबंधी अतिरेकी भावनांचा उद्रेक यावर बंधने आली. धर्माचे बाह्य प्रदर्शन त्याज्य ठरले. विशेषत: स्कॅंडिनेव्हिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वीडन, नॉर्वे आणि डेन्मार्क या देशांमध्ये तर धर्माचा पगडा अजिबात नष्ट झाला. त्याच वेळी या देशांमधील प्रशासकीय व्यवस्था अत्यंत प्रगत झाली. जगातील संपन्न देशांत त्यांची गणना होऊ लागली. या देशांमधील गुन्हेगारी अत्यंत कमी झाली. नागरिक मुक्त विचारांना समजून घेऊन विचारस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते झाले. या देशांमधून मुस्लीम लोकसंखा नगण्य होती, याचीही नोंद घेतली पाहिजे.

त्यांच्या या नंदनवनासारख्या देशांना २००४ साली इस्लामी अतिरेकाचा सामना करावा लागला. डेन्मार्कमधील एका वृत्तपत्राने पै. मुहंमदांची व्यंगचित्रे काढण्याचे निमित्त झाले आणि आगडोंब उसळला. युरोपातील अनेक देशांना त्याची झळ पोहोचली. खरे तर त्याच वेळी इस्लामसंदर्भात सामाजिक चिंतन होऊन पुढे जाऊन इस्लामसंदर्भात काय धोरण अंगीकारावे लागेल, या बाबतीत सरकारी आणि सामाजिक स्तरावर काय केले पाहिजे, याचा विचार झाला नाही. लगेच सुमारे पाच वर्षात अरब देशांतून अरबी उन्हाळी क्रांतीमुळे पोळलेल्या मुस्लीम स्थलांतरितांचा ओघ युरोपच्या दिशेने वाहू लागला. सीरियात क्रांतीदरम्यान हुकूमशहा अस्सादने केलेल्या कत्तली, शहरांवरील नृशंसपणाने केलेले हल्ले यामुळे तर संपूर्ण युरोपमध्ये पळून येणाऱ्या स्थलांतरितांच्या बाबतीत सहानुभूतीचा पूर आला. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या मुस्लीम स्थलांतरितांना सामुदायिकरित्या सामावून घेण्याची जबाबदारी युरोप समूहाने स्वीकारली. जर्मनीच्या चॅन्सेलर एँजेला मेर्केल यांनी सर्वात जास्त - म्हणजे आठ लाख मुस्लीम स्थलांतरितांना स्वीकारण्याची जबाबदारी घेतली. ती लगेचच ओलांडली गेली. ही जबाबदारी घेताना त्यांनी आपल्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांना विचरले नव्हते, असे बाहेर आले. इतकी मोठी जबाबदारी घेताना काय योजना कराव्या लागतील, मुस्लीम स्थलांतरितांना मुख्य प्रवाहात कसे सामावून घ्यायचे, त्यांच्याकडून काय वर्तणूक अपेक्षित असावी या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले. येणारे मुस्लीम स्थलांतरित आपले धार्मिक आणि सांस्कृतिक ओझे घेऊन येतील हे अत्यंत दुर्लक्षित झाले. ते कट्टर धार्मिकतेचे असतील हे लक्षात येऊनसुद्धा, स्थानिक सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी त्यांची मानसिकता तयार करणे यावर बोलणे म्हणजे निषिद्ध ठरले. उलट मुस्लिमांना त्यांच्या धर्माप्रमाणे वागण्यास देण्याची टूम निघाली. याचा परिणाम असा झाला की आलेले मुस्लीम स्थलांतरित नव्या वातावरणाशी जुळवून न घेता मुस्लीम देशांत वागावे तसे स्वैरपणे वागू लागले. ज्या जर्मनीने त्यांना उदार होऊन आसरा दिला, त्याच देशाच्या नववर्षप्रसंगी स्थानिक जर्मन महिलांवर अतिप्रसंग करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. हे कोणता देश खपवून घेईल? यातूनच केवळ ३ वर्षांत मुस्लीम स्थलांतरितांच्या विरोधात नवे राजकीय पक्ष उभे राहिले. त्यांना जनतेचे पाठबळ मिळते आहे. या तथाकथित उजव्या विचारसरणीच्या लोकांनी कुरआन शरीफ जाळणे, फाडणे अशा घटनांमधून त्याचे प्रतिबिंब पडते आहे. ते स्वीकारार्ह नसले, तरी नॉर्वे, स्वीडन यासारख्या दोन पिढ्या पूर्णपणे सेक्युलर राहिलेल्या देशांमध्ये केवळ ३-४ वर्षांत का घडते आहे, याचा विचार प्रथम तर तेथील प्रशासनाने आणि फार मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित झालेल्या मुस्लिमांनी केला पाहिजे. त्याच वेळी हंगेरी, पोलंड अशा पूर्वाश्रमीच्या साम्यवादी देशांनी स्थलातरितांना अजिबात थारा दिला नाही. आता ते या आगडोंबापासून मुक्त आहेत. या दोन्ही देशाच्या प्रवक्त्यांनी तसे स्पष्ट केले.

युरोपमध्ये गुण्यागोविंदाने राहायचे असल्यास चौदाशे वर्षापूर्वीच्या अश्मीभूत संकल्पना घेऊन जगता येणार नाही, नव्या युगाशी, वैचरिक स्वातंत्र्याशी जुळवून घ्यावे लागेल हे या मुस्लीम स्थलांतरितांना आचरणात दाखवावे लागेल. अन्यथा, ८०-८५ वर्षांपूर्वी हिटलरने ज्यूंच्या बाबतीत जे केले, आयसिसने गैर सुन्नी कुर्द आणि यझदींच्या बाबतीत याच दशकात जे केले, सध्या उइघूर मुस्लिमांच्या बाबतीत चीनचे सरकार जे करते आहे, तेच दशकभरात युरोपात मुस्लीम स्थलांतरितांच्या बाबतीत घडले, तर नवल वाटायला नको. भारतात तसे घडणार नाही, कारण तो हिदूंचा स्वभावधर्म नाही. बेंगळुरूसारख्या घटनांनी ही दरी वाढीस लागणे हे सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हितावह नाही. म्हणून भारतातील इस्लाम लगेच नाही, पण २०४७पर्यंत कसा बदलला पाहिजे, याची हिंदू आणि मुस्लीम दोघांनीही विचार करण्याची ही वेळ आहे.