हिंदुभावाचे सर्वंकष चिंतन

विवेक मराठी    13-Jan-2021
Total Views |

 

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त सा. विवेकने आयोजित केलेल्या 'माझ्या जगण्यातील हिंदुभाव' या अनुभव लेखन स्पर्धेचा निकाल आणि परीक्षक सिद्धाराम पाटील यांचे मनोगत १७ जानेवारीच्या अंकात प्रसिद्ध केले होते. या अंकात स्पर्धेच्या दुसर्या परीक्षक डॉ. रमा गर्गे यांचे मनोगत....

hindu_1  H x W:

 

माझ्या जगण्यातील हिंदुभाव या विषयावर लिहिलेले निबंध वाचल्यानंतर लक्षात आले की नवी पिढी सर्वंकष विचार करते. त्यांच्याच लिखाणातील मुद्द्यांवर मी दोन भागांत माझे चिंतन मांडत आहे.

 

भाग १ - प्रश्न प्रश्न आणि प्रश्न..

पूर्व आणि पश्चिम अशा वेगळ्या विचारधारा, जीवनप्रणाली आहेत. मात्र सध्या सगळे जग एकाकार झाले आहे आणि पश्चिमेच्या विकासनीतीकडे धावत सुटले आहे! वेग वेग वेग!! सतत धावाधाव. पण कोणतेही गंतव्य नाही. मुक्कामाचे ठिकाण नाही. पोहोचले असे वाटेपर्यंत पुनश्च धावावे लागणे हेच मानवाचे भागधेय झाले आहे. या विप्लवात सगळ्याच राष्ट्रांच्या बाह्यरचना बदलून गेल्या आहेत. समाजजीवन ज्यामुळे सुस्थिर होते, त्या शाश्वत तत्त्वांची पायमल्ली झाली आहे. आर्थिक रचनांमध्ये क्रांतिकारक बदल झाले आहेत. आणि हे सर्व ज्याच्या सुखासाठी करतो आहोत असे वाटत आहे, त्या माणसाच्या भोवती सर्व प्रकारच्या समस्या मात्र वाढतच चालल्या आहेत.

 

UNPD संस्थेच्या १९९६च्या अहवालात आपण स्वीकारलेले आर्थिक वाढीचे धोरण नेमके कसे आहे याचे वर्णन केलेले आहे. खासगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण या नवीन आर्थिक धोरणांमुळे आणि गतिमय आर्थिक वाढ या धोरणामुळे काय घडत आहे, याचा अभ्यास या अहवालात नमूद करण्यात आला आहे. जगातील आकडेवारी, कायदे आणि प्रत्यक्ष अनुभव त्यांच्या सखोल अभ्यासानंतर हे वर्णन केलेले आहे.

 

त्यानुसार ही आर्थिक वाढ

१. जॉबलेस - रोजगारविहीन, म्हणजे प्रचंड बेकारी वाढवणारी असणार आहे. कारण यंत्रमानव, स्वयंचलित यंत्रे व संगणकीकरण यामुळे बेकारी वाढत जाणार आहे.

 

२. व्हॉइसलेस - म्हणजे आवाजविरहित अशी ही रचना आहे. कुणी आर्थिक वृद्धी नको म्हणणे म्हणजे प्रतिगामी विचार ठरतो. त्याच्याविरुद्ध कोणी बोलू शकणार नाही अशी व्यवस्था करणारी ही रचना आहे.

 

३. रुथलेस - म्हणजे दयामाया नसलेली, करुणाविरहित अशी व्यवस्था. जे ठरले आहे, त्यात कोणाचे कितीही नुकसान झाले तरी त्याच्या गंभीर परिणामाची चिंता न करणारी व्यवस्था. मोठे विमानतळ, धरण, परकीय वा देशी भांडवलदारांच्या मोठ्या प्रकल्पांसाठी, स्थानिक लोकांच्या विस्थापनाची काळजी न करणारी अशी दयामायाविरहित रचना.

