क्रॉस कल्चर सांस्कृतिक संवादाची अभ्यासशाखा

विवेक मराठी    26-Oct-2021
Total Views |
@सुलक्षणा वर्‍हाडकर
विविध संस्कृतीतील व्यक्तीबरोबर वावरताना इतर संस्कृतीतील व्यक्ती जशी आहे तशीच स्वीकारून आपली सांस्कृतिक ओळख व आचारविचार आत्मविश्वासाने प्रेझेंट केले जातात, तेव्हा एक निकोप समाजाला खरं तर सुरुवात होऊ शकते. अमुक संस्कृतीतील माणसं नेमकी अशी का वागतात? हे पाहताना त्यावर कोणतेही शिक्के न मारता पाहता अशा वर्तणुकीचा अभ्यास केला जातो त्या समूहाला अभ्यासण्यासाठी.

corrs_1  H x W:
दोन किंवा अधिक भिन्न अशा संस्कृतींचा अभ्यास करण्याकडे गेल्या दोन-तीन दशकांत कल दिसतो आहे. मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय आणि थोडंसं मानववंशशास्त्रीय या दृष्टीकोनातूनदेखीलही ही अभ्यास शाखा पाहिली जातेय, अभ्यासली जातेय. आपण भारतीय वसुधैव कुटुम्बकम मानणारे आहोत. विविधतेत एकता हा आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा पैलू आहे; तरीही मॅनेजमेंटमध्ये या ज्ञानशाखेवर संशोधन व्हायला लागेल, तेव्हा ते श्रेय भारतीयांकडे नाही याचं नेहमीच वाईट वाटतं.
 
 
हा अभ्यास म्हणजे नेमकं काय, ते सोप्या भाषेत उलगडून सांगते. दोन परस्परभिन्न संस्कृतीतील साम्यस्थळं आणि धक्कादायक विरोधाभास याबद्दल जेव्हा अभ्यास केला जातो, निरीक्षण केलं जातं अथवा मध्यममार्ग काढून मतभेद कमी कसे होतील हे पाहिलं जातं, Empathy ठेवली जाते, अ‍ॅक्सेप्टन्स, अ‍ॅडॅप्टेबिलिटी, अ‍ॅडजस्टमेंट केली जाते, जजमेंटल न होता विशेषत: दुसर्‍या संस्कृतीतील एखाद्या कृत्याकडे, कृतीकडे तटस्थपणे पाहिलं जातं, त्यावर कोणतंही भाष्य न करता फक्त एक प्रकार म्हणून पाहिलं जातं, तेव्हा या अभ्यासाची सुरुवात होते. उदाहरणार्थ, जास्तीत जास्त पैसे कमावणं आणि आयुष्याचा स्तर उंचावून समाधानी आयुष्य जगणं या विधानाकडे डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फिनलंड या देशांमध्ये कसं पाहिलं जातं, जर्मनी, जपान, फ्रान्स या देशांमध्ये कसं पाहिलं जातं आणि भारत, चीन आणि ब्राझील कसं पाहतील? पैसे कमावणं याबाबत या सर्वांचं जरी एकमत असेल, तरी उच्च जीवनशैली आणि त्यातून मिळणारं समाधान यावर एकमत होईलच असं नाही. क्रॉस कल्चरल संशोधक जेव्हा अशा वर्तणुकीचा अभ्यास करतात, तेव्हा तो क्रॉस कल्चरल अभ्यास असतो. यासाठी विविध परिमाणं पाहिली जातात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुळीच जजमेंटल न होता समूहाचा अभ्यास केला जातो. त्यामागची कारणं पाहिली जातात आणि त्यानुसार आपली लवचीकता, ग्राह्य करण्याची क्षमता ठरवता येते. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या जगभर विखुरलेल्या आहेत. तिथे काम करणारे जगभरातून आलेले असतात. त्या सर्वांची कार्य करण्याची पद्धत एकसंध नसणार. त्यातून वैचारिक स्फोट होण्याची शक्यता घडतील. उदाहरणार्थ, एखाद्या ब्राझिलियन पुरुषाने ऑफिशियल ई-मेलमध्ये ‘बेजोस’ किंवा ‘अब्रासो’ लिहिलं असेल, तर भारतीय, चिनी किंवा जपानी स्त्रीला ते अवघडल्यासारखं वाटू शकतं. बेजोस म्हणजे चुंबन. अब्रासो/अब्रासा म्हणजे मिठी, केरिदा म्हणजे डार्लिंग या अर्थाने प्रिय. ब्राझिलमध्ये मिठी मारणं हा अत्यंत समाजमान्य भाग आहे. म्हणजे कोणी अनोळखी स्त्री, पुरुष असेल तर मिठी मारली जाते, गालाला गाल लावला जातो आणि ग्रीट केलं जातं. हेच वागणं जपानमध्ये त्यांच्या खाजगी स्पेसमध्ये अतिक्रमण केल्यासारखं होईल. भारतात कोणी कदाचित ‘मी टू’चाही वापर करतील.
 
