शारदीय चांदणे : शांताबाई शेळके यांच्या भावगीतांचे

विवेक मराठी    22-Oct-2021
Total Views |
@प्रवीण दवणे
गीतरचनेच्या गाभार्‍यात कवितेचा दिवा तेवता ठेवून शांताबाई शेळके यांनी गीताचे अनेक प्रकार हाताळले. भक्तिगीते, लावणी, बालगीते, लोकगीते, नाट्यगीते, गवळणी, राष्ट्रभक्तिगीते, प्रेमगीते असे अनेक. भावगीतातील त्यांचे काव्य व रचनाकौशल्य यांनी रसिकांना स्वप्नामधील गावा नेले. 12 ऑक्टोबर 1922 हा त्यांचा जन्मदिनांक त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या स्वागताचा व आदरांजलीपर ठरणारा त्यांच्या ‘भावगीतकार’ या भूमिकेचा आस्वादपर वेध घेणारा हा वैशिष्ट्यपूर्ण लेख खास ‘विवेक’ दिवाळी वाचकांसाठी.

poet_1  H x W:
मी माझे गाणे गुणगुणत राहिले,
वेडेपण काय! लोक म्हणत राहिले।
 
 
असे स्वत:चे गाणे गुणगुणत, भोवतालच्या प्रतिक्रियांचा आदर करीत, पण स्वत:च्या अटींवर लेखनसंसार करणार्‍या शांताबाई शेळके यांचे जीवनशताब्दी वर्ष सुरू होत आहे. शांताबाईंनी व्यक्त होण्याची अनेक माध्यमे हाताळली - अगदी कथा, कादंबरी, आत्मकथनपर, ललित लेख या लेखनाबरोबर त्यांचे निवडक अनुवादही केले. साहित्यपर व्याख्याने दिली, पण शांताबाईंची लेखणी रमली ती कवितालेखनात.
 
 
मूळ पिंड कवयित्रीचा असल्याने त्यांच्या ललित गद्य लेखनातही काही वर्णने काव्यात्मक उतरली आहेत. वडिलांच्या व्यवसायानिमित्त झालेल्या भ्रमंतीमुळे त्यांना खेडोपाडीची लोकसंस्कृती कळली; आजोळच्या संस्कारांमुळे नातेसंबंध, रितीरिवाज, म्हणी-वाक्प्रचारांचे अनेक रंग त्यांना भावले आणि हे सगळे लोकधन त्यांच्या विविध गीतरचनांमध्ये पाझरले. कवितेचा दिवा गीतांच्या प्राणांमध्ये तेवत होता; संत, पंत, आख्यानकवी यांचे संस्कृतप्रचुर साहित्य आस्वादून त्यांचा लेखनभाव जसा प्रासादिक झाला, तसा अभिजात वाङ्मयाचा अभ्यास व आस्वाद यामुळे तो सालंकृतही झाला.
 
 
शांताबाईंची गीतेही लोकप्रिय झाली, कारण ती सहजसंवादी, मृदुल शब्दकळेची होती. गीतलेखन म्हणून विविध प्रकारचे सर्जनशील साहस करण्यात त्यांना मुळात मौज वाटत असे. एखादा लेखनप्रयोग यशस्वी होणे वा न होणे हे नंतर, पण मुळात तो करून पाहायला हवा ही ओढ हे त्यांच्या गीतलेखनातील विविधरंगी आविष्काराचे रहस्य आहे. सुदैवाने काव्य व गीत ‘जाणणारे’ प्रतिभासंपन्न गायक व संगीतकार त्यांना ऐन उमेदीत लाभले. नावेच घ्यायची झाली, तर ज्येष्ठ पिढीतील श्रीनिवास खळे, यशवंत देव, सुधीर फडके, वसंत पवार, हृदयनाथ मंगेशकर, आनंदघन, प्रभाकर पंडित, पं. जितेंद्र अभिषेकी, श्रीधर फडके अशी अनेक नावे घेता येतील.
 
