गोमाता साद घालते आहे...

विवेक मराठी    23-Oct-2021
Total Views |
@धनश्री बेडेकर 8308841271
भूजजवळ कुकमा गावात 12 वर्षांपूर्वी पुरुषोत्तमदास सोळंकी यांनी ‘श्री रामकृष्ण ट्रस्ट’ या संस्थेचे बीज रोवले. त्यांचे तीन पुत्र मनोजभाई, महेशभाई आणि विनोदभाई यांनी ही संस्था मोठी केली. गावोगावचे शेतकरी जोडत गेले. एक मोठा परिवार तयार झाला. या परिवाराच्या केंद्रस्थानी होती ‘देशी गाय’! संस्थेची एक विशिष्ट विचारपद्धती आहे, त्यामुळेच संस्था खूप लोकांना जोडू शकली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, अनुभव आधारित शिक्षण! संस्था सांगते, तुम्ही या, शिका म्हणजे संवाद साधा आणि तुमच्या शेतावर स्वत: प्रयोग करा, अनुभव घ्या.

mya_1  H x W: 0
 
“बहेनजी, आप 7 दिनमें पोहोच रही है ना? आपका स्वागत है। आपको किसानोंके साथ बातचीत करणी है ना, मै व्यवस्था करता हूँ।” उत्साहाने शैलेंद्रभाई बोलत होते. माझ्या मनात कल्पनेचे पतंग उडत होते. भूजला पोहोचण्यापूर्वीपर्यंत गुजराथी शेतकर्‍यांशी मला फारसे कधी बोलायची वेळ आलीच नव्हती. तसे लहानपणी डहाणूला काही प्रयोगशील शेतकरी बघितले होते, पण ते प्रयोगशील आहेत, हेही मला मोठे झाल्यावर कळले होते. त्यामुळे भूजजवळच्या कुकमा गावात पोहोचताना माझी पाटी तशी कोरीच होती. ‘देशी गाय’ हा विषय किती मोठा आहे, याची मला खरोखरच कल्पना नव्हती. गो आधारित ‘जैविक शेती’ म्हणजे ‘सेंद्रिय शेती’ करणार्‍या शेतकर्‍यांशी आम्ही संवाद साधणार होतो.
 
 
“धनश्री, आपण किती मुलाखती करणार आहोत? तुझे काही बोलणे झाले आहे का?” माझी सहकारी योगिता वैद्यने मला प्रश्न विचारला. मी म्हणाले, “दहाबारा शेतकरी असतील. साधारण दिवसभराचा कार्यक्रम असेल.” आम्ही आमचे कॅमेरे आणि लेखनसाहित्य, लॅपटॉप घेऊन भूजला दाखल झालो. रात्रभराचा प्रवास करून आल्यावर दिवसभराचा शीण घालवून संस्था बघण्याचा कार्यक्रम झाला. शेणाने सारवलेल्या भिंती आणि जमीन बघून आम्ही खूश झालो होतो. त्या दिवशी संस्थेमध्ये फारसे कुणी नव्हते. मी माझी सहकारी, संस्थेचा स्टाफ आणि सोबतीला 300 देशी गायी. दुसर्‍या दिवशी मात्र लगबग सुरू झाली. आमचा कार्यक्रम 9 वाजता सुरू होणार होता. आम्ही उत्साहाने मीटिंगच्या जागी पोहोचलो, तर.. आश्चर्याचा धक्काच बसला. एका भव्य मंडपात सुमारे 500 शेतकरी जमले होते. त्यातील काही जण तर आपल्या कुटुंबाला घेऊन आले होते. माझी पाचावर धारण बसली. कामाचा आवाका लक्षात आला. एका झाडाखाली एक देशी गाय बांधली होती. सगळ्यांनी मिळून तिची पूजा केली. आरती म्हटली. सगळे जण अतिशय भावपूर्ण नजरेने गायीकडे बघत होते. हे सगळे वातावरण आम्हाला अगदी नवीन होते. गायीकडे बघण्याचा श्रद्धाभाव तर फार स्तिमित करणारा होता. गुजरातमधील एक मोठे संत या कार्यक्रमाला उपस्थित होते. मग त्या भल्यामोठ्या मंडपात सगळे एकत्र जमले, व्यासपीठावर मान्यवर आले आणि गुजराथीमधून कार्यक्रम सुरू झाला. आमचे संकट वाढत होते. मी गर्दीतून शैलेंद्रभाई या संस्थेच्या व्यवस्थापकांना शोधून काढले आणि माझ्या अडचणींचा पाढा वाचला. त्यावर ते म्हणाले, “बहेनजी, आप निश्चिंत रहिये.” कार्यक्रम सुरू झाल्यावर आमची रवानगी दुसरीकडे केलेली होती. काही निवडक शेतकरी लोकांच्या मुलाखती होत्या. मी त्यांना म्हणाले, “हा कार्यक्रम आधीपासून ठरला होता, म्हणून तुम्ही आम्हाला आत्ता यायला सांगितलं होय! बरं, बरं!’ त्यावर ते उत्तरले, “अजिबात नाही. 7 दिवसांपूर्वी आम्ही हा कार्यक्रम ठरवला. इथे असेच असते. कार्यक्रम असला की आमचे शेतकरी जमतातच. आमच्याशी असे 5000 शेतकरी जोडलेले आहेत. कुठल्याही कार्यक्रमाला 500 तर सहज जमतातच.”
 

