पद्मश्री सय्यदभाई!

विवेक मराठी    14-Dec-2021
Total Views |
मुस्लीम महिलांच्या हक्कांसाठी आणि तिहेरी तलाक विरोधी कायद्यासाठी दीर्घकाळ लढा देणारे, मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे सय्यदभाई यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार देशभरातील मुस्लीम महिलांच्या आशीर्वादाचा परिणाम आहे अशी नम्र प्रतिक्रिया सय्यदभाई व्यक्त करतात.

padmshree_1  H
पद्म गौरव लेखमालेत या वेळी आपण पद्मश्री सय्यदभाई यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. पाच दशकांपासून, सय्यद मेहबूब शाह कादरी उर्फ सय्यदभाई यांनी तिहेरी तलाक अंतर्गत मुस्लीम पुरुषांनी सोडून दिलेल्या मुस्लीम महिलांना त्यांच्या स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. आपल्या बहिणीला भोगावे लागलेले दु:ख कोणाच्याही वाट्याला येऊ नये, यासाठी त्यांनी एक व्रत स्वीकारले आणि योद्धा बनून मुस्लीम महिलांच्या हक्कांसाठी ते सतत लढत राहिले. मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या माध्यमातून हजारो महिलांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून त्यांना मदत केली आणि अजूनही करत आहेत. खरे तर ही लढाई सोपी नव्हती. समाजातल्या मोठ्या घटकाचा रोष पत्करून, रोज टीका सहन करूनही लढत राहायचे हेच ठरवून व्रत पूर्ण करण्याच्या दिशेने पद्मश्री सय्यदभाई सतत मार्गक्रमण करत राहिले.

तिहेरी तलाकच्या विरोधातील कायदा लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहातून पास होत आला आहे. त्यासाठी खूप मोठे धाडस स्वीकारून संघर्ष करणार्‍या लोकांच्या प्रयत्नांचे ते फळ आहे आणि याच अद्भुत कार्यासाठी विद्यमान केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री देऊन त्यांचा गौरव केला आणि त्याबद्दल केंद्र सरकार कौतुकास पात्र आहे.
 
सय्यदभाई यांना केंद्र सरकारने प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आणि नुकताच राष्ट्रपती भवनात पद्म सोहळा संपूर्ण जगाने अनुभवला आहे, ज्यात त्यांचाही गौरव करण्यात आला आहे. एकसमान नागरी संहिता आणण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांना दुप्पट सामाजिक सुधारणांसाठी काम करत राहण्याची पुरस्कारामुळे कायम प्रेरणा मिळते, हे ते सांगत असतात. हा पुरस्कार देशभरातील मुस्लीम महिलांच्या आशीर्वादाचा परिणाम आहे, ज्यांच्यासाठी मला गेल्या पाच दशकांमध्ये मदत करण्याची संधी मिळाली, केंद्र सरकारने माझ्या कामाची दखल घेतल्याने मला आनंद झाला आहे. मी मुस्लीम सत्यशोधक समाज मंडळाचा संस्थापक सदस्य आहे. समाजात समान नागरी कायदा झाला पाहिजे, सर्व लग्न नोंदणी पद्धतीने झाली पाहिजेत, यासाठी मी पुढाकार घेतला. पती-पत्नीचे वाद न्यायालयात सोडवावे, पहिली पत्नी असताना दुसरी पत्नी करायला विरोध हवा, त्याचबरोबर ट्रिपल तलाक रद्द केले हे योग्य असून तलाक देण्यापूर्वी तलाक योग्य की अयोग्य हे न्यायालयाने ठरवावे, महिलांना मूल दत्तक घेण्याचा कायदा असावा अशी सत्यशोधक मंडळाची भूमिका आहे, असेही सय्यदभाईं कायम सांगतात.

