देशार्थ धर्मार्थ काया झिजावी.. कै.मधुकरराव महाजन

विवेक मराठी    09-Nov-2021
Total Views |
@डॉ. गीता सुरेश काटे
कै. मधुकरराव महाजन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पहिल्या पिढीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, जनसंघाचे संस्थापक सदस्य. 2021 हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष. या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला धांडोळा.

RSS_1  H x W: 0
 
2021 हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिल्या पिढीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि जनसंघाचे तडफदार नेते कै. मधुकरराव महाजन यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांच्या छायाचित्रातील त्यांच्या चेहर्‍यावरील भाव पाहिले की भौतिकदृष्ट्या त्यांचे वय कितीही वाढले, तरी त्यांच्या देखणेपणात कधीही उणेपणा येऊ शकेल असे वाटत नाही. कै. मधुकरराव महाजन यांच्या पत्नी आणि राष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ अधिकारी श्रीमती सुशीलाताई महाजन यांच्या ‘डाव मांडियेला’ या आत्मचरित्राच्या प्रकाशन प्रसंगी प्रेक्षकात बसलेल्या एका व्यक्तीने श्री. सुरेश काटे यांना “तुम्ही कुठून आलात?” असे विचारले. ते हैदराबादहून पुस्तक प्रकाशनासाठी आले आहेत असे कळल्यावर त्यांनी “तुम्ही मधुकरराव यांना पाहिले होते का?” असे विचारले. काटे नाही म्हणाले. ते गृहस्थ म्हणाले, “पेशवे परिवारात शोभावे असे मधुकरराव देखणे, गोरेपान आणि तडफदार होते.” अगदी मोजक्या पण अचूक शब्दात त्यांनी मधुकरराव यांचे व्यक्तिमत्त्व साकार केले. मी त्यांना पाहिले होते, त्या गृहस्थांचे ते वर्णन मधुकरराव यांच्या व्यक्तिमत्त्वास तंतोतंत साजेसे होते.

 
मधुकरराव महाजन यांचा जन्म 1921चा. लहानपणीच त्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जे नाते जोडले गेले, ते अगदी जीवनभर. संघाचा कार्यकर्ता म्हणजे खरोखरच निष्काम कर्मयोगी. वयाच्या 16-17व्या वर्षी ज्या उत्साहाने त्यांनी संघाच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले होते, तो सर्व समर्पणाचा भाव अंतिम श्वासापर्यंत होता.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1936मध्ये झाली. मधुकरराव यांचे वडील कै. पुरुषोत्तम राम महाजन यांच्या परिवारातील 10 ते 18 वयातील सर्वच मुले संघाच्या शाखेत जात असत. त्यांच्या घरात मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जाई. मधुकरराव महाजन लहानपणापासूनच सूर्यनमस्कार आणि पुढे योगासने करत. कल्याणच्या ‘नमस्कार मंडळात’ सूर्यनमस्कार स्पर्धेत मधुकररावांचा नेहमी पहिला क्रमांक असे.

मधुकररावांचे शालेय शिक्षण कल्याण येथे आणि कॉलेजचे पदवी शिक्षण पुणे येथे एस.पी. कॉलेजमध्ये झाले. 1945मध्ये ते संघाचे पूर्णवेळ प्रचारक होते. त्यांनी एम.ए. पदवी प्राप्त केली ती संघकार्य करताकरताच.

गांधीहत्येनंतर संघावर बंदी आली, त्या काळात त्यांनी भूमिगत राहून काम केले व पुढे 1951पर्यंत पूर्णवेळ प्रचारक म्हणून कार्य केले. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्याशी मधुकरराव यांची 50-60 वेळा भेट झाली होती. सतत संपर्कात असल्यामुळे पुढे त्यांनी डॉ. हेडगेवार यांच्या जन्मशताब्दीच्या वेळी ‘केशवाय नम:’ हे पुस्तक लिहिले. त्यात डॉ. हेडगेवार यांच्या चरित्राबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना, घ्येयधोरणे, जडणघडण, कार्यपद्धती यांचे दर्शन घडते.