 

४. रूटलेस - म्हणजे सारे काही समूळ उखडून टाकणारी. शेकडो बोलीभाषा, अनेक प्रगत भाषा, पूर्वजांचे ज्ञान, बोध साहित्य या सर्व गोष्टी नष्टप्राय झाल्या, तरी त्यामुळे काही विशेष न वाटणारी व्यवस्था. समाजाची मुळेच ह्यामुळे छाटून टाकली जातील अशी ही वाढ आहे. येणाऱ्या पिढीला स्थानिक भाषा वाचता येणार नाही, समजणार नाही, स्थानिक भाषेमधील बोधसाहित्य त्यांच्यापासून दूर जाईल अशी स्थिती या रूटलेस विकास धोरणामुळे होणार आहे.

 

५. फ्यूचरलेस - म्हणजे ही भविष्यविहीन वाढ आहे. पुढे काय होणार आहे याविषयी कोणीही काहीही भाकित करू शकत नाही.
 

यालाच सर्व जगामध्ये सध्या विकास असे म्हटले जाते आणि याच धर्तीवर तो राबवला जातो. अधिकाधिक भौतिक प्रगती, माणसाच्या भौतिक गरजा वाढवायच्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी योजना करायच्या. यामुळे माणूस सुखी होत आहे की समस्याग्रस्त होत आहे हे बघायचे नाही आणि दिशाही बदलायची नाही, अशीही सध्याची विकासाची नीती आहे.

 

या पाश्चिमात्य जड-सुखवादी भौतिक विकास प्रणालीने विसकळीत केलेल्या मानवसमूहाला पुन्हा एकदा व्यवस्थित कसे करता येईल? यावर काही उपाय आहे का ?

 

भाग २ - उत्तर

 

जगण्यातील हिंदुभाव जपणे!!.

 

शांती, सामंजस्य व परस्परपूरकता, पर्यावरणाच्या चैतन्याचे रक्षण व संवर्धन, जीवनाभिमुखता यासाठी आपल्याला पुन्हा एकदा पूर्वेकडे जावे लागेल! पूर्वेतही ह्या विषयाला प्रत्यक्षात जगलेल्या भारतीय संस्कृतीकडे जावे लागेल.

 

भारतामध्ये या विषयावर अनेक शतके ज्यांनी चिंतन केले प्रयोग केले, विविध रचना उभ्या केल्या, त्या कालजयी ठरल्या, अनेक शतके सातत्याने चालवल्या गेल्या, त्या भारतीय चिंतन सृष्टीकडे पुन्हा एकदा गेल्याशिवाय गत्यंतर नाही, हे आता लक्षात येत आहे. एकेकाळी इंद्रियांपासून मिळणारे ज्ञान हेच खरे ज्ञान असे मानणारे वैज्ञानिक आता अध्यात्मवादी विचारांनाही मान्यता देऊ लागले आहेत. त्यामध्ये नवे संशोधन होऊ लागले आहे. एकूणच विकासासाठी धावणारे जग एक क्षण थांबून पूर्वेकडे बघत आहे..

 

काय आहे ही विकासाची वेगळी संकल्पनाएखाद्या संकल्पनेचे 'भारतीय' असणे म्हणजे नेमके काय?

जेव्हा आपण एखादी संकल्पना भारतीय आहे म्हणतो, तेव्हा अर्थातच भारत या राष्ट्राच्या भूभागावर जी संस्कृती नांदली, तिच्याबाबत बोलत असतो. त्या संस्कृतीला हिंदू संस्कृती म्हटले जाते.

हिंदुभाव हे हजारो वर्षे विविध प्रयोगांनी सिद्ध झालेल्या राष्ट्रीयत्वाचे नवनीत आहे. त्याचा आत्मा मूल-मंत्र सारतत्त्व जर एका शब्दात सांगायचे असेल, तर तो शब्द आहे समग्रता!! एखादी संकल्पना भारतीय आहे असे म्हणायचे असेल, तर ती होलिस्टिक अॅप्रोच – टोटॅलिटीचा - समग्रतेचा बोध करून देणारी असली पाहिजे. विकासाच्या संकल्पनेलाही आपल्याला याच समग्रतेची कसोटी लावून स्वीकारायचे आहे.

