भारताची अभयवरदायिनी सत्ता

विवेक मराठी    23-Oct-2021
Total Views |
@रमेश पतंगे
 
अमेरिका आणि रशिया ही हार्ड पॉवर देशांची उदाहरणे आहेत. हार्ड पॉवर म्हणजे बळाच्या, शस्त्राच्या जोरावर आपले वर्चस्व सिद्ध करणे. मात्र भारत हा सॉफ्ट पॉवर म्हणून उदयास येत आहे. सॉफ्ट पॉवर या शब्दाला आपण ‘पालकसत्ता’ किंवा ‘अभयवरदायिनी सत्ता’ असा शब्दप्रयोग करू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या परराष्ट्र नीतीमध्ये या सॉफ्ट पॉवर डिप्लोमसीचा अतिशय कौशल्याने वापर केलेला आहे. ‘विश्वगुरू भारत’ हे त्यांचे स्वप्न आहे आणि भारत पारतंत्र्यात असतानाच स्वामी विवेकानंदांनी भारतापुढे हे स्वप्न ठेवलेले आहे. एका संन्यासी नरेंद्राचे हे स्वप्न राजयोगी नरेंद्र पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे.

bjp_13  H x W:
 
जागतिक सत्ताकरणात दोन शब्दांचा वापर सातत्याने केला जातो. पहिला शब्द आहे ‘हार्ड पॉवर’ आणि दुसरा शब्द आहे ‘सॉफ्ट पॉवर’. या दोन्ही शब्दांचे विशिष्ट अर्थ आहेत. हे अर्थ समजून घेण्यापूर्वी पॉवर म्हणजे सत्ता याचा अर्थ काय होतो? पॉवर (सत्ता) याचा अर्थ आपल्याला जे हवे ते दुसर्‍याकडून करवून घेण्याची शक्ती म्हणजे सत्ता. ही सत्ता अनेक प्रकारे व्यक्त होत असते. राज्यसत्ता ही सर्वव्यापी आणि अतिशय शक्तिमान असते. राज्यसत्ता दोन विभागांत कार्यरत असते. पहिला विभाग देशांतर्गत असतो. देशांतर्गत शांतता, सुव्यवस्था राखण्यासाठी कायदे करावे लागतात, कायद्याची अंमलबजावणी करावी लागते, अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस दल लागते. नाक्यावर उभ्या असलेल्या गणवेशधारी पोलिसाच्या रूपाने ही राज्यसत्ता आपण रोज पाहत असतो.
 
 
राज्यसत्तेचे दुसरे क्षेत्र आंतरराष्ट्रीय आहे. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात शेजारील देशांपासून ते हजारो मैल दूर असलेल्या देशांशी संपर्क येतो. शेजारील देशांपासून ते दूरच्या देशांपर्यंत आपल्याला जे हवे ते त्याच्याकडून करून घेण्याची शक्ती म्हणजे आंतरराष्ट्रीय सत्ता. ही आंतरराष्ट्रीय सत्ता वर दिलेल्या दोन शब्दांतून व्यक्त होते. त्यातील हार्ड पॉवर म्हणजे देशाची लष्करी शक्ती. खडे सैन्य, विमानदल, रणगाडा दल, क्षेपणास्त्रे, अणुबाँब, विमानवाहू नौका, पाणबुड्या इत्यादी माध्यमांतून लष्करी शक्ती व्यक्त होते. जगातील हार्ड पॉवर म्हणून ज्या देशांची गणना केली जाते, त्या देशांत अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन आणि फ्रान्स हे देश येतात. लष्करी शक्तीच्या बळावर हे देश दुसर्‍या देशाकडून आपल्याला जे हवे ते करून घेण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक देशाचे आपले प्रभावक्षेत्र आहे. लष्कराच्या साहाय्याने आपल्याला जे हवे ते अन्य देशाकडून कसे करून घेतले जाते, याची जागतिक राजकारणात अनेक उदाहरणे आहेत. यापैकी अमेरिका आणि रशिया यांची एक एक उदाहरणे बघू.
 
 
अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे मुख्य सूत्र ‘मन्रो डॉक्ट्रीन’ यात 1823 सालीच घोषित केले आहे. हे सूत्र सांगते की, अमेरिका खंडात युरोपातील कोणत्याही सत्तेने लुडबुड करता कामा नये. तसा कुणी प्रयत्न केल्यास अमेरिका त्याचा विरोध करील. अमेरिका खंडातील देशात हस्तक्षेप याचा अर्थ नेमका काय होतो, हे समजून घ्यायला पाहिजे. युरोपातील कोणताही देश समुद्रमार्गे सैन्य घेऊन अमेरिका खंडातील कुठल्याही देशावर स्वारी करण्याची शक्यता शून्य. दुसर्‍या देशाच्या कारभारात हस्तक्षेप याचे अर्थ व्यापारी हस्तक्षेप, सत्तेवर आपल्या देशाला अनुकूल अशी राजवट आणणे, नैसर्गिक साधनसंपत्तीवर मक्तेदारीचे करार करून त्या ताब्यात घेणे अशा भिन्न भिन्न प्रकारे हस्तक्षेप केला जातो. मध्य अमेरिकेतील देश आकाराने लहान आहेत, परंतु साधनसंपत्तीने अतिशय समृद्ध आहेत. यातील काही देशांची नावे अशी आहेत - व्हेनेझुएला, निकरागुवा, ग्रेनाडा, होंडुरास, क्युबा, पनामा, कोलंबिया. या सर्व देशांवर अमेरिकेचे जबरदस्त प्रभुत्व आहे. यातील सगळ्यात छोट्या देशाचे नाव आहे ‘ग्रेनाडा’. तो किती छोटा आहे, तर त्याची लोकसंख्या फक्त एक लाख बारा हजार आहे. सगळे ख्रिश्चन्स आहेत. त्याचे क्षेत्रफळ आहे 348.5 चौरस किलोमीटर (मुंबईचे क्षेत्रफळ 603.4 चौरस किलोमीटर आहे) आणि देशाच्या राजधानीचे नाव आहे ‘सेंट जॉर्जेस’. या छोट्या देशात जायफळाचे उत्पादन प्रचंड होते, तसेच अन्य मसाल्यांच्या पदार्थांचेही भरपूर उत्पादन होते.
 
 
bjp_7  H x W: 0
बंडखोरांकडून मारले गेलेले ग्रेनाडाचे पंतप्रधान मॉरिस बिशप
 
हा देश ब्रिटिशांची वसाहत होता. 1974 साली तो स्वतंत्र झाला. त्याला सार्वभौमत्व प्राप्त झाले. अमेरिकेच्या भौगोलिक विस्तारापुढे आणि लोकसंख्येपुढे हा देश एखाद्या तिळासारखा आहे. पण या देशावर अमेरिकेने 25 ऑक्टोबर 1983 रोजी आक्रमण केले. त्याचे कारण असे घडले की, मॉरिस बिशप या पंतप्रधानाची बंडखोरांनी अतिशय क्रूरपणे हत्या केली. मॉरिस बिशप यांच्याविरुद्ध उपपंतप्रधान बर्नाड कोर्ड याने बंड केले. बिशपला त्याच्या घरातच कैद करण्यात आले. तो लोकप्रिय होता. लोकांनी उठाव करून त्याला सोडविले. यानंतर बिशप आणि बंडखोरांच्या ताब्यात असलेले सैन्य यांच्यात संघर्ष झाला. त्यात बिशप आणि त्याच्या अकरा सहकार्‍यांना पकडण्यात आले. एका रांगेत उभे करून त्यांना ठार करण्यात आले.
 