 
शांता शेळके व्यवसायाने प्राध्यापक असल्या, तरी वृत्तीने ‘विद्यार्थी’ होत्या. आणि उत्तम गीतकाराकडे हे विद्यार्थिपण सतत जागे असावे लागते. मी लिहीन तो अंतिम शब्द ही मुजोरी चालत नाही. चर्चा करून योग्य ते बदल स्वीकारण्याचे निरभ्र मोकळेपण लागते. शांताबाईंकडे ते होते. म्हणूनच श्रीनिवास खळे यांच्याबरोबर गीतरचना करताना त्या जितक्या सहजपणे लिहीत गेल्या, त्याचप्रमाणे देवदत्त साबळे, हेमंत भोसले, अनिल-अरुण असा त्यांच्या पुढच्या त्या वेळच्या तरुण संगीतकारांकडे ‘काव्य’ करतानाही शांताबाई नवे प्रयोग स्वीकारीत राहिल्या. भारतीय संगीताचा पाया असणारे नाट्यगीतात्मक ‘काव्य’ रचताना त्या जितक्या तरल लेखन करीत राहिल्या, त्याच शांताबाई पाश्चिमात्य सुरावटीवर काहीशी बेधडक तालप्रधान गीतरचना करताना संकोचल्या नाहीत.
 
 
हे काहीसे दीर्घ प्रास्ताविक एवढ्यासाठी की गीतकार म्हणून शांताबाईंच्या वैशिष्ट्यांचा आनंद घेताना त्यांच्या प्रयोगशील किंवा प्रयोगोत्सुक सर्जनशीलतेचाही वेध घेणे गरजेचे आहे.
 

poet_1  H x W:  
 
भावगीतात्मक रचना हे गीतकार म्हणून शांताबाईंचे वैशिष्ट्य ठरले. स्वररचनेबरहुकूम गीत लिहिताना कधी महाकवी कालिदासांच्या मेघदूतावरून आपण प्रेरणा घेतली, किंवा नाट्यगीतातील एखादे चिंतनशील गीतलेखन करताना सूरदास, कबीर, मीराबाई यांच्या पदांचा आधार घेतला, हे सांगताना त्या संकोचल्या नाहीत. पं. हृदयनाथांच्या स्वररचनेतील आशा भोसले यांनी गायिलेले ‘जिवलगा, राहिले दूर घर माझे’ हे अजरामर गीत लिहून झाल्यावर यातील ‘जिवलगा’ हा सुरुवातीचा शब्द हृदयनाथांनी सुचवला आहे, हे सांगताना त्यांना आनंदच होत असे.
 
 
ज्याचे श्रेय त्यास देऊन मोकळे होण्याचा शांताबाईंचा स्वभाव असल्याने त्यांचा लेखनप्रवास असा स्वच्छ शारदीय चांदण्याप्रमाणे का झाला, त्यांच्या पिढीतील इतर यशस्वी साहित्यकांमध्येही त्या व्यासंगाने आणि स्वाभाविक चांगुलपणाने कशा आदरणीय ठरल्या, याचेही रहस्य कळते.
 
 
शांताबाई शेळके यांची भावगीतेही अनेकरंगी आहेत. ज्या भावगीताने आजही विरहहृदये कातर होतात, त्यातले स्वरतीर्थ बाबूजी, अर्थात सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेले व गायिलेले ‘तोच चंद्रमा’ हे भावगीत शांताबाईंमधील अभिजात वाचक व अभिजात कवयित्री यांच्या रसायनाचे प्रतीक ठरावे. मूळ संस्कृतमध्ये श्लोक ‘य: कौमारहर: स एव हि वर: ता एव चैत्रक्षपा:।’ काव्यप्रकाशातील या श्लोकाचे चिंतन-मनन शांताबाईंच्या मनात रुजले होते. संधी मिळताच त्यांच्या परीसस्पर्शी प्रतिभेने व व्यासंगाने एक उत्कट विरहगीत दिले.
 

poet_5  H x W:
 
हे गीत म्हणजे गायकाच्या हुरहुरीच्या भावनेचे मूर्तिमंत भावचित्रच आहे.
 
निरवता ती तशीच धुंद तेच चांदणे,
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे,
जाईचा कुंज तोच तीच गंधमोहिनी
एकान्ती मजसमीप तीच तूहि कामिनी!
 