 
 
विविध संस्कृतीतील व्यक्तीबरोबर वावरताना इतर संस्कृतीतील व्यक्ती जशी आहे तशीच स्वीकारून आपली सांस्कृतिक ओळख व आचारविचार आत्मविश्वासाने प्रेझेंट केले जातात, तेव्हा एक निकोप समाजाला खरं तर सुरुवात होऊ शकते. अमुक संस्कृतीतील माणसं नेमकी अशी का वागतात? हे पाहताना त्यावर कोणतेही शिक्के न मारता पाहता अशा वर्तणुकीचा अभ्यास केला जातो त्या समूहाला अभ्यासण्यासाठी. उदाहरणार्थ, जर कोणी भस्म लावून किंवा आडवे गंध लावून बुक्का लावून ऑफिसमध्ये जात असेल तर त्यात हसण्यासारखं काही नाही. हे त्या व्यक्तीचं एक्स्प्रेशन असू शकतं. त्या व्यक्तीचं धार्मिक असणं, देवपूजा करणं यावर ऑफिसमधले कोणी तक्रार करू शकत नाहीत, हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. विविध संस्कृतींत माणसांच्या वर्तणुकीचा अभ्यास करण्याची ही ज्ञानशाखा त्या समूहात संवाद कसा साधावा जेणेकरून गैरसमज न वाढता, स्फोट न होता, सरसकटीकरण न करता एकमेकांना स्वीकारलं जाईल याकडे पाहते. या विषयाबद्दल न बोलता जपानमधील वर्क कल्चरबद्दल सविस्तर बोलते एक उदाहरण म्हणून.
 
 
आपण सर्व भारतीय आहोत. मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू या शहरांमधील कार्यपद्धतीच्या तफावतीबद्दल पाहू या. मुंबईत कामं लवकर होतात. पुण्यात ‘आमची कुठेही शाखा नाही’, लोक दुपारी एक ते चार झोपतात. दिल्लीत लोक सतत ‘मेरा बाप कौन है’ बोलतात, मोठ्या ओळखी एकमेकांवर फेकतात काम करून घेण्यासाठी.
 
 
अशी वाक्यं आपल्या कानावर सररास येतात. मुंबईत मिनिट मिनिटाच्या लोकल मुंबईकरांचा श्वास आहे. मुंबई स्पिरीट हेसुद्धा यात आलं. आमची कुठेही शाखा नाही या वृत्तीबद्दल बोललं जातं ते वेगळंच. तुम्हीसुद्धा हे कल्चर पाहिलं असेल.
 
 
 
माझा लेक सात वर्षं जपानमधल्या टोकिया शहरात शाळा शिकला. माझ्या जपानमधल्या वास्तवामुळे मला जपानी संस्कृती अनौपचारिकरित्या अभ्यासण्याची संधी मिळाली. पुढे जपाननंतर चीनमध्ये राहण्याची संधी मिळाली. त्यानंतर गेल्या आठ वर्षांत ब्राझिलमध्ये राहतेय. लहानपण अंधेरी लिंक रोड, ओशिवरा आणि जुहू-विलेपार्ले शाळा-कॉलेज होतं. लग्नानंतर मलबार हिल येथे स्वत:च्या मॅन्शनमध्ये राहता आलं. नवर्‍याचे पणजोबा प्रतिष्ठित ‘रावसाहेब’ पदकाने सन्मानित होते. या सर्व संस्कृती माझ्यासाठी टाइम मशीनमध्ये बसल्यासारख्या होत्या. माझे आई-वडील 55 वर्षांहून जास्त काळ अंधेरी-विलेपार्ल्यात राहत आहेत आणि मूळचे शेतकरी असल्याने आजही नाशिकमध्ये शेती आहे.
 
 
माझ्या जडणघडणीत इतक्या संस्कृतींचा प्रभाव आहे. त्यामुळे मला याच विषयाचा सखोल अभ्यास करावासा वाटला. मॅनेजमेंटमध्ये एमबीए करताना त्यात एक विषय होता डायव्हर्सिटी, इक्विटी आणि इन्क्लुजन. ते शिकताना मी या विषयाच्या आणखी खोलात त्याचा जाऊन अभ्यास करायचं ठरवलं. दिवाळी अंकाच्या लेखाच्या शब्दांची मर्यादा पाहता सगळ्या संस्कृतींतील सविस्तर उदाहरणं देणार नाही, पण जपानमधल्या वर्क कल्चरबद्दल सांगते. त्यामुळे तुम्हाला कल्पना येईल क्रॉस कल्चरल सायकॉलॉजीची.
 
 
मॅनेजमेंटमध्ये याचा अभ्यास करताना मनाची पाटी कोरी ठेवून जायचं असतं, हा एक नियम आहे. तो पाळून जपानमधील उदाहरणं तुम्ही पाहू शकता.
 
 
‘हामिगाकी’ म्हणजे दात घासण्याबद्दल जपानमध्ये पराकोटीचं लक्ष असतं. जपानची ही सवय ब्राझिललादेखील आहे. तुम्ही जर मॉलमध्ये पाहिलं, उपाहारगृहात, ऑफिसमध्ये सगळीकडे खाणं झालं की लोक ब्रश करताना दिसतात. हे अगदी नॉर्मल आहे. हा एक सोशल नॉर्म आहे. सामाजिक प्रथा म्हणू या. दाताचं आरोग्य अत्यंत महत्त्वाचं मानणारे देश म्हणजे जपान आणि ब्राझिल. ऑफिसमध्येही लोक ब्रश घेऊन जातात.

 
corrs_1  H x W:

‘कोदावरी’ ही आणखी एक जपानी संकल्पना. परिपूर्णतेचा ध्यास - मग ती कचरा टाकण्याची जागा जरी असेल, तरी तिथे कोणती घाण अस्ताव्यस्त पडलेली नसेल. प्रत्येकासाठी एक जागा असेल. स्वच्छता असो की सौंदर्य याचं भान ठेवलं जाईल. अगदी एखाद्या इमारतीचं रंगाचं, डागडुजीचं काम होत असलं, तरी त्या इमारतीला झाकून ठेवावं, जेणेकरून तिच्या सौंदर्यात कोणतीही कमतरता दिसू नये. तिथे सार्वजनिक ठिकाणी हेच तत्त्व वापरतात. हा त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे. तुम्ही कोणी ‘पनेलासो’बद्दल ऐकलंय का? पनेलासो असं नाव असणार्‍या कृतीचा खरा अर्थ होतो स्वयंपाकाची भांडी. सार्वजनिक ठिकाणी निदर्शन करण्याच्या पद्धतीला पनेलासो हे नाव दिलं. एका ठरावीक वेळी सरकारच्या विरोधात आणि बाजूने निदर्शनं करायची असतात, तेव्हा इथले सर्व नागरिक बाल्कनीत येऊन, खिडकीत येऊन घरातली कॉफीची पॅन आणि तवे घेऊन आवाज करतात, बिगुल वाजवतात, भोंगे वाजवतात समर्थन आणि निषेध करण्यासाठी. त्यांची सामाजिक पद्धत म्हणजे भांडी वापरणं, याला आमच्याकडे बुझिनोसोस असं म्हणतात. दक्षिण अमेरिकेत त्याला पनेलासो असं म्हटलं जातं. मध्यमवर्गीय आपला राग, संताप, निषेध, समर्थन देण्यासाठी भांडी वाजवतात. भांडी वाजण्याची वेळ समाजमाध्यमांत सांगितली जाते. तुम्हाला जर दुसर्‍या संस्कृतीतील अशा पद्धती समजल्या, तर ती माणसं समजायला सोपी जातात. संस्कृती म्हणजे फक्त खाद्यविषयक, पेहरावविषयक, भाषाविषयक किंवा सिनेमा-संगीताशी मर्यादित नसते, तर तो भाग फक्त हिमनगाच्या टोकासारखा असतो. अमुक व्यक्ती अमुक प्रसंगात कशी प्रतिसाद देते, प्रतिक्रिया देते हे खरं तर तिच्या सांस्कृतिक जडणघडणीवर अवलंबून असतं, याचा अभ्यास क्रॉस कल्चरल सायकॉलॉजीमध्ये करतात. ती तशी वागते.. तो तसा वागतो.. याची कारणमीमांसा न करता त्यामागील भूमिका समजून घेतली जाते, म्हणजे तो लोकसमूह समजणं सोपं जातं. माणसाला उलगडून पाहता येतं.
 
 
जपानमधील आणखी काही सविस्तर सांगते. जपानी लोकांच्या परफेक्शनचा हट्ट, संस्कार त्यांच्या स्मशानभूमीतही दिसतो. तिथे चक्क सुंदर प्लॉटच्या जाहिराती येतात. तुम्हाला तुमच्या थडग्याची निवड करता येते. या प्लॉटसाठी सुलभ हप्त्यावर कर्ज काढता येतं. तुमच्या आवडीचं डिझाइन करता येतं. त्यासाठी वापरात येणारा दगड, त्यावर कोरलं जाणारं नाव सगळ्यांची निवड करता येते. ज्यांना किमान सहा फुटांची जागा घेणं आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखं नाही, त्यांच्यासाठी लॉकर सुविधा उपलब्ध असते. यात तुमच्या आप्तांच्या अस्थी ठेवण्यासाठी लहान-लहान लॉकर आहेत. त्याची किंमत थोडी कमी असते. मुंबईत वन रूम किचन येईल एवढ्या किमतीत हे प्लॉट असतात. अनेक जण या सुविधेचा लाभ घेतात. काही सेलिब्रिटीजच्या अस्थी पळवून गेल्याच्या घटना येथे घडल्यात. त्या बदल्यात चोरट्यांनी मोठी रक्कम मागितली होती.
 
 
‘हिकिकोमोरी’ ह्याबद्दल अगदी सांगायलाच हवं. ‘देही असुनी विदेही’ किंवा ‘आईना देख के तसल्ली हुई। हमको इस घर मे जानता है!’ काही अशी भावावस्था हिकिकोमोरीत दिसते. जपानी भाषेत याला एक नाव आहे. समाजापासून दूर, संपूर्ण एकांतात राहणारे, जगाशी कोणतीही कसाही संपर्क न ठेवणारे. आजच्या ओव्हरकनेक्टेड जगातही अशा व्यक्ती आहेत. स्पेनमध्ये, कोरियातदेखील आहेत. पण जपानसारख्या तंत्रज्ञानात अव्वल देशात ही संख्या सर्वाधिक आहे. एक कोटीपेक्षा अधिक लोक हिकिकोमोरी आहेत. वयाच्या पंधराव्या वर्षापासून अनेक जण आयसोलेशनमध्ये जातात. इंटरनेटचा सर्वाधिक वापर, स्वत:च्या खोलीत कोंडून घेणं, हे सुरुवातीला होतं. सहा महिन्यांपासून जास्त काळ कोणत्याही सोशल कार्यक्रमात सहभागी न होण्यापासून ही सुरुवात होते. मग तेच क्रॉनिक बनत जातात.
 
 
 
समाजसेवक त्यांना शोधून त्यांचं मन वळवतात, औषधोपचार करतात, जेवण देतात, पण त्यांना मोहमायेच्या वेड्या जगात परतायचं नसतं. घरात वीज नसली, पंखा नसला तरी त्यांना चालतं, भातात मीठ टाकून खाणं ते स्वीकारतात, पण जगात परत जात नाहीत. गरजेच्या वस्तू सुपर मार्केटमधून घेऊन येतात.
 