 
रिगन तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. ग्रेनाडामध्ये डाव्या विचारसरणीचे सरकार येणे अमेरिकेला मंजूर नव्हते. ग्रेनाडामध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी सहाशे अमेरिकन विद्यार्थी होते. त्यांच्या सुरक्षेचा विषय रिगन यांनी केला. याच काळात इराणमध्ये वकिलातीला घेरा घालून चारशे दिवसांहून अधिक काळ इराणच्या सैन्याने अमेरिकन स्त्री-पुरुषांना ओलिस धरून ठेवले होते. तसा प्रसंग ग्रेनाडामध्ये निर्माण होऊ नये, म्हणून अमेरिकेचे 7600 सैनिक ग्रेनाडामध्ये पाठविण्यात आले. ते आधुनिक शस्त्रांनी सज्ज होते. बिशप यांना ठार करून अधिकारावर आलेले सैनिकी शासन समाप्त करण्यात आले. ग्रेनाडात अमोेरिकेचे व्यापारी हितसंबंध गुंतलेले होते. मसाल्याची शेती करणार्‍या अमेरिकन कंपन्या होत्या. आपल्या आर्थिक हितसंबंंधांना अजिबात धोका निर्माण होता कामा नये, म्हणून ग्रेनाडासारख्या केवळ 348.5 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या छोट्या देशावर अमेरिकेने स्वारी केली. एक मुंगी मारायला दहा हत्ती पाठविण्यासारखे हे काम झाले.
 

bjp_8  H x W: 0
 
 1956 सालचा हंगेरीतील उठाव आणि त्याचा नेता इम्रे नेगी
 
अमेरिकेने निकारागुवा येथे अशाच उचापती केल्या. सुएझ कालव्याप्रमाणे दोन समुद्रांना जोडणारा पनामा कालवा आहे. पनामा हे एका भूभागाचे नाव आहे. तो कोलंबियाचा भाग होता. कोलंबिया, अमेरिकेला पनामा कालवा बांधण्याची अनुमती देत नव्हता आणि अनुमती हवी असेल तर भरसाठ पैसा मागत होता. अमेरिकेने पनामामध्ये लाखो डॉलर्स गुंतवून बंड घडवून आणले. पनामाला कोलंबियापासून वेगळे केले. आम्ही स्वतंत्र देश आहोत, असे बंडखोरांनी घोषित करताच अमेरिकेने त्याला तत्काळ मान्यता दिली आणि नंतर मग जगप्रसिद्ध पनामा कालवा खोदण्यात आला. अटलांटिक आणि पॅसिफिक महासागर यांना जोडणारा हा कालवा आहे.
 
 
अमेरिकेप्रमाणे रशियादेखील आपल्या प्रभावक्षेत्रात अन्य कुठल्या देशाचा हस्तक्षेप किंवा बंडाळी सहन करीत नाही. 1956 साली हंगेरीत उठाव झाला. इम्रे नेगी यांनी या उठावाचे नेतृत्व केले. हंगेरी हा देश रशियाच्या आधिपत्याखाली होता. इम्रे नेगीने कम्युनिस्ट राजवटीला विरोध केला. त्याचा उठाव यशस्वी झाला आणि तो देशाचा पंतप्रधान झाला. त्याने युनोकडे आणि पश्चिम युरोपातील देशांकडे मदतीची याचना केली. रशियाशी दोन हात करायला कुणाची तयारी नव्हती. पूर्व युरोप रशियाच्या प्रभावाखाली राहील असे पश्चिम युरोपातील देशांनी मान्यच केले होते. 4 नोव्हेंबर 1956ला रशियाचे रणगाडा दल हंगेरीत घुसले. बंड करणारे शेेकडो लोक रणगाड्याखाली चिरडले गेले. इम्रे नेवीला अटक झाली. राजद्रोहाचा आरोप त्याच्यावर ठेवून त्याला ठार करण्यात आले. या सर्व प्रकरणात अमेरिका शांत होती.
 
 
ग्रेनाडाच्या आक्रमणाचा जगाने निषेध केला. हंगेरीवरील आक्रमणाचादेखील जगाने निषेध केला. भारतात तर अशा निषेधाची चटक लागलेली स्वयंघोषित, लोकशाहीवादी मंडळी आहेत. त्यांनीदेखील निषेध केला. जागतिक सत्ताकारण शाब्दिक तोफगोळ्यावर चालत नाही. ते तोफांच्या गोळ्यांवर आणि रणगाड्यांच्या गोळ्यांवर चालते. शाब्दिक वटवटीला अमेरिका भीक घालीत नाही आणि रशियादेखील भीक घालीत नाही. रशियाने पोलंडचा उठावदेखील याच पद्धतीने मोडून काढला. पोलंडमध्ये 1956ला तिथल्या औद्योगिक कामगारांनी उठाव केला. कामाचे तास कमी करा, भाकरी द्या म्हणून त्यांनी मोर्चे काढले. कम्युनिस्ट पक्षांच्या अधिकार्‍यांना ठोकून काढले. त्यांनाही कम्युनिस्टांच्या सैन्याने गोळीबार करून शांत केले.
 