 
पद्मश्री सय्यदभाई यांनी तिहेरी तलाकचे परिणाम वैयक्तिकरित्या अनुभवले आहेत, जेव्हा त्यांच्या लहान बहिणीला तिच्या पतीने घटस्फोट दिला. त्याने जे कारण दिले, ते फक्त ‘अल्लाहची इच्छा’ असल्याचे सांगितले. त्या वेळी त्यांना ते पटले नाही आणि त्यांनी या प्रथेच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. आजूबाजूच्या अनेक लोकांनी त्या वेळी त्यांची चेष्टा केली. लोकांची मानसिकता बदलण्यासाठी काहीतरी वेगळे करण्याची गरज असल्याचे त्यांना जाणवू लागले होते आणि त्या जाणिवेतून त्यांचे कार्य सुरू झाले. पुढे दिवसेंदिवस कार्याची व्यापकता संपूर्ण देशभर पसरली गेली.

 
1970च्या दशकाच्या सुरुवातीला सय्यदभाई पुण्यातील समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या संपर्कात आले. त्याच वर्षी 22 मार्च रोजी त्यांनी येथे मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. त्याबरोबरच सय्यदभाईंनी घटस्फोटित बहिणीला शिवणकामाच्या क्लासमध्ये दाखल केले. बहिणीने काबाडकष्ट करून आपल्या दोन मुलांचे संगोपन केले, जे आता सरकारी नोकरीत कार्यरत आहेत. आधाराशिवाय घटस्फोटित महिलांसाठी काम करणे किती कठीण आहे, याची जाणीव सय्यदभाईंच्या बहिणीने त्यांना करून दिली आणि त्यातून मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या कार्याला दिशा मिळत गेली.

मुस्लीम सत्यशोधक मंडळाद्वारे घटस्फोटित महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी, त्यांना आर्थिक आणि कायदेशीर साहाय्य केले जाते. दशकभरात मंडळाने अनेक शहरांमध्ये शाखा स्थापन केल्या आहेत. संपूर्ण देशभरातील नेटवर्कमुळे सय्यदभाई यांनी अनेक महिलांपर्यंत मदत पोहोचवली आहे, ज्या आता स्वावलंबी आहेत आणि त्या महिला स्वावलंबी असल्याने सय्यदभाईंना आत्मिक समाधान आहे.

तिहेरी तलाकाबाबत हुसेन दलवाई यांच्याबरोबर राज्यभरात त्यांनी प्रचार केला. त्या वेळी समाजात तिहेरी तलाकाचा धार्मिक कायदा असल्याने बदलता येणार नसल्याची भूमिका होती. महिलांवर अन्याय होत असल्याची भूमिका घेऊन त्यांनी पुण्याला परिषद घेतली होती. मात्र काही संघटनांनी याला विरोधही केला, असे सय्यदभाई म्हणतात. “जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवणे योग्यच आहे. समाजाला विश्वासात घेऊन कायदे बदलले पाहिजेत. सामाजिक कायदे हे धर्माशी जोडू नये, ते धर्मनिरपेक्ष असले पाहिजेत” असेही सय्यदभाई यांनी सांगितले आहे.

10 जानेवारी 2021 रोजी सय्यदभाई आणि त्यांच्या सहकार्‍यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि समान नागरी संहितेबाबत निवेदन सादर केले. पद्मश्री सय्यदभाई मूळचे हैदराबादचे आहेत, पण आता पुण्यात स्थायिक झाले आहेत. ते प्रत्येक मुलाखतीत कायम म्हणतात, “पुणे शहराने माझ्या कामाला नेहमीच पाठिंबा दिला आहे” आणि त्यामुळेच पुण्यावर त्यांचे विशेष प्रेम आहे. सय्यदभाईंनी त्यांचा पद्म पुरस्कारही पुणे शहराला समर्पित केला आहे. केंद्र सरकारने तिहेरी तलाकच्या विरोधात कायदा केला, तेव्हा शरीर फार साथ देत नसतानाही त्यांचे आभार मानण्यासाठी सय्यदभाई खास दिल्लीत गेले होते. अशा या व्रतस्थ व्यक्तीला सादर नमन! यांच्या कार्याची आपल्याला सतत ओळख रहावी, कारण ही माणसे खरेच देवदुर्लभ आहेत.