The Unknown Dad (अपरिचित डॅड)- श्रीनिवास लक्ष्मण

विवेक मराठी    25-Oct-2021
Total Views |
@शब्दांकन - रुचिरा सावंत
भारतीय व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण हे सर्वसामान्य भारतीयांच्या मानसिकतेचे भान असलेले भाष्यकार होते. तीव्र निरिक्षणशक्ती, राजकीय-सामाजिक घटनांमागच्या कार्यकारणतेची नेमकी जाण आणि प्रतिभाशक्ती यांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. अशा या श्रेष्ठ व्यंगचित्रकाराचे जन्मशताब्दी वर्ष नुकतेच सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर, अंतराळ पत्रकारितेतील स्वत:चे स्थान निर्माण करणारे श्रीनिवास लक्ष्मण यांनी आर.के. लक्ष्मण यांच्यातील पित्याचा करून दिलेला हा परिचय.

r k_5  H x W: 0
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांनी देशविदेशातील थोरामोठ्यांची व्यंगचित्रे काढली, ती अतिशय नावाजलीही गेली. पण ‘यू सेड इट’ या व्यंगचित्रमालिकेतून त्यांनी सातत्याने रेखाटलेल्या कॉमन मॅनला जाणकारांची सर्वाधिक पसंती मिळाली. आर.के. लक्ष्मण म्हटले की डोळ्यासमोर त्यांच्या कॉमन मॅनची छबी यावी, इतके त्या व्यक्तिरेखेशी त्यांचे अद्वैत होते. चौकडीचा विटका कोट, धोतर आणि बुचकळ्यात पडलेली मुद्रा असलेल्या या कॉमन मॅनने वाचकांच्या मनावर राज्य केले. लक्ष्मण यांच्या कार्याची आठवण म्हणून या कॉमन मॅनचा पुतळा उभारला गेला, ही घटनाच बोलकी आहे. भवतालच्या राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक घडामोडींवर व्यंगचित्रांच्या माध्यमातून अतिशय मार्मिक टिप्पणी करणारे आर.के. लक्ष्मण हे सर्वसामान्य भारतीयांच्या मानसिकतेचे भान असलेले भाष्यकार होते. तीव्र निरिक्षणशक्ती, राजकीय-सामाजिक घटनांमागच्या कार्यकारणतेची नेमकी जाण आणि प्रतिभाशक्ती यांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. अशा या श्रेष्ठ व्यंगचित्रकाराचे जन्मशताब्दी वर्ष नुकतेच सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर, अंतराळ पत्रकारितेतील स्वत:चे स्थान निर्माण करणारे श्रीनिवास लक्ष्मण यांनी आर.के. लक्ष्मण यांच्यातील पित्याचा करून दिलेला हा परिचय.
 
 
डॅडच्या अगदी सुरुवातीच्या आठवणींचा विचार करायला लागल्यावर, माझ्या ठळक स्मरणात असलेली बालवयातली पहिली आठवण म्हटलं की ब्रीच कँडीच्या आमच्या घरून नेपियन सी रोडच्या माझ्या शाळेत सकाळी साडेआठच्या ठोक्याला मला सोडायला येणारे डॅड डोळ्यासमोर दिसतात. जरी तो फार दूरचा प्रवास नसला, तरी त्या प्रवासाचा खोलवर परिणाम माझ्यावर झाला आहे. तिथल्या बस स्टॉपवर घडलेला प्रसंग, खरं तर प्रसंगांची मालिकाच त्याला कारणीभूत आहे.
 