मधुकरराव स्वभावत: गंभीर प्रवृत्तीचे होते, तसेच अभ्यासू आणि रसिकही होते. त्यामुळे विविध क्षेत्रांतील सर्व वयाच्या लोकांशी त्यांचे आदरयुक्त आणि आपुलकीचे संबंध होते. 1950 ते 1951 या काळात नागपूरच्या संघ शिक्षा वर्गावर ते प्रमुख शिक्षक होते. या वर्गात कबड्डी खेळताना एका मुलाला जोराचा मार लागला होता. पुढे जवळजवळ तीस वर्षांनंतर तो मुलगा (श्री. भालचंद्र याज्ञिक) त्यांना हैदराबाद येथे भेटला. मधुकररावांनी तीस वर्षानंतरही त्याला नावाने ओळखले आणि कबड्डीच्या प्रसंगाची आठवण दिली. हे एक त्यांच्या जनसंपर्काचे आणि आपुलकीचे छोटेसे उदाहरण आहे.


RSS_1  H x W: 0
मधुकरराव जनसंघाच्या स्थापनेपासून जनसंघाचे कार्य करायला लागले. 1951पासून पुढे एक तप त्यांनी राजकारणात काढले. ते मुंबई इलाख्याचे संघटन मंत्री होते, तेव्हा त्यांनी तीन आंदोलने जवळून बघितली होती. जनसंघाने काश्मीर संपूर्णपणे भारतात विलीन करण्यासाठी सत्याग्रह केला. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह मधुकररावही होते. त्यांनाही अटक झाली. तुरुंगातील त्रासाने श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा तुरुंगातच मृत्यू झाला. नंतर मधुकररावांची सुटका झाली, पण त्यांच्या मनात श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या तुरुंगातील मृत्यूचे शल्य कायम राहिले. त्यांना त्यामुळे स्वत:च्या सुटकेचा आनंदही नगण्य वाटला.

गोवा मुक्तिसंग्रामात मधुकररावांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. ते या आंदोलनाचे सहकार्यवाह होते. या दोन आंदोलनांमुळे जनसंघाचे नाव महाराष्ट्रात सर्वदूर पसरले. जनसंघाच्या आरंभीच्या काळात मधुकररावांनी विदर्भात आणि मराठवाड्यात जोमाने बैठका घेतल्या. पक्षाची सभा-संमेलने भरवली. दादरा-नगरहवेली मुक्तिसंग्रामात मधुकररावांची कामगिरी लक्षणीय होती. ते पूज्य गोळवलकर गुरुजींच्या संपर्कात होते व स्वयंसेवकांची नोंद करणे, मुंबईतून त्यांना पुढे पाठवणे, चढाईची चक्रव्यूह रचना करणे यांची व्यवस्था त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतूनच केली गेली होती. पुढे या लढ्यातील श्री. सुधीर फडके यांनी महाजन पुरस्काराच्या कार्यक्रमात मधुकररावांच्या योजनाबद्ध नियोजनाचे व कामाचे वर्णन केले होते.

मध्यंतरीच्या काळात - म्हणजे 1952 साली मधुकररावांचा सुशीलाताई साठे यांच्याशी विवाह झाला. भुलेश्वरला बिर्‍हाड थाटले. त्याही राष्ट्र सेविका समितीच्या सेविका होत्या. पुढे त्यांनी विविध ज्येष्ठ पदे सांभाळली. आज वयाच्या 94व्या वर्षीही त्या समितीच्या कामात सतत कार्यरत आहेत. विवाहानंतर मधुकरराव काही काळ स्वत:चे बिर्‍हाड थाटेपर्यंत संघकार्यालयात सुशीलाताई व त्यांची लहानगी कन्या चि. विद्या यांच्यासह राहत असत. आपल्या या लहानशा परिवाराचा महिन्याचा खर्च भागून उरलेले पैसे ते कार्यालयात परत देत असत.

नगरहवेली जिंकल्यानंतर तेथील सरकारी खजिना स्वातंत्र्यसैनिकांच्या हाती लागला. तो मुंबईचे प्रमुख मधुकरराव यांच्यासह मोरारजी देसाई यांच्या हाती सुपुर्द केला. संघाच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका न घेण्याची आणि नि:स्वार्थी सेवेची ही परंपरा आजही अबाधित आहे.