 
अर्थचक्र सहकाराचेना थांबले, ना मंदावले!
https://www.evivek.com//Encyc/2021/10/26/Economic-cycleDon-t-stop-don-t-slow-down-.html

दिवाळी अंकातील लेख  
 
मानसशास्त्रात या सामाजिक भूमिकेवर बरंच संशोधन चालू आहे. गेली दोन-अडीच दशकं ही समस्या वाढीला लागली. समाजाकडून प्रचंड डावलले गेल्यामुळे हे हिकिकोमोरी होतात. त्यामुळे ते एकांतवासात जातात. आपली कोणाला गरज नाही, आपण कोणाच्या उपयोगाचे नाही.. कोणी एखादा मिसफिट असेल, तर त्याला आपल्याकडे अनुल्लेखाने मारतात आणि त्या व्यक्तीचं जीणं मुश्कील करतात. कमकुवत मनाच्या, आत्मविश्वास हरवलेल्या व्यक्ती हिकिकोमोरी होतात. स्वत:च्या अस्तित्वाचा शोध, जगण्याचं कारण-हेतू हरवायला लावणारा समाजही या परिस्थितीला कारणीभूत असतो. त्यात घरगुती हिंसाचाराला बळी पडलेला बायकाही आहेत. सायातो तामाकिसान हे यावर संशोधन करीत आहेत. जपानमध्ये आणखी एक वाईट समज आहे, तो म्हणजे धडधाकट समाजात कोणी विकलांग असेल तर सहज स्वीकारलं जात नाही. त्यासाठी समान क्षमतेचा गट हवा. हे प्रेशर हिकिकोमोरी होण्यास प्रवृत्त करतं. एकदा का हिकिकोमोरी अवस्था समजली की तुम्हाला जाणवेल जपानमध्ये सांघिकपणाला किती महत्त्व आहे ते. क्रॉस कल्चरल अभ्यास म्हणजे समाजशास्त्र, मानसशास्त्र, भूगोल, इतिहास, देहबोली प्रभाव आणि बरंच काही असतं. जपान हा देश फक्त सुशी, साकुरा, सुमीमासेन, सायोनारा आणि त्सुनामी यापेक्षाही आणखी इतर पैलू असणारा देश आहे. मला क्रॉस कल्चरल स्टडीमध्ये या जपानचा अभ्यास करताना जपान उलगडत गेला. तोच वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करते.
 
 
‘कारोशी’ ही अशीच एक सामाजिक संकल्पना. अतिश्रमाने मृत्यू किंवा ऑफिसमध्ये जास्त वेळ काम केल्याने मृत्यू असं याला मराठीत म्हणू शकतो. जपानमध्ये प्रचंड कामसू लोक आहेत. परिपूर्णतेचा ध्यास आहे त्यांच्याकडे. ते मेहनत करतात. दर्जा उत्तम राखायचा असतो उत्पादनांचा. काम करणार्‍या व्यक्तीवर ह्या सर्वाचा नकळत परिणाम होतोच. कोरोशी मृत्यूंची संख्या तिथे लाखांच्या संख्येत आहे. कामगार कायद्यानुसार यात आता सुधारणा करण्यात आली असली, तरी प्रचंड काम करणं यामुळे लोक अकाली मरण पावत आहेत.
 
 
‘कायझेन’, ‘इकिगाई’ ह्या तत्त्वांवर जपानी लोकांचा फार विश्वास आहे. सगळ्या कामात, जगण्यात, राहणीमानात एक हार्मनी दिसते. तिथे जे किमोनो घातले जातात, त्याची डिझाइन्स ऋतुमानानुसार बदलत असतात आणि त्यावर कोणती फुलं माळायची हेदेखील ठरलेलं असतं.
 