 
एके दिवशी आमच्या मुख्याध्यापिकांनी प्रार्थनेच्या वेळी एक नवा नियम जाहीर केला. त्या म्हणाल्या, “जे विद्यार्थी स्वत:च्या चार चाकी वाहनाने शाळेत येतात, त्यांनी बस थांब्यावर आपल्या शाळेतील कुणी विद्यार्थी दिसले, तर त्यांना आपल्या सोबत गाडीतून शाळेत घेऊन यायचं.”
मला ही कल्पना फार आवडली आणि घरी येऊन फार उत्साहाने मी डॅडना याविषयी सांगितलं. यावर त्यांची प्रतिक्रिया होती - “अजिबात नाही. मला गाडी चालवताना शांतता हवी आहे.”
त्यांच्या या उत्तराचं मला आश्चर्य वाटलं. त्याने मी नक्कीच अडचणीत आलो होतो. सुरुवातीला ब्रीच कँडीकडून नेपियन सी रोडच्या वळणावर असणार्‍या बस थांब्यावर मला आमच्या शाळेतील कुणी दिसलं की मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करायचो. पण याचा फारसा काही परिणाम झाला नाही. यानंतर मी दुसरा मार्ग शोधला. मला दूरवरून कुणी विद्यार्थी उभा असलेला दिसला की मी कारच्या सीटखाली लपू लागलो. माझ्याजवळ इतर काहीच पर्याय नव्हता. माझ्या या दडून बसण्याचं कारण डॅडनी मला विचारल्यावर मी फार धैर्याने, हे सगळं त्यांच्यामुळे होतंय, असं त्यांना ठणकावून सांगितलं.


r k_4  H x W: 0
मात्र माझं उत्तर ऐकून त्यांना काहीच उमगलं नाही. मी त्यांना सगळं समजावून सांगितल्यावरही त्यांनी माझ्या सांगण्याकडे आणि कल्पनेकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष केलं.
दरम्यान शाळेतल्या अनेक विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिकांकडे माझी तक्रार केली होती. एके दिवशी शाळेच्या व्हरांड्यात आमची भेट झाली, तेव्हा त्यांनी माझ्याकडे या अशा वागण्याविषयी चौकशी केली. मी अगदी प्रामाणिकपणे - डॅड नकार देतात असं त्यांना सांगितलं आणि गंमत म्हणजे हे ऐकून त्या काहीच न बोलता निघून गेल्या.
तो बस स्टॉप आजही त्याच ठिकाणी आहे. जवळपास दररोज जेव्हा मी तिथून जातो, तेव्हा मला या सार्‍या आठवणी, कारच्या सीटखाली लपणारा मी आणि मला नित्यनेमाने शाळेत सोडणारे डॅड आठवत राहतात.
आमच्या सकाळी 9 वाजताच्या शाळेसाठी 8.45 वाजता मी शाळेत पोहोचण्याबाबत ते आग्रही असले, तरी माझ्या इतर मित्रांच्या वडिलांसारखे ते अभ्यास, परीक्षा, मार्क्स यांना फार महत्त्व देणारे नव्हते. या बाबतीत माझे आईबाबा अगदी विरुद्ध स्वभावाचे होते. मॉम मात्र माझ्या अभ्यासाच्या बाबतीत आणि मार्कांबाबतीत आग्रही होती.
डॅडच्या या गुणांचं दर्शन घडवणारा एक प्रसंग ठळक सांगायचा, तर इंटर आर्टस्मध्ये मी नापास झालो तेव्हाचा सांगता येईल. मला ती रात्र लख्ख आठवते. मी बाहेरून घरी आलो, त्या वेळी डॅड त्यांच्या खोलीत बसले होते. माझ्याकडे रोखून पाहत ते म्हणाले, “हे बघ, तू नापास झाला आहेस. पण अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. मीसुद्धा कॉलेजमध्ये असताना अनेक वेळा नापास झालोय. आणि मी सध्या काही वाईट परिस्थितीत नाही.” त्यानंतर एकापाठोपाठ एक त्यांनी मला आपल्या क्षेत्रात प्रसिद्ध असणार्‍या, छान काम करणार्‍या पण अभ्यासात मात्र समाधानकारक प्रगती नसलेल्या अनेकांची उदाहरणं दिली.
त्यापैकीच एक उदाहरण म्हणजे त्यांचे थोरले बंधू - एक जगप्रसिद्ध लेखक आर.के. नारायण यांचं होतं, जे इंग्लिश भाषेत नापास झाले होते. त्यातही विरोधाभास असा की पुढे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ते याच भाषेतील साहित्यातील मोठं नाव झाले.
त्यानंतर ते म्हणाले, “एका अर्थी तू नापास झालास हे चांगलंच झालं. मला आशा आहे की तू तुझी स्वप्नं आणि उद्दिष्टं नक्कीच साध्य करशील.”
माझं स्वप्नं तर अवकाश विज्ञानाच्या क्षेत्रात भरारी घेण्याचं होतं. काही महिन्यांनी पुन्हा परीक्षा दिल्यावर मी पास झालो, तो प्रसंगही त्यांनी फार सहज हाताळला.

