साध्यपूर्तीसाठी अध्यापक प्रशिक्षणही आवश्यक

विवेक मराठी    07-Sep-2020
Total Views |
@मिलिंद नाईक

नव्या शैक्षणिक धोरणाने सर्वसमावेशक बदल आणले आहेत. आजपर्यंतच्या शिक्षण पद्धतीमध्ये या सर्व गोष्टींचा फार कमी अंतर्भाव झालेला असल्यामुळे शिक्षकांना फार मोठ्या बदलाला सामोरे जावे लागणार आहे.शिक्षकांनाही आता पाठ्यपुस्तकातील धडा शिकवण्याऐवजी विद्यार्थ्यांना विचार करायला शिकवणे म्हणजे काय, ते कळले पाहिजे व जमलेही पाहिजे. त्यांच्यासाठी हा एक खूप मोठा बदल आहे. शिक्षकांनी प्रथमतः प्रशिक्षण घेऊन स्वतःची कल्पकता वाढवून मग विद्यार्थ्यांची कल्पकता वाढवण्यासाठी कसे प्रशिक्षण द्यायचे, याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
 
shikshan_1  H x


शिक्षणाचे राष्ट्र-विकसनात असलेले महत्त्व लक्षात घेऊन, शिक्षण क्षेत्राबद्दल आस्था दाखवून नवीन शैक्षणिक धोरण आणल्याबद्दल सर्वप्रथम भारत सरकारचे अभिनंदन! तसेच, मुख्य तज्ज्ञ समितीने सर्वमान्य शिक्षणतज्ज्ञ ते सर्वसामान्य जनता अशा सर्वांच्याच सूचनांची दखल घेत धोरण तयार करताना ज्या प्रकारे लोकशाही मूल्याचे दर्शन घडवले, तेही अतिशय कौतुकास्पद आहे म्हणून त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन! पहिला मसुदा तयार केल्यानंतर सुमारे वर्षभर ही समिती अनेक जणांशी चर्चा करत होती, सूचना मागवत होती. देश, राज्य व स्थानिक पातळीवर अनेक चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती व त्यामुळेच या धोरणांमध्ये सर्वसमावेशकता व पुरेशी व्यवहार्यता आलेली आपल्याला दिसते.

नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये तीन मुख्य बदल सांगितले आहेत. पहिला म्हणजे माहितीपर शिक्षण देण्यापेक्षा कौशल्याधिष्ठित शिक्षण देऊ या. दुसरा म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकी शिक्षण देण्यापेक्षा सर्वांगीण विकास घडवणारे पण एकात्मिक शिक्षण देऊ या आणि तिसरा बदल म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकी शिक्षणाचे संकलित मूल्यमापन करण्याऐवजी सर्वंकष सातत्यपूर्ण आकारिक मूल्यमापन करू या. आजपर्यंतच्या शिक्षण पद्धतीमध्ये या सर्व गोष्टींचा फार कमी अंतर्भाव झालेला असल्यामुळे शिक्षकांना फार मोठ्या बदलाला सामोरे जावे लागणार आहे.

