असामान्य संघर्षाची कहाणी पद्मश्री डॉ. रवींद्र आणि पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे

विवेक मराठी    04-Oct-2021
Total Views |
सातपुड्याच्या पर्वतरांगेत बैरागड या गावात एक दांपत्य त्यांच्या कार्यातून बहरत आहे. आज हा मेळघाटावरील मोहोर ‘पद्मश्री’ या बिरुदावलीत अधिक बहरतो आहे आणि त्याची व्याप्ती सर्वदूर पसरते आहे. एखाद्या ठिकाणाला आपली कर्मभूमी मानून तिथे रुजायचे म्हणजे काय, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे कोल्हे दांपत्य.

social _1  H x
परतीच्या पावसाचे आगमन झाले आहे. वातावरणात एक प्रकारचे चैतन्य जाणवते आहे, कारण नवरात्राची चाहूल लागली आहे. येणार्‍या काळात शारदीय नवरात्रात आदिशक्तीचा जागर सर्वत्र उत्साहात पार पडेल. पुढे हळूहळू थंडीचे आगमन होईल, पण दूर सातपुड्याच्या पर्वतरांगेत बैरागड या गावात एक दांपत्य त्यांच्या कार्यातून बहरत आहे. आज हा मेळघाटावरील मोहोर ‘पद्मश्री’ या बिरुदावलीत अधिक बहरतो आहे आणि त्याची व्याप्ती सर्वदूर पसरते आहे. खरे तर प्रत्येक आत्मचरित्र कायमच वेगळी प्रेरणा देत असते. ‘मेळघाटावरील मोहोर : डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे’ या मृणालिनी चितळे लिखित पुस्तकात कोल्हे दांपत्याविषयी आणि मेळघाटात त्यांनी उभ्या केलेल्या त्यांच्या कामाची संपूर्ण माहिती, तीही अतिशय वाचनीय स्वरूपात समजते. कोल्हे दांपत्य जे ईश्वरी कार्य करत आहे, त्यांची ओळख या पुस्तकात अधिक होईल. त्यासाठी स्वतंत्रपणे वाचन करणे अधिक योग्य होईल.

मेळघाट - सातपुडा पर्वताच्या डोंगररांगांतील घनदाट अरण्याने व्यापलेला प्रदेश. त्यातले बैरागड म्हणजे तीन नद्यांच्या त्रिकोणात असलेले बेटासारखे गाव. तिथल्या लोकांसाठी आपले आयुष्य वेचणार्‍या डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे यांच्या असामान्य संघर्षाने आज इथे अनपेक्षित बदल बघायला मिळतो आहे. मेळघाटातील बैरागड या गावात कोल्हे दांपत्याला भेटायला जाणेही किती कठीण आहे, हे तिथे गेल्यावरच जाणवते. सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात वसलेले हे गाव जेमतेम दोन-चार हजार वस्तीचे. नागपूर-धारणी, धारणी-बैरागड असा प्रवास. पावसाळ्यात धारणीच्या पुढे रस्ते बंद असतात. 40 कि.मी. अंतर पायी चालत बैरागड गाठावे लागते. या भागाकडे शासनाचे दुर्लक्ष. रस्ते नाहीत, वीज नाही.. मग शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र वगैरे आवश्यक सुविधांविषयी तर बोलायलाच नको. अशा ठिकाणी कोल्हे दांपत्याने केलेले काम समाजासमोर आले.

पद्मश्री डॉ. रवी कोल्हे व पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे या दांपत्याच्या रूपाने इथे 1990च्या सुमारास आशेचा किरण आला व स्थिरावला. मग दवाखाना सुरू झाला. औषधोपचार व अवघड बाळंतपण सुरू झाले. पण आल्यावर मनात हेतू गावाच्या सर्वांगीण विकासाचाही होता. त्यांनी संस्था उभारली नाही, पण प्रबोधनासाठी वेगळ्या वाटा शोधल्या. कधी शिक्षणातून प्रबोधन, कधी उत्सवातून, तर शेतात नावीन्यपूर्ण प्रयोग करत करत आज बैरागड इथवर पोहोचले. अनेक अडचणी पार करत यांची वाटचाल अजूनही सुरू आहेच. इच्छा, दुर्दम्य आकांक्षा यातून आणि स्वत:च्या कार्यातून ते आजही प्रेरणादायक आहेत.