gaushala_8  H x 
 
आम्ही दिवसभरात नेमके किती वेळा चकित होणार आहोत, याची मला साधारण कल्पना आली. आम्ही सज्ज झालो. विवेक मगनभाई नावाचा तरुण आमच्या पुढ्यात येऊन बसला. “आपण किती वर्षे सेंद्रिय शेती करत आहात?” हा प्रश्न त्याचे वय बघून विचारायचे मला काही धैर्य होईना. शेवटी वय विचारूनच मी बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला, “मी 22 वर्षांचा आहे. गेल्या दोन वर्षांपासून सेंद्रिय शेती करतो आहे. माझे आजोबा सेंद्रिय शेती करत होते. माझे वडील मात्र रासायनिक शेतीकडे वळले. मी त्यांच्या सांगण्यानुसार शेती महाविद्यालयात प्रवेश घ्यायला गेलो, तर तिथला अभ्यासक्रम काही मला पटला नाही. माझ्या बाबांना मी लहानपणापासून चिंतेतच पाहिले आहे. शेतीच्या समस्या, तिथले खर्च आणि त्यांच्या स्वत:च्या शारीरिक समस्या. याउलट माझ्या आजोबांनी आयुष्यभर सेंद्रिय शेती केली. त्यांचे राहणीमान खूप वेगळे आहे. त्यांना याही वयात कुठलेही शारीरिक विकार नाहीत. मी याचे कारण शोधले, त्याचे कारण ‘त्यांचा सेंद्रिय शेतीवरील विश्वास’ हे होते. मी शेती कॉलेजमध्ये प्रवेश न घेता इथे संस्थेत दाखल झालो. 7-8 महिने राहिलो. सेंद्रिय शेतीसंबंधी खूप तज्ज्ञ आणि आमच्यासारखेच असंख्य शेतकरी यांच्याशी संवाद साधत गेलो आणि दुसरीकडे जवळच असलेल्या एका शेताच्या पट्ट्यात माझी सेंद्रिय शेती सुरू झाली. माझ्या या निर्णयावर वडील सुरुवातीला नाराज होते. तोवर आमच्या घरातील देशी गायीसुद्धा कमी झाल्या होत्या. मी मात्र ही संख्या आता वाढवत चाललो आहे. मला माझ्या शेतीबद्दल खूप समाधान वाटते आहे.” अवघ्या 22 वर्षांच्या तरुणाला हा सेंद्रिय शेतीचा सापडलेला मार्ग बघून आम्हाला प्रसन्न वाटले. हा मुलगा बोलण्याची तयारी करून आला होता की काय, अशी क्षणभर शंकाही आली. पण पुढच्या मुलाखतींमध्ये अशा शंका मावळत गेल्या. आपल्याकडे अनेक शेतकर्‍यांची मुले शेती महाविद्यालयातून बाहेर पडून सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आपण धडपडताना बघतो. इथे हा मुलगा हे शिक्षण नाकारून शेतीकडे वळलेला पाहिला. त्याच्या पुढच्या शेतकर्‍याने हिंदीत बोलायला ठाम नकार दिला. त्यामुळे दुभाषा घेऊन आमचे काम सुरू झाले. हा शेतकरी शाळेत गेलाच नव्हता.त्यामुळे ‘हिंदी सिनेमा’ आणि ‘मोदीजींचे भाषण’ या दोनच गोष्टी त्याला हिंदी भाषा म्हणून माहीत होत्या. सेंद्रिय शेतीसोबत तो एक समाजकार्य करतो. दूध न देणार्‍या देशी गायी स्वस्तात मिळतात, त्या तो घेतो आणि त्याच किमतीत गरीब शेतकर्‍यांना विकतो. नफा कमवत नाही. मुळात ‘गाय हा दूध देणारा प्राणी आहे’ या आमच्या संकल्पेनालाच तडा गेला. पुढे तो म्हणाला, “सध्या माझ्या मुलीचे लग्न ठरण्यापूर्वीच मोडतेय, असे वाटते. मला तिकडच्या मंडळींनी खोटे सांगितले की, त्यांच्याकडे देशी गायी आहेत. पण जर्सी गाय असलेल्या घरात मी माझी मुलगी देणार नाही. जर्सी गाय हा तर एक पशू आहे.”
 