माहितीयुगात माहिती सहज उपलब्ध आहे व तीही जवळपास फुकटात. माहितीचा स्फोट झाला आहे. पुस्तके, वर्तमानपत्रे, इतर अध्ययन साहित्य असे छापील साहित्य असो अथवा माहितीचे महाजालाद्वारे मिळणारे डिजिटल साहित्य, ही माहितीची साधने कुणालाही मुबलक प्रमाणात व स्वस्तात उपलब्ध आहेत. ज्याला स्वतःहोऊन अभ्यास करायचा आहे, त्याच्यासाठी ही पर्वणीच आहे. त्यामुळेच वर्गातील अध्यापन पद्धती आता बदलायला हवी. या उपलब्ध प्रचंड माहितीचे करायचे काय? ती निवडायची कशी? ती पचवायची कशी? हे आता विद्यार्थ्यांना शिकवायला हवे आहे. काही शतकांपूर्वी जेव्हा पुस्तके नव्हती किंवा काही दशकांपूर्वी ती असूनही पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नव्हती, तेव्हा वर्गामध्ये प्रत्येक धडा शिकवला पाहिजे, विद्यार्थ्यांना माहिती दिली पाहिजे व विद्यार्थ्यांनी ती पाठ केली पाहिजे याचा आग्रह आपण समजू शकतो. पण जेव्हा आता माहिती उपलब्ध आहे, तेव्हा विद्यार्थ्यांना माहितीतून ज्ञाननिर्मितीची कौशल्यॆ शिकवायला हवीत. केवळ माहितीच्या संग्रहाने मनुष्य विद्वान झाला असता, तर संगणक हा जगातील सर्वात मोठा विद्वान झाला असता. निव्वळ माहितीचा काहीच उपयोग नसतो, जोपर्यंत विद्यार्थ्यांना ती एखादा प्रश्न सोडवण्यासाठी वापरता येत नाही. प्रश्न सोडवणारे विद्यार्थी घडवायचे असतील, तर त्यांना विचारकौशल्ये शिकवावी लागतील. नेमकी हीच मांडणी प्रस्तुत धोरणामध्ये केली आहे. माहितीच्या निव्वळ पाठांतराकडून विचारकौशल्यांच्या शिक्षणाकडे वळले पाहिजे, असे या धोरणात वारंवार म्हटले आहे. पण जेव्हा अलीकडच्या काळातसुद्धा पालक एखाद्या धड्यातील एखादा भाग शिकवला नाही म्हणून रागावलेले पाहिले की आश्चर्य वाटते. शिक्षकांनाही आता पाठ्यपुस्तकातील धडा शिकवण्याऐवजी विद्यार्थ्यांना विचार करायला शिकवणे म्हणजे काय, ते कळले पाहिजे व जमलेही पाहिजे. त्यांच्यासाठी हा एक खूप मोठा बदल आहे. धडा मोठ्याने वाचून घेणे, त्यातील कठीण शब्दांचा अर्थ सांगणे व धड्याखालच्या प्रश्नांची उत्तरे सांगणे किंवा लिहायला लावणे अशा पद्धतीने अध्यापक आतापर्यंत शिकवत असत. त्याऐवजी विद्यार्थ्यांनी धडा घरूनच वाचून येणे व वर्गात मात्र त्यातील पाठ्यमुद्द्यांवर आधारित कार्यपत्रके सोडवणे, चर्चा करणे, प्रकल्प करणे, प्रयोग करणे आदी गोष्टींवर भर देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना विचार करायला लावायचे असेल तर पाठाची पद्धतच बदलायला हवी. माहितीची मांडणी करून झाली की आकलन व्हावे व संकल्पना निर्मितीस मदत व्हावी यासाठी विविध प्रकारचे अध्ययन अनुभव देणे, कार्यपत्रके सोडवायला देणे, प्रयोग करायला देणे, उपयोजन करायला लावणारे काम देणे आदी गोष्टी करायला हव्यात व असे करताना विद्यार्थी आकलनात कुठे कमी पडला आहे याचे निरीक्षण करून दुरुस्त्या करायला हव्या. विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञान निर्माण होण्यास मदत करण्याची शिक्षकाची भूमिका हवी. विद्यार्थी स्वतः शिकत असतात व शिक्षक त्यांच्या शिकण्याला केवळ मदत करत असतात, अशा भूमिकेत शिक्षकांनी जायला हवे.

अध्यापन पद्धतीतील या बदलांशिवाय अध्यापकांनी विद्यार्थ्यांना विशेष कौशल्यांचे प्रशिक्षणही द्यावे लागेल. निरीक्षण कसे करावे, प्रश्न कसे विचारावेत, माहिती कशी मिळवावी, सार कसे काढावे, टिपणे कशी काढावीत, वाचन वेग कसा वाढवावा आदी कौशल्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवायला हवीत. विद्यार्थ्यांचे स्वयंअध्ययन कौशल्य वाढावे म्हणून प्रयत्न करायला हवेत. आपल्या या एकशे पंचवीस कोटी लोकसंख्येच्या देशात दुर्दैवाने आजपर्यंत चांगले संशोधक निर्माण होऊ शकले नाहीत, यामागे आपली आत्तापर्यंतची शिक्षणपद्धतीच कारणीभूत आहे. अभ्यासक्रमाच्या बाहेरचे विचारायचे नाही व ‘गप्प बसा’ संस्कृती याने विद्यार्थ्यांची मूलभूत विचार करण्याची क्षमताच दडपून गेली आहे. दुर्दैवाने कल्पकता हा विषयच आपल्या शालेय शिक्षणात गौण मानला गेलाय. दैनंदिन जीवनातील समस्यांपासून ते संशोधनातील समस्या सोडवणारे कल्पक विद्यार्थी खरोखरीच घडायला हवे असतील, तर विद्यार्थ्यांची कल्पकता वाढावी यासाठी प्रयत्न करायला हवेत. सर्वसाधारणपणे सध्या अजिबात वेगळा विचार करायचा नाही असे जे शिकवले जाते, तिथून जाणीवपूर्वक वेगळा विचार कसा करायचा हे शिकवायचे, हा एक मोठा मानसिक बदल आहे. कल्पकता पद्धतशीरपणे वाढवता येते, याची संशोधनांवर आधारित प्रशिक्षणे आता उपलब्ध आहेत. शिक्षकांनी प्रथमतः प्रशिक्षण घेऊन स्वतःची कल्पकता वाढवून मग विद्यार्थ्यांची कल्पकता वाढवण्यासाठी कसे प्रशिक्षण द्यायचे, याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
 