 
जरी डॅड एक जगप्रसिद्ध सन्मानप्राप्त व्यंगचित्रकार असले, तरी कुंचला हाती घेण्यासाठी त्यांनी मला कधीच प्रेरणा दिली नाही. दर रविवारी दुपारी बारा वाजता जेवणापूर्वीची त्यांची बिअर घेण्याआधी ते चित्र रेखाटत बसायचे. आणि बर्‍याचदा मी त्यांना पहात बसलेलो असायचो. अनेकांना याचं आश्चर्य वाटत असलं, तरी या कशाचाही परिणाम होऊन मला त्यांच्यासारखं व्यंगचित्रकार व्हावं असं कधीच वाटलं नाही.
लहानपणीच मी अगदी वेगळ्या परीघात भरारी घेतली आणि हीच झेप मला अग्निबाण आणि उपग्रहांच्या दुनियेत घेऊन गेली. माझ्या डॅडनी या प्रवासासाठी मला कायम प्रोत्साहन दिलं. माझ्या जन्मापासून प्रत्येक वाढदिवशी डॅड माझ्यासाठी एक भेटकार्ड बनवायचे. त्या वर्षी मला ज्या गोष्टीविषयी विशेष आकर्षण असायचं, त्या गोष्टीचं चित्र डॅड त्या भेटकार्डावर रेखाटायचे. माझ्या तेराव्या वाढदिवसासाठी चंद्रावर सायकल चालवणार्‍या माझं चित्रं त्यांनी रेखाटलं. 1969च्या जुलै 20-21 रोजी नील आर्मस्ट्राँग आणि बझ आल्ड्रिन यांनी चंद्रावर पाऊल ठेवण्याच्या 7 वर्षं आधी त्यांनी हे चित्र रेखाटलं. आमच्या जेवणाच्या खोलीत हे चित्र मी फ्रेम करून लावलं आहे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी त्याचं दर्शन घेण्याचा माझा शिरस्ता आहे. त्या माध्यमातून माझे डॅड मला भेटतात आणि त्यांच्या सदिच्छा देतात, असं मला आजही वाटतं.


r k_1  H x W: 0
काही वर्षांपूर्वी चांद्रयान-1 या भारतीय चांद्रमोहिमेचे मिशन डायरेक्टर, डॉ. अण्णादुराई सदिच्छा भेटीसाठी घरी आले असताना हे चित्र पाहून भारावून गेले आणि गंमतीत म्हणाले, “मला वाटतं, चंद्राच्या पृष्ठभागावर पहिलं पाऊल ठेवणारी व्यक्ती नील आर्मस्ट्राँग नाही तर तू आहेस - श्रीनिवास लक्ष्मण.” अवकाश विज्ञानाविषयीचं माझं वेड वृद्धिंगत करणारी ही भेट दिल्याबद्दल मी डॅडप्रति कायम कृतज्ञ आहे.
त्यानंतर आणखी एक लक्षात ठेवण्यासारखं भेटकार्ड म्हणजे 1997मधील इस्रोच्या पोलर सॅटलाइट लाँच व्हेइकल (पी.एस.एल.व्ही.)च्या प्रक्षेपणाची आठवण ठेवण्यासाठी त्यांनी रेखाटलेलं एक सुबक चित्र. हे प्रक्षेपण पूर्ण अर्थाने यशस्वी झालं नव्हतं. माझ्या खोलीतल्या छोट्याशा अवकाश विज्ञानाच्या संग्रहालयात मी ते फ्रेम करून लावलं आहे.

 
माझ्या अवकाशातील रुचीसाठी त्यांनी मला कायम प्रोत्साहन दिलेलं असलं आणि प्रत्येक वेळी मी सतीश धवन स्पेस सेंटरला जात असताना ते मला सदिच्छा देत असले, तरी आमचं दैनंदिन नातं फारसं मुक्त आणि अनौपचारिक प्रकारचं नव्हतं. याचं एक उदाहरण म्हणजे गल्फ युद्धाच्या वेळी अमेरिकेच्या लढाऊ विमानांमध्ये सहारा विमानतळावर इंधन भरलं जात असतानाची बातमी करण्याचा निर्णय मी घेतला तेव्हाची. ही बातमी मी फार प्रयत्नान्ती धोका पत्करून मिळवली होती. मला आठवतंय, तो रविवार होता आणि टाइम्स ऑफ इंडियाला ती बातमी त्या दिवशी रात्रीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत हवी होती.
जेव्हा रात्री डॅडना मी या बातमीवर काम करत असल्याचं समजलं, तेव्हा त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. मी ही बातमी करू नये अशी आज्ञा त्यांनी दिली.
“ही बातमी करू नकोस. सरकारबरोबर तुला मोठी अडचण निर्माण होईल” असं त्यांचं सांगणं होतं.
 
 
मी गोंधळलो. माझ्या संपादकांना बातमी हवी होती आणि डॅड बातमी करण्याच्या विरोधात होते. शेवटी मी निर्णय घेतला. आयुष्यात माझ्या आठवणीत मी पहिल्यांदा डॅडचं म्हणणं न ऐकता काहीतरी करायचं ठरवलं. मी ती बातमी दिली आणि दुसर्‍या दिवशी टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावर ती झळकली. जागतिक पातळीवर तिचा मोठा परिणाम झाला. डॅडच्या अनेक मित्रांनी माझ्या या बातमीसाठी त्यांचं अभिनंदन केलं. मला अनेक सन्मान आणि पारितोषिकं मिळाली. मला वाटतं, त्यानंतर त्या बातमीसाठी मला विरोध करण्याची चूक त्यांच्या लक्षात आली असावी.
 
 
r k_3  H x W: 0
नि:संशय ते एक विद्वान होते. मात्र या विद्वत्तेसोबतच त्यांच्यात एक विचित्रपणासुद्धा होता. त्यांचं वागणं आणि मन:स्थिती यांचा अंदाज बांधता यायचा नाही. माझ्या एक लक्षात आलंय की त्यांच्या फार जवळ जाणं फारसं सोप्पं नव्हतं. कुणी आव्हान दिलेलं तर त्यांना अजिबात आवडायचं नाही आणि त्यामुळे मी कधीच त्यांच्यासोबत वाद घालायचो नाही. त्यामुळेही आमच्या नात्यात फार मोकळेपणा नव्हता. त्यात बरीच औपचारिकता होती. खरं सांगायचं तर यामुळेच त्यांच्यासोबत खूप वेळ एकत्र राहण्यासाठी मला फारसा उत्साह नसायचा.
 
 
आणि एकदा 1985च्या जून महिन्यात मुंबई ते पॅरिसच्या एअर इंडियाच्या विमानात ती वेळ आली. एअरबस इंडस्ट्री या युरोपमधील अव्वल दर्जाच्या विमान कंपनीने मला एका हाय प्रोफाइल पॅरिस एअर शोसाठी आमंत्रण दिलं होतं. या कार्यक्रमात जगभरातील एव्हिएशन आणि स्पेस या दोन्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध आणि महत्त्वाच्या व्यक्ती येतात. त्याच दरम्यान भारत सरकारने पॅरिसमध्ये ‘फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ नावाचा कार्यक्रम आखला होता आणि डॅड त्या कार्यक्रमासाठी आमंत्रित होते.
 