RSS_2  H x W: 0
 
गोवा मुक्ती आंदोलनात महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष या आंदोलनापुरते सर्व भेद विसरून एकत्र आले होते. त्यांच्यातील परस्पर भेद, गैरसमज मधुकररावांनी खूप जवळून पाहिला आणि त्याचा अनुभव घेतला होता. याचा फायदा असा झाला की अन्य पक्षीयांच्या मनात संघाबद्दल जे गैरसमज होते, त्याचे निराकरण त्यानंतरच्या काळात करता आले. संघाचे लोक पक्के हिंसाचारी आणि मुस्लीमद्वेष्टे असतातच, असा गैरसमज अन्य पक्षांच्या मनात होता व ते तसे बोलून दाखवत. आपल्या भाषणातून, लेखनातून मधुकररावांनी हे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला.

गोवा मुक्ती आंदोलनात ‘गोवा विमोचन समिती’च्या मुंबई कमिटीत मधुकरराव होते. भारतातून सत्याग्रही तुकड्या गोवा हद्दीत पाठवायचे ठरले. एका तुकडीचे नेतृत्व मधुकररावांकडे होते. या नि:शस्त्र सत्याग्रहींनी सशस्त्र शत्रूपुढे जायचे म्हणजे मृत्यूला आमंत्रण, अशी शंका त्यांच्या आईच्या मनात आली आणि त्यांनी मधुकररावांना तसे विचारले, तेव्हा मधुकरराव म्हणाले, “मरण यायचे असेल तर घरीही येऊ शकते. मग मरणाला भिऊन चालेल का?” गोवा मुक्ती आंदोलनात सत्याग्रहींची व्यवस्था पुण्यात केली गेली होती. गोळीबारात जखमी झालेल्या सत्याग्रहींचे आणि शहीद झालेल्या सत्याग्रहींचे मृतदेह पुण्यात पाठवत असत. या धावपळीत मुंबई-पुणे अशा महाजनांच्या सतत फेर्‍या चालल्या होत्या. ‘महाजन म्हाळगी करे पुकार। गोवा छोडो सालाझार’ अशी जनसंघाच्या सत्याग्रहींची घोषणा होती. या घोषणा देत सत्याग्रही गोव्यात घुसत होते. मधुकरराव या लढ्याच्या संबंधातील सर्व बातम्या वृत्तपत्रांना तातडीने देत. सर्व वृत्तपत्रांत त्यांचे नाव झळकत होते. ते मुंबईच्या लोकांना जेवढे माहीत होते, तेवढेच पोर्तुगीज पोलिसांनाही माहीत झाले होते. या धामधुमीत मधुकरराव गोव्यात गेले तर त्यांना अटक होणार हे निश्चित होते, म्हणून त्यांनी तेथे जाऊ नये असे गोळीबारात जखमी झालेले सत्याग्रही श्री. माधव काणे यांनी त्यांना सांगितले. महाजनांना गोव्याला पाठवू नका अशी पूज्य गुरुजींनाही अनेकांनी पत्र पाठवली. पुढे जगन्नाथराव जोशी यांनी मधुकररावांच्या तुकडीचे नेतृत्व केले. गोवा भारतात विलीन झाले. संघस्वयंसेवकांनी देशासाठी काय केले? ते देशभक्त नाहीतच अशी विधाने करणार्‍यांनी दादरा-नगरहवेली, काश्मीरचे सत्याग्रह, गोवा मुक्ती आंदोलन या आंदोलनांचा ‘खरा ’इतिहास वाचावा, म्हणजे त्यांना त्यांच्या बेजबाबदार विधानातील फोलपणा समजेल. संघकार्यासाठी आणि वर उल्लेखित आंदोलनासाठी मधुकररावांचा सातत्याने प्रवास चालला होता. या कामांकरता सतत बैठका घेणे चालले होते. पक्षाचा व्याप वाढला होता. आता जनसंघाला मोठ्या कार्यालयाची आवश्यकता तीव्रतेने भासत होती. तोपर्यंत जनसंघाचे कार्यालय हे एखाद्या कार्यकर्त्याच्या घरीच चाले. तेच त्यांचे कार्यालय असे. पक्षाचा व्याप वाढल्यानंतर जनसंघाच्या कार्यालयासाठी एक मध्यवर्ती जागा घेणे आवश्यक होते. जागेचा शोध सुरू झाला आणि मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण म्हणून दादर परिसरातील मधुकरराव व त्यांचे जनसंघातील सहकारी श्री. शामराव अरगडे यांनी कथक भवनची जागा निवडली. जागा घेण्यासाठी मधुकररावांनी निधीसंकलनाची जबाबदारी घेतली आणि अपेक्षेपेक्षा अधिक निधी गोळा झाला. मधुकररावांचे सर्वांशी असणारे मधुर संबंध, त्यांच्याबद्दल जनमानसात असणारा आदर आणि विश्वास यांचे हे श्रेय होते. याच वास्तूत राहणार्‍या श्री. मारुतराव आवटे यांनी आपले राहते घरही जनसंघाच्या ऑफिससाठी वापरायला दिले होते. मधुकररावांचे माणसे जोडण्याचे कसब असे अपूर्व होते. त्यांनी संघकार्यालयातील थोड्याशा मोठ्या असणार्‍या स्वयंपाकघरात आपले बिर्‍हाड हलवले.