 
रशियाच्या हार्ड पॉवरची 2014ची घटना म्हणजे युक्रेनचा प्रांत असलेल्या क्रिमियावर रशियाने आक्रमण केले आणि तो भाग रशियन संघराज्यात समाविष्ट करून टाकला. ज्याप्रमाणे अमेरिकेने कोलंबियापासून पनामा तोडला, त्याच पद्धतीने रशियाने क्रिमियाला युक्रेनपासून तोडले. क्रिमियाच्या कायदे मंडळात रशियात सामील होण्याचे ठराव झाले. त्यानंतर सार्वमत घेऊन जनतेलाच रशियात सामील व्हायचे आहे, असा आभास निर्माण करण्यात आला. सार्वमतात 98% जनतेने रशियात सामील होण्याच्या बाजूने मतदान केले असे सांगितले गेले. क्रिमिया गिळंकृत करीत असताना रशियाविरुद्ध सगळे पाश्चात्त्य देश मिठाची गुळणी घेऊन बसले आहेत. युक्रेनच्या मदतीला अमेरिका गेली नाही, युनोदेखील गेली नाही आणि ब्रिटनदेखील गेले नाही. युक्रेन हा रशियाच्या प्रभावक्षेत्राखालील देश आहे आणि क्रिमियावर रशियाचा इतिहासकाळापासून हक्क आहे, या गोष्टी अन्य जागतिक महासत्तांनी मान्य केल्या आहेत.
 
 
bjp_3  H x W: 0
  जगाच्या पाठीवरील हार्ड पॉवर सत्ताकेंद्रे - अमेरिका आणि रशिया
 
ही झाली हार्ड पॉवरची दोन देशांची उदाहरणे. आता आपल्याला ‘सॉफ्ट पॉवर’कडे यायचे आहे. ‘सॉफ्ट पॉवर’ याला मराठीत प्रतिशब्द देणे अवघड आहे. सॉफ्ट याचा अर्थ होतो मऊ, मुलायम आणि पॉवरचा अर्थ होतो सत्ता. म्हणून या शब्दाचा अर्थ मऊ मुलायम सत्ता असा अर्थ येत नाही, ते हास्यास्पद होईल. जोसेफ नाय या अमेरिकन राजनीतिक अभ्यासकाने 1990 साली प्रथम ‘सॉफ्ट पॉवर’ हा शब्दप्रयोग केला. या विषयावर त्यांची पुस्तके आहेत. त्यांनी असे म्हटले की, सॉफ्ट पॉवर म्हणजे कोणताही दबाव निर्माण न करता दुसर्‍याला आपल्याकडे आकर्षित करणयाची शक्ती. दुसरा कोणताही दबाव याचा अर्थ सैनिकी दबाव निर्माण करायचा नाही किंवा आर्थिक दबाव निर्माण करायचा नाही. हार्ड पॉवरमध्ये सैनिकी शक्तीबरोबर आर्थिकी शक्तीचा आणि तांत्रिक शक्तीचादेखील अंतर्भाव केला जातो. आर्थिक शक्तीच्या आधारे दुसर्‍या देशाला आपल्याला हवे तसे वाकविता येते. याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे पाकिस्तान आहे. अमेेरिका पाकिस्तानला प्रचंड आर्थिक मदत देऊन आपल्याला पाहिजे ते त्याच्याकडून करवून घेत असते. जोसेफ यांना हे सांगायचे आहे की, ही हार्ड पॉवर आणि इकॉनॉमिक पॉवरची डिप्लोमसी नेहमी यशस्वी होते असे नाही.
 
 
 
अमेरिका जगातील सैनिकी, आर्थिक आणि तांत्रिक महासत्ता असूनही अमेरिकेविषयी प्रेम असणारे देश जगाच्या पाठीवर थोडे आहेत. विशेषत: आशिया आणि आफ्रिका खंडातील देश अमेरिकेचा कमी-अधिक प्रमाणात द्वेषच करीत असतात. अरबस्तानातील सगळे अरब देश अमेरिकेच्या विरोधात आहेत. सौदी अरेबिया त्याला अपवाद आहे. अमेरिकेच्या पे्रमापोटी तो अमेरिकेच्या गोटात आहे असे नाही, तर तो त्याच्या स्वार्थासाठी तिथे आहे. इराण आणि अमेरिका यांचे शत्रुत्व आहे. अफगाणिस्तान आणि अमेरिका एकमेकांचे मित्र नाहीत. पाकिस्तानची जनता अमेरिकाविरोधी आहे. इंदिरा गांधींच्या काळात सीआयए आणि अमेरिकन प्रशासन यांच्या विरोधात जबरदस्त वातावरण होते. भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री कधी थंड तर कधी उष्ण अशी राहते. अनेक देशांमध्ये अमेरिका अब्जावधी डॉलर्स गुंतवते, पण तेथील जनता अमेरिकेवर प्रेम करीत नाही. कोरिया, व्हिएतनाम, जपान असे सगळे देश अमोेरिकाधार्जिणे देश झालेले नाहीत. असे का होते? असा प्रश्न जोसेफ नाय यांना पडला आणि 1990साली ‘डेषीं झेुशी - गेीशहि छूश’ हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले.
 
 
bjp_6  H x W: 0 
 सॉफ्ट पॉवर डिप्लोमसीचा कौशल्याने वापर करणारा नेता नरेंद्र मोदी
 
त्यांचा सिद्धान्त असा आहे की, रणगाडा दल किती आहे, क्षेपणास्त्रे किती आहेत इत्यादी सॉफ्ट पॉवरचे घटक नसून त्या-त्या देशाची सांस्कृतिक मूल्ये त्याचे घटक आहेत. अमेरिकेचा विचार करता अमेरिकेची सांस्कृतिक मूल्ये कोणती? अमेरिकेचा इतिहास पाहता हा देश 1776 साली जन्माला आला. जगातील इतर देशांच्या तुलनेत अमेरिका अजून लहान आहे. भारताचे वय दहा हजार वर्षांचे आहे. चीनचेदेखील वय पाच-सहा हजार वर्षे आहे. ब्रिटन-फ्रान्स यांचे वय आठशे-हजार वर्षे आहे. सांस्कृतिक मूल्ये निर्माण होण्यासाठी फार प्रदीर्घ काळ जावा लागतो. ते एकाएकी निर्माण होत नाहीत. बी लावली आणि झाड झाले, असा संस्कृतीचा विकास होत नसतो. ती लोकजीवनात खोलवर मुरावी लागते. असे अमेरिकेच्या बाबतीत झालेले आहे असे म्हणणे म्हणजे, संस्कृती संकल्पनेचे अज्ञान व्यक्त करण्यासारखे आहे.
 