 

भारतीयांनी आपल्या संस्कृतीमधून जीवनपरायण व्यक्तित्वे घडवली. त्यांनी अनेक वर्षे या कालजयी संस्कृतीचे भरणपोषण केले. अव्यक्त सृष्टीचे, स्थूल इंद्रियांच्या आवाक्याबाहेरील विषयवस्तूंचे संशोधन भारतात केले गेले. त्याचप्रमाणे इहलोकात सभ्य, अभिजात कलापूर्ण कसे राहावे याचे धडेही भारताने गिरवले. अगदी साधा अशिक्षित माणूसदेखील उच्चतम जीवनसाधक असू शकतो, असे भारतीय विकासाची नीती मानते. भारतीय दृष्टीकोनातून त्याच्याकडे आधुनिकतम साधन-सोयी नसतानाही, तो विकसित असू शकतो. हाच हिंदुभाव आहे!!

 

एखाद्या व्यक्तीने किंवा कुटुंबाने स्वेच्छेने साधे राहणे, चिंतनात वेळ घालवणे स्वीकारले असेल, कमी संसाधनांमध्ये ते कुटुंब समाधानी जीवन जगत असेल, तर भारतीय दृष्टीकोनातून ते कुटुंब विकसित असते. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती राजप्रसादासारखे सुख-वैभव उपभोगत असेल, त्यात समाधानी असेल, स्वस्थचित्त व आनंदी असेल तर ती व्यक्तीसुद्धा भारतीय दृष्टीकोनातून विकसित आहे. शुद्ध आनंदी मन:स्थिती, तसेच रचनात्मक सर्जनात्मक कामे, इतरांना हितकर अशा सकारात्मक इच्छा असतील आणि आत्मोन्नतीकडे जर मनुष्य, कुटुंब, व्यक्ती, समाज जात असेल, तर भारतीय दृष्टीकोनातून तो विकासाचा मार्ग ठरतो.

 

जगण्याच्या या हिंदुभावाला चैतन्यवादी दृष्टीकोन असे म्हणता येईल. या पद्धतीने जगताना परस्पर आत्मीयता अपेक्षित असते, जो समर्थ असेल तो इतरांचे रक्षण करेल असा भाव असतो. निसर्ग आणि मानव हे एकमेकांचे पूरक घटक म्हणून एकमेकांचे रक्षण करतात. मनुष्य निसर्गावर प्रेम करतो. त्याचे शोषण करत नाही. या व्यवस्थेत स्पर्धेऐवजी परस्पर सहकार्य हे प्रगतीसाठी आवश्यक मानले जाते.

 

सामाजिक दृष्टीकोनातून पाहिले, तर या व्यवस्थेमध्ये विकेंद्रित अर्थव्यवस्था असते, जी ग्राम आधारित असते. निसर्गाचे दोहन केले जाते. ऊर्जेचा अमर्याद वापर केला जात नाही. हवा, पाणी शुद्ध राखण्याचे प्रयत्न केले जातात. परस्परावलंबी असली, तरीही परावलंबी अशी व्यवस्था नसते. तंत्रज्ञान हे समुचित असते आणि व्यक्तिमत्त्व विकासाची धारणा ही प्रेम, आदर, आत्मीयता, मैत्रिभाव, क्षमाशीलता यावर अवलंबून असते.

 

एकूणच हिंदुभाव म्हणजे व्यक्ती, समाज आणि निसर्ग या तिघांनी हातात हात घालून प्रेमाने चालणे होय.

 

सर्वांचेच निबंध उत्तम आहेत. साधारणपणे सगळ्यांचे मुद्दे येथे घेण्याचा प्रयत्न केला आहे. चिंतनशील तरुण पिढी बघून परीक्षण करताना मला आनंद व समाधान वाटले.

 

- डॉ. रमा दत्तात्रेय गर्गे