 
आपले ‘मन’ जणू स्वत:च्याच ‘मनाचा’ श्रोता करून या गीतातील नायक उलगडत आहे. प्रेयसीबरोबर व्यतीत केलेल्या गंधमोहक धुंद चांदण्याच्या स्मरणाने व्याकूळता येत आहे. आज हे सारे निसर्गचित्र समोर आहेच, पण त्यातील प्राण मात्र आता मालवला आहे. त्या निष्प्राण निसर्गनिरवतेचे वर्णन शांताबाई शेळके कसे करतात, पाहा -
 
 
सारे जरि ते तसेच, धुंदि आज ती कुठे?
मीहि तोच तीच तूहि प्रीती आज ती कुठे!
ती न आर्तता उरात स्वप्न ते न लोचनी
एकान्ती मजसमीप तीच तूंहि कामिनी!
 
 
शांताबाईंची भावगीते अशी आत्मसंवादीही आहेत. खिन्नता, आर्तता, एकाकीपण असे भावरंग त्यातून प्रकट होतात. पं. हृदयनाथांच्या स्वररचनेवर आधारित असूनही मूळ गीतच आधी लिहिलेले असावे इतके ‘जिवलगा, राहिले रे दूर घर माझे!’ हे तरल गीत आहे. उत्तम कवयित्री असलेल्या गीतकारांची सर्व वैशिष्ट्ये या गीतात रसपूर्ण उत्कटतेने व्यक्त झाली आहेत.
हे केवळ शारीर प्रियकराबद्दलचे विरहगीत न राहता, काहीसा सुफीया अंदाजाचे वातावरण असून मधुरा भक्तीचे विरहगीत करण्यात शांताबाई शेळके यांचे शब्द यशस्वी झाले आहेत. वातावरणाची गहन गूढता हा या गीताचा आत्मा आहे.
 
 
किर्र बोलते घन वनराई
सांज सभोती दाटुन येई।
सुखसुमनांची सरली माया, पाचोळा वाजे
जिवलगा राहिले रे दूर घर माझे!
 
 
या ‘किर्र’ ह्या अकाव्यात्मक वाटणार्‍या शब्दामुळेही गाण्याला केवढा गूढ भाव आला आहे. घन, वन, दाटुन अशा अनुप्रासयुक्त शब्दांमुळेही नादमयता निर्माण झाली आहे! आत्मा आणि परमात्मा यांची एक निगूढ ओढ व्यक्त होताना एक प्रकारची सकल शरणता, अनन्य भाव शब्दातून कसा व्यक्त होतो पाहा.
 

poet_8  H x W:
 
निराधार मी, मी वनवासी
घेशिल केव्हा मज हृदयासी?
तूच एकटा नाथ अनाथा महिमा तव गाजे
जिवलगा, राहिले रे दूर घर माझे।
 
 
हृदयनाथांची मनव्याकूळ संगीतरचना, स्वरांचे आर्त आकाशच असणार्‍या आशा भोसले यांच्याइतकेच श्रेय शांताबाईंच्या शब्दांनाही आहे. याच भावगीताच्या बरोबरीने इतकेच टोकाचे सुंदर गाणे शांता शेळके यांनी लिहिले आहे, ते म्हणजे -
 
 
ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा
  
माझ्या मनातला का तेथेे असेल रावा।
 
या गीताचे वेगळेपण म्हणजे, हे गीत शांताबाईंनी रचना म्हणून केलेले नाही, तर मूळ काव्य म्हणून त्यांनी आधी लिहिले. हृदयनाथांनी ह्या कवितेला सूर देऊन - स्वरसाज देऊन लक्षावधी रसिकांना अक्षरश: त्यांच्या स्वप्नामधील गावा नेऊन पोहोचवले.
ही कविता म्हणजे एक रंगचित्रच आहे. स्वप्नरम्यता तर त्यात आहेच, त्याचबरोबर अजून न गवसलेल्या आंतरिक उत्कट सुखस्पर्शाची आस लागलेल्या कोवळ्या जिवाचे आत्मसंवादी मनोगत आहे. प्रत्येक कडव्यात मिलनाची आस सुचवणार्‍या निसर्गप्रतिमांची गहिरी पण तरीही प्रत्येकात आपले प्रतिबिंब दिसावे अशी पारदर्शक नितळता आहे. उदा.,
जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले।
 
 
poet_6  H x W:
ह्या ओळीतून धरती आणि आभाळ यांची प्रतिमा येते. तर -
 
घे साउली उन्हाला कवळून बाहुपाशी।
 
मधून उन्ह व सावली यांचे प्रणयोत्सुक नाते येते.
 