shikshan_1  H x 

पाठयपुस्तकी विशिष्ट अभ्यासक्रमापलीकडे जाऊन व्यक्तिमत्त्व विकसनासाठी शिक्षण देणे ही तर अध्यापक महाविद्यालयांच्या पाठ्यपुस्तकांमध्येच अडकलेली बाब वाटते. 'शिक्षण म्हणजे माणसांमधील क्षमतांचे परिपूर्ण विकसन' अशी मोठमोठी वाक्ये तिथे ऐकायला मिळतात, पण त्याचे रूपांतर शालेय उपक्रमांत व मूल्यमापनात झालेले बघायला अभावानेच मिळते. व्यक्तिमत्त्वाचे सर्वांगीण विकासन हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करायचे झाल्यास त्या ताकदीचे शिक्षक आपल्याला लागतील व उपलब्ध अध्यापकांचे खूप चांगले प्रशिक्षणही करावे लागेल. व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे काय, त्यासाठीचे उपक्रम कसे योजायचे, विद्यार्थ्यांची निरीक्षणे कशी करायची, त्यातून विद्यार्थ्यांच्या अभिक्षमता कशा लक्षात घ्यायच्या, करिअर कसे निवडायचे या साऱ्याचे प्रशिक्षण करावे लागेल. सर्वांगीण विकासाचा विचार करायचा म्हणजे विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, मनोकायिक, सामाजिक, नेतृत्वगुण, मूल्ये या सगळ्यांचा विचार करणे आले. आजपर्यंत याबाबतची तत्त्वे जरी शिकलेली असली, तरी प्रत्यक्ष वर्गांमध्ये या सगळ्याचा वापर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कसे करायचे याचे प्रशिक्षण झालेले नाही. सातत्यपूर्ण, सर्वंकष मूल्यमापन करता यावे, यासाठी अध्यापकांचे प्रशिक्षण करावे लागेल. आतापर्यंत फक्त पाठ्यपुस्तकी अभ्यासक्रमासाठी लेखी-तोंडी परीक्षा घेण्याची सवय अध्यापकांना आहे. व्यक्तिमत्त्व विकासासाठीही सर्वंकष मूल्यमापन कसे करायचे हे आजवर अध्यापक प्रशिक्षणात आलेले नाही. यापुढे अध्यापकांना विद्यार्थ्यांची या सर्व प्रकारची निरीक्षणे करता येणे, त्यांच्या नोंदी ठेवता येणे, आवश्यक तेव्हा त्यांचे समुपदेशन करता येणे, या सर्व गोष्टी जमल्या पाहिजेत. त्यासाठी मानसशास्त्राचे अधिक चांगले प्रशिक्षण यापुढे घ्यावे लागेल. नुसत्याच नोंदी करता येणे पुरेसे ठरणार नाही, तर केलेल्या निरीक्षणांवरून विद्यार्थ्यांचा कल ओळखता येणे, त्यावरून त्याला पुढची दिशा व जास्तीचे अनुभव कसे द्यायचे यासाठी प्रशिक्षण द्यावे लागेल, तरच शिक्षण खऱ्या अर्थाने विद्यार्थिकेंद्री बनेल. थोडक्यात, शिक्षक या भूमिकेतून अध्ययन व्यवस्थापक (लर्निंग मॅनेजर) व तिथून पुढे अधिमित्राची (मेंटॉरची) भूमिका कशी करायची, हे शिकावे लागेल. आजपर्यंतच्या शिक्षण पद्धतीत शिक्षकाने ही भूमिका क्वचितच स्वीकारलेली दिसते. अर्थातच नेहमीच काही सन्माननीय अपवाद असतात, तसे ते आहेत. पण सर्वसाधारण आपल्या देशातील शिक्षण पद्धती पाठयपुस्तकी माहितीच्या घोकंपट्टीच्या पलीकडे गेलीच नाही.

दैनंदिन जीवनातील समस्या असो अथवा विज्ञानातील संशोधनात्मक, कुठलीही समस्या ही फक्त एका विशिष्ट विषयापुरती मर्यादित नसते. समस्या या एकात्मिक असतात. एक छोटी समस्या सोडवायची असेल, तरी अनेक विषयातील अभ्यास व समज लागते. खरे तर अध्यापकांना शिकवायला सोपे जावे म्हणून विषयांची विभागणी काटेकोरपणे केली गेली. त्यामुळे तास विषयानुसार होतात. एक विषयतज्ज्ञ एक विषय शिकवतो. पण त्यामुळे जीवनातील खऱ्या समस्यांपासून लांब गेले व घोटाळा झाला. शिक्षण कंटाळवाणे झाले. त्यामुळेच या शैक्षणिक धोरणात असे म्हटले आहे की विषयांचे काटेकोरपणे कप्पे केले जाणार नाहीत. मग आता अध्यापकांनी एकात्मिक शिकवायचे झाले, तर त्यांना आपल्या स्वतःच्या विषयाशिवाय इतर अनेक विषयांचा किमान पातळीचा तरी अभ्यास असायला हवा. जिथे अगदी शक्य होणार नाही तिथे तो विषय एकापेक्षा अधिक तज्ज्ञांनी गटकार्य करून शिकवायला हवा. त्यामुळे शिक्षकांनी आपल्या विषयात पलीकडचे ज्ञान मिळवणे व गटअध्यापन करण्याचे कौशल्य या दोन्ही गोष्टी मिळवायला हव्यात.

आकारिक मूल्यमापन म्हणजे नेमके काय याचा अर्थ समजावून सांगणारे चांगले प्रशिक्षण शिक्षकांना देण्याची गरज आहे. बहुतेक वेळा परीक्षेचा उपयोग विद्यार्थ्यांना घाबरवण्याकरता व घाबरवून अभ्यास करायला लावण्याकरता केला जातो. खरे तर विषयाचा अभ्यास हा घाबरून नाही, तर विषयाच्या आवडीतून केला गेला पाहिजे व मूल्यमापन हे आकलनातील फटी लक्षात आणून देण्याकरता व त्यात सुधारणा करण्यास मदत करण्याकरता वापरले गेले पाहिजे. विद्यार्थ्याला मूल्यमापनाची भीती नाही, तर मदत वाटली पाहिजे. विद्यार्थी घडत असताना त्याच्या योग्य घडणीच्या मदती करता केले गेलेले मूल्यमापन म्हणजे आकारिक मूल्यमापन होय. त्याकडे संकलित मूल्यमापनासारखे बघून चालणार नाही. म्हणूनच आकारिक मूल्यमापन करताना लाल पेनाबरोबरच हिरव्या पेनाचाही वापर केला पाहिजे. काय चुकले आहे हे जसे आपण सांगतो, तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून काय चांगले झाले आहे तेसुद्धा सांगितले पाहिजे. मूल्यमापनात संख्यात्मक नोंदींबरोबरच गुणात्मक नोंदीसुद्धा केल्या पाहिजेत. दुर्दैवाने अध्यापकांनी कायमच सर्कशीतल्या रिंगमास्टरची भूमिका घेतल्यामुळे अध्यापक विद्यार्थ्यांचे नातेच सशक्त व समृद्ध बनू शकत नाही, अशी सध्या परिस्थिती आहे.

सर्वसाधारणपणे अध्यापक स्वतः लहानपणी जसे व ज्या पद्धतीने शिकले, त्याच पद्धतीने पुढच्या पिढीला शिकवण्याकडे त्यांचा कल असतो. त्यांच्यावर त्यांच्या लहानपणी झालेल्या संस्कारांचा एक मोठा पगडा असतो. तो संस्कार, त्या सवयी बदलून नवीन प्रकारे अध्यापन करण्यास अध्यापकांना शिकवणे ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. नवीन शिकण्यापेक्षाही जुने शिकलेले विसरणे हे महाकठीण काम असते. त्यामुळे अध्यापक प्रशिक्षण हे अतिशय आव्हानात्मक काम आहे. थोडक्यात, जे आडात नाही ते पोहऱ्यात आणण्याचे काम करावे लागणार आहे. प्रौढ अध्यापकांना त्यांच्या लहानपणी ज्या गोष्टींचे शिक्षण मिळाले नाही, अशा सर्व गोष्टींची भर अध्यापक प्रशिक्षणात घालावी लागेल. यात वर्गात ‘गप्प बसा’ या मनोवृत्तीतून 'समजेस्तोवर प्रश्न विचारा' या मनोवृत्तीकडे अध्यापकांना न्यावे लागेल. आकलनाइतकेच विचारकौशल्याला व कल्पकतेला ही महत्त्व आहे, याची जाणीव करून द्यावी लागेल. आपण शिकवले तरच विद्यार्थी शिकतात असे नसून आपण फक्त शिकण्यासाठी मदत करतो, वातावरण निर्माण करतो या भूमिकेत जाण्यास शिकवावे लागेल. सध्या असलेल्या शिक्षकांनी त्यांच्या लहानपणी कधीही प्रयोगशाळेत जाऊन प्रयोग केले नसतील, तर त्यांना प्रयोग करून बघण्याची संधी उपलब्ध करून द्यावी लागेल. त्यांनी स्वतः प्रकल्प करून बघावे लागतील. विद्यार्थ्यांच्या भूमिकेत शिरून नव्याने या गोष्टी शिकल्या, आत्मसात केल्या तरच पुढच्या पिढीला शिकवणे शक्य होईल. परंपरा खंडित करून नवीन वाटा निर्माण करणे नेहमीच अवघड असते. आमच्या वेळच्या व हल्लीच्या काळात या दोन्हीतील केवळ सवयीने स्वीकारलेल्या गोष्टी दूर करून संशोधनाने योग्य सिद्ध झालेल्या गोष्टी शिक्षकांच्या गळी उतरवाव्या लागतील. कला व खेळ यांचा उपयोग करून शिक्षण कसे अधिक आकर्षक व पचनीय होईल, याचा विचार करण्यास या धोरणात सुचवले आहे. पण मुळातच ज्या शिक्षकांनी कधी कला शिकलेली नाही किंवा कलेचा आस्वादसुद्धा घेतलेला नाही, तसेच कधीही लहानपणी खेळलेले नाहीत, त्यांना अध्यापनात कलांचा व खेळाचा कसा उपयोग करून घ्यायचा हे कसे समजेल? त्यासाठी त्यांना स्वतःला आधी एखादी कला समजून घ्यावी लागेल व खेळापाठीमागील मानसशास्त्र तरी किमान समजून घ्यावे लागेल, तरच अध्यापन पद्धतीत त्याचा अंतर्भाव करता येऊ शकेल.

महत्त्वाकांक्षी नवीन शैक्षणिक धोरणाच्या यशाचा मार्ग शिक्षकांच्या माध्यमातून जात असल्यामुळे शिक्षक प्रशिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल. शिक्षकांची गुणवत्ता हा कळीचा मुद्दा आहे. बाकी आवश्यक साधने व साधनसामुग्री यथावकाश येतील. एखादा वर्ग एखाद्या चौरस फुटाने कमी पडल्याने शिक्षणाचे फार नुकसान होत नाही. पण गुणवत्तारहित शिक्षक विद्यार्थ्यांच्या पिढ्यानपिढ्या बरबाद करतो. त्यामुळेच शासनाने अध्यापक प्रशिक्षण हा प्राधान्याचा मुद्दा मानला पाहिजे व त्यासाठीची रचना आधी करून, प्रशिक्षणे पूर्ण करून मग धोरणाच्या अंबलबजावणीला सुरुवात केली पाहीजे, तरच धोरणात इच्छित साध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे.