देवकीचा तान्हा, यशोदेचा कान्हा

विवेक मराठी    25-Oct-2021
Total Views |
@शेफाली वैद्य
श्रीकृष्ण जन्मला मथुरेमध्ये, वाढला गोकुळात, त्याने गीता सांगितली कुरुक्षेत्रात, राज्य केले द्वारकेमध्ये आणि देह सोडला तोही सौराष्ट्रात. पण त्याच्या आयुष्यातले दोन कोवळे बंध - एक त्याच्या जन्मदात्या आई देवकीबरोबरचा आणि दुसरा त्याच्या दत्तक आई यशोदेबरोबरचा, दोन्ही जपले गेलेत ते दूरच्या गोव्यामध्ये आणि तामिळनाडूमध्ये, तेही शेकडो वर्षांपूर्वीपासून, दळणवळणाची आधुनिक साधने उपलब्ध नसताना. देवकीचा तान्हा आणि यशोदेचा कान्हा आजही ह्या देशाला एका भक्तीच्या सूत्रात गुंफण्याचे काम करतोय आणि ही दोन्ही मंदिरे त्याचीच साक्ष देत आहेत.
 

lord balkrishna_5 &n
 फोटो : गुगल सर्च 

श्रीकृष्ण.. हिंदू जनमानसाला पडलेले एक सुंदर, सावळे स्वप्न. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतच्या सर्व भाविक हिंदूंचा लाडका देव. श्रीविष्णूचा अवतार आणि भागवत संप्रदायाची आराध्यदेवता. श्रीकृष्णाची पूजा अनेक स्वरूपात भारतात ठिकठिकाणी केली जाते. कधी तो देवकीचा तान्हा कृष्ण असतो, तर कधी तो यशोदेचा नटखट कान्हा असतो. कुठे तो गोकुळातला रांगता बाळकृष्ण म्हणून पूजला जातो, तर कुठे राधेचा सखा म्हणून. रुक्मिणीचा पती म्हणून महाराष्ट्रात पंढरपूरला त्याची उपासना केली जाते, तर उज्जैनला सांदिपनी आश्रमात श्रीकृष्ण आपल्याला दिसतो तो सुदाम्यासमवेत, तिथल्या गुरुकुलातला एक विद्यार्थी म्हणून. तामिळनाडूमधल्या ट्रिपलिकेनच्या मंदिरात तो अर्जुनाचा मित्र, सखा आणि सारथी असा पार्थसारथी असतो, तर तिथल्याच कांचीपुरममध्ये पांडवदूत मंदिरात तो कौरवांशी शिष्टाई करणारा श्रीकृष्ण असतो. गुजरातमधल्या द्वारकेला तो असतो द्वारकेचा स्वामी, द्वारकाधीश, तर गुजरातमधल्याच डाकोरखेडा येथे तो जरासंधाशी युद्ध न करता मथुरेहून द्वारकेला स्थलांतरित होणारा रणछोडराय म्हणून पूजला जातो. देशभरातल्या आया आपल्या तान्ह्या बाळाला कण्णा, कानुडा, कान्हा, कृष्णा अशी लडिवाळ हाक मारून बोलावतात. असा हा श्रीकृष्ण. आयुष्याच्या वेगवेगळ्या पडावांवर वेगवेगळ्या स्वरूपांत श्रीकृष्ण आपल्याला भेटतो, नव्हे, आपल्या आयुष्यांमधल्या सगळ्या नात्यांमध्ये आपण भारतीय श्रीकृष्णाचेच प्रतिबिंब पाहत असतो, असे म्हटले तरी चालेल.
 
सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा....
https://www.facebook.com/Viveksaptahik
 
 
ह्याच श्रीकृष्णाच्या दोन मंदिरांची आपण ह्या लेखात ओळख करून घेणार आहोत - एका मंदिरात तो देवकीचा तान्हा आहे, तर दुसर्‍या मंदिरात यशोदेला विश्वरूप दाखवणारा तिचा नटखट कान्हा. योगायोगाची गोष्ट म्हणजे पहिले मंदिर आहे माझ्या माहेरच्या राज्यातले, म्हणजे गोव्यातले आणि दुसरे मंदिर आहे ते माझ्या सासरच्या राज्यातले, म्हणजे तामिळनाडूमधले.
 