अशा सर्वपरिचित प्रतिमांना योग्य वातावरणाचा साज देऊन शांताबाईंची ही कविता एक भावार्त सादच होते. ‘स्वप्न’ ह्या एकाच
 
कल्पनेची गुंफण कवयित्री किती प्रकारे करते पाहा -
 
स्वप्नामधील गावा स्वप्नामधून जावे
 
स्वप्नातल्या प्रियाला मनमुक्त गीत गावे
 
स्वप्नातल्या सुखाचा स्वप्नीच वेध घ्यावा
 
माझ्या मनातला का तेथे असेल रावा?
 
सारे गीत-काव्य म्हणजे एक स्वप्निल परिकथाच आहे, पण ती सत्यात उतरावी असे प्रत्येकालाच वाटते. शांताबाईंचे हे काव्यगीत लोकप्रिय होण्यात ह्या प्रत्येकालाच मनोमन वाटणार्‍या स्वप्नपूर्तीच्या ओढीचाही वाटा आहे. शब्दांना एक निर्मळ शांत ओघ आहे. प्रतिमांची पखरण असली, तरी त्यांची विलोभनीय मांडणी आहे. एका उत्तम कवितेचे तितकेच प्रत्ययकारक माध्यमांतर कसे होते, याचे उदाहरण म्हणजे शांताबाई नि हृदयनाथ यांच्या गीत-संगीत युतीचे हे उदाहरण म्हणता येईल.
 
 
शांताबाईंचे असेच काव्यात्मक भावमधुर भावगीत म्हणजे - ‘चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा!’ गझल प्रकारात सहज बसेल असे हे नितांतसुंदर भावगीत माणिक वर्मा यांच्या गर्भरेशमी स्वरात लोकप्रिय झाले आहे. वसंत पवार यांनी विलक्षण भावोत्कट अशा स्वररचनेने एक मानसकथाच रसिकांपुढे सादर केली आहे.
 
 
poet_1  H x W:
साधारणत: सत्तर वर्षांपूर्वीचे प्रीतीतील मुग्ध नाट्य यात आहे. प्रीती जडूनही एका नाइलाज वळणावर नियतीकडून मिळणारे चिरंतन दुराव्याचे संकेत यात आहेत. जे कधीच विसरले जाणे शक्य नाही, ते ‘विसरून जा!’ म्हणण्यातली हृदयस्थ आर्तता ह्या काव्यात आहे.
 
 
हे भावगीत म्हणजे एक अधुरी राहील की काय अशी हुरहुर लावणारी प्रेमकथा आहे. कधीतरी सर्वस्व अर्पण केलेली गीतातली नायिका एका नाइलाजाने पुढे संसारबंधनात गुंतू शकत नाही. अशा वेळी जिवावर दगड ठेवून एखादी प्रेयसी आपल्या प्राणजिवाला कशी जीवघेणी विनंती करेल, याचे मन कातर कातर करणारे चित्रण कवयित्रीने केले आहे.
 
 
आणिले धागे तुझे तू मीही माझे आणिले
गुंफिला जो गोफ, त्याचा पीळ तू विसरून जा।
 
 
यातील ‘पीळ तू विसरून जा’ ही कल्पना भावार्त आहे. पीळ विसरणे हेच हृदयाला पीळ पाडणारे आहे. ‘तुझ्या-माझ्या धाग्यांनी एकत्र गोफ गुंफला होता, स्वप्न पाहिली होती, एकमेकांना तन-मन अर्पण केलं होतं; पण आता हे राजसा तू ते सारे विसरून जा’ हे सांगताना प्रेयसीच्या मनात होणार्‍या यातना शब्दातून व्यक्त झाल्या आहेत, त्या अर्थात माणिक वर्मा यांच्या स्पंदनऊर्मीतून, स्वरात अश्रू होऊन उतरल्या आहेत. या कवितेचे ‘गीत’ तर बहारदार आहेच, पण ‘काव्य’ नुसते वाचतानाही शांताबाईंची लेखणी ही केवळ त्यांची स्वत:ची राहत नाही, तर प्रीतीतील समर्पण मूल्य मांडणार्‍या एका पिढीच्या प्रेमिकांचे प्रतिनिधित्व करते. हेच तर त्यांच्या अविस्मरणीय गीतरचनेचे वेगळेपण आहे.
 