प्रत्येक मुलाखतीनंतर, आपण आपला ग्रह चुकून वेगळीकडेच आलो आहोत की काय असे वाटत होते.
 
diwali_1  H x W
 
नंतर एक शेतकरी म्हणाला, “माझ्याकडे 200 देशी गायी आहेत. मी दूध आणि तूप विकतो.” याच दुधाला आपण अ2 दूध म्हणतो आणि ते महाग असते, इतपत प्राथमिक ज्ञान मला सुदैवाने होते. पण हा शेतकरी 2000 रुपये किलो या दरात या देशी गायीचे तूप विकतो, हे ऐकून मला चक्कर यायची वेळ आली होती. पण हा अनुभव पुढे सततच येत गेला. त्या दिवशी भेटलेल्या शेतकर्‍यांपैकी 100 टक्के लोक सेंद्रिय शेती करणारे होते. 95 टक्के शेतकर्‍यांकडे स्वत:च्या देशी गायी होत्या. बर्‍याचशा लोकांनी ‘शाळा-कॉलेजमधील पारंपरिक शिक्षण’ घेतलेच नव्हते. पण अगदीच असे काही नव्हते. मुंबईत आयुष्य काढलेले हितेश व्होरा हे हायड्रॉलिक इंजीनिअर होते. दहा वर्षांपासून त्यांचा पत्ता बदलला आहे. भूजजवळच्या कुंभरडी गावात ते त्यांच्या पत्नीसह स्थायिक झाले आहेत. मुंबईत सर्व व्यवसाय बंद करून ते आता 90 एकरवर सेंद्रिय शेती करतात. 80 प्रकारची धान्ये पिकवतात. काही वर्षांपासून त्यांनी सेंद्रिय पद्धतीचा शाम्पूही तयार केला आहे. सुरुवातीला या विषयात त्यांना व्यवस्थित अपयश आले. पण त्यांनी न हरता प्रयत्न चालू ठेवले. ते स्वत: अनेक उत्पादने तयार करतात आणि विक्री करतात. त्यांनी नुकतेच चण्यापासून कॉफीसारखे पेय तयार केले आहे. मुंबई आणि गुजरात येथे या उत्पादनांचे मार्केटिंग करतात. त्यांना या संस्थेकडून खूप प्रेरणा तर मिळालीच, तसेच प्रशिक्षणदेखील मिळाले.