 
गोवा म्हटले की सर्वसामान्य पर्यटकाला तिथला फेसाळता समुद्र, सोनेरी वाळूने भरलेले समुद्र किनारे, नारळी-पोफळीच्या बागा आणि फेणी, मासे आणि मौजमजा करणे इतकेच आठवते. बहुसंख्य पर्यटक ओल्ड गोवाची चर्चेसही बघून येतात, क्वचित कुणी मंगेशाच्या आणि शांतादुर्गेच्या दर्शनालाही जाऊन येतात; पण गोव्यात इतरही अनेक शेकडो भव्य आणि सुंदर मंदिरे आहेत, हे किती जणांना ठाऊक आहे?
 

lord balkrishna_4 &n
 
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेसाठी आणि स्वच्छतेसाठी गोव्याची मंदिरे प्रसिद्ध आहेत. देशात इतरत्र कुठेही न आढळणार्‍या देवतांची मंदिरे गोव्यातच आपल्याला सापडतात. आनंदी सागरपर्यटनाचा मुखवटा धारण केलेल्या ‘फन अँड फेणी’वाल्या गोव्याचा खरा चेहरा फार कमी लोकांना दिसतो. पण तोच आहे खरा गोवा, जो सहसा आपली गुपिते, आपली संस्कृती, आपला इतिहास बाहेरच्या पर्यटकांपुढे उघडी करून दाखवत नाही. हा गोवा आपल्या काळजात खूप खोलवर आपल्या वेदनादायक इतिहासाचे व्रण बाळगून आहे.
 
 
पोर्तुगीजांनी गोव्यावर तब्बल साडेचारशे वर्षे राज्य केले. अत्यंत धर्मांध आणि जुलमी राज्यकर्ते होते ते. सोळाव्या आणि सतराव्या शतकात त्यांनी गोव्याच्या हिंदू जनतेवर खूप जुलूम केले, जबरदस्तीने धर्मांतरे केली गेली. लोकांच्या तोंडात जोरजबरदस्तीने गाईचे मांस आणि पाव कोंबून त्यांना बाटवले गेले, शेकडो मंदिरे पाडून त्या ठिकाणी चर्चेस उभारण्यात आली. पण गोव्याच्या हिंदूंनी प्राणाची बाजी देऊन आपल्या देवतांच्या मूर्ती राखल्या आणि मूळ मंदिरे पाडली, तरी त्या मूर्ती पोर्तुगीज अंमलाखाली असलेल्या ठिकाणावरून हलवून त्या काळी हिंदू राजाच्या अंमलाखाली असलेल्या फोंडा तालुक्यात नेल्या आणि तिथे नवीन मंदिरे उभारली. त्यातल्या प्रत्येक मंदिराचे वैशिष्ट्य, इतिहास, आख्यायिका, मान्यता वेगवेगळ्या आहेत. यापैकी एक अनोखे मंदिर म्हणजे माशेल येथील म्हणजे देवकी कृष्ण लक्ष्मी रवळनाथ मंदिर.
 
