“शाश्वत मूल्यांच्या विकासासाठी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव” - मधू चव्हाण

विवेक मराठी    29-Dec-2021
Total Views |
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत. आपला स्वातंत्र्यलढा बाराशे वर्षांचा असून अनेकांच्या बलिदानाने आणि त्यागाने तो गौरवांकित झाला आहे. या निमित्ताने देशभर ‘आझादी 75’ ही संकल्पना घेऊन विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटीच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविले जात आहेत. ‘उत्सव स्वातंत्र्याचा, गौरव स्वातंत्र्यसैनिकांचा’ या नावाने विविध उपक्रम होतील. या उपक्रमामागील भूमिका आणि त्याचे प्रकटीकरण याविषयी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार मधू चव्हाण यांच्याशी साधलेला संवाद.
 
 
madhu chavan_1
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आपल्या संस्थेच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविले जात आहेत, त्याचे स्वरूप व त्यामागची भूमिका काय आहे?
 
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्याला पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतक्या वर्षांत अनेक पिढ्या उदयास आल्या. आज शालेय शिक्षण घेणारी पिढी आधुनिक तंत्रज्ञान आणि सेवासुविधा यांचा उपयोग करत शिक्षण घेत असली, तरी या पिढीला भारतीय संस्कृती, इतिहास, मूल्ये यांचा परिपूर्ण परिचय आहे असे म्हणता येणार नाही. त्याला आपली शिक्षण पद्धती जबाबदार आहे. याला कारण दीर्घकाळ आपल्यावर परकीय राजसत्ता होती. मात्र असे असूनही आपली संस्कृती, संस्कार टिकून राहिले, ही खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या शिक्षणातून पाश्चिमात्य विचारांची आणि व्यक्तींची माहिती मिळते, मात्र आपल्या देशाचा इतिहास खूप त्रोटक व सिलेक्टिव्ह पद्धतीने शिकविला जातो. व्यक्तिगत विकास हाच या शिक्षणाचा हेतू आहे. यातून विद्यार्थ्यांना राष्ट्र, संस्कृती आणि संस्कार याविषयी पुरेशी माहिती मिळत नाही, किंवा राष्ट्रीय