 
शांताबाईंनी आपल्या या गीतलेखनासाठी उपकारक ठरणार्‍या बालपणातील वातावरणाबद्दल लिहिले आहे. त्या म्हणतात - ‘माझे लहानपण खेड्यात गेले. एकत्र कुटुंबामुळे बायकांच्या तोंडून जात्यावरच्या ओव्यांपासून नागपंचमीच्या फेराच्या गाण्यांपर्यंत गाणी कानावर पडत. त्यांतील लय-तालांमुळे ही जाणीव लहान वयापासून झाली. एखाद्या निवांत संध्याकाळी, उदास हुरहुरीच्या वेळी अजूनही त्यातल्या ओळी अवचित्त मनात जाग्या होतात. ते शब्द, ते सूर आज सुखावतात, तसे दूर दूर गेल्यामुळे खिन्नही करतात.’
अबोध मनावर उमटलेले ते लय, ताल, लोककथा, उखाणे, म्हणी, रितीरिवाज यांचे संस्कार शांताबाईंच्या गीतलेखनास समृद्ध तर करून गेलेच आहे, त्याचबरोबर अस्सल मराठी मातीचा ओला सुगंधही त्यांच्या काव्यात्मक गीतांना आला आहे.
 
 
diwali_1  H x W
 
स्वररचनेबरहुकूम शब्द ठेवत जायचे आणि त्यातूनही पुन्हा एकत्र अर्थाचे चित्र एकसंध वाटावे अशी काळजी घ्यायची, ही तारेवरची कसरत कवी असलेल्या अनेक गीतकारांना करावी लागते. या तंत्राबद्दल पुरेसे माहीत नसलेले आणि स्वररचनेच्या वजनावर लिहिण्याने गाण्यात शब्दांचे, रचनेचे वेगळणेपण कसे येते, याबद्दलच्या अज्ञानाने अनेक जण अशा गीतलेखनावर आक्षेप घेतात. काहींना तर गीतकाराने अशा प्रकारचे लेखन करणे हेच दुय्यम वाटते. अर्थात त्यात काही अंशी तथ्य असेलही, पण हे आव्हान मुळातल्या कसदार कवीसमोर येते, जेव्हा त्याला या रचनातंत्राचे बलस्थानही माहीत असते.
 
 
शांताबाई शेळके यांनी अशा तंत्रप्रधान आणि मूळ स्फूर्तिकेंद्र बाह्य असलेल्या लेखनप्रकारातही प्रयत्नपूर्वक प्रभुत्व मिळवले होते. केवळ चालीवरचेच गाणे नव्हे, तर मूळ बंदिशी, चिजा, बंगाली, आसामी स्वररचना व शब्दकळा, लोकगीतांचा व त्यातील शब्दांचा मुक्तपणे वापर करून त्यांनी आपले ‘गीतकार’पण सौष्ठवपूर्ण केले आहे.
 
 
याबाबत खुद्द शांताबाई शेळके काय म्हणतात, ते बघण्यासारखे आहे. “चालीवर लिहिणे अनेक कवींना रुचत नाही. असे करताना कवींवर काही बंधने पडतात, हेही खरे. पण चालीमुळे, त्यांच्या वेगळ्या वजनामुळे, त्यांतल्या विशिष्ट खटक्यामुळे कवीला कित्येकदा अगदी वेगळ्या कल्पना सुचतात, वेगळ्या प्रकारची गीतरचना तो करून जातो, हेही तितकेच खरे. निदान माझा तरी हा अनेक गीतांबाबतचा अनुभव आहे. माझ्या लोकप्रिय झालेल्या गीतांपैकी अनेक गीते मी चालीवर रचली आहेत.”
 
 
चालीवर गीतरचना करण्याचा शांताबाईंचा हा द़ृष्टीकोन अतिशय स्वच्छ व प्रामाणिक आहे आणि केवळ मत मांडूनच त्या थांबलेल्या नाहीत, तर त्यांनी अनेक दर्जेदार गीतरचना या तंत्राबरहुकूम सिद्ध केल्या आहेत. उदाहरणादाखल अशा काही गीतांचे मुखडे द्यावेसे वाटतात -
 
 
पुनवेचा चंद्रम आला घरी
चांदाची किरणं दर्यावरी
चांदण्याच्या चुर्‍यात
खार्‍या खार्‍या वार्‍यात
तुझा माझा एकांत रे साजणा!
 