 
तरीही अमेरिकेची काही सांस्कृतिक मूल्ये सांगितली जातात. अमेरिकन संविधानाने स्वातंत्र्य, समानता आणि लोकशाही ही तीन मूल्ये स्वीकारलेली आहेत. या तीन मूल्यांच्या आधारावर अमेरिकन संस्कृतीचा विकास झाला, त्यातून अमेरिकेच्या संस्कृतीची काही मूल्ये विकसित होत गेलेली आहेत. व्यक्तिस्वातंत्र्य हे अमेरिकेचे प्रमुख सांस्कृतिक मूल्य मानले जाते. त्याला व्यक्तिवाद असेही म्हणतात. यामध्ये स्वयंपूर्णता, स्वत:चा विकास स्वत:च करून घेण्याची धडपड, स्वत:चे सुख स्वत:च्या मार्गाने शोधण्याचे पूर्ण स्वातंत्र्य यांचा समावेश होतो. वयात आल्यानंतर अमेरिकन मुले आणि मुली स्वत:च्या पायावर उभ्या राहतात. कुटुंबाशी जोडलेले राहत नाहीत. स्वत:च्या खाजगी जीवनाच्या बाबतीत ते फार काटेकोर असतात. अल्पवयातच अपत्यांची झोपण्याची व्यवस्था स्वतंत्र खोलीत होते. समानता हे अमेरिकेचे आणखी एक सांस्कृतिक मूल्य आहे. ‘निर्मितीने सर्व माणसे समान आहेत’ हे अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यातील वाक्य जगण्याचा ते प्रयत्न करतात. प्रत्येकाला समान संधी उपलब्ध असते. ‘अमेरिकन स्वप्न’ (Americal Dream) या शब्दप्रयोगात स्वत:चा विकास स्वकष्टाने करून भरपूर धन मिळविणे हा आशय येतो.
 
 
भांडवलशाही हे अमेरिकन सांस्कृतिक मूल्य आहे. अमेरिकन लोकशाही आणि भांडवलशाही या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. भांडवलशाहीचा एक विषय आहे स्पर्धा. ही स्पर्धा अनेक वेळा जीवघेणी स्पर्धा असते. व्यवसायिक स्पर्धा याचे अमेरिकेचे अनेक किस्से आहेत. वेळेचा काटेकोर उपयोग करणे आणि कार्यक्षमतेवर भर देणे हे अमेरिकन संस्कृतीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. उपभोगतावाद हे भांडवलशाहीचेच अपत्य आहे. अमेरिकन समाज हा जगातील साधनसंपत्ती सर्वाधिक उपभोगणारा समाज आहे.
 
 
लोकशाही, भांडवलशाही, उपभोगतावाद या शब्दांच्या माध्यमातून अमेरिका ही सांस्कृतिक मूल्ये जगावर लादण्याचा प्रयत्न करते. कोकाकोला, वॉलमार्ट, जीन्स, पॉप संगीत, हॉलीवूड चित्रपट, मॅकडॉनाल्ड, केएफसी (KFC) इत्यादी माध्यमांतून त्याचे प्रतिनिधित्व केले जाते. युरोपातील ख्रिश्चन लोक अमेरिकेत गेले. ते सर्व ख्रिस्ती संस्कृतीचे वाहक झालेले आहेत. जगाने आपल्यासारखे झाले पाहिजे, आपण म्हणू तेच खरे, आपली संस्कृती श्रेष्ठ, इतरांनी आपले अनुकरण केले पाहिजे. राज्यव्यवस्थेत लोकशाही सर्वोत्तम, अर्थव्यवस्थेत भांडवलशाही सर्वोत्तम आणि वस्तूंच्या बाजारपेठेत उपभोगवाद सर्वोत्तम ही अमेरिकेची मूल्ये आहेत आणि ती जगावर लादण्याचा अमेरिकेचा प्रयत्न चाललेला असतो. लोकशाही राजवटीची ज्या लोकांना सवय नाही, तेथे ती लादली असता अयशस्वी होते. टोकाचा व्यक्तिवाद जगातील अनेक देशांना न परवडणारा असतो. मुक्त स्वातंत्र्य अनेक संस्कृतीत बसत नाही, यामुळे संस्कृती संघर्षाचा जन्म होतो. सॅम्युएल हॅग्टिटन यांचे ‘क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन’ हे पुस्तक यावर अधिक प्रकाश टाकते.
 
 
भारतीय परराष्ट्र नीतीच्या संदर्भात ‘सॉफ्ट पॉवर ऑफ इंडिया’ हा शब्दप्रयोग वापरला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परराष्ट्र धोरण या संकल्पनेवर आधारित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावर अनेक पुस्तके लिहिली गेलेली आहेत. या पुस्तकांतून त्यांच्या सॉफ्ट पॉवर डिप्लोमसीची चर्चा विस्ताराने केलेली आहे. "Communicating India's Soft Power' - Buddha to Bollywood - Daya Kishan Thussu', "Modi And The Reinvention Of Indian Foreign Policy - Ian Hall' Am{U "Modi Doctrine - The Foreign Policy Of India's Prime Minister - Sreeram Chaulia' इत्यादी पुस्तकांतून आपल्याला सॉफ्ट पॉवर या विषयाची माहिती मिळते.
 
 
सॉफ्ट पॉवर डिप्लोमसीची सुरुवात पं. नेहरू यांच्यापासून होते. त्यांचे परराष्ट्र धोरण पंचशील आणि गटनिरपेक्षता (Nonalignment 2.0) या शब्दात मांडण्यात येते. पं. नेहरूंच्या काळात रशिया आणि अमेरिका या दोन महासत्ता होत्या. जगाची विभागणी या दोन महासत्तांत झाली होती. 1947 साली भारत स्वतंत्र झाला. भारताने कोणत्याही गटात सामील न होण्याचा निर्णय घेतला. गटनिरपेक्षता (अलिप्ततावाद) हे परराष्ट्र धोरण ठेवले. नेहरू यांनी पंचशील या तत्त्वावर सर्व जगाशी संबंध ठेवण्याचे प्रयत्न केले. कुठल्याही देशाच्या कारभारात सैनिकी हस्तक्षेप करायचा नाही, त्याच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करायचे, परस्पर सहकार्य, जागतिक शांतता, युद्धबंदी, अण्वस्त्रबंदी असे सगळे विषय यात येतात. पं. नेहरू यांनी त्यांच्या पद्धतीने भारतीय सांस्कृतिक मूल्ये आंतरराष्ट्रीय राजकारणात आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सॉफ्ट पॉवर डिप्लोमसी हा शब्दप्रयोग प्रचारात आला नव्हता. जोसेफ यांच्यापूर्वीच नेहरूंनी सॉफ्ट पॉवर डिप्लोमसीचा अवलंब केल्याचे दिसते.
 

bjp_11  H x W:
 
