पाकिस्तानच्या निर्मात्यांचे पुढे काय झाले?

विवेक मराठी    04-Oct-2021
Total Views |
पाकिस्तानच्या निर्मितीला हातभार लावणार्‍यांचे पुढे काय झाले? हे पाहिले, म्हणजे भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या चारित्र्यातला फरक स्पष्ट होईल. हा फरक का आहे, त्यामागे काय कारणे आहेत, ह्याची चर्चा अधिक महत्त्वाची आहे. त्यात अनेक गंभीर व सखोल मुद्दे दडलेले आहेत. त्यांची चर्चा करण्यापूर्वी, पाकिस्तानच्या जन्मानंतर, पाकिस्तानच्या निर्मितीसाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांची अवस्था काय झाली, हे पाहू.

Pakistan_8  H x

गेल्या 15 ऑगस्ट रोजी आपण आपल्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाला प्रारंभ केला. त्या निमित्ताने येते वर्षभर अनेक कार्यक्रम होतील. या ठिकाणी मी एक वेगळा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण ह्याच वेळेला, किंबहुना आपल्या अगोदर एक दिवस पाकिस्तान जन्माला आला होता. आपल्याप्रमाणेच त्यांच्याही निर्मितीस पंचाहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत. ह्या पंचाहत्तर वर्षांमध्ये त्यांचे काय झाले, हेही आपण पाहिले पाहिजे, कारण त्यात फाळणीमागील तर्कशास्त्राचा फोलपणा दडलेला आहे. ह्या निमित्ताने त्या मुद्द्यांचीही चर्चा घडवली पाहिजे. कारण ‘भारतात हिंदू आणि मुस्लीम अशी दोन वेगळी राष्ट्रे आहेत’ असा दावा करून, ‘हिंदू भारतात मुसलमान सुरक्षित राहू शकत नाहीत, म्हणून त्यांच्यासाठी स्वतंत्र राष्ट्र निर्माण केले पाहिजे’ असे तर्कशास्त्र मांडून भारताची फाळणी केली गेली. ते इंग्रजांचे कुटिल कारस्थान होते. त्यांना भारत हा देश म्हणून नष्ट करायचा होता, त्यासाठी त्यांनी शक्य त्या सर्व प्रकारे ह्या देशात फुटीची बीजे पेरली. त्यांच्या ह्या कारस्थानी राजकारणाचे दुष्परिणाम आपण अजून भोगतो आहोत. पाकिस्तानचा एक अखंड धोका आपल्या डोक्यावर निर्माण करून ठेवून त्यांनी 1947 साली भारत सोडला, ही पार्श्वभूमी लक्षात ठेवून पाकिस्तानकडे आपण पाहिले पाहिजे.

आपल्या राष्ट्रनिर्मितीला ज्यांनी ज्यांनी हातभार लावला, त्यांच्याबद्दल आपण कायम कृतज्ञ राहिलो. त्यांचे ऋण मान्य करण्याचा प्रयत्न आपण नेहमीच करतो. पण पाकिस्तानात ह्याच बाबतीत काय झाले? हे पाहिले, म्हणजे दोन देशांच्या चारित्र्यातला फरक स्पष्ट होईल. हा फरक का आहे, त्यामागे काय कारणे आहेत, ह्याची चर्चा अधिक महत्त्वाची आहे. त्यात अनेक गंभीर व सखोल मुद्दे दडलेले आहेत. त्यांची चर्चा करण्यापूर्वी, पाकिस्तानच्या जन्मानंतर, पाकिस्तानच्या निर्मितीसाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांची अवस्था काय झाली, हे पाहू.