 
जनसंघाच्या नव्या कार्यालयात जनसंघाचे प्रचारक, नेते यांचा सतत राबता असे. सगळे तरुण कार्यकर्ते होते. दीनदयाळजी, अटल बिहारी वाजपेयी, जगन्नाथराव जोशी, प्रेमजीभाई अशर, प्रभाकर पटवर्धन, बच्छराजजी व्यास, सुंदरसिंह भंडारी, कुशाभाऊ ठाकरे हे सर्व तेव्हाचे तरुण कार्यकर्ते होते, जे नंतरच्या काळात जनसंघाचे मोठे नेते झाले. ही सर्व मंडळी जनसंघाच्या या कथक भवन कार्यालयातच उतरत. सौ. सुशीलाताई वेळप्रसंगी सर्वांसाठी स्वयंपाक करत आणि ही सर्व मंडळी तेथे जेवत. सुशीलाताईंनी हे काम मोठ्या आस्थेने केले. आता बहुमताने केंद्रात सत्तेवर असणार्‍या आणि मुंबईत असणार्‍या भारतीय जनता पार्टीच्या मंदिराचा पाया जनसंघाने असा घातला. काळ पुढे सरकत गेला, कार्यकर्त्यांची संख्या वाढत गेली, अनेक नेते जनसंघाशी जोडले गेले, पक्षाला केंद्रीय राजकारणात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले, याचे सर्व श्रेय वर उल्लेखित नि:स्वार्थी नेत्यांना आहे.

गोवा मुक्ती आंदोलन झाले व गोवा भारतीय संघराज्यात सामील झाला. लगेच संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न ऐरणीवर आला. संयुक्त महाराष्ट्र समितीत जनसंघ सामील झाला व मधुकररावांनी समितीचे सहकार्यवाहपद स्वीकारले. पुन्हा बैठका, प्रचार, भाषणे यांचे सत्र जोमाने सुरू झाले. 1957च्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले. मुंबई विधानसभेत जनसंघाच्या वाट्याला केवळ एक जागा आली आणि त्या जागेसाठी सर्वानुमते मधुकरराव महाजन यांचे नाव पुढे आले. त्या वेळी मधुकररावांचे वय केवळ पस्तीस वर्षे होते आणि अन्य उमेदवार त्यांच्याहून वयाने बरेच ज्येष्ठ होते. हा पस्तीस वर्षाचा तरुण काय करणार असे बोलले जाऊ लागले. या निवडणुकीचा प्रचार धूमधडाक्याने चालला होता. संघकार्यकर्त्यांप्रमाणेच सुशीलाताईंनी राष्ट्र सेविका समितीच्या सेविकांसह स्वत:ला अहोरात्र प्रचारकार्यास वाहून घेतले. आपल्या लहानगी कन्या विद्या हिला त्यांनी कल्याणला आपल्या माहेरी ठेवले आणि पूर्ण वेळ निवडणूक कार्याला दिला. मधुकररावांची निवडणूक प्रचारातील भाषणे दमदार असत. ते फर्डे वक्ते होते. त्यांच्या भाषणांना खूप गर्दी होई. सभा तुडुंब भरलेली असे, त्यांची भाषणे ऐकून लोक खूप प्रभावित होत. पण तरीही या निवडणुकीत निश्चितपणे आपण जिंकून येऊ असे त्यांनी कधी म्हटले नाही, कारण काँग्रेसचे धनबळ आणि दंडेलीचे बळही खूप मोठे होते. जनसंघाकडे धनाचे बळ नाही, हे त्यांना ठाऊक होते. संघाकडे महत्त्वाचे बळ होते ते देशकार्यासाठी स्वत:ला वाहून घेणार्‍या देशभक्त कार्यकर्त्यांचे. त्यांच्यात संघाची शिस्त होती. लाचलुचपत आणि दंडेली त्यांना वर्ज्य होती. पण मधुकरराव यांच्या भाषणांना होणारी गर्दी पाहून त्यांचा निवडणुकीत विजय निश्चित असे सर्वांनाच वाटत होते. मधुकरराव मात्र सावध होते. काँग्रेसचे बळ ते जाणून होते. त्यांचा अंदाज खरा ठरला. अगदी अल्प मतांनी मधुकरराव निवडणुकीत दुसर्‍या क्रमांकावर राहिले आणि काँग्रेसचे इंद्रवदन ओझा यांनी ही निवडणूक जिंकली. मधुकररावांनी त्यांना हार घातला आणि ते काउंटिंग सेंटरमधून शांत मनाने बाहेर आले.

