अमेरिकन बंड

विवेक मराठी    11-Jan-2021
Total Views |

बाहेरून झालेल्या हल्ल्यास तोंड देण्यासाठी देशाला एकत्र करणे सोपे असते. पण जर देशाचे सार्वभौमत्वाचे प्रतिनिधित्व करणार्‍या सर्वोच्च वास्तूवर जर देशातील नागरिकांनीच हल्ला केला तर, त्याला तोंड देण्यापेक्षा त्यातून निर्माण झालेले प्रश्न हे येणार्‍या काळासाठी भेडसावणारे ठरतात. तरीदेखील, सकारात्मक विचार करायचा झाल्यास असे म्हणावेसे वाटते की, एखादी ठसठसणारी जखम, जिच्याकडे अनेक वर्षे दुर्लक्ष केलेले असते ती भळाभळा वाहू लागल्याने, खरे उपचार करून ती भरून आणणे इतकाच पर्याय राहतो.

america_1  H x

६ जानेवारी २०२१ला अमेरिकन काँग्रेसच्या इमारतीमध्ये ज्याला Capitol म्हणतात, तेथे जे काही झाले ते काही प्रमाणात ९/११ला जे काही अमेरिकेने पाहिले आणि भोगले त्यापेक्षा कैक पटीने भयावह होते. Washington DCमधील व्हाइट हाऊस आणि त्याच्या जवळच असलेली Capitolची देखणी वास्तू, अमेरिकन लोकशाही आणि अनेक जागतिक घडामोडीची केंद्रे आहेत. व्हाइट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्षांचे घर आणि कार्यालय असते, तर Capitol हे संसद भवनासारखे असल्याने, तेथे सिनेटचा पदसिद्ध अध्यक्ष म्हणजे अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष आणि हाऊसच्या सभापतीचे कार्यालय असते. जर राष्ट्राध्यक्षाचे काही बरे वाईट झाले तर, घटनेनुसार, उपराष्ट्राध्यक्ष, राष्ट्राध्यक्ष होतो आणि त्यानंतर तो अधिकार हा हाऊसच्या सभापतीचा असतो. थोडक्यात ही दोन्ही पदे राष्ट्राध्यक्षाइतकीच अतिमहत्त्वाची आहेत.


या पुर्वपिठीकेवर विचार केल्यास काय दिसते, तर
Capitol इमारतीत ट्रंप समर्थकांची झुंड सहज जाते. जमाव Hang Vice President Mike Pence” म्हणून घोषणा करत असतो. तरीदेखील ते सभागृहापर्यंत पोहोचू शकतात, एक विचित्र पेहरावातील माणूस हा उपराष्ट्राध्यक्ष Mike Pence यांचे आसन बळकावतो आणि मायक्रोफोनवरून ट्रंप परत निवडून आलेत म्हणून जाहीर करतो, दुसरा माणूस सहजतेने सभापती नॅन्सी पेलोसी यांचे कार्यालय शोधू शकतो, तेथे आत जाऊन तोडफोड करून त्यांच्या खुर्चीवर पाय पसरून बसून फोटो काढतो. फक्त सुदैवाने पेंस, पेलोसी आणि सर्व उपस्थित प्रतिनिधी, सभागृहात हा हिंस्त्र जमाव येण्याआधी सुरक्षित स्थळी पोहोचू शकतात. आता माध्यमांमध्ये आलेल्या बातमीनुसार, Capitolच्या बाहेर पोलिसांना गावठी बॉम्ब आणि शस्त्रास्त्रांनी भरलेला एक ट्रक मिळाला. थोडक्यात हे एक प्रकारचे बंड होते. त्याच्यामागे, काय वाट्टेल ते होवोत, आम्ही ट्रंप यांनाच राष्ट्राध्यक्ष करणार असे वाटणारा जमाव आणि त्या जमावाला लोकशाहीस तिलांजली देऊन हिंसेसाठी प्रेरित करणारे नेतृत्व होते.