 
 
किंवा मानस मुखर्जी यांच्या बंगाली शब्दांच्या आधारे व बंगाली भाषेच्या सुरावटीचा प्रत्यय देणार्‍या चालीवर -
 
 
ना ना ना ना नाही नाही गं
 
आता पुन्हा मसासि येणे नाही गं!
घन भरून भरून झरे गगन वरून
कुणी साजण दुरून मज दिसे की हसे
खुणावि सये बाई गं!
ना ना ना ना नाही नाही नाही गं।
 
 
आता या गीतात ‘काव्य’ अगदी मूळ कवितेप्रमाणे नसेलही, पण ज्या खटक्यात नि शब्दांच्या वेगळ्या रूपबंधात लिहिण्याची संधी शांताबाईंना मिळाली, त्या संधीचे बाईंनी सोने केले आहे. प्रीत जडलेल्या नि नकारातही होकार छुपलेल्या खट्याळ युवतीचे हे प्रेमभावनाट्य शब्दांमुळे भुरळ पडावे असेच झाले आहे. गीतकार म्हणून शांताबाईंचे रचनाकौशल्य स्पष्ट करण्याचा याच गीताचा पुढील कडव्याकडे आपण पाहावे -
 
 
बोलति चुडे किण किण किण
कलशि जल गाते गं।
नुपुर बोले छुन छुन छुन
पाउल पुढे जाते गं।
नवल पडे अहा अहा अहा
हृदय धडधडे कि उडे
पदर सये बाई गं।
ना ना ना ना नाही नाही गं।
 
 
ज्या प्रकारची शब्दरचना कवयित्री शांता शेळके यांनी गीतरचनाकाराच्या अंतरंग कुंचल्याने केली आहे, ती स्तिमित करणारी आहे.
 
 
 
पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वररचनेवरील
शालू हिरवा पाच नि मरवा
वेणि तिपेडी घाला
साजणी बाई येणार, साजण माझा!
गोर्‍या भाळी चढवा जाळी
नवरत्नांची माला।
साजणी बाई येणार साजण माझा।
 
 
हे भावगीतही त्यातील अगदी दोन किंवा तीन अक्षरीच शब्दांच्या चित्रमय रचनेमुळे लोकप्रिय ठरले. तुलनेने अलीकडचे म्हणावे असे श्रीधर फडके यांच्या स्वररचनेतील, आशा भोसले यांच्या स्वरातील ‘ऋतु हिरवा’ हे भावकाव्य मराठी भावगीत प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरेल असे आहे. श्रीधरजींच्या अत्यंत तरल अशा सुरावटीवर शांताबाई शेळके यांनी तेवढेच तजेलदार नि वासंतिक शब्द लिहिले आहेत.
 
 
ऋतु हिरवा ऋतु बरवा
पाचूचा वनी रुजवा।
युग विरही हृदयावर
सरसरतो मधु शिरवा।
 
 
या शब्दातच एक ताजे टवटवीतपण आहे. कविवर्य बा.भ. बोरकर यांची कविता स्फूर्तिस्थानी आहे. त्यातील काही शब्दांनी आरंभ करून पुढे शांताबाईंनी स्वररचनेच्या वल्ह्याने स्वत:चे काव्य गुंफले आहे.
 
 
 
अशा प्रकारे, केवळ भावगीतकार म्हणून जरी शांताबाईंचे कार्य पाहिले, तरी ते अपूर्व आहे. ग.दि. माडगूळकर यांच्यासारखे दिग्गज कवी गीतरचनेतून प्रकटत असताना स्वतंत्र पाऊलवाट निर्माण करण्याचे श्रेय त्यांच्या प्रयोगशील व नवतेचा स्वीकार करणार्‍या मुक्त प्रतिभेला द्यायला हवे. गोविंदराव टेंबे, स.अ. श्ाुक्ल, शांताराम आठवले, राजा बढे, आचार्य अत्रे, माधव ज्युलियन, ना.घ. देशपांडे अशा श्रेष्ठ कवी-गीतकारांच्या आकाशगंगेत स्वत:चे गीतनक्षेत्र लखलखत ठेवणारी ही शारदीय चांदण्याची प्रतिभा रसिकांना सदैव मोहवतच राहणार आहे.