मधुकरराव विधानसभेच्या या निवडणुकीत जिंकले नाहीत, पण या निवडणुकीत त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचे आणि ठोस कार्य केले. चेंबूरच्या या मतदारसंघात जनसंघाचा मोठा मतदारसंघ उभा करण्यात ते यशस्वी झाले. मधुकरराव यांनी उभा केलेला हा मतदारसंघ म्हणजे मुंबईतील नंतरच्या काळातील जनसंघाच्या म्हणजेच आत्ताच्या भारतीय जनता पार्टीचा भक्कम पाया होय. नंतरच्या काळात सातत्याने या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला विजय मिळत राहिला.

विधानसभेनंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतही जनसंघाचे एकमेव तडफदार, दमदार, लढाऊ वृत्तीचे प्रभावी वक्ते होते ते म्हणजे मधुकरराव महाजन. पक्षाचा ज्येष्ठ वक्ता म्हणून रात्रंदिवस धावपळ, बैठका आणि प्रचार भाषणे याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. योजनाबद्ध पद्धतीने प्रचारकार्य झाले आणि जनसंघाला दोन मतदारसंघांत विजय मिळाला, त्याचे श्रेय मधुकररावांच्या कार्य शैलीला आणि प्रभावी वक्तृत्वाला द्यायला हवे.



RSS_1  H x W: 0
मधुकरराव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि जनसंघाच्या कार्यात इतके व्यग्र होते, तरी या काळात त्यांनी आपले लेखन चालू ठेवले होते. जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी राजकारण समजून घ्यावे, म्हणून त्यांनी 1960मध्ये श्री. गोपाळ टोकेकर यांच्या मदतीने ‘भारतीय राज्यशास्त्र’ हा ग्रंथ लिहिला. सणांचे सुगम विवेचन करणारा ‘आली दिवाळी भुवन उजळी’ हा लेखसंग्रह लिहिला, तर ‘अशा व्यक्ती असे तेज’मध्ये थोरामोठ्यांचा जीवनपट उलगडून दाखवला आहे. झह.ऊ. पदवीसाठी संशोधन विषय म्हणून त्यांनी श्रीमद्भागवत हा ग्रंथ घेतला होता. भागवतातील कथा, तत्त्वज्ञान आणि काव्यसौंदर्य यांची टिपणे तयार केली. त्यांच्या निधनानंतर त्यांची ज्येष्ठ कन्या डॉ. विद्या देवधर हिने मला साधारणपणे 1992-1994मध्ये सहज ही टिपणे दाखवली. ती पाठकोर्‍या कागदांवर मोत्यासारख्या सुरेख अक्षरात लिहिलेली होती. ती पाहताना आमच्या दोघींच्याही मनात आले की हे प्रकाशात यायला हवे. आमचे तसे बोलणे झाले, पण लगेच त्या कामाला सुरुवात झाली नाही. पुढे 2010-11च्या काळामध्ये त्या कामाला हळूहळू सुरुवात झाली आणि ‘आनंदाचे आवरू’ या ग्रंथात त्यांचा श्रीमद्भागवताचा हा अभ्यास प्रकाशात आला. डॉ. विद्याने या ग्रंथाचे संपादन केले. मराठीतील अशा प्रकारचा हा पहिलाच ग्रंथ आहे. सुशीलाताईंनीही आपल्या कार्यातून वेळ काढून पदवी आणि शिक्षक प्रशिक्षण पुरे केले आणि विलेपार्ले येथील पार्ले टिळक शाळेत शिक्षिकेची नोकरी केली. सातत्याने लेखन, वाचन, राष्ट्र सेविका समितीचे कार्य, बौद्धिके, शिबिरे, दौरे, लेखन, वाचन सातत्याने चालले होते. ‘डाव मांडियेला’ या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांच्या आणि मधुकररावांच्या या जीवनपटाचे सुंदर दर्शन घडते. प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या पाठीशी एक स्त्री असते असे म्हणतात, पण हे उभयता एकमेकांच्या पाठीशी सदैव उभे होते. ध्येय एकच होते - नि:स्वार्थी देशकार्य.