 
america_2  H x

नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत बाइडेन यांना ३०६ इलेक्टोरल व्होट्स मिळाली, तर ट्रंप यांना २३२. राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी २७० मते आवश्यक असतात, थोडक्यात बाइडेन यांना निर्णायक विजय मिळाला होता. पण ट्रंप यांना तो मान्य नव्हता. त्यांनी कायम मनापासून म्हणजे अक्षरश: स्वत:ला सांगण्यापासून ते जनतेला सांगेपर्यंत एकच मुद्दा पुढे रेटत ठेवला. “ही निवडणूक भ्रष्ट होती. यात खूप गोंधळ त्यांच्या (ट्रंप यांच्या) विरोधात असलेल्या डेमोक्रट्सनी घातले आहेत. बाइडेन यांना मिळालेली मतेच खोटी आहेत आणि मीच (म्हणजे ट्रंप) जिंकलो आहे.अर्थात कुठल्याही लोकशाही व्यवस्थेत स्वत:चे मत मांडणे आणि त्यासाठी विधायक मार्गाने आवाज उठवण्याचा प्रत्येक व्यक्तीला अधिकार असतो. ट्रंप यांनी तसे प्रयत्न त्यांना ज्या राज्यांमध्ये आक्षेप होता अशा ठिकाणी करून बघितले मात्र एकही पुरावा न देता. नुसते षडयंत्र (conspiracies) म्हणायचे पण पुरावा एकही देऊ शकायचे नाही. परिणामी स्थानिक कोर्टापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यांच्या विचारसरणीचे म्हणजे मूलत: रिपब्लिकन असलेले न्यायाधीशही त्यांच्या तक्रारी मान्य करू शकले नाहीत. आपण निवडणूक काय, कशातच कधीच हरू शकणार नाही असा अतिरेकी विश्वास बाळगण्यार्‍या ट्रंप यांना हे सहन होणे शक्य नव्हते. ते आणि त्यांचे त्यांच्याच पठडीतले सल्लागार विविध क्लृप्त्यांचा विचार करू लागले. त्यातील शेवटची प्रक्रिया होती दोन्ही प्रतिनिधीगृहांनी संमत करून निवडणूक निकालाला दिलेले प्रमाणपत्र.

america_1  H x

अमेरिकन कायद्यानुसार राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर येणारा ६ जानेवारी हा नवनिर्वाचित अथवा पुनर्निर्वाचित राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीवर अमेरिकन काँग्रेस (संसदेने) औपचारिकतेने शिक्कामोर्तब करण्याचा दिवस असतो. त्या दिवशी सिनेटमधले सिनेटर्स आणि हाऊसमधील काँग्रेसमेन हे सभागृहात एकत्र येतात. विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष जो घटनासिद्ध सिनेट अध्यक्ष पण असतो, तो या सभेचा प्रमुख असतो आणि जोडीला हाऊसचा/ची सभापतीही असतात. प्रत्येक राज्यामध्ये राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षास मिळालेली मते ही निवडक प्रतिनिधींकडून वाचून घेतली जातात. उपराष्ट्राध्यक्ष राज्याचे मत वाचून झाले की कुणाची काही हरकत आहे का म्हणून विचारतो. तशी अधिकृत हरकत ही हाऊसमधील प्रतिनिधीस घेता येते, ती लेखी लागते आणि त्याला सिनेटमधील किमान एका प्रतिनिधीचा पाठिंबा दाखवणारी सही लागते. ते झाल्यास, सिनेट आणि हाऊस आपआपल्या वेगळ्या सभा घेतात आणि नियमाप्रमाणे, केवळ दोन तासात त्यावर चर्चा करून मत घेतात. त्यात जर निर्णय बदलला नाही तर काही प्रश्न नसतो. जर निर्णय बदलला तर दोन्ही प्रतिनिधिगृहे आणि उपराष्ट्राध्यक्ष मिळून निवडणुकीत हरलेल्या उमेदवारासदेखील राष्ट्राध्यक्ष करू शकतात. अर्थात ही अगदी टोकाची, गरज पडली तरच म्हणून केलेली व्यवस्था आहे.