 
मी पहिल्यांदाच पॅरिसला जात होतो आणि त्यासाठी तयारी करत होतो. अचानक एक दिवस मॉमने मला आश्चर्याचा धक्काच दिला. माझ्यासोबत त्याच विमानातून डॅडसुद्धा पॅरिससाठी रवाना होणार होते. प्रामाणिकपणे सांगायचं तर याविषयी काय आणि कसं व्यक्त व्हावं हे मला अजिबात समजत नव्हतं. हे सगळं पुरेसं नव्हतं, म्हणून आम्ही बोइंग 747मध्ये एकमेकांशेजारी बसलो होतो. ती साधारण 9 वाजताची पॅरिससाठीची फ्लाइट होती, जी नवी दिल्लीमार्गे जाणार होती. नवी दिल्ली येथे पॅरिस एअर शो आणि फेस्टिवल ऑफ इंडियासाठी निघणारे माझे इतर पत्रकार मित्र त्याच विमानात आमच्यासोबत या प्रवासाला येणार होते.
 
 
अंदाजे 1 वाजता नवी दिल्लीहून विमानाने आकाशात झेप घेतली आणि आम्ही युरोपच्या भागात असताना अनेक पत्रकार व काही सरकारी अधिकारी आनंद घेण्यासाठी सज्ज झाले. एअर इंडियाच्या त्या विमानामध्ये मद्याचे ग्लास भरले जाऊ लागले. सार्‍या आमंत्रित प्रवाशांनी संधीचा फायदा घेतला आणि समुद्रसपाटीपासून 30,000 फुटांवर आकाशात एक कॉकटेल पार्टी रंगली.
 
 
माझे काही मित्र माझ्या जवळ येऊन मला त्यांच्यासोबत ड्रींक घेण्यासाठी बोलावू लागले. पण माझ्या शेजारी बसलेल्या त्या प्रवाशामुळे - माझ्या डॅडमुळे मी त्यांना काहीबाही कारणं देऊन या सगळ्यापासून दूर राहिलो. त्या वेळी डॅड मात्र त्यांच्या ड्रिंकचा आस्वाद घेत होते. मी ड्रिंक घेतो हे डॅडना माहीत होतं. त्यांना ते माहितीय हे मलाही माहीत होतं, पण त्यांच्या समक्ष मद्याला मी कधीच हात लावला नाही. मला ते कधीच जमलं नाही.
 
 
पॅरिस विमानतळावरून आम्ही आमच्या वाटांनी गेलो. डॅडसाठी पॅरिसमधील एका उंची हॉटेलात राहण्याची व्यवस्था केली होती. तर पॅरिस एअर शोसाठी आमंत्रित मीडियासाठी पॅरिसपासून जवळच असणार्‍या ङश र्इेीीसशीं या शहरातील एका हॉटेलात व्यवस्था झालेली. योगायोगाने डॅड आणि माझा खोली क्रमांक सारखाच होता. दर दिवशी सकाळी मी त्यांना फोन करून त्यांची चौकशी करायचो. मी त्यांचा मुलगा आहे म्हणून मी डॅडसोबत त्यांच्या हॉटेलात थांबलो नाही. मला त्यांचा मुलगा म्हणून खास वागणूक मिळावी यासाठी त्यांनीही प्रयत्न केले नाहीत. आम्ही दोन स्वतंत्र व्यक्तिमत्त्वं होतो. मीदेखील माझ्या स्वत:च्या ओळखीबाबतीत आग्रही हातो. अगदी आजही आहे.
 
 
तर त्या वेळी मी राहत असलेलं शहर - ङश र्इेीीसशीं हे एरोस्पेस क्षेत्रातील ऐतिहासिक महत्त्व असणारं शहर. जागतिक कीर्तीचे एव्हिएटर चार्ल्स लिंडबर्ग यांची 21 मे, 1927 रोजी न्यूयॉर्क ते पॅरिस ही थांबा न घेता केलेली सोलो फ्लाइट इथेच डळिीळीं जष डरळपीं र्ङीळी येथे उतरली. पुढे अनेक वर्षांनी ट्रान्स अटलांटिक प्रवासासाठीची दारं तिने खुली केली.
 