Pakistan_4  H x
बॅ. मोहम्मद अली जीना - एक शोकांतिका
 
 
बॅ. मोहम्मद अली जीना हे पाकिस्तानचे शिल्पकार मानले जातात. त्यांनी मुस्लीम लीगचे नेतृत्व हाती घेतल्यानंतर आक्रमक राजकारण करून देशाला फाळणीच्या दिशेने नेले. पाकिस्तान झाल्यानंतर ते त्या देशाचे गव्हर्नर जनरलही झाले. पण त्यानंतर ते जेमतेम एक वर्ष जगले. 14 ऑगस्ट 1947 रोजी सत्तारूढ झाल्यानंतर 11 सप्टेंबर 1948 रोजी त्यांचे निधन झाले. ह्या एका वर्षातच पाकिस्तानची निर्मिती केल्याबद्दल त्यांना पश्चात्ताप व्हायला लागला होता, असे सांगितले जाते. त्यांची एकुलती एक मुलगी त्यांच्याबरोबर पाकिस्तानात गेली नाही, ती भारतातच राहिली. जीनांनासुद्धा शेवटचा श्वास घ्यायला भारतात जावे, असे वाटत होते. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच त्यांची तब्येत खालावलेली होती. ते एक-दोन वर्षांपेक्षा अधिक काळ जगणार नाहीत, असे अहवाल ब्रिटिश गुप्तचर खात्यांनी 1945-46मध्येच दिले होते. पण माउंटबॅटनने म. गांधी-नेहरूंपर्यंत ही माहिती पोहोचू दिली नव्हती. कारण ती माहिती मिळाली, तर म. गांधी फाळणीला नकार देतील अशी इंग्रजांना भीती वाटत होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जीनांची तब्येत खालावतच गेली. पण त्यातच त्यांच्यावर विषप्रयोग झाला असण्याची शक्यता तेव्हापासून वर्तवली जात आहे. कारण ‘नव्या पाकिस्तान’साठी जीना गैरसोयीचे होते. ते ‘राजकीय मुसलमान’ होते, कट्टर ‘धार्मिक मुसलमान’ नव्हते. त्यांना ‘आधुनिक व सेक्युलर पाकिस्तान’ घडवायचा होता. त्यातच ते सिंधी होते, त्यामुळे अल्पसंख्य होते. पाकिस्तानवर दोन घटकांचा पगडा होता - पंजाबी आणि बंगाली! ह्या दोघांमध्ये प्रभुत्वाचाही संघर्ष होता. त्या सर्व चित्रात जीना ‘उपरे’ आणि ‘अडचणी’चे होते. ही वस्तुस्थिती स्वत: जीनांच्याही लक्षात आली होती आणि म्हणूनच ते कमालीचे वैफल्यग्रस्त होते. त्यांचा लवकर मृत्यू झाला नसता, तर त्यांची हत्या झाली असती, ह्यात कोणाच्याही मनात शंका नव्हती. आजच्या पाकिस्तानात ‘कायदे आझम जीना’ काही स्मारकांचे धनी आहेत, ह्यापलीकडे कोणालाही त्यांची आठवण नाही.