 
हे मंदिर देशातील एकमेव असे मंदिर आहे, जिथे बाळकृष्णाची पूजा त्याच्या जन्मदात्या आईसमवेत म्हणजे देवकीसमवेत केली जाते. ह्याबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की मगध सम्राट जरासंध हा कंसाचा सासरा. श्रीकृष्णाने कंसाचा वध केल्यानंतर चवताळलेल्या जरासंधाने श्रीकृष्णावर स्वारी केली. त्याच्याशी लढून दमल्यावर श्रीकृष्ण श्रमपरिहारासाठी म्हणून गोमांचल पर्वतावर आला. तिथल्या चुडामणी ह्या बेटावर श्रीकृष्ण आणि बलराम काही काळ लपून राहिले. ही बातमी कृष्णाच्या आईला, म्हणजे देवकीला कळताच ती लगोलग आपल्या मुलाला भेटायला त्या बेटावर गेली. पण तिला आठवत होता तो श्रीकृष्ण तान्हा होता, तिच्या मांडीवरून जन्मल्यावर लगेच उचलून नंदाघरी नेलेला बाळकृष्ण. चुडामणी बेटावर तिला भेटलेला श्रीकृष्ण हा नुकताच तारुण्यात पदार्पण केलेला युवक होता. इतके दिवस कंसाच्या कारागृहात बंद असलेल्या देवकीला त्याची कुठलीच खूण पटेना. श्रीकृष्णाला आपल्या आईची ही गोंधळलेली मन:स्थिती समजली. लीलाधरच तो! एकेकाळी त्याने आपल्या दत्तक आईच्या, यशोदेच्या भोळ्या रागाला तोंड देत तिला स्वत:चे विराट स्वरूप दाखवले होते. आता जन्मदात्या आईसाठी त्याने योगसामर्थ्याने बालरूप घेतले आणि आई देवकीच्या मांडीवर झेप घेतली. देवकी हरखली आणि तिने श्रीकृष्णाला विनंती केली की त्याच स्वरूपात मायलेकरांनी चुडामणी येथे कायम निवास करावा. तेव्हापासून चुडामणी बेटावर देवकी व कृष्ण मूर्तिरूपात राहिले.
 
lord balkrishna_7 &n
 
 माशेलच्या मंदिरातील देवकी आणि तिच्या मांडीवर बसलेल्या बाळकृष्णाची मूर्ती
 
हे द्वापारयुगातले चुडामणी बेट म्हणजेच आजचे मांडवी नदीच्या प्रवाहात उभे असलेले चोडणे हे गोव्यातले छोटे बेट. तिथे हे देवकी कृष्णाचे मूळ मंदिर कित्येक वर्षे अस्तित्वात होते. सोळाव्या शतकात पोर्तुगीज शासकांनी केलेल्या पहिल्या आक्रमणात चोडण त्यांच्या आधिपत्याखाली गेले आणि मूळ मंदिर उद्ध्वस्त करण्यात आले. त्या वेळी - म्हणजे सुमारे 1530मध्ये पोर्तुगीजांपासून संरक्षण व्हावे, यासाठी या मंदिरातील मूर्ती इथून सुरक्षित जागी नेण्यात आल्या. केवळ ह्याच नव्हे, तर पोर्तुगीज आक्रमकांपासून संरक्षण व्हावे म्हणून गोव्यातील अनेक मंदिरांतील मूर्ती फोंडा तालुक्यात अशाच हलवल्या गेल्या आणि कालांतराने नंतर त्या ठिकाणी भव्य मंदिरांची बांधणी केली गेली.
 
 
चोडणे गावातून हलवल्यानंतर काही वर्षे देवकी कृष्णाची मूर्ती मयें ह्या गावी ठेवली गेली आणि 1560च्या सुमारास ही मूर्ती माशेल गावात आणली गेली. मूळ तिसवाडी तालुक्यातल्या, अशा विस्थापित झालेल्या सुमारे पंधरा वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती माशेलमध्ये आणल्या गेल्या. आजही माशेल गावात सुमारे पंधरा वेगवेगळ्या देवतांची मंदिरे आहेत. यापैकी प्रमुख म्हणजे देवकी कृष्ण मंदिर. या मंदिराला लक्ष्मी रवळनाथ किंवा देवकी कृष्ण रवळनाथ मंदिर असेही म्हटले जाते. सोळाव्या शतकात इथे अगदी छोट्या स्वरूपात एक मंदिर होते. 1842 रोजी याचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि भव्य मंदिर उभारले गेले.
 