gaushala_4  H x 
 
तेवढ्यात एक गुजराथी पारंपरिक वेशातील व्यक्ती माझ्यापाशी आली आणि माझ्या हातावर आमरसाचे डबे ठेवले. 13 एकर जमीन आणि त्यासाठी 2 देशी गायी यासह ते संस्थेच्या मार्गदर्शनाने 12 वर्षांपासून शेती करत आहेत. गडवी यांचे प्रमुख पीक आंबा आहे. संस्थेकडून प्रशिक्षण घेऊन त्यांनी गोमय आणि गोमूत्र यापासून शेती सुरू केली. त्याचबरोबरीने ते गोमूत्रापासून फिनेल, तुळसी अर्क, धूपकांडी यांचे उत्पादन करतात. हा त्यांचा पूरक व्यवसाय आहे. आता त्यांनी आंब्याचा रस टिनमध्ये घालून विकायला सुरुवात केली आहे. 1000 किलोपासून दमदार सुरुवात केलेल्या गडवी यांचा आता चांगलाच जम बसला आहे. तेही फारसे शिकलेले नाहीत. त्यांनी आयुष्यभरासाठी गोव्रत घेतलेले आहे. देशी गाय सोडून कुठल्याही दुधाचे ते सेवन करत नाहीत.
‘शामजी’ हे या संस्थेतील वैद्य. संस्था तयार करत असलेल्या आयुर्वेदावर आधारित उत्पादने तयार करण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. संस्थेच्या कार्यक्रमांतर्गत, आजवर त्यांनी 3000 पेशंट्स तपासले आहेत. दर महिन्याला किमान 150 ते 200 पेशंट्स ते बघतात. आधी मला वाटले, ते आयुर्वेद शिकलेले वैद्य आहेत. पण तसे नव्हते. संस्थेतर्फे काही वर्षांपूर्वी वैदू लोकांचे ट्रेनिंग झाले. अहमदाबादच्या एका आयुर्वेदिक संस्थेच्या मदतीने सेल थेरपी, पंचगव्य वापर आणि बायोकेमिस्ट्री यावर आधारित एक कोर्स तयार झाला, तो संस्थेतर्फे गावागावातील वैदू लोकांसाठी आहे. आयुर्वेदाबाबत आपल्याकडे दोन टोकाची मते असतात. एक तर महाग आणि वेळ घेणारा आयुर्वेद किंवा रस्त्याच्या कडेला गाड्या लावून स्वस्तात उपचार करणारे अर्धवट ज्ञान असलेले वैदू! ही समाजातील दरी ओळखून शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या वैदू लोकांचे प्रशिक्षण संस्थेने काही वर्षांपूर्वी केले होते. सध्या काही कारणास्तव तो प्रशिक्षण प्रकल्प थांबवला आहे. पण औषधांचे उत्पादन आणि उपचार मात्र अव्याहतपणे चालू आहेत. संस्थेत असलेल्या 300 गायींपासून मोठ्या प्रमाणात पंचगव्य तयार होते. त्यापासून रक्तदाब, स्पाँडिलायसिस, सायटिका, सांधेदुखी, हृदयविकार अशा अनेक व्याधींवर औषधे तयार करून उपचार केले जातात.
 
पुढे आम्ही काही रुग्णांच्याही मुलाखती घेतल्या. त्यातील एक बाई सांगत होत्या की त्या सांधेदुखीसाठी फाइल घेऊन खूप डॉक्टर फिरल्या. त्यांचे म्हणणे होते, “अ‍ॅलोपथीच्या औषधांनी दुखणी दाबली जातात. आयुर्वेदिक औषधांनी पहिले दोन दिवस त्रास होतो, कारण त्या वेळेस विषारी गोष्टी बाहेर काढण्याचे काम केले जाते. मला आता फार आराम पडला आहे. इथे मी एक जीवनशैली शिकले आहे. गोमातेची सेवा घडते आणि त्यामुळेच दुखणी दूर होतात.”
 
मी चकित झाले. देशी गाय ही गोष्ट इथे इतकी कशी रुजली आहे? कोणी रुजवली? काय आहे ही संस्था? काय जादू करतात हे लोक?
गुजराथी माणूस तसा संघटित स्वरूपात काम करतोच. त्यात त्याला जर योग्य नेतृत्वाची दिशा मिळाली तर काय होते, हे आपण अनेक मॉडेल्समधून बघितले असेल. ‘श्री रामकृष्ण ट्रस्ट’ ही संस्था पाहताना मला याच गोष्टीचा प्रत्यय आला. भूजजवळ कुकमा गावात 12 वर्षांपूर्वी पुरुषोत्तमदास सोळंकी यांनी ‘श्री रामकृष्ण ट्रस्ट’ या संस्थेचे बीज रोवले. त्यांचे तीन पुत्र मनोजभाई, महेशभाई आणि विनोदभाई यांनी ही संस्था मोठी केली. गावोगावचे शेतकरी जोडत गेले. एक मोठा परिवार तयार झाला. या परिवाराच्या केंद्रस्थानी होती ‘देशी गाय’! संस्थेचे सध्याचे अध्यक्ष मनोजभाई भूजमधील मोठे व्यावसायिक आहेत. त्यांच्या पारंपरिक व्यवसायात स्थिरावलेले आहेत. त्यांनी स्वत: गोव्रत घेतलेले आहे. त्यांच्या घरी आणि संस्थेमध्येसुद्धा शेणाने सारवलेल्या जमिनीवर बसूनच जेवावे लागते. ‘देशी गायीवर आधारित सेंद्रिय शेती’ या तत्त्वाचा प्रचार करण्यासाठी मनोजभाई गेल्या 12 वर्षांत जवळजवळ 700 गावे फिरले आहेत. ते प्रचंड प्रवास करतात. गावोगावच्या शेतकर्‍यांशी त्यांचा वैयक्तिक संवाद असतो. गुजराथी व्यावसायिक एखादे समाजोपयोगी काम करताना किती सम्यक दृष्टी ठेवू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मनोजभाई सोळंकी! त्यांनी पूर्वी वेगळ्या संस्थांबरोबर काम करून बघितले होते. पण नंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले.


gaushala_2  H x
 
श्री रामकृष्ण ट्रस्ट ही संस्था एका वेगळ्याच आर्थिक तत्त्वावर चालते. ही संस्था सरकारी आणि खाजगी देणगी घेण्याच्या विरोधात आहे. त्यांना जे पोहोचवायचे आहे, त्याचे त्यांनी एक उत्तम मॉडेल बनवले आहे. ते शिक्षण गावोगावच्या शेतकर्‍यांना मिळावे यासाठी ते उत्तम प्रचार-प्रसाराचे काम करतात. त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप्स आहेत. एक हाक टाकली की शेतकर्‍यांचे मेळावे भरतात. आपली वेबसाइट ुुु.ीहीशशीरार्ज्ञीीीहपर्रीीीीींं.ेीस, तसेच यूट्यूब चॅनलवरून शेतकर्‍यांशी संपर्कात असतात. सुरुवातीला अनेक वर्षे सोळंकी कुटुंबीयांनी त्यांच्या पारंपरिक व्यवसायातून सामाजिक हिताचा हिस्सा म्हणून संस्था उभारणीसाठी जबाबदारी उचलली. आजवर 5000हून जास्त शेतकरी तिथे येऊन शिकून गेलेत. ते प्रशिक्षणासाठी दोन स्तरांवर काम करतात. एक म्हणजे तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि दुसरा म्हणजे शेतकर्‍यांशी संवाद! मुळात शेतकरी सातत्याने एकत्र भेटून सेंद्रिय शेतीमधील आपापले अनुभव इतरांशी वाटून घेतात. संवादामध्ये अनेकांना दिशा मिळते. इथे देशभरातून शेतकरी येतात. कुकमा गावात 8 एकरांवर चिंतन फार्म वसलेले आहे. तिथे हे शेतकर्‍यांसाठी प्रेरणादायक कार्यक्रम चालतात, तेही चक्क मोफत! तिथे येऊन शिकण्याची, तर ते कुठलीही फी आकारत नाहीतच, तर शेतकर्‍यांच्या राहण्या-जेवण्याची सोयदेखील मोफत होते. हे मॉडेल फारच वेगळे आहे. संस्थेचे असे म्हणणे आहे की, आपण शेतकर्‍याला स्वयंपूर्ण व्हावे असा आग्रह करतोय, तर ते सांगणारी संस्था स्वयंपूर्ण नको का? संस्था कोणाकडून देणगी स्वीकारत नाही. संस्थेकडे असलेल्या 300 कांकरेज जातीच्या देशी गायींपासून संस्थेचे कर्मचारी 100हून जास्त उत्पादने तयार करतात. त्याची विक्री करून ही संस्था स्वयंपूर्ण पद्धतीने चालवली जाते.पंचगव्य म्हणजे देशी गायीचे दूध, दही, तूप, गोमय आणि गोमूत्र! या गोष्टी येथील उत्पादनाचा मूलाधार आहेत. त्यापासून असंख्य औषधे, सौंदर्य प्रसाधने, घर-सफाई आणि कलात्मक वस्तू यासारखी उत्पादने तयार केली जातात. या संस्थेने शेण वापरून तयार केलेले घड्याळ ही तर फारच सुंदर गोष्ट आहे. इतकेच काय, गोमयापासून तयार केलेले सिमेंटसुद्धा फार उत्तम उत्पादन आहे. देशी गायीचे शेण म्हणजे गोबर हे ‘विषाणूमुक्त’ वातावरण तयार करते, असा संस्थेत येणार्‍या शेतकर्‍यांचा अनुभव आहे. ही उत्पादने तयार कशी करायची, याचेही प्रशिक्षण ही संस्था मोफत स्वरूपात देते. पैसे कमावणे हे या संथेचे उद्दिष्ट नसल्याने, ग्राहकांसाठीही उत्पादने अत्यंत वाजवी दरात उपलब्ध होतात. मोफत प्रशिक्षण देण्यामागचा उद्देश असा आहे की, लोकांनी इथे येऊन शिकून, प्रयोग करावेत, ते परत इथे येऊन लोकांना सांगावेत. अनुभवाची शिदोरी वाढवावी.
 
