मोदींचे कर्तृत्व ही संघाची राष्ट्राला देणगी : डॉ. अशोकराव कुकडे

विवेक मराठी    26-Oct-2021
Total Views |

*साप्ताहिक विवेकच्या 'राष्ट्रजागरण व्याख्यानमाले'चे उद्घाटन*

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यकर्तृत्व ही संघाची या राष्ट्राला मिळालेली देणगी आहे. संघ विचार, संघ संस्कार, संघ व्यवहार, संघ परंपरा, संघटन कौशल्य हे सर्व आत्मसात करून राजकीय शक्तीतून त्याचे योग्य उपयोजन नरेंद्र मोदी करत आहेत, असे मत विवेकानंद रुग्णालय, लातूरचे संस्थापक 'पद्मभूषण' डॉ. अशोकराव कुकडे यांनी व्यक्त केले. साप्ताहिक विवेकच्या 'राष्ट्रजागरण व्याख्यानमाले'च्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते.


RSS_1  H x W: 0
 
नरेंद्र मोदी यांच्या विदेशनीतीचे विविध पैलू उलगडणारा 'लोकनेता ते विश्वनेता' हा ग्रंथ लवकरच प्रसिद्ध होत आहे. यानिमित्ताने 'राष्ट्रजागरण व्याख्यानमाला' या ५ दिवसीय ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याचे पहिले पुष्प डॉ. कुकडे यांनी गुंफले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ लेखक - विचारवंत रमेश पतंगे यांनी केले. आपल्या उद्घाटनपर व्याख्यानात डॉ. कुकडे म्हणाले की, नरेंद्र मोदी हे गेल्या काही वर्षांत भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात कुतूहलाचा, कौतुकाचा, क्वचितप्रसंगी असूयेचा विषय बनले आहेत. मोदींकडे देशाचे नेतृत्व आल्यापासून भारताने जणू कूस बदलली असल्याचा अनुभव आज जग घेत आहे. नरेंद्र मोदी यांची एक संघप्रचारक ते राष्ट्रीय लोकनेता ही वाटचाल आश्चर्यकारक आणि दिङ्मुढ करणारी असल्याचे त्यांनी सांगितले

डॉ. कुकडे पुढे म्हणाले की, आपल्याकडे अनेकांना राजकारणाचा वारसा हा कुटुंबातूनच मिळाला आहे. कुटुंबाच्या आधारावर राजकारणात पुढे आलेली अनेक नावे आज आपल्यापुढे आहेत. यांचे मूळ ऊर्जास्रोत, सामर्थ्य हे त्यांच्या घराण्यात होते व त्यातून त्यांना आपल्या वैयक्तिक राजकीय महत्वाकांक्षांना बळ देता आले. काहींनी स्वकर्तृत्वावर आपले स्थान निर्माण केले. अनेकांनी प्रादेशिक वा विशिष्ट जाती-जमातींच्या भावनांच्या आधारावर आपले राजकीय स्थान बळकट केले. नरेंद्र मोदींना यातील कोणतीही पार्श्वभूमी नव्हती, असे डॉ. कुकडे यांनी नमूद केले. ज्या माणसाने साधी ग्रामपंचायत निवडणूकदेखील लढवली नव्हती, तो माणूस थेट एका राज्याचा मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अखंड परिश्रम, प्रखर मनोबल, निरिच्छ संन्यस्त भावना, उद्दिष्टांवर स्थिर दृष्टी ही नरेंद्र मोदी यांची वैशिष्ट्ये असून ती दिवसेंदिवस अधिकच प्रखर होत गेल्याचे डॉ. कुकडे यांनी सांगितले. मोदी यांचे कार्यकर्तृत्व ही संघाची या राष्ट्राला मिळालेली देणगी असल्याचे मत त्यांनी नोंदवले. संघ विचार, संघ संस्कार, संघ व्यवहार, संघ परंपरा, संघटन कौशल्य हे सर्व आत्मसात करून राजकीय शक्तीतून त्याचे योग्य उपयोजन नरेंद्र मोदी करत असल्याचे ते म्हणाले. भारतीयांचे भावविश्व मोदींच्या प्रत्येक कृतीतून दिसत असल्याचे डॉ. कुकडे यांनी सांगितली. नरेंद्र मोदी यांच्या रूपाने एक संघ प्रचारक - लोकनेता देशाला उज्वल भविष्याकडे नेईल, असा विश्वास यावेळी अशोकराव कुकडे यांनी व्यक्त केला.
 
'मोदी डॉक्ट्रीन'ची सात वर्षे मांडणार डॉ. शैलेंद्र देवळाणकर
राष्ट्रजागरण व्याख्यानमालेचे दुसरे सत्र मंगळवार, दि. २६ रोजी सायंकाळी सात वाजता होणार असून 'विदेशनीतीच्या मोदी डॉक्ट्रीनची सात वर्षे' या विषयावर परराष्ट्र संबंधांचे अभ्यासक डॉ. शैलेंद्र देवळाणकर आपले विचार मांडणार आहेत. डॉ. अशोकराव कुकडे, डॉ. देवळाणकर यांच्या व्याख्यानांसह राष्ट्रजागरण व्याख्यानमालेची पुढील सर्व व्याख्याने साप्ताहिक विवेकच्या फेसबुक पेज व युट्युब चॅनेलवर दर्शकांसाठी उपलब्ध असतील.