lord balkrishna_8 &n
 
तिप्पीरमलाई येथील कृष्ण आणि यशोदेचे मंदिर
 
 
खास गोव्याच्या इंडो-युरोपियन शैलीत बांधले गेलेले हे मंदिर आज अनेक कृष्णभक्तांना आकर्षित करते. इथल्या गाभार्‍यात काळ्या पाषाणात घडलेल्या देवकी आणि बाळकृष्ण यांच्या मूर्ती आहेत. शृंगार करताना त्यांच्यावर सुरेख सोन्याचा मुखवटा चढवला जातो. पण मुळातल्या मूर्ती शेकडो वर्षे जुन्या आहेत. असे म्हणतात की ओल्ड गोवा जिंकून घेतल्यावर पोर्तुगीज सरदार अल्फोन्स दे अल्बुकर्क चोडणे इथे गेला होता. त्याने ह्या मंदिराला तेव्हा हात लावला नाही, कारण त्याला ह्या मूर्तीत मेरी आणि बाल येशूचा भास झाला. अर्थात ह्या आख्यायिकेला लेखी आधार किंवा पुरावा कुठलाच नाही, कारण मंदिर तर तोडले गेलेच!
 
 
पणजीपासून जेमतेम वीस किलोमीटरवर असलेले माशेल हे एक अत्यंत सुरेख गाव आहे. देवकी कृष्ण मंदिर समूहातच रवळनाथाचे मंदिर आहे. रवळनाथ हे शिवाचेच एक रूप. त्याची मूर्ती दक्षिण कोकणातील हरएक गावात असते. दक्षिण कोकणचा संरक्षक क्षेत्रपाळ म्हणून रवळनाथाची ओळख आहे. देवकी कृष्ण मंदिरातच रवळनाथ विराजमान असल्यामुळे या मंदिराला देवकी कृष्ण रवळनाथ मंदिर असेही म्हटले जाते. याच मंदिराच्या मागील बाजूस आणखी एक छोटेखानी मंदिर आहे. या मंदिराला पिसो रवळनाथ - म्हणजे वेड्या रवळनाथाचे मंदिर म्हणून ओळखतात. देवकी कृष्ण मंदिराचा परिसर अत्यंत शांत आणि मनमोहक आहे. दर पावसाळ्यात होणारा साजरा होणारा चिखलकाला हा इथला प्रमुख सण. गोकुळात आपल्या बालगोपाल मित्रांबरोबर श्रीकृष्ण पावसात भिजून दहीकाला करीत असे त्याची ही आठवण. मुद्दाम भेट द्यावे असे हे गोव्याचे देवकी कृष्ण मंदिर, जिथे श्रीकृष्ण आपल्या जन्मदात्या आईच्या मांडीवर अजून बालरूपात खेळतो आहे.

सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा....
https://www.facebook.com/Viveksaptahik
 
 
देवकीने श्रीकृष्णाला जन्म दिला, पण त्याला जीवन दिले यशोदेने. त्याचे लाड, त्याच्या खोड्या, त्याच्या बाललीला फक्त तिच्या वाट्याला आल्या. साक्षात श्रीकृष्णाला उखळाला बांधून ठेवणे फक्त यशोदेलाच जमले आणि ज्या मोजक्या लोकांना श्रीकृष्णाने स्वत:चे विराट रूप दाखवले त्यात यशोदाही होती. किंबहुना, यशोदेनेच पहिल्यांदा आपल्या अलौकिक मुलाचे खरे विराट स्वरूप बघितले. ती कथा सगळ्यांनाच माहीत आहे. बाळ कृष्ण एकदा मातीचे लाडू खात होता. छोट्या बलरामाने धावत जाऊन यशोदेकडे चुगली केली. कृष्णाच्या सततच्या खोड्यांमुळे वैतागलेली यशोदा कृष्णाला विचारू लागली, “खरंच तू माती खाल्लीस?” श्रीकृष्णाने आपले मोठे काळेभोर डोळे आईवर रोखत मानेनेच नकार दिला. त्याच्या कुरळ्या केसातले मोरपीस त्या क्षणी डोललेही असेल. पण यशोदेने निग्रहाने त्याला तोंड उघडायला लावले. त्या तीन-चार वर्षांच्या सावळ्या बालकाने तोंड उघडले आणि आईला त्याच्या मुखात अवघे ब्रह्माण्ड दिसले. श्रीकृष्ण क्षणभर आकाराने मोठा झाला आणि त्याची आई, यशोदा त्याच्यापुढे अगदीच लहान दिसू लागली. पण क्षणभरच. आश्चर्याने, भीतीने अवाक झालेल्या यशोदेला दुसर्‍याच क्षणी तिचा लाडका नटखट कान्हा येऊन बिलगला आणि तिला कळेचना की तिने पाहिलं होते ते स्वप्न की सत्य! भागवत पुराणातली ही गोड कथा.
 