Pakistan_6  H x
 
भारतद्वेष्टा चौधरी रहमत अली
 
 
चौधरी रहमत अली हा पाकिस्तानच्या कल्पनेचा जनक मानला जातो. 16 नोव्हेंबर 1897 रोजी तेव्हाच्या पंजाबमध्ये एका गुर्जर कुटुंबात जन्माला आलेला रहमत अली शिक्षणासाठी सन 1930च्या सुमाराला इंग्लंडला केंब्रिजमध्ये गेला होता. तेथे त्याचे कोणाकोणाशी संबंध आले होते हे गुलदस्त्यातच आहे. पण काही इंग्रज अधिकारी त्याच्या कायम संपर्कात असत, असे सांगितले जाते. त्याने 1933 साली ‘छेु ेी छर्शींशी’ नावाचे एक पत्रक प्रसिद्ध केले. हे पत्रक म्हणजे ‘पाकिस्तानच्या निर्मितीचा जाहीरनामा’ मानला जातो. त्या पत्रकात रहमत अलीने पहिल्यांदा ‘पाकिस्तान’ हा शब्द वापरला व त्याच्या भौगोलिक कक्षा स्पष्ट केल्या. भारताचे अनेक तुकडे करून ‘भारत - खपवळर’ ही अक्षरेच जगाच्या नकाशावरून पुसून टाकण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले होते. त्याला, पंजाब (आजचा हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थानचा काही भाग यासह), जम्मू-काश्मीर, बलुचिस्तान, अफगाणिस्तान ह्यासह पाकिस्तान घडवायचा होता. पूर्ण बंगाल (प. बंगाल व बांगला देश), आसामसह पूर्ण ईशान्य भारत, ओरिसा आणि बिहार-झारखंडचा काही भाग जोडून ‘स्वतंत्र बंगिस्तान’ बनवायचा होता. शिवाय हैदराबाद केंद्रस्थानी ठेवून ‘उस्मानिस्तान’ बनवायचे होते. पृथ्वीवरील ह्या भागाला खपवळर न म्हणता ऊळपळर म्हणावे असा त्याचा आग्रह होता, इतका तो भारतद्वेष्टा होता.
ह्या रहमत अलीने भारताच्या फाळणीसाठी इंग्लंडमध्ये भरपूर प्रचार केला. त्याला काही ब्रिटिश अधिकार्‍यांचा पाठिंबा आणि मदत होती. मात्र त्याला मजबूत मदत करणारे हे लोक नेमके कोण होते, हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच राहिलेले आहे. रहमत अलीच्या कल्पनांना भारतात सुरुवातीला तरी फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. मुस्लीम लीगला फाळणीपेक्षा सत्तेत समान वाटा मिळवण्यात रस होता. पण 1940नंतर परिस्थिती बदलली. मुस्लीम लीगने रहमत अलीची कल्पना पूर्ण जरी नाही, तरी बर्‍याच प्रमाणात स्वीकारली आणि धर्माच्या आधारावर द्विराष्ट्रवादाचा सिद्धान्त मांडायला सुरुवात केली. पुढचा सगळा इतिहास मी येथे उगाळत बसत नाही. फाळणी घडवून आणण्यासाठी मुस्लीम लीगने संपूर्ण देशात दंगलींचा आगडोंब उसळवून दिला. ह्या दंगलींचा भडका पंजाबमध्ये आणि बंगालमध्ये जास्त होता. प्रचंड हिंसाचार करून लाखो लोकांचे बळी घेऊन 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तान जन्माला आला. पण रहमत अली ह्या पाकिस्तानवर नाराज होता. कारण त्याची कोणतीच कल्पना पूर्ण झाली नव्हती. मुस्लीम लीगने मुसलमान समुदायाचा विश्वासघात केला, असे त्याचे म्हणणे होते. पाकिस्तानच्या जन्मानंतर एप्रिल 1948मध्ये रहमत अली इंग्लंडमधून पाकिस्तानात आला. पाकिस्तानातच राहायच्या इराद्याने तो आला होता. पण आल्या आल्या त्याचे सर्व सामान पाक सरकारने जप्त केले, त्याला पाकिस्तानमध्ये वावरायला बंदी घातली आणि काही काळाने त्याला अक्षरश: अंगावरच्या कपड्यांनिशी, रिकाम्या हाताने देशाबाहेर हाकलून दिले. अखेर ऑक्टोबर 1948मध्ये अत्यंत वैफल्यग्रस्त मन:स्थितीत तो इंग्लंडला परतला. मात्र आता तो इंग्लंडमध्येही पूर्ण निराधार होता. कोणीही मुस्लीम मित्र त्याच्यासोबत नव्हते. ज्या इंग्रज व्यक्ती त्याला भारताच्या फाळणीसाठी प्रचार करताना मदत करत होत्या, त्यांनीही त्याच्याकडे पाठ फिरवली.
3 फेब्रुवारी 1951 रोजी केंब्रिजमध्ये बेवारस अवस्थेत त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अंत्यविधीचा खर्चही त्याच्या जुन्या कॉलेजच्या प्राचार्यांना करावा लागला. ‘पाकिस्तान’ हा शब्द व संकल्पना जन्माला घालणार्‍या चौधरी रहमत अलीला वास्तवात उतरलेल्या पाकिस्तानात मात्र पाऊल ठेवायला अथवा त्याचा मृतदेह दफनायलाही जागा मिळाली नाही.