 
पं. नेहरूंचे पंचशील तत्त्व अपयशी ठरले
दुर्दैवाने त्यांना यात लक्षणीय यश प्राप्त झाले नाही. 1962 साली चीनने भारतावर आक्रमण केले. यात भारताचा अपमानकारक पराभव झाला. ज्याला आपल्या सीमांचे रक्षण करता येत नाही, त्याच्या उदात्त तत्त्वांना जगाने स्वीकारले नाही. नेहरूंनंतर सॉफ्ट पॉवरपासून हार्ड पॉवरकडे भारताचा प्रवास सुरू झाला. संरक्षणसिद्धतेवर भर देणे सुरू झाले. भारताने जगाच्या बाजारपेठेतून आधुनिक शस्त्रे विकत घ्यायला सुरुवात केली. इंदिरा गांधी यांनी 1974 साली पोखरण येथे पहिला अणुचाचणी स्फोट केला. अण्वस्त्र बनविण्याची क्षमता सिद्ध केली. बांगला देशची निर्मिती करून, इंदिरा गांधी यांनी भारत आता हार्ड पॉवर आहे हे जगाला दाखवून दिले. तरीसुद्धा या काळात भारताचे धोरण अलिप्तवादाचेच राहिले. इंदिरा गांधी यांच्या काळात भारत रशियाच्या गटात झुकल्यासारखा झाला, परंतु तो पूर्णपणे रशियन गटात सामील झालेला नाही. भारताची सॉफ्ट पॉवर जगाला देण्याचा प्रयत्न या काळातही होत राहिला. हे प्रयत्न ज्यांना इंग्लिशमध्ये ‘नॉन स्टेट अ‍ॅक्टर’ (राज्याशिवायचे नायक) म्हणतात, त्यांच्यामार्फत झाले.
राज्याशिवायच्या नायकांमध्ये वेगवेगळे धर्माचार्य, हिंदी चित्रपट (बॉलीवूड), नृत्य कलापथके, भारतीय खाद्यसंस्कृती, भारतीय योगविद्या यांचा समावेश करावा लागतो. महर्षी महेश योगी, इस्कॉन, रामकृष्ण आश्रम, स्वामीनारायण पंथ, ओशो, श्रीश्रीरविशंकर इत्यादी भारतीय आध्यात्मिक संस्थांनी आणि व्यक्तींनी आध्यात्मिक मार्गाने पाश्चात्त्य देशांत भारताची सॉफ्ट पॉवर नेली. हिंदी चित्रपट मुस्लीम देशांत आवडीने बघितले जातात. रशियातदेखील हिंदी चित्रपटांची गाणी लोकप्रिय झालेली आहेत. राज कपूर यांचे ‘मेरा जूता है जपानी’ हे गाणे त्या काळात रशियातदेखील गाजले. सॉफ्ट पॉवरच्या संदर्भात हिंदी चित्रपटसृष्टीचा किती जबरदस्त परिणाम असतो, याचे उदाहरण दया किसन थुसू यांच्या पुस्तकात वाचायला मिळते. आपल्या प्रस्तावनेत त्यांनी टाइम साप्ताहिकाचे बगदाद ब्युरो चीफ बॉबी घोष याचे उदाहरण दिले आहे.
 
 
अमेरिकेने जेव्हा इराकवर आक्रमण केले, तेव्हा बॉबी घोष इराकमध्ये होते. बगदादच्या एका खेड्यामधून ते वृत्तांकन करीत होते. हे खेडे सद्दाम हस्तकांचे केंद्र होते. सद्दामशी एकनिष्ठ असलेल्या कर्नलला बॉबी घोष यांची माहिती मिळाली. तो बॉबी घोष यांच्याकडे गेला. आपली एके 47 रायफल उचलून ती बॉबी यांच्या कपाळावर ठेवून त्यांना विचारले, “तू अमेरिकन आहेस का?” घोष म्हणतो, “नाही, मी भारतीय आहे.” कर्नल म्हणाला, “तू अमेरिकन आहेस, म्हणून तुला मारावे लागेल.” बॉबीने पुढे लिहिले की, त्याच्याबरोबर असलेल्या दुभाषाने कर्नलला विनंती केली की, हा बॉबी खरोखर भारतीय आहे, अमेरिकन नाही. कृपा करून त्याला मारू नकोस. कर्नलला ते पटले नाही. तो म्हणाला, “हा अमेरिकनच आहे आणि म्हणून हा मेलाच पाहिजे.” त्याक्षणी बॉबीला काय वाटले कोण जाणे, तो म्हणाला, “मी भारतीय आहे, शम्मी कपूरप्रमाणे.” कर्नल म्हणाला, “शम्मी कपूर? तुला शम्मी कपूरची माहिती आहे का?” बॉबी म्हणाला, “अर्थातच, सगळे भारतीय शम्मी कपूरला ओळखतात. तो मोठा नट आहे.” कर्नलने आपली एके 47 रायफल खाली केली आणि म्हणाला, “मला शम्मी कपूर खूप आवडतो. मी त्याचे सगळे चित्रपट पाहिलेले आहेत. त्याचे गाजलेले गाणे कोणते आहे, त्यात तो मोठा आवाज करतो?” बॉबी म्हणाला, “याऽहू, चाहे कोई मुझे जंगली कहे..” बॉबीचा प्राण वाचला. हिंदी चित्रपटसृष्टीची ही सॉफ्ट पॉवर आहे. अशी अनेक उदाहरणे देण्यासारखी आहेत. पण विस्तारभयास्तव इथे थांबतो.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या परराष्ट्र नीतीमध्ये या सॉफ्ट पॉवर डिप्लोमसीचा अतिशय कौशल्याने वापर केलेला आहे. ‘विश्वगुरू भारत’ हे त्यांचे स्वप्न आहे आणि भारत पारतंत्र्यात असतानाच स्वामी विवेकानंदांनी भारतापुढे हे स्वप्न ठेवलेले आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, “मी भविष्यात पाहत नाही, मला त्याची आवश्यकतादेखील नाही. परंतु एक दृश्य मी जीवनाप्रमाणे माझ्यापुढे स्पष्ट पाहत असतो. या दृश्यात मी पाहतो की, भारतमाता पुन्हा एकदा जागृत झालेली आहे. कायाकल्प झालेल्या तिच्या सिंहासनावर पूर्वीच्या तेजापेक्षाही अधिक तेजाने ती विराजमान झालेली आहे. सगळ्या जगाला उच्चरवाने ती शांततेचे आशीर्वचन देत आहे.” एका संन्यासी नरेंद्राचे हे स्वप्न राजयोगी नरेंद्र पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे.
 

bjp_12  H x W:  
 कोरोनाकाळात मोदींनी अन्य राष्ट्रांना केलेले सहकार्य सॉफ्ट पॉवरचेच उदाहरण
 
 
सॉफ्ट पॉवर या शब्दाला आपण ‘पालकसत्ता’ किंवा ‘अभयवरदायिनी सत्ता’ असा शब्दप्रयोग करू शकतो. भारताचे भारतपण या पालकसत्तेत आहे. ते कसे आहे, हे अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या ‘हिंदू तन-मन’ या कवितेत पुढील ओळींत फार समर्पकपणे मांडलेले आहे.
 