lord balkrishna_3 &n

श्रीकृष्णाच्या बाललीला फक्त यशोदेच्याच वाट्याला आल्या
 
त्या कथेवर आधारित एक छोटे मंदिर तामिळनाडूमध्ये आहे. तिप्पीरमलाई हे जुन्या त्रावणकोर संस्थानातील एक छोटे गाव. कन्याकुमारीपासून जवळच असलेले. आज तामिळनाडूमध्ये असले, तरी सांस्कृतिकदृष्ट्या केरळचा भाग असलेले. तिथे खास केरळी शैलीत बांधलेले एक छोटेसे पण सुंदर श्रीकृष्ण मंदिर आहे, जिथली श्रीकृष्णाची मूर्ती साडेतेरा फूट उंच आहे. विश्वरूपदर्शनाच्या वेळी विराट रूप धारण केलेला श्रीकृष्ण आणि शेजारी आश्चर्यचकित अवस्थेत बसलेली त्याची आई यशोदा ह्या दोनच मूर्ती गर्भगृहात आहेत. मंदिर गोलाकार आहे आणि वर झावळ्यांचे छप्पर आहे. इथली पूजा तांत्रिक पद्धतीने चालते, त्यामुळे फोटो घेऊ देत नाहीत आणि गाभार्‍यात अंधुकसा गूढ उजेड असतो. पण छाया-प्रकाशाच्या त्या लपंडावात चंदनचर्चित अशी ती तेरा फुटांची मूर्ती बघताना अंगावर काटा आल्याखेरीज राहत नाही. कृष्णमूर्ती चतुर्भुज आहे. वरच्या दोन हातांमध्ये शंख आणि चक्र आहे. खालच्या एका हातात गदा आहे आणि मूर्तीच्या दुसर्‍या हातात मात्र पद्माच्याऐवजी मातीचा लाडू आहे. बाजूच्याच यशोदेच्या मूर्तीच्या एका हातात लोण्याचा गोळा आहे, तर दुसर्‍या हातात ताक घुसळायची रवी. मंदिराच्या बाहेर त्या परिसरात सापडलेले शिलालेख जपून ठेवलेले आहेत, त्यावरून सिद्ध होते की मंदिराला किमान आठशे वर्षांचा इतिहास आहे.
 
 
श्रीकृष्ण जन्मला मथुरेमध्ये, वाढला गोकुळात, त्याने गीता सांगितली कुरुक्षेत्रात, राज्य केले द्वारकेमध्ये आणि देह सोडला तोही सौराष्ट्रात. पण त्याच्या आयुष्यातले दोन कोवळे बंध - एक त्याच्या जन्मदात्या आई देवकीबरोबरचा आणि दुसरा त्याच्या दत्तक आई यशोदेबरोबरचा, दोन्ही जपले गेलेत ते दूरच्या गोव्यामध्ये आणि तामिळनाडूमध्ये, तेही शेकडो वर्षांपूर्वीपासून, दळणवळणाची आधुनिक साधने उपलब्ध नसताना. भारत सांस्कृतिकदृष्ट्या कायम एकच होता, कृष्णभक्तीने, रामभक्तीने रंगलेला होता हेच ह्यातून सिद्ध होते. देवकीचा तान्हा आणि यशोदेचा कान्हा आजही ह्या देशाला एका भक्तीच्या सूत्रात गुंफण्याचे काम करतोय आणि ही दोन्ही मंदिरे त्याचीच साक्ष देत आहेत.

सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा....
https://www.facebook.com/Viveksaptahik