Pakistan_3  H x
बंगाली राष्ट्रवादाचा पुरस्कर्ता
हुसेन शहीद (एच.एस.) सुर्‍हावर्दी
हा बंगालच्या मुस्लीम लीगचा प्रमुख होता. बंगालमधील एका गडगंज जमीनदार घराण्यात त्याचा जन्म झाला होता. त्याचे वडील सर झहीद सुर्‍हावर्दी कलकत्ता न्यायालयात न्यायाधीश होते. स्वत: एच.एस. सुर्‍हावर्दीदेखील ऑक्स्फर्ड विद्यापीठाचा पदवीधर वकील होता. राजकारणात तो प्रथम स्वराज पार्टीमध्ये व नंतर मुस्लीम लीगमध्ये कार्यरत होता. प्रचंड जमीन, पैसा आणि त्याच्या आधारावर बाळगलेली गुंडांची फौज हे त्याच्या राजकारणाचे आधार होते. स्वतंत्र बंगिस्तान हे त्याचे ध्येय होते. त्यासाठी मुस्लीम लीगच्या नावावर त्याने बंगालमध्ये भीषण दंगली घडवून आणल्या. 1946 साली तो बंगालचा मुख्यमंत्री झाला. त्या सत्तेचा वापर करून त्याने दंगलींचे राजकारण अधिक भडकावले. बंगाली मुसलमान पोलीस अत्याचार करण्यात कमी पडत आहेत असे वाटले, म्हणून त्याने पंजाबमधून मुसलमान पोलिसांच्या तुकड्या आणल्या व आपल्याला हवी असलेली कारवाई करून घेतली. त्याच्या ह्या राजकारणात लाखो हिंदू कुटुंबे देशोधडीला लागली. पण फाळणी झाल्यानंतर तो लगेच पाकिस्तानात गेला नाही. 1950नंतर तो तिकडे गेला. तेथील राजकारणात त्याला सुरुवातीला फारसे स्थान मिळाले नाही. बंगाली आणि पंजाबी हा वाद तोपर्यंत पाकिस्तानच्या राजकारणाचा अविभाज्य भाग बनला होता. बंगाली राष्ट्रवादाचा पुरस्कर्ता असलेला सुर्‍हावर्दी पंजाब्यांना मानवणारा नव्हता. पण अनेक लटपटी खटपटी करून सुर्‍हावर्दी 1956 साली पाकिस्तानातील आघाडी सरकारचा पंतप्रधान बनला. मात्र हे पद त्याला फार काळ लाभले नाही. 1958 साली झालेल्या लष्करी उठावात लष्कराने त्याला अटक केली. नंतर तो बैरुटला परागंदा आयुष्य जगत राहिला. तेथेच त्याचा मृत्यू झाला. हा मृत्यूसुद्धा संशयास्पद होता. आज सुर्‍हावर्दी हे नाव पाकिस्तानमध्ये तर कोणी घेतच नाही, तसेच बांगला देशातही घेत नाहीत.
 