 
 
एअर शोनंतर मी लंडनसाठी रवाना झालो. मुंबईत पुन्हा भेटण्यासाठी मी डॅडचा पॅरिसमध्ये निरोप घेतला. पॅरिसप्रमाणेच लंडनभेटसुद्धा माझ्यासाठी पहिलाच अनुभव असणार होता. या अनुभवासाठी मी खूप उत्साहात होतो. तेथील लोकांची वागणूक मैत्रिपूर्ण होती. मला लंडन फार आवडलं. डॅड त्यांच्या लंडनभेटीत ज्या हॉटेलात राहिले होते, तिथेच मी उतरलो. त्याच हॉटेलात माझे प्रसिद्ध काका - आर.के. नारायणसुद्धा यापूर्वी राहिले होते. आम्ही उतरलेलो ते ठिकाण होतं - इंडिया क्लब, जे लंडन शहराच्या हृदयात वसलेलं होतं.
 
 
मी हॉटेलात प्रवेश केल्यावर तिथले मॅनेजर असणार्‍या ‘मिस्टर जोसेफ’ यांनी अगत्याने डॅडची चौकशी केली. त्यांच्या सांगण्यानुसार डॅड जेव्हा लंडनला जायचे, तेव्हा हे हॉटेल म्हणजे त्यांच्यासाठी लंडनमधलं घर होतं.
 
 
एके दिवशी सकाळी माझ्या दारावर सकाळच्या वेळी ठकठक झाली. हॉटेलमधील कुणीतरी असावं असं वाटून मी त्याला थोडा वेळ थांबायला सांगितलं. पुन्हा दरवाजा वाजल्यावर मी आतून काही काळ थांबण्याची विनंती करून तयार होऊन दार उघडलं. दार उघडून पाहतो तर काय - समोर खुद्द डॅड उभे! माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना.
 
 
खरं तर आम्ही मुंबईहून निघण्यापूर्वीच त्यांनी हे सगळं नियोजन केलं होतं. पण ते माझ्यापासून दडवून ठेवलं होतं. या आनंददायक धक्क्यानंतर मोजकं बोलणं झाल्यावर त्यांनी मला चटकन तयार व्हायला सांगितलं आणि लंडनमधील रस्त्यांची पायी चालत ओळख करून देण्याचा त्यांचा मनसुबा सांगितला. टाइम्स ऑफ इंडियातर्फे काही काळ ते लंडनमध्ये काम करत होते. त्यामुळे लंडन शहराची त्यांना बारकाव्यांनिशी माहिती होती. आम्ही खूप ठिकाणी पायी फिरलो. ट्रफल्गार स्क्वेअर, ऑक्स्फर्ड स्ट्रीट आणि त्यानंतर आम्ही बॉण्ड स्ट्रीटला गेलो, जिथे त्या वेळेचं एअर इंडियाचं ऑफिस होतं.
 
 
एअर इंडियाच्या ऑफिसमध्ये प्रवेश करताच तेथील अनेक कर्मचार्‍यांनी त्यांचं अगत्याने स्वागत केलं. त्यांनी सर्वांशी माझी ओळख करून दिली. तेथील मुख्य समितीचा भाग असल्याच्या आविर्भावातच ते तेथील व्यवस्थापकाच्या कार्यालयात गेले. त्याच्या खुर्चीत समोरील टेबलावर दोन्ही पाय ठेवून बसले आणि तेथील टेलिफोनवरून आमच्या मुंबईच्या घरी फोन करून मॉम आणि माझी पत्नी उषा यांच्याशी बराच वेळ गप्पा मारत राहिले.
 

r k_2  H x W: 0
 
तेथील कर्मचार्‍यांशी नंतर झालेल्या बोलण्यातून मला समजलं की डॅड एअर इंडियाच्या या ऑफिसमध्ये कायम आपल्या घराप्रमाणे वावरत आणि तेथील कर्मचार्‍यांना हे फार आवडत होतं.
 