 
मैंने छाती का लहू पिला पाले विदेश के क्षुधित लाल।
मुझ को मानव में भेद नहीं, मेरा अंतस्थल वर विशाल।
जग के ठुकराए लोगों को, लो मेरे घर का खुला द्वार।
अपना सब कुछ लुटा चुका, फिर भी अक्षय है धनागार।
मेरा हीरा पाकर ज्योतित परकीयों का वह राजमुकुट।
यदि इन चरणों पर झुक जाए कल वह किरीट तो क्या विस्मय?
 
सॉलोमनचे मंदिर उद्ध्वस्त झाल्यानंतर ज्यू सर्व जगात पांगले. त्यातले काही भारतात आले. भारतात त्यांचा धर्मछळ झाला नाही. इराणमधून पारसी आपला धर्मग्रंथ ‘झेन अवेस्था’ घेऊन गुजरातच्या किनार्‍याला लागले. तेथे राजाने त्यांचे स्वागत केले. कवी फिराक गोरखपुरी या सुंदर काव्यपंक्तीत म्हणतात,
सर-जमीन-ए-हिंद पर अक्वाम-ए-अलाम के ‘फिराक’
क़ाफिले बसते गए हिन्दोस्ताँ बनता गया।
 
 
येशू ख्रिस्ताला सुळावर चढविल्यानंतर त्यांच्या बारा शिष्यांपैकी सेंट थॉमस केरळला आले. भारताने त्यांचे स्वागत केले. आपल्या परंपरेप्रमाणे सत्य एक असून त्याकडे जाण्याचे मार्ग अनेक आहेत, यामुळे येथे अनेक मार्गांचा विकास झाला. बौद्ध, जैन, शीख, वेदान्ती असे अनेक मार्ग भारतात निर्माण झाले. हजारो वर्षे ते गुण्यागोविंदाने एकत्र राहात आहेत. त्यांच्यात धार्मिक कलह होत नाहीत. दुसर्‍या पंथाच्या लोकांच्या कत्तली करणे हा आपला स्वभाव नाही. तो युरोपमधील ख्रिश्चन देशांचा आणि मध्यपूर्वेतील इस्लामी देशांचा स्वभाव आहे. आपली ‘सॉफ्ट पॉवर’ सर्वसमावेशकता शिकविणारी आहे.
 
 
सर्व समावेशकता हे आपले फार मोठे सांस्कृतिक मूल्य आहे. ते जगाने स्वीकारायचे असेल, तर त्या मूल्याचे आदर्शवत जीवन आपण जगलो पाहिजे. अभयवरदायिनी सत्ता हा जेव्हा परराष्ट्र नीतीचा आधार होतो, तेव्हा त्या आधाराच्या मागे जनजीवनाची तशीच जबरदस्त शक्ती उभी राहावी लागते. जगाचा स्वभाव पोकळ प्रवचने ऐकण्याचा नाही. तुम्ही जे सांगता त्याप्रमाणे जगता का? हे जग पाहणार आणि विचारणार. आपण सर्वसमावेशकतेचे जीवन जगत नाही, असा याचा अर्थ होत नाही. या जगण्यात काही त्रुटी आहेत, त्या आपल्या आपणच दूर केल्या पाहिजेत.
 
 
विश्वाकडे बघण्याची आपली दृष्टी ‘वसुधैव कुटुंबकम्’ अशी असते. ‘हे विश्वची माझे घर’ अशी आपली भावना असते. संतसाहित्यातून ही भावना फार उत्कटतेने प्रकट झालेली आहे. संत ज्ञानदेवांचे पसायदान याचा आदर्श आहे. पसायदानात ज्ञानेश्वर म्हणतात,
 
 
दुरितांचे तिमिर जावो। विश्व स्वधर्मसूर्ये पाहो।
जो जे वांछिल ते ते लाहो। प्राणिजात॥
 
 
विश्व एक कुटुंब असल्यामुळे आपण परस्परांशी जोडलेलो आहोत, एकात्म आहोत हा भाव यातून आपोआपच प्रकट होतो. विश्वाचा विचार करताना तो तुकड्यातुकड्यात करायचा नाही, तर एकात्मिक करायचा. याला ‘होलिस्टिक अ‍ॅप्रोच’ म्हणतात. जगाच्या सुख-दु:खापासून आपण अलिप्त राहू शकत नाही. जगाच्या एका कोपर्‍यात जे काही घडते, त्याचे परिणाम सर्व मानवजातीवर होत असतात. याचे दाहक उदाहरण म्हणजे कोरोनाची आपत्ती. या आपत्तीच्या काळात नरेंद्र मोदी यांनी ‘सार्क कोविड 19 इमर्जन्सी कोड’ची स्थापना केली आणि या फंडात 1 कोटी डॉलर्सचे योगदान दिले. कोविडचा मुकाबला करण्यासाठी नेपाळ आणि मालदीव येथे डॉक्टरांची टीम पाठविली. अफगाणिस्तानात अन्न, धान्य आणि औषधे पाठविली. इंडो-पॅसिफिक, लॅटिन अमेरिका आणि आफ्रिका खंडातील गरीब देशांना भारताने औषधांचा पुरवठा केला. कोविड-19चा मुकाबला करण्यासाठी भारतीय नौदलाचे जहाज ‘आयएनएस केसर’ आवश्यक ती सामग्री घेऊन मालदीव, आफ्रिका, सेशल्स इत्यादी देशांमध्ये गेले. ब्राझिलला आणि अमेरिकेला हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा पुरवठा केला. आकड्यात सांगायचे, तर 133 देशांना 44 कोटी 60 लाख हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन आणि 1.54 अब्ज पॅरासिटॅमॉल टॅबलेट्स देण्यात आल्या. ‘वसुधैव कुटुंबकम्’चा हा विचार आंतरराष्ट्रीय क्षेत्रात अशा प्रकारे जगावा लागतो.
 
 
bjp_1  H x W: 0
 
परदेशात भारतीय संगीत सादर करणारे
गायक शंकर महादेवन
 
अभयवरदायिनी सत्ता हे जेव्हा आपल्या परराष्ट्र नीती धोरणाचा मुख्य आधार होतो, तेव्हा दुर्बळ देशांना सबळ करणे, त्यांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे, त्यांना आर्थिक मदत करणे हे आपले कर्तव्य होते. सॉफ्ट पॉवर डिप्लोमसीमध्ये ‘पब्लिक डिप्लोमसी’ असाही एक शब्दप्रयोग वापरला जातो. पब्लिक डिप्लोमसीचा अर्थ होतो, जनतेच्या स्तरावर संवाद साधणे. राज्यकर्त्यांमध्ये राजनीतिक संवाद होतात. दोन-चार देशांचे राज्यप्रमुख आणि परराष्ट्र नीतीतील त्यांचे तज्ज्ञ एकत्र बसतात, वेगवेगळ्या विषयांची चर्चा करतात, काही करार करतात ही झाली नेहमीची परराष्ट्र नीती. पब्लिक डिप्लोमसीमध्ये जनतेच्या स्तरावरील संवादाला अनन्यसाधारण महत्त्व असते. जनतेच्या स्तरावरील संवादात लोकांची मने जिंकावी लागतात. लोकांच्या डोक्यावर बंदूक ठेवून त्यांची मने जिंकता येत नाही. भय उत्पन्न करून प्रीती उत्पन्न होत नाही.
 