 
ऑफिसमध्ये हायरार्की पाळणं तर त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसतं. नावापुढे ‘सान’ लावलं जातं. एकेरी नावाने हाक मारली जात नाही. सगळ्यांची संमती घेतली जातेच, तसंच वरिष्ठांना लहानात लहान निर्णय सांगितला जातो. वरिष्ठांना अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. ह्यात कोणताही अहंकार आड येत नाही. उत्तर अमेरिकेत जसे ‘सेल्फ मोटिव्हेटेड’ निर्णय घेतले जातात, तसं जपानमध्ये शक्य नाही. वरिष्ठांची उतरंड येथे असते, त्यांच्या परवानगीने प्रत्येक पाऊल टाकलं जातं. जपानमध्ये ऑफिसातही क्युबिकल्स नसतात, तर ओपन स्ट्रक्चर असतं. शांतता असते. कोरियन लोकांप्रमाणेच ते काम करताना सेल फोनवर बोलत नाहीत. ऑफिसमध्ये काम करताना मोठ्यामोठ्याने बोललं जात नाही. शांतता महत्त्वाची असते. चेन ऑफ कमांड पाळली जातेच जाते. यात एक twist आहे, तो म्हणजे चेहर्‍यावर इस्त्री केल्यासारखे भाव घेऊन ऑफिसमधला वावर असला, तरी ऑफिसनंतर जेव्हा नोमिकाय (छेाळज्ञरळ) नोमिन्युकेशनसाठी सगळे भेटतात, तेव्हा ही उतरंड सैल होते. टाय काढले जातात, ब्लेझर बाजूला पडतात आणि सगळे जण एकत्र दारू पितात. मनसोक्त हा शब्द वापरायला हवा इथे. नोमिकाय आणि कम्युनिकेशन यांना घेऊन हा एक शब्द बनवला आहे ‘नोमिन्युकेशन’. यात दारू पिता पिता गप्पा मारल्या जातात. सगळी औपचारिकता इथे गळून पडते. काराओके गाणी गायली जातात. बरेच जण ऑफिसच्या सहकार्‍यांबरोबर एकत्र जातात. जपानी नोकरदार व्यक्तींना ‘सॅलरी मेन’ असं म्हणतात.
 
 
तिथल्या कार्यपद्धतीत Ho - Ren - So hmo - aoZ- gmo- सो यावर भर दिला जातो.
1) हो के म्हणजे Houkoku - रिपोर्ट करणं.
2) Ren म्हणजे
Renraku - Communicate or touch base
3) So म्हणजे Soudan सौदान -
Consult or discuss.
 
 
इतर देशांत ज्याप्रमाणे वॉटर कूलरभोवती, कॉफी मशीनभोवती गप्पा मारल्या जातात, तसं जपानमध्ये सहज होत नाही. शांतपणे कामावर फोकस करून एकमेव उद्देशाने ते काम करतात. काम करताना सतत फोन चेक करत नाहीत. जर कोणी असं करत असेल, तर खाली पाहिलं जातं. जास्त वेळ काम करणं यावर कोणी तक्रार करत नाही. सर्वमान्य आहे तसंच जास्त काम करणं. उत्तर अमेरिकेत जर वेळेवर काम आटोपून घरी जाणं हा प्रघात असेल, तर जपानमध्ये अधिक काम करणं चांगलं मानलं जातं. जपानमध्ये मी आणखी एक पाहिलं - जेवणाच्या सुट्टीमध्ये कोरियनसारखे झुंडीने जाणार नाहीत. एकेकटे जेवण करताना त्यात कोणतीही नकारात्मकता नसते. तिथल्या ऑफिसमध्ये स्वतंत्र कॅफेटेरिया असतीलच असं नाही, पण ऑफिसच्या आजूबाजूला खूप सारी लहान लहान उपाहारगृहं असतात.
 
 
‘इझाकाया’बद्दल तुम्ही ऐकलंय का कधी? नेटफ्लिक्सवर ‘मिडनाइट डिनर’ म्हणून एक जपानी मालिका आहे. त्यात एक इझाकाया आहे. ही जागा फक्त रात्री उघडते आणि पहाटे बंद होते. अशा दिवसा चालू असणार्‍या ‘इझाकाया’ तेथे पुष्कळ आहेत. माणसं जरी एकटे तिथे गेली, तरी इतरांबरोबर संवाद साधताना दिसतात. हा त्या संस्कृतीचा एक भाग आहे. कोरियात सगळे जण एकत्र जेवताना दिसतात.
 