मधुकरराव आणि सुशीलाताई अमेरिकेच्या दौर्‍यावर गेले, तेव्हाही प्रवास आणि निवास याबरोबरच तेथे ठरलेली उभयतांची भाषणे हा त्यातील मुख्य भाग होता. या प्रवासात अमेरिका दर्शनाबरोबरच जनसंघ आणि भारतीय संस्कृती यांचा भाषणाद्वारे प्रचार हे महत्त्वाचे कार्य होते. तिथे मिळालेले मानधन त्यांनी भारतात परत आल्यावर जनसंघाच्या आणि राष्ट्र सेविका समितीच्या कार्यासाठी दिले. एवढेच नव्हे, तर मधुकररावांनी वयाच्या साठाव्या वर्षी नोकरदार घेतात तशी कार्यनिवृत्ती घेतली. म्हणजे आपला कारखाना धाकटी कन्या सौ. सुषमा देवधर हिच्या सुपुर्द केला. तसेच सुशीलाताई यांनीसुद्धा सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या भविष्य निधीतील काही भाग राष्ट्र सेविका समितीला दिला. मधुकररावांनी आपल्या उभय कन्या विद्या आणि सुषमा यांना शिक्षणाबरोबरच स्वतंत्रपणे विचार करण्याचे, देशभक्तीचे, त्यागाचे, जनसंपर्काचे संघटनाचे, संस्कार दिले होते. त्या दोघींनाही या संस्कारातून कार्यबळ आणि यश मिळाले. दोघींचाही समाजकार्यातील आणि साहित्य सेवेतील सहभाग लक्षणीय आहे.

साहित्य, समाजकार्य, राजकारण, व्यवसाय, संसार, साहित्य आणि देशाटन अशा विविध क्षेत्रांत मधुकररावांना अनेक मान्यवर व्यक्ती भेटल्या, स्नेह जडला. मराठी, इंग्लिश आणि संस्कृत तसेच संतसाहित्याचे, धार्मिक ग्रंथांचे वाचन व या निमित्ताने झालेला संतांचा - थोरामोठ्यांचा सहवास यामुळे ते जीवनाकडे तटस्थपणे पाहू शकले.

मधुकररावांनी एक तपानंतर पक्षाचे काम थांबवले हे खरे, पण लेखन-वाचन थांबवले नाही. जेव्हा जेव्हा विवेकमधून त्यांना निरोप येई, तेव्हा ते लेख लिहून देत. या स्वरूपात संघकार्य चालले होते, असे म्हणता येईल. अमेरिकेच्या दौर्‍यावरून परत आल्यानंतर मधुकररावांना कर्करोग झाला आहे हे कळले, पण ते तटस्थ होते. कर्करोगावर वैद्यकीय उपचार करायला त्यांनी विरोध केला नाही, पण जीवनाचा अंत दृष्टिक्षेपात आल्यावर त्यांनी प्रायोपवेशन सुरू केले आणि शांतपणे त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. अंतसमयी चित्त एकाग्र होण्यास बाधा येईल म्हणून सुशीलाताई आणि दोन्ही मुलींनाही आपल्या जवळ बसू नये असे सांगितले. दिवस होता 25 नोव्हेंबर 1989. त्या दिवशी कार्तिक वद्य त्रयोदशी - म्हणजे संत ज्ञानेश्वरांचा समाधी दिवस होता. तो मुहूर्त साधून त्यांनी जगाचा निरोप घेतला. अवघा रंग एक झाला!
 
 
- डॉ. गीता सुरेश काटे
919948070499