अटलबिहारी वाजपेयी हा भाव पुढील शब्दांत फार समर्पकपणे सांगतात.
 
होकर स्वतंत्र मैंने कब चाहा है कर लूं जग को गुलाम?
मैंने तो सदा सिखाया करना अपने मन को गुलाम।
गोपाल-राम के नामों पर कब मैंने अत्याचार किए?
कब दुनिया को हिंदू करने घर-घर में नरसंहार किए?
कब बतलाए काबुल में जा कर कितनी मस्जिद तोडीं?
भूभाग नहीं, शत-शत मानव के हृदय जीतने का निश्चय।
 
 
मन जिंकण्यासाठी दुसर्‍याला नमस्कार करावा लागतो. दोन्ही हात जोडून नमस्कार करणे ही भारतीय पद्धती आहे. पाश्चात्त्य देशांची पद्धती हस्तांदोलन करण्याची आहे. काही देशांची पद्धती आलिंगन देण्याची आहे, तर काही देशांची पद्धती गालाला गाल लावण्याची आहे. कोविड-19च्या काळात या सर्व पद्धती कोविड रोग पसरविण्यास कारणीभूत ठरलेल्या वाटल्यामुळे आता जगाने भारतीय नमस्काराचा स्वीकार केलेला आहे. प्रिन्स चार्ल, फ्रान्सचे तेव्हाचे अध्यक्ष मॅक्रॉन, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यांहू, आणि जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल या कोविडच्या काळात नमस्कार करायला शिकलेल्या आहेत. ही भारताची अभयवरदायिनी शक्ती आहे. नमस्कार करण्याची बळजबरी नाही की तोफा लोकांवर रोखलेल्या नाहीत. नमस्काराला ‘अंजली मुद्रा’ असे म्हणतात. आणि या अंजली मुद्रेचेदेखील एक शास्त्र आहे. नमस्कार यामध्ये एक आध्यात्मिक अर्थदेखील आहे. नमस्कारात नम्रता असते आणि दुसर्‍याला आपल्या बरोबरीने मानण्याची भावना असते. भारतीय आध्यात्मिक परिभाषेत सांगायचे, तर आपण सर्व एकाच आत्मतत्त्वाचे आविष्कार आहोत, त्या आत्मतत्त्वाला मी नमन करतो, असा याचा अर्थ होतो.
 
 
bjp_5  H x W: 0
 
मोदींनी योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून दिली
 
योगविद्या ही भारताची जगाला देणगी आहे. पातंजल योगसूत्राचा पहिला मंत्र ‘योग: चित्तवृत्ती निरोधा:’ असा आहे. योग म्हणजे चित्त आणि वृत्ती यांच्यावर ताबा मिळविणे आणि त्यासाठी प्राणायाम करावा लागतो, तसेच वेगवेगळी आसनेही करावी लागतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर 21 जून हा दिवस ‘योग दिवस’ म्हणून साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014मध्ये युनोला संबोधन करीत असताना 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो, म्हणून हा दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिवस मानण्यात यावा, असे सुचविले. 11 डिसेंबर 2014 रोजी युनोतील भारतातले कायमचे प्रतिनिधी अशोक मुखर्जी यांनी युनोच्या आमसभेपुढे ठराव मांडला. 170 देशांनी त्याला मान्यता दिली आणि हा ठराव पारित झाला. आज जगातील बहुतेक देशांत योगाभ्यास केला जातो. कुठल्याही उपासना पद्धतीशी या योगाभ्यासाचा संबंध नाही. शरीर-मन-बुद्धी आणि आत्मतत्त्व यांच्यातील संतुलन साधण्यासाठी हा योगाभ्यास आहे. नियमित योगाभ्यासामुळे अनेक शारीरिक व्याधींपासून सुटका होते आणि मनोव्याधी मागे लागत नाहीत. मन शांत होत जाते. पाश्चात्त्य लोक चिकित्सक असतात आणि शास्त्रीय मनोवृत्तीचे असतात. कोणी सांगितले म्हणून केले, असे ते करीत नाहीत. त्याची प्रचिती त्यांना यावी लागते. ती येत गेल्यामुळे योगाभ्यास आता लोकप्रिय झालेला आहे. पब्लिक डिप्लोमसीचा हा मास्टर स्ट्रोक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विषय जागतिक स्तरावर नेला, हे विशेष आणि अभिमानास्पद आहे.
 
 
संगीत हा भारताच्या सॉफ्ट डिप्लोमसीमधला एक अत्यंत महत्त्वाचा विषय. भारताला संगीताची हजारो वर्षांची परंपरा आहे. मूळ सात स्वर यावर आपल्या संगीताची उभारणी झालेली आहे. संगीत हा शब्दब्रह्माचा अविष्कार असतो. महान संगीतकारांनी जगभर त्याचा प्रचार केलेला आहे. पंडित रविशंकर, अली अकबर खाँ, ॐकारनाथ ठाकूर इत्यादी संगीतकारांचे यातील योगदान लक्षणीय आहे. या पिढीचे गायक शंकर महादेवन यांचा पुत्र सिद्धार्थ म्हणतो, “जगात आज शास्त्रीय संगीत खूप लोकप्रिय होत चाललेले आहे. लोकांचा त्यातील सहभाग आणि प्रतिक्रिया फारच उत्तम आहे.” ते पुढे म्हणतात, “संगीताच्या वेगवेगळ्या प्रकारांना प्रेक्षक असतो. आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात शास्त्रीय संगीताला पाश्चात्त्य श्रोते आवडीने हजर असतात. भारतीय संगीताला फार मोठी खोली आहे. आणि जेव्हा जेव्हा माझे वडील पाश्चात्त्य संगीतकारांबरोबर सहभागी होऊन कार्यक्रम सादर करतात, तेव्हा त्याचे खूप चांगले स्वागत होते. श्रोते उभे राहून दहा मिनिटांपर्यंत टाळ्यांचा गजर करतात.” संगीताचा हा प्रभाव सर्व जगभर अनुभवायला मिळतो.
 