 
त्यानंतर आम्ही हॉटेलच्या दिशेने पुन्हा एकदा पायी निघालो. आणि ते मला वाटेत वेगवेगळी ठिकाणं दाखवत राहिले. तो खरंच सुखावणारा अनुभव होता. 2018च्या ऑगस्ट महिन्यात माझी मुलगी रिमाणिका आणि पत्नी उषा यांच्यासमवेत मी लंडनमध्ये असताना मीसुद्धा त्यांना इंडिया हाउसला घेऊन गेलो होतो. त्या वेळी मी त्यांना तो परिसर दाखवला. त्यादरम्यान डॅडच्या आठवणींनी माझ्या भावना अनावर होत होत्या. मी डॅडसमवेत इथे असताना हॉटेलचे व्यवस्थापक असणारे जोसेफ यांच्याविषयी चौकशी केली. पण दुर्दैवाने काही वर्षांपूर्वी त्यांनी या जगाचा निरोप घेतला, असं समजलं.
 
 
असाच आणखी एक प्रसंग मला आठवतो. आमच्या मुंबईच्या घरी रात्री जेवणापूर्वीचे ड्रिंक घेत डॅड दिवाणखान्यात बसले होते. इतक्यात घरातील फोन खणखणला. त्यांनीच तो फोन घेतला आणि फोनवरच ते खूप रडू लागले. मॉमने त्यांना सावरण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही.
 
 
त्यांचे थोरले बंधू आर.के. नारायण यांचा तो फोन होता. त्यांच्या आईच्या मृत्यूची खबर देणारा. डॅडचं त्यांच्या आईवर खूप प्रेम होतं आणि त्यांना या सार्‍याचा मोठा धक्का बसला होता.
 
 
या बातमीमुळे पूर्णत: हादरून गेलेले असतानाही ते आपलं हाती घेतलेलं ड्रिंक पूर्ण करत तिथेच बसले.
 
 
दुसर्‍या दिवशी शनिवारच्या सकाळी ते नेहमीप्रमाणे उठले. घरी सर्वांशी नेहमीचं बोलणं करून ते ऑफिसला निघून गेले. जसं काही घडलंच नव्हतं. गोष्ट इथे संपत नाही. त्या रात्री ब्रिटिश डेप्युटी हाय कमिशनने आयोजित केलेल्या कॉकटेल आणि डिनर पार्टीलासुद्धा ते आणि मॉम गेले. हे सारं घडलं त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर पुढील 24 तासात ‘डहेु र्ाीीीं से ेप’ हा त्यांचा मंत्र होता.
वय होऊ लागलं आणि त्यांची तब्येत खालावू लागली. त्यांच्या मृत्यूच्या एक महिना आधी मी त्यांच्याकडे माझ्या आयुष्यातील पहिली व्यावसायिक विनंती केली. भारतीय मार्स ऑर्बिटर मिशनची (चजच ची) मंगळाच्या कक्षेतील 100 दिवसांची पूर्तता साजरी करण्यासाठी बंगळुरू येथील यू.आर. राव सॅटलाइट सेंटर येथे ठेवण्यासाठी इस्रोला मंगळ ग्रहावरील कॉमन मॅनचं चित्र हवं होतं. त्यांना हे जमेल याची माझ्या मॉमला शाश्वती नव्हती. पण शेवटी डॅडनी माझ्यासाठी दोन स्केच केलीच, जी मी इस्रोमध्ये पाठवून दिली.
 
 
डॅडनी केलेेली ही स्केचेस इस्रोसाठी सन्मान होता. आमच्या घरी घरभर या स्केचेसच्या प्रती आम्ही लावल्या आहेत.
 
 
अशा प्रकारे माझी पहिली आणि एकमेव विनंती त्यांनी पूर्ण केलीच. आणि दुर्दैवाने ती शेवटची ठरली. डॅडने रेखाटलेलं ते स्केच त्यांचं शेवटचं स्केच ठरलं. त्यानंतर महिन्याभरात 2015च्या 26 जानेवारी रोजी सायंकाळी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आणि योगायोग म्हणजे नेमके त्याच दिवशी टाइम्स ऑफ इंडियाच्या बंगळुुरू एडिशनमध्ये भारतीय अवकाश मोहिमांवरील माझं लेखन डॅडच्या त्याच शेवटच्या चित्रासमवेत प्रकाशित झालं होतं.