या सर्व प्रक्रियेत उपराष्ट्राध्यक्ष या सभेचा प्रमुख म्हणून एक शेवटचे मत सोडल्यास ढवळाढवळ करू शकत नाही. तो फक्त सभेचा आयोजक म्हणून काम करत असतो इतकेच. तरीदेखील ट्रंप यांनी जाहीरपणे म्हणजे ट्वीटरचा वापर करून पेंस यांना आवाहनवजा आदेश दिला की, हे निवडणूक निकाल प्रमाणपत्र त्यांच्या पारड्यात पडेल. पेंस यांनी त्यांच्या या आदेशाला संयतपणे उत्तर देऊन संगितले की, “मी राज्यघटनेचे रक्षण करण्याची शपथ घेतली आहे आहे आणि असे काही करणे त्याच्या विरोधात जाईल.परिणामी सत्ताकेंद्र अजिबात सोडण्याच्या तयारीत नसलेल्या ट्रंप यांनी राखून ठेवलेला दुसरा विकल्प वापरण्याचे ठरवले आणि आधीपासून बोलावून ठेवलेल्या ट्रंप समर्थक मेळाव्यात ते व्हाईट हाऊसच्या बाहेर बोलायला गेले. आपल्यावरील तथाकथित अन्यायाचा पाढा पुन्हा एकदा वाचून, समर्थकांच्या सहकार्याने आपणच कसे परत राष्ट्राध्यक्ष होऊ हे पढवून त्यांनी उपस्थितांना Capitolकडे कूच करण्याचे आवाहन केले आणि ते स्वत:पण त्यात सहभागी होत आहेत असे बोलले. अर्थात स्वत: ट्रंप तेथे गेले नाहीतच. ती समर्थकांची दिशाभूल होती. भडक भाषणानंतर आणि ट्रंप यांचा आत्मविश्वास पाहून त्यांच्या समर्थकांना खरेच वाटले की ते सभागृह ताब्यात घेऊ शकतील आणि त्यांच्या दृष्टीने जो चुकीचा निर्णय सभागृह घेत आहे ते, ते थांबवून बदलू शकतील. त्यासाठी पेंस आणि पेलोसी या सर्वोच्च नेत्यांवर हल्ला करण्याची पण पूर्ण तयारी त्यांनी नंतर वास्तवात दाखवली. सुदैवाने तसे करण्यात ते यशस्वी झाले नाहीत आणि खूप मोठा घटनात्मक पेचप्रसंग टळला.

नंतर जे काही घडले तो आता इतिहास आहे. पुढच्या अनेक अमेरिकन पिढ्या हा प्रसंग ऐकून घडतील. चांगले अथवा वाईट कसेही असले तरी, ऐतिहासिक क्षण हे एखाद्या नेतृत्वाच्या प्रभावामुळे घडतात. पण असे नेतृत्व हे सरते शेवटी समाजातील इच्छाआकांक्षाचे अथवा वैफल्यग्रस्ततेचे आणि सामाजिक विचारपद्धतीचे फळ म्हणून तयार झालेले असते. अमेरिकेतील द्विपक्षीय पद्धती ही जेव्हा राष्ट्रीय स्वार्थ असतो तेव्हा एकजुटीने उभी राहताना दिसते. पण जेव्हा सामाजिक प्रश्न येतात तेव्हा एकमेकांच्या टोकाची विरोधी होते. त्यात जे डावे आणि उजवे हे गट पडतात ते विचारवंत म्हणून, समाजशास्त्रज्ञ म्हणून, अर्थतज्ज्ञ म्हणून, आणि शिक्षक वर्ग म्हणून टोकाचे विरोधक होतात. त्यात प्रसिद्धीमाध्यमे, विद्यापीठे आणि इतर विचारप्रवर्तक केंद्रात डाव्यांची वरचढ असते. यांना स्वत:च्या पद्धतीनेच केवळ आर्थिक आणि सामाजिक प्रश्नाचे महत्त्व असते. दुसर्‍या बाजूस तुच्छ लेखणे हा विचारवंत म्हणून ते आपला हक्क समजतात. या अनेक वर्षांच्या 'वैचारिकतेचा' परिणाम म्हणून हिलरी क्लिंटनसारख्या मुरलेल्या राजकीय व्यक्तीसदेखील स्वत:च्या तोंडून सामान्य रिपब्लिकन मतदारांना 'deplorable' अर्थात निषेधार्ह अथवा वाईट असले शब्द वापरताना त्याचे काय परिणाम होतील हे कळले नाही.