 
gaushala_7  H x
 
संस्थेची एक विशिष्ट विचारपद्धती आहे, त्यामुळेच संस्था खूप लोकांना जोडू शकली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, अनुभव आधारित शिक्षण! शिक्षण हे लिखित स्वरूपात असते, अशी आपल्या समाजाची धारणा कळत-नकळत अनेक वर्षांपासून झालेली आहे. संस्था सांगते, तुम्ही या, शिका म्हणजे संवाद साधा आणि तुमच्या शेतावर स्वत: प्रयोग करा, अनुभव घ्या. शिकताना अनुभवातूनच शिका. स्वत:च्या आणि त्याआधी इतरांच्या! मी संस्थेमध्ये जे काही 5-6 दिवस होते, त्यात अनेकांशी संवाद साधत होते. त्यात मला कुणीही लेखनात आणि वाचनात अडकून पडलेला तज्ज्ञ आणि शिकलेले समजून घेताना टिपा लिहीत बसणारा शेतकरी दिसला नाही. सगळे शिक्षण अगदी सहज स्वरूपात, मौखिक स्वरूपात आहे. भारतीय संस्कृतीमधील अनेक पारंपरिक गोष्टी इथे जपलेल्या दिसतात. संस्थेमध्ये पाहुण्यांना राहण्यासाठी, शेणापासून सारवून तयार केलेल्या गोल आकाराच्या गुजराथी शैलीच्या खोल्या आहेत. त्याला ‘भुंगा’ म्हणतात. तिथे रात्रीची 5-6 तासांची शांत झोप आपल्याला वेगळाच अनुभव देते. तिथल्या अनेक लोकांचे असे म्हणणे आहे, की आपली गाय आपली काळजी घेते, तिची सेवा करा. म्हणजे हा केवळ भावनिक दृष्टीकोन नाही, तर अत्यंत व्यावहारिक दृष्टीकोन आहे. दूध न देणारी गाय कसायाला न देता, तिचे गोमय, गोमूत्र बहुउपयोगी असते, त्यामुळे तिचे जतन करा. कारण गोमय आणि गोमूत्र म्हणजे सेंद्रिय शेतीचा मूलाधार! गाय ही कामधेनू समजली जाते, याचे कारण तिची उपयुक्तता! इतक्या उपयुक्त पशूला मारून खाणे ही केवळ शारीरिकच नाही, तर वैचारिक हिंसा आहे. भारताच्या वेगवेगळ्या भागांत असलेल्या तेथील स्थानिक देशी गायींच्या संवर्धनासाठी प्रचार करणे ही ट्रस्टची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
 