bjp_4  H x W: 0 
 ‘इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन’च्या सॉफ्ट पॉवर परिषदेच्या व्यासपीठावरून बोलताना मा. उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू


‘इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन’ ही शासकीय संस्था आहे आणि डॉ. विनय सहस्रबुद्धे या संस्थेचे चेअरमन आहेत. सॉफ्ट पॉवर डिप्लोमसीच्या संदर्भात त्यांच्या काळात खूप भरीव उपक्रम झालेले आहेत. डिसेंबर 2018ला दिल्ली येथे सॉफ्ट पॉवर या विषयावर तीन दिवसांची परिषद झाली. या परिषदेत ‘विश्वगुरू भारत’ या संकल्पनेच्या संदर्भात सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि बौद्धिक नेतृत्व इत्यादी विषयांवर चर्चा झाली. उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी परिषदेचे उद्घाटन केले होते. आपल्या उद्घाटनाच्या भाषणात त्यांनी मार्क ट्वेन, मॅक्सम्युलर यांना उद्धृत केले आहे. मार्क ट्वेन (अमेरिकेतील श्रेष्ठ साहित्यिक) म्हणतात, ‘भारत हा मानव जातीचे पाळणाघर आहे. मनुष्य बोलीचे जन्मस्थान आहे. इतिहासाची जननी आहे, आख्यायिकांची आजी आहे आणि परंपरांची पणजी आहे. आपल्या मानवी इतिहासाचे अत्यंत मौल्यवान आणि मार्गदर्शक भांडवल भारतात खजिन्याच्या रूपाने उपलब्ध आहे.’ स्वातंत्र्यानंतर या खजिन्याचा उपयोग करण्याचा कालखंड 2014नंतर सुरू झालेला आहे.
 
 
 
 
भारताची वाटचाल महासत्ता बनण्याच्या दिशेने चालू आहे. अगोदर म्हटल्याप्रमाणे महासत्तांचे दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारात सैनिकी आणि आर्थिक महासत्ता येतात आणि दुसर्‍या प्रकारात सांस्कृतिक आणि अध्यात्मिक महासत्ता येतात. या दुसर्‍या क्षेत्रात भारताची बरोबरी करेल असा देश जगात नाही. विश्व आज अनेक संकटांतून जात आहे. मानवजातीच्या अस्तित्वापुढे पर्यावरणाचे संकट आहे. वसुंधरेचे तापमान बिघडत चाललेले आहे, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होताना दिसतात. संस्कृती संघर्षाची भाषा करणारे लोक वेगवेगळी युद्धे खेळत असतात. यातून दहशतवादाचा जन्म झालेला आहे. असुरक्षितता, भूक, गरिबी, योग्य शिक्षणाचा अभाव, युद्धामुळे होणारे स्थलांतर अशा असंख्य समस्या मानवजातीपुढे आहेत. या सगळ्या समस्या मनुष्यनिर्मित आहेत. मनुष्याने निसर्गाचे संतुलन बिघडविले, त्यामुळे या सर्व समस्या उप्तन्न होतात. मनुष्याने निर्माण केलेल्या समस्यांवर मनुष्यालाच उत्तर शोधायचे आहे. हे उत्तर भारतीय सनातन संस्कृतीत आहे. ती मूल्ये जगाला देण्याची वेळ आता आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम सर्व शक्ती पणाला लावून करीत आहेत आणि जग त्याचा स्वीकारही करीत आहे. विश्वगुरू भारत हे भारताचे जन्मसिद्ध स्थान येणार्‍या काही काळातच त्याला प्राप्त होईल, यात काही शंका नाही.
 
 
आंतरराष्ट्रीय राजरकारणात जगाचे नेतृत्व कोणता देश करणार, याच्यात चढाओढ चालू असते. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या भाषेत सांगायचे तर महासत्ता जगाचे नेतृत्व करतात. आतापर्यंत आपण महासत्तांचा आढावा घेतलेला आहे. महासत्तांचा सत्तासंघर्ष मानवाच्या कत्तली, निसर्गाचा र्‍हास आणि साधनसंपत्तीचा विनाश यांना जन्म देणारा झालेला आहे. भारताला या महासत्तांच्या शर्यतीत येऊन चालणार नाही. आपल्यावर कुणी आक्रमण करणार नाही आणि कुणी केल्यास त्याला चोख उत्तर दिले जाईल, एवढे लष्करी सामर्थ्य आपल्याकडे असायलाच पाहिजे. परंतु लष्करी सामर्थ्य ही आपली एकमेव ओळख करून चालणार नाही. आपल्याला विश्वमानवात भ्रातृभाव निर्माण करणे, परस्परांशी सहकार्याचे वातावरण निर्माण करणे, मानवी जीवन उन्नत करणे या मार्गाने जायचे आहे. हा मार्ग हजारो वर्षांच्या आपल्या संस्कृतीने आखून दिलेला आहे. या मार्गाच्या जनकत्वाचे श्रेय कुण्याही एका व्यक्तीला देता येत नाही. तो आपला राष्ट्रीय आणि सांस्कृतिक स्वभाव आहे.
 
 
हजारो वर्षाच्या मोहनिद्रेतून भारत आता जागा होत आहे. आपण कोण आहोत आणि आपल्याला कोठे जायचे आहे, याचा शोध भारताने सुरू केलेला आहे. मोदी या शोधाचे नेतृत्व करीत आहेत. आपली भगवद्गीता जगातील नेत्यांना भेट देण्यास त्यांना संकोच वाटत नाही. मंदिरात जाऊन पूजा करताना त्यांना अवघडल्यासारखे होत नाही. गंगेची आरती करताना ते तल्लीन होऊन जातात. भारताच्या निद्रिस्त आत्म्याचे जागृत रूपांतर म्हणजे नरेंद्र मोदी आहेत. ही त्यांची वाटचाल केवळ भारताच्याच हिताचीच नाही, तर मानवजातीच्या कल्याणाचीदेखील आहे. ‘जागतिक सत्तासंघर्ष आणि भारत’ असे हिंदुस्थान प्रकाशन संस्थेच्या आगामी पुस्तकाचे शीर्षक आहे आणि मला असे वाटते की, फार थोड्या शब्दांमध्ये जागतिक सत्तासंघर्षाच्या रंगमंचावर भारत नेमका कुठे आहे, हे या पुस्तकातून वाचकांसमोर येईल.