त्याचबरोबर अमेरिकन उजवे हे जास्त धार्मिक असतात, निमशहरी अथवा ग्रामीण भागातील अधिक असल्याने त्यांच्या एकूण अपेक्षा आणि संस्कृती वेगळी असते. त्यात कधी कधी वंशवाद दिसू शकतो तर कधी कधी अमेरिकन व्यक्तिगत स्वातंत्र्यतेचे हक्क सांभाळण्याची टोकाची अपेक्षा दिसते. नव्वदीच्या इंटरनेट क्रांतीनंतर बदलणार्‍या जगातील तंत्रज्ञान घेणे सोपे होते, पण झपाट्याने होणारे सामाजिक बदल रिपब्लिकन सामान्यांना आत्मसात करणे अवघड होते. जुना काळ, अमेरिकेचा त्यांच्या दृष्टीने सुवर्णकाळ, ज्यात कमी इतर वंशीय, कमी स्थलांतरित, जवळीक असलेली कुटुंबपद्धती, या सगळ्यापासून ते जगावरील वर्चस्व होते, ते सर्व ओसरत आहे, अशी खंत या सामाजिक घटकाला होती. वास्तवात याचे प्रमुख कारण हे, स्वत:ची संस्कृती टिकवत पण कालानुरूप घडणारे बदल आत्मसात न करण्याकडे असलेला कल. ट्रंप आणि ट्रंप यांना पुढे आणणार्‍या रिपब्लिकन धोरणकर्त्यांनी ह्या समाजाची ही दुखरी नस ओळखली आणि 'Make America Great Again' ही घोषणा देत जुना सुवर्णकाळआणूयात अशी हाक दिली. क्यू नामक एका निनावी व्यक्तीच्या आधारे QAnon (“Q Anonymous”) नावाची एक यंत्रणा चालू केली आणि त्यामार्फत सातत्याने सर्वत्र कसे षडयंत्र रचवले जात आहे यावरून अनेक खोट्या गोष्टी तयार केल्या गेल्या. सत्तेत येण्यासाठी लढा देताना लागणारी मानसिकता ही सत्तेत आल्यावर बदलावी लागते. पण हा समाज आणि स्वत: ट्रंपदेखील अधिकाधिक डाव्यांचे बळी होत असल्यासारखे वागत राहिले, काल्पनिक षड्यंत्रे तयार करत राहिले आणि परिणामी दुहीचे विष अधिकच समाजाच्या नसनसात भिनले.

झालेल्या हिंसेस जबाबदार धरत, डेमोक्रट्स हे ट्रंप यांच्यावर महाभियोग खटला (Iimpeachment) चालवून काढण्याच्या तयारीत आहेत. त्यांना हळूहळू मध्यममार्गी रिपब्लिकन नेत्यांचा पाठिंबा मिळत आहे. कदाचित महाभियोग पूर्ण होण्याआधी ट्रंप स्वत: राजीनामा देण्याची शक्यता पण आहे. तसे केले तर त्यांची राष्ट्राध्यक्षपदासाठी असलेली पेन्शन, तसेच नंतरची सुरक्षाव्यवस्था ते ठेवू शकतील, जी महाभियोगानंतर राहू शकणार नाही.