 
पारंपरिक विचार जसा प्रगतीसाठी आवश्यक आहे, तसाच त्यात अनुकूल आधुनिक विचार करणे ही गोष्ट ट्रस्टच्या कामांमध्ये दिसून येते. जेवढी देशी गाय महत्त्वाची, तेवढाच देशी बैल महत्त्वाचा आहे. दैनंदिन आयुष्यात त्याचा वापर होणे गरजेचे आहे. ट्रस्टमधील शेतकर्‍यांनी, संशोधकांनी आणि कारागीरांनी बैलगाडीचे सुधारित मॉडेल तयार केलेले आहे. बैलगाडीचे चाक बदलले आहे. त्यात आधुनिक तंत्रज्ञान वापरून बैलगाडीपासून मुलांना शाळेत ने-आण करण्यासाठी एक छान रथ तयार केला आहे. कल्पना हीच आहे की असे प्रयोग लोकांनी इथे बघावेत, त्यांनी केलेले इतरांना सांगावेत. हेच शिक्षण आहे. मनोजभाई यांच्या भेटींमध्ये आपल्याला हमखास ऐकायला मिळणारे वाक्य म्हणजे, “हमे बात नही बदलनी है, सोच बदलनी है.” निसर्ग आपल्या सगळ्यांचा आहे. भगवान बलरामापासून शेतीचा विकास सुरू झाला, अशी भारतीयांची धारणा आहे. त्या शेतीच्या तत्त्वांमध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची संकल्पना आहे. निसर्गातील सर्व घटक जगले पाहिजेत. विकास केवळ माणसाचा होऊन उपयोग नसतो, निसर्ग सगळ्यांना जगायची संधी देतो. निसर्गातील फूलपाखरे, प्राणी, झाडे आणि माणूस हे परस्परावलंबनाने जगले पाहिजेत, असा संदेश ट्रस्टच्या प्रत्येक कार्यक्रमात असतो. सरकारबरोबर शेतीच्या वेगवेगळ्या स्तरांवर काम करण्यासाठी संस्था आता अक्षय कृषी परिवार या संस्थेशी जोडली गेली आहे. यामुळे भारतभरातील अनेक कृषी विज्ञान केंद्र संस्थेच्या तत्त्वज्ञानाशी एकरूप होण्याच्या मार्गावर आहेत.
 