 
मेळघाट म्हटले की ‘कुपोषणाचा प्रश्न’ एवढेच समीकरण आज आपल्याला माहीत आहे. पण मेळघाटातल्या माणसांच्या जगण्याचे इतरही अनेक आयाम समजून घेत, तिथले शक्य तितके प्रश्न शासनदरबारी मार्गी लावण्याची धडपड कोल्हे दांपत्य करीत आहे. एखाद्या ठिकाणाला आपली कर्मभूमी मानून तिथे रुजायचे म्हणजे काय, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे कोल्हे दांपत्य. जिथे आपण राहतो, तिथले लोक, त्यांचे रोजचे जगण्याचे प्रश्न, त्यासंबंधीची आस्था हे सारे आपल्याही जगण्याचा भाग झाले, तर ते रुजणे म्हणजे कोल्हे दांपत्य आहे.

social _2  H x

घरातून कोणताही पाठिंबा आणि आधार नसताना, अशा प्रकारच्या सामाजिक कामांची कोणतीच पूर्वपरंपरा नसताना आणि जन्मापासून हृदयाचा गंभीर आजार असताना केवळ आत्मशक्तीच्या बळावर एखादी व्यक्ती केवढे काम उभारू शकते, याचे उदाहरण म्हणजे डॉ. रवींद्र कोल्हे यांचे हे बैरागडचे कार्य आहे. डॉ. रवींद्र कोल्हे यांनी 1984मध्ये मेळघाटात पहिले पाऊल कसे टाकले आणि ते कसे स्थिरावू लागले, याची स्वत: या दांपत्याने सांगितलेली कथा अचंबित करणारी आहे.

समाजकार्य करीत असताना आपण कौटुंबिक जबाबदार्‍या झटकून टाकतोय या भावनेने निर्माण होणारा ताण, त्यावर मात करणारी, गांधीजींचे विचार प्रत्यक्षात उतरवण्याची ओढ, खरीखुरी रुग्णसेवा करण्याची दुर्दम्य इच्छा, ज्या गावात डॉक्टर नाही अशा ठिकाणी काम करण्याचा झालेला निश्चय आणि त्यातून मेळघाटातील बैरागडची केलेली निवड हा डॉक्टरांचा प्रवास त्यांच्या आशयपूर्ण शब्दांत ऐकणे म्हणजे पर्वणीच असते.


social _3  H x

डॉ. स्मिता कोल्हे यांच्यासारखी सहधर्मचारिणी त्यांना लाभली आणि कार्य आज यशोशिखरावर जाते आहे. त्यांच्या विवाहाची हकीकत विलक्षण आहे. मुलांचे जन्म, साप-विंचू-बेडूक-सरडे यांच्यासोबत असलेले त्यांचे बालपण, त्यांचे आजार, शिक्षण हे सगळे इतर अनेकींप्रमाणे स्मिताताईंनी केलेच; त्याहीव्यतिरिक्त आपले कायद्याचे ज्ञान, वैद्यकीय ज्ञान यांच्या आधारे तिथल्या समाजजीवनाशी त्या समरस होत गेल्या, तिथल्या स्त्रियांच्या प्रश्नात गुंतत गेल्या, अगदी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवून ती जिंकून दाखवण्यापर्यंत स्वतंत्रपणे त्यांचेही काम कसे विस्तारत गेले, याचा प्रत्यय त्यांच्या कार्यातून पदोपदी जाणवतो.

 रुग्णसेवेबरोबरच या पती-पत्नींच्या कामाचे स्वरूप लोकांच्या गरजेनुसार हळूहळू वाढत गेले. कधी शिक्षणातून, कधी उत्सव-सभेमधून, तर कधी कायद्याचा धाक दाखवून झाले. लोकशिक्षणात हे दांपत्य सातत्याने कार्यरत आहे. स्वस्त धान्य दुकान चालवणे, धर्मांतराच्या प्रश्नात लक्ष घालणे, शेतीचे प्रयोग करणे, दूध आणि भाजी विक्री करणे असे नाना उद्योग राबवत आहेत. कुठलीही संस्था न उभारता किती काम करता येते, याचा वस्तुपाठच त्यांच्या जगण्यातून मिळतो. कुठेही भारावून न जाता परिस्थितीची जाणीव आणि त्या जाणिवेतून होत असलेल्या कार्याची दखलच विद्यमान केंद्र सरकारने घेतली आहे.

कोल्हे दांपत्याचे कार्य आजही अविरतपणे सुरूच आहे. त्यांच्याकडून जाणून घेतल्यावर असेच काहीसे सामाजिक काम करावे, असे आपल्यालाही वाटून जाते; पण या प्रवासातून आपण वास्तवात येतो आणि प्रखरपणे जाणवते की कामाप्रतीची अपार निष्ठा, त्याग आणि संपूर्ण समर्पण जेव्हा एकरूप होतात, तेव्हाच निर्माण होते कोल्हे दांपत्याचे मेळघाटातील कार्य आणि कुठेतरी त्या कार्याप्रति नतमस्तक होऊन आपसूकच हात जोडले जातात.

वेगळ्या वाटा चोखाळत चाकोरीबाहेर जाऊन समाजात प्रतिष्ठा प्राप्त केलेल्या व्यक्तींची स्पंदने कशी असतील, तर त्यात अग्रक्रमाने नाव घेता येईल असे पद्मश्री डॉ. रवी कोल्हे व पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे हे दांपत्य आहे. आज पद्मश्रीचे वलय असताना डॉ. रवी कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे हे वेगळ्या वाटेवरील पथिक असेच म्हणता येईल आणि असे काही बघितले की खरेच एक भारत श्रेष्ठ भारत हा नक्कीच वैविध्यपूर्ण असाच आहे, हे सहज वाटून जाते.