 
सांस्कृतिक प्रभाव असणार्‍या एखाद्या देशात काम करताना स्थानिक संस्कृती लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपली संस्कृती आपल्याला ठाऊक असतेच, पण जेव्हा दुसरी संस्कृती, त्यातील बारकावे आपण लक्षात घेतो, तेव्हा दोन दोन संस्कृतींमधील लोकांमध्ये सुसंवाद होतो. क्रॉस कल्चर अभ्यासात उत्तम कम्युनिकेशन अत्यंत उपयोगी मानलं जातं.
 
 
जपानी कार्यशैलीत कामाचा अंतिम परिणाम कसा झालाय, रिझल्ट कसा आलाय यापेक्षा किंवा तितकीच ही ‘प्रोसेस’ महत्त्वाची असते. अंतिम निर्णयापर्यंतचा प्रवास कसा झाला. कोणत्या समस्या आल्या? त्यांचं निराकरण कसं केलं गेलं? कोणता त्रास झाला? त्यातून मार्ग कसा काढला गेला? हे अभ्यासणं अत्यंत महत्त्वाचं असतं. संघ, सांघिकवृत्ती, संघटन, संघाचं महत्त्व याबद्दल तर असंख्य वेळा आपण ऐकलं असेल. जपानकडून हा गुण घेण्यासारखा आहे. एकीचं बळ काय असतं ते जपानी लोकांच्या कार्यपद्धतीकडे पाहून लक्षात येतं. बरोबर काम करणारे स्पर्धक नसतात तर सहकारी असतात, हे तिथे पक्कं रुजलं आहे मनात. असं असतानाही एक औपचारिकता पाळली जाते, ती म्हणजे एकमेकांचे खासगी नंबर विचारले जात नाहीत. लगेच घरी जात नाहीत दुसर्‍यांच्या. बाहेर भेटतात, पण घरापर्यंत येणार नाहीत, जाणार नाहीत.
 
 
वर्षातून एकदा जपानी माणूस संपूर्ण मेडिकल चेक अप करतोच करतो. यात ऐकू येतं का, डोळे तपासतात, रक्तचाचण्या, रक्तदाब, हृदयाशी संबंधित तपासण्या, ईसीजी टेस्ट असं सर्व काही करतात. आरोग्याची काळजी घेणं त्यांना आवडतं.
 
तिथे कुणालाही सहजासहजी नोकरीवरून काढता येत नाही. ते Unfair Dismissal मानलं जातं.
 
आणखी एक संस्कृती ‘ओमियागे’. ओमियागे म्हणजे भेटवस्तू देणं. ऑफिसमधला एखादा सहकारी जर कुठे फिरायला गेला, तर इतर सहकार्‍यांसाठी तो स्मरणभेटी souveniers घेऊन येतो. त्याने त्या आणायलाच हव्या. जर त्याने आणल्या नाहीत, तर तो उद्धटपणा मानला जातो. ही भेटवस्तू देण्यामागे आणखी एक कारण म्हणजे आभार मानायचे सहकार्‍यांचे. फिरायला गेलेली व्यक्ती ऑफिसमध्ये नसतानाही मित्रांनी तिचं काम केलं. ती नसल्यामुळे झालेला खोळंबा गृहीत धरून ती व्यक्ती सर्वांसाठी भेट आणते. थँक्यू म्हणून.
 
 
ऑफिसमधल्या कपड्यात इथे एकसंधता असते. पायात किटन हिल्स घातलेल्या बायका दिसतात. या बायकांच्या चपलांमुळे एक मोहीम झाली होती.  जशी mee to मोहीम होती, तशीच
ku Too. बायकांनी हील्सच्या चपला घालायला नकार दिला. हा विरोध संसदेपर्यंत गेला.
 
 
टोकाची शिस्त, स्वच्छता, गांभीर्य आणि सौंदर्याची जपणूक हे गुण ऑफिसमध्ये काम करताना दिसतात. एक फार फिलॉसॉफिकल छटा आहे जपानी लोकांच्या वागण्यात. तुमच्या मनात जे काही चालू आहे, जे दु:ख आहे, जी व्यथा आहे, ते चेहर्‍यावर न दाखवता त्याचा थेट किंवा आणखी कोणताही प्रभाव तुमच्या कामावर होता कामा नये. हे शाळेपासूनच शिकवतात. नम्रता, शांतता, आदर, सहवेदना, खाजगीपण हे सर्व सांभाळून ऑफिसची कामं होतात.
 