gaushala_9  H x
 
मी खूप विचार करत होते. अनेक संस्कार मनावर होत होते.शेतकरी गरीब नाहीये. त्याच्याकडे इतकी साधनसंपत्ती आहे की तो गरीब असूच शकत नाही. आपल्या भारतीय धारणांमध्ये उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असा क्रम होता. तो क्रम परकीयांच्या आक्रमणांनी बदलून गेला. शेतकर्‍याला स्वावलंबी बनवण्याऐवजी त्याला बिचारा ठरवून त्याला सबसिडी देऊन लाचार होण्याकडे प्रवृत्त करण्याचा अनेक वर्षे प्रयत्न झाला आहे. त्याच्याकडे असलेल्या साधनसंपत्तीचा विनियोग करून तो समृद्ध जीवन जगू शकतो. पण त्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे. ‘सेंद्रिय शेती परवडत नाही, ती महाग पडते’ अशा गोष्टी आपल्याकडे रुजवल्या गेल्या आहेत. मुळात आपली भारतीय शेती म्हणजे जल, जमीन, जंगल आणि पशू यांच्यातील परस्परावलंबनाचे उत्तम मॉडेल आहे. ती जगण्याची उत्तम शैली आहे. रासायनिक खते वापरून केलेली हरित क्रांती आपल्याला सर्वार्थाने खूप महागात पडलेली आहे. रासायनिक खते महाग पडतात, कारण ती शेतकर्‍याच्या शेतावर तयार होत नाहीत. त्यामुळे शेतीमध्ये बाहेरून पैसा खर्च करून खते आणि कीटकनाशके फवारली, तर ‘शेती’ या व्यवसायाची इनपुट कॉस्ट वाढणारच! तेच बियाणांच्या बाबतीत. आपले बियाणे शेतकर्‍याने मुळात विकत का घ्यावे? बहुराष्ट्रीय कंपन्यांची बियाणे शेतकर्‍यांनी विकत घेऊन कंपन्या श्रीमंत होतात, आणि शेतकरी कर्जबाजारी! आपल्याकडील अनेकांच्या शेतावरील देशी गाय कधीच आपली वेस ओलांडून बाहेर पडली आहे. त्यामुळे तिचे दूध, त्यापासून तयार होणारे पोषक दही, तूप हे तर गेलेच. त्याचबरोबरीने ती देत असलेले गोमय आणि गोमूत्र हे उत्तम खत आणि कीटकनाशक म्हणूनही कमी झाले आहे. कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांना आपण आज तोंड देतो आहोत, कारण भारतीय संस्कृतीमधील देशी गायीवर आधारित सेंद्रिय शेतीचे मॉडेलचा आपल्याला विसर पडला आहे. तिथले एक शेतकरी म्हणाले, ती वाक्ये मनात ठसली गेली आहेत - “आपली आई, आपली मातृभूमी आणि आपली गो-माता यांचा आपल्याला विसर पडला आणि आपण दरिद्री झालो.. भारताची रया गेली. हरित क्रांतीच्या नावाखाली आपण आपली जमीन खराब केली. ती नीट करायला आणखी महाग उपचार, त्या कस जात चाललेल्या जमिनीत जास्तीत जास्त उत्पादन व्हायला आणखी महाग विकत घेतलेली बियाणी, मग परत कर्ज. हे दुष्टचक्र आहे..” मनाला पटतात ह्या गोष्टी. पण पटलेल्या गोष्टी भावनिकरित्या अंगीकारून चालायचे नाही. ‘कसायाला गाय द्यायची नाही, कारण ती गोमाता आहे’, हे भावनिक विधान बरोबर आहे, पण ‘संपूर्ण’ नाही. कारण त्यामागचा अर्थ आपण विसरलो आहोत. इतकी समृद्धी देणारी आपली गाय, आपण देवतेच्या जागी हजारो वर्षांपासून बसवून ठेवणे अगदीच स्वाभाविक होते.
 
 
आपण शेतकरी असू, तर देशी गायीवर आधारित सेंद्रिय शेतीच्या दिशेने वाटचाल करायला हवी. आणि आपला शेतीशी काहीही संबंध नसला, तर असे असूच शकत नाही. कारण अन्नदात्या शेतकर्‍याने पिकवलेल्या अन्नावर आपण पोसले जातो. गोसेवा करण्यात आपलाही हातभार असलाच पाहिजे, तरच हे चक्र पूर्ण होईल. तिची सेवा करायची म्हणजे तिचे संवर्धन करायचे. आपण ग्राहक म्हणून देशी गायीचे दूध घेण्याचा आग्रह करायचा. सेंद्रिय धान्याचा पुरस्कार करायचा. शेतकरी वर्गाला जरा आत्मविश्वास द्यायचा असेल, तर त्याच्याकडे सेंद्रिय उत्पादनांचा आग्रह धरायला हवा. ही ग्राहक म्हणून आपली जबाबदारी आहे, याची मला जाणीव झाली. तत्काळ मिळणारा फायदा अनेकदा भविष्यातील अनेक संकटांची नांदी असू शकतो, याची जाण आपण ठेवायला हवी. हे भारतीय म्हणून आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शेतकरी स्वावलंबी होण्यासाठी आपणही त्याला मदत करायला हवी. असे झाले, तरच उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी ही वेळ परत यायला वेळ लागणार नाही, हा विचार घेऊनच मी आणि योगिता महाराष्ट्रात परतलो.
 
बीज कम्युनिकेशन कन्सल्टन्सी