Pakistan_1  H x
 
पाकचा पहिला पंतप्रधान

लियाकत अली खान
पाकिस्तानचा पहिला पंतप्रधान बनलेला लियाकत अली खान हा मूळचा आजच्या उत्तर प्रदेशातील जमीनदार घराण्यात जन्मलेला होता. त्याने अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीत शिक्षण घेतले. त्याला काँग्रेसने आपल्याकडे यायला आमंत्रण दिले होते. पण ते नाकारून तो मुस्लीम लीगमध्ये गेला आणि त्याने बॅ. मोहम्मद अली जीनाबरोबर चांगलीच जवळीक साधली. जीनांनी जेव्हा ‘अंतिम लढ्याची हाक’ दिली आणि धार्मिक हिंसाचाराचा आगडोंब उसळवून दिला, तेव्हा लियाकत अली खानने त्यात महत्त्वाची भूमिका निभावली. फाळणीसाठी घडवून आणलेल्या हिंसाचाराचा तो एक प्रमुख सूत्रधार होता. त्याचे बक्षीसही त्याला मिळाले. पाकिस्तान झाल्यावर त्या देशाचा पहिला पंतप्रधान म्हणून त्याची नियुक्ती झाली. पूर्व पाकिस्तानातील हिंदू निर्वासितांच्या हिताचा बळी देणारा ‘नेहरू-लियाकत अली करार’ पं. नेहरूंनी याच लियाकत अलीबरोबर केला होता. जीनांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानात काही काळ त्याचा प्रभाव वाढला होता. पण 1951 साली रावळपिंडी येथे एका जाहीर सभेत त्याचा खून झाला. आज लियाकत अली खान विस्मरणात गेला आहे.