 
जपानचं हे उदाहरण मी थोडक्यात तरी सविस्तरपणे दिलं, कारण त्याशिवाय आपल्याला समजणार नाही. क्रॉस कल्चर कम्युनिकेशन शिकवताना, शिकताना आणि प्रत्यक्ष अंगीकार करताना याकडे कल असतोच. आपली संस्कृती आणि त्यातले बारकावे आणि Do's / Don't काय करायला हवं आणि काय करायला नको - आपल्याला माहीत असतातच. परंतु दुसर्‍या संस्कृतीतील बारकावे आपल्याला समजले, तर आपल्याला जास्त संधी उपलब्ध होतात. त्या संधी रोजगाराच्या असतील, व्यक्ती म्हणून असतील, आपण आणखी प्रगल्भ होतो.
 
 
आपण संवेदनशील बाबी टाळू शकतो. भारतासारख्या खंडप्राय देशात चार कोसांवर भाषेचे उच्चार, हेल बदलतात. फोडण्या बदलतात. भाजी-आमटीचे प्रकार बदलतात. आणि डोक्यावर पदर, खांद्यावरच्या ओढण्या बदलतात, वेगवेगळ्या पद्धतीने घेतल्या जातात. आपल्या देशात राजकारण्यांपासून वेगवेगळ्या राज्यात बदली म्हणून काम करणार्‍यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना या अभ्यासाची सवय असते. त्यासाठी जे निरीक्षण आणि कल्चरल एक्स्पोझर लागतं, ते सहज उपलब्ध असतं. लष्करामधले लोक जे सतत वेगवेगळ्या राज्यात राहतात, त्यांच्या कुटुंबीयांना पाहिलं तर जाणवतं की त्यांच्यात एक सफाईदारपणा असतो. त्या व्यक्तीच्या वैचारिक कक्षा उंचावलेल्या असतात. यात औपचारिक शिक्षण कमी असलं, तरी सांस्कृतिक परीघावर अनेक जणांना भेटल्यामुळे असं होतं. उदाहरणार्थ, मुख्यमंत्र्यांच्या ड्रायव्हरला विचारा, मंत्रालयाच्या लिफ्टमनला विचारा किंवा आयएएस आयएफएस आयपीएस अधिकार्‍यांकडे पाहा. त्यांच्या पदामुळे त्यांना सांस्कृतिक अभ्यास आपसूकच मिळतो. खरं तर हा अभ्यास अधिकृतपणे अभ्यासात शालेय जीवनापासून शिकवला पाहिजे. येथे आपल्या संस्कृतीची ओळख तर होईलच, तसंच इतर चार-पाच संस्कृतींची ओळख होईल. सांस्कृतिक बुद्धिमत्ता ही नवीन बुद्धिमत्ता मॅनेजमेंटमध्ये महत्त्वाची मानली जाते. ती बुद्धिमत्ता क्रॉस कल्चरलजवळ आहे. सध्या एमबीएमध्ये डायव्हर्सिटी, इन्क्लुजन, इक्विटी (Diversity, Inclusion, Equity) याविषयी बोललं जातं.
 
 
मला असं वाटतं की शालेय विद्यार्थ्यांना शाळेपासूनच जर वेगवेगळ्या संस्कृतींची ओळख करून दिली, तर ती मुलं मोठी होताना एका देशासाठी चांगले नागरिक म्हणून सिद्ध होते.
 
बाहेरच्या देशात वावरताना आपण आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करतो. अशा वेळेस आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करताना हा अधिकचा अभ्यास केला, तर देशाचं नाव मोठं होईल.
 
रिओ दि जनेरो.

(लेखिका सांस्कृतिक बुद्धिमत्ता आणि क्रॉस कल्चर कम्युनिकेशन्स विषयाच्या अभ्यासक आहेत.)