ट्रंप यांच्या काळात रिपब्लिकन पक्षाच्या विचाराच्या जवळ असलेली अनेक धोरणे आणि निर्णय घेतले गेले. त्यात आर्थिक धोरणे आणि करसवलती होत्या, आंतरराष्ट्रीय करारातून अमेरिकेला बाहेर ठेवणे होते, त्याचबरोबर जनसामान्यांसाठीच्या योजना तसेच पर्यावरण संवर्धन बाजूस सारणे होते. या सर्व धोरणांपोटी रिपब्लिकन प्रतिनिधी तसेच अगदी Wall Street Journal सारखी माध्यमे, ट्रंप यांच्या बाकीच्या मनमानी वागण्याकडे दुर्लक्ष करत होते. मात्र ६ जानेवारीच्या प्रसंगानंतर ते बदलले. Wall Street Journalने तर त्यांच्या या घटननेसंदर्भातील अग्रलेखाचा शेवट हा, ट्रंप यांना उद्देशून, 'In the name of God, go.' या विधानाने केला आहे. ज्या समाजमाध्यमांचा उपयोग ट्रंप यांनी समर्थक मिळवायला आणि त्यांना भडकावायला केला आणि त्याचा फायदा घेत समाजमाध्यमांनी सध्याच्या परवलीच्या शब्दात आपला टीआरपी वाढवला, त्याच समाजमाध्यमांनी आता ट्रंप यांच्या वापरावर बंदी आणली आहे. थोडक्यात ट्रंप यांची अवस्था वाल्या कोळ्यासारखी झालेली आहे.

तात्पर्य:

आत्मस्तुतीचे कुंडल कानी, गर्व जडविला भालाअशी जेव्हा सुरुवात होते तेव्हा पुढच्या काळात, “स्वत:भोवती गिरक्या घेता अंधपणा की आला, तालाचा मग तोल कळेना सादही गोठून गेला...असे म्हणायची वेळ येते. हे जसे व्यक्तीला लागू असते, तसेच समाजाला आणि अगदी राष्ट्रालादेखील लागू होऊ शकते.

ट्रंप यांच्या नेतृत्वाला बळ दिल्यामुळे येणारी काही वर्षे रिपब्लिकन पक्षास स्वत:ची प्रतिमा आणि काही अंशी कालानुरूप विचार, यामध्ये बदल घडवण्यासाठी द्यावी लागणार आहेत. अमेरिकेसदेखील स्वत:ची जगातील प्रतिमा आणि त्या अनुसरून वर्तणूक बदलण्यासाठी आत्मपरीक्षण करून निर्णय घ्यावे लागतील. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत बाइडेन यांचा जरी विजय झाला असला तरी, ट्रंप यांना एकूण मतांच्या 47% मते मिळाली आहेत. ही संख्या खचितच कमी नाही आणि केवळ ते एक कारण डाव्या राजकारण्यांना आणि विचारवतांना आत्मपरीक्षण करण्यासाठी तसेच सामाजिक प्रश्न समजून घेण्यासाठी पुरेसे आहे. ते न करता, जर जितं मया म्हणत बसले तर कर्माचा कायदा हा त्यांना पण लागू होईलच.

बाहेरून झालेल्या हल्ल्यास तोंड देण्यासाठी देशाला एकत्र करणे सोपे असते. पण जर देशाचे सार्वभौमत्वाचे प्रतिनिधित्व करणार्‍या सर्वोच्च वास्तूवर जर देशातील नागरिकांनीच हल्ला केला तर, त्याला तोंड देण्यापेक्षा त्यातून निर्माण झालेले प्रश्न हे येणार्‍या काळासाठी भेडसावणारे ठरतात. तरीदेखील, सकारात्मक विचार करायचा झाल्यास असे म्हणावेसे वाटते की, एखादी ठसठसणारी जखम, जिच्याकडे अनेक वर्षे दुर्लक्ष केलेले असते ती भळाभळा वाहू लागल्याने, खरे उपचार करून ती भरून आणणे इतकाच पर्याय राहतो. आज नवनिर्वाचित अध्यक्ष जो बाइडेन यांना या अर्थाने इतिहास घडवण्याची संधी मिळालेली आहे.