Pakistan_7  H x
उपेक्षित जोगेंद्रनाथ मंडल
पूर्वीच्या बंगालमध्ये जन्मलेले जोगेंद्रनाथ मंडल हे त्या काळातील नामशूद्र समुदायाचे नेते होते. 1937 साली ते पहिल्यांदा बंगाल विधानसभेवर निवडून गेले व मुस्लीम लीगबरोबर हातमिळवणी करून मंत्री बनले. भारताच्या फाळणीला त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला. मुस्लीम लीगबरोबर पाकिस्तानात जाऊन आपल्याला अधिक राजकीय लाभ मिळेल, अशी त्यांना आशा होती. त्यासाठी त्यांनी आपल्या समाजालाही पाकिस्तानातच राहायचा आग्रह केला. पण त्याच्या ह्या सगळ्या अपेक्षा खोट्या ठरल्या. मागे राहिलेल्या हिंदूंवर, जे बहुतेक नामशूद्र-दलित होते, त्यांच्यावर पाकिस्तानात प्रचंड अत्याचार झाले. आजही त्यांना तेथे किमान मानवी व नागरी अधिकार उपलब्ध नाहीत. त्यांना पाकिस्तान सोडता येत नाही, धर्मांतर करून मुसलमान होता येत नाही. कारण सफाई काम करायला माणसे पाहिजेत, मुसलमान माणूस सफाई काम करत नाही, ह्या कारणासाठी त्यांची अमानुष गळचेपी आजच्या पाकिस्तानातही सुरू आहे. जी आशा दाखवून जोगेंद्रनाथ मंडलनी त्यांना पाकिस्तानात राहायला भाग पाडले, तो त्यांच्यासाठी आजही शाप ठरलेला आहे. स्वत: मंडल ह्यांचीही शोकांतिका झाली.
पाकिस्तानच्या पहिल्या मंत्रीमंडळात त्यांना कायदा मंत्री म्हणून स्थान मिळाले खरे, पण त्याला काही अर्थ नव्हता. त्यांच्या नजरेसमोर त्यांच्या समाजाची कत्तल होत होती, स्त्रियांवर अत्याचार होत होते, पण ते बघत रहाण्याखेरीज काही करू शकले नाहीत. त्यांनी हस्तक्षेप करायचा प्रयत्न केल्यानंतर पाकिस्तानी पोलिसांनी त्यांच्यावरच - देशाच्या कायदा मंत्र्यावर अटक हुकूम बजावला. ही वेळ आलेली पाहून जोगेंद्रनाथ मंडल ह्यांनी पाकिस्तानातून पळ काढून भारताचा आश्रय घेतला व भारतात येऊन ‘पाकिस्तानात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांचा निषेध करण्यासाठी’ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा पाठवून दिला. भारतातही त्यांना अखेरपर्यंत ‘निर्वासित’ म्हणूनच राहावे लागले व अत्यंत उपेक्षित अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला.
पाकिस्तानच्या निर्मितीशी संबंधित बहुतेक सगळ्या व्यक्तिमत्त्वांची थोड्याफार फरकाने हीच कहाणी होती.
अर्थात भारतात होऊन गेलेल्या मुस्लीम राज्यकर्त्यांचा इतिहास ह्यापेक्षा वेगळा नाही. ज्या मोगलांकडून इंग्रजांनी भारताचा ताबा घेतला, त्यांचा पूर्ण इतिहास हाच आहे. बाबराचा मुलगा हुमायूनपासून सुरू झालेली ही परंपरा शेवटपर्यंत चालू होती. हुमायूनने खजिना ताब्यात मिळावा ह्यासाठी बापाविरुद्ध बंड पुकारले होते, त्याचा मुलगा अकबर ह्याच्याविरुद्ध अकबराच्या मुलानेच बंड पुकारून त्याचा अत्यंत विश्वासू अबुल फजल ह्याची हत्या केली होती. ह्या सगळ्यावर औरंगजेबाने कळस चढवला होता. त्याने स्वत:च्या बापाला कैदेत टाकून सत्ता ताब्यात घेतली, स्वत:च्या सख्ख्या भावांचीच नाही, तर आपल्या मुला-मुलींचीसुद्धा कत्तल केली होती. भारतात होऊन गेलेल्या इतर मुस्लीम राज्यकर्त्यांचा इतिहासही ह्यापेक्षा वेगळा नाही. 14 ऑगस्ट 1947 रोजी जन्माला आलेला पाकिस्तान ती परंपरा घेऊन जन्माला आला.
पाकिस्तानचा जन्मच धार्मिक हिंसाचारातून झाला. हिंदू, शीख व अन्य समाजाची लाखो कुटुंबे उद्ध्वस्त करून, त्यांची मालमत्ता लुटून, त्यांना देशोधडीला लावून, स्त्रियांवर अकल्पनीय अत्याचार करून हा देश निर्माण झाला. पंचाहत्तर वर्षे झाली, तरी त्यात काही बदल झालेला नाही, उलट त्या देशाचीच पुन्हा फाळणी झाली. आजही तो देश विघटनाच्या उंबरठ्यावर उभा आहे. सिंध, बलुचिस्तान ह्यांना वेगळे व्हायचे आहे. अखंड हिंसाचार हा त्यांचा स्थायिभाव आहे. आता त्या देशात अल्पसंख्य हिंदू, शीख, ख्रिश्चन उरले नाहीत, तर मुस्लिमांमधील अहमदिया, शिया समूह हिंसेचे लक्ष्य ठरले आहेत. ‘हिंदू भारतात मुस्लीम समाज सुरक्षित राहू शकणार नाही, म्हणून भारताची फाळणी करून अस्तित्वात आलेल्या देशातच’ मुसलमान समाज सर्वाधिक असुरक्षित आहे. त्या देशाचे आर्थिक दिवाळे तर एवढे निघाले आहे की पंतप्रधान निवासस्थानसुद्धा भाड्याने देण्याची वेळ आली आहे. ह्या सर्वाचा अर्थ हाच आहे की, केवळ धर्माच्या आधारावर अथवा द्वेषभावनेवर राष्ट्र किंवा देश उभा राहत नाही. त्यासाठी एक संस्कृती असावी लागते, परंपरेचा, इतिहासाचा आधार असावा लागतो. आपण एका प्राचीन संस्कृतीचा, इतिहासाचा, परंपरेचा आधार घेऊन उभे आहोत, म्हणून अनंत अडचणींना तोंड देऊन प्रगती करत आहोत.
 
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना हा विरोधाभास लक्षात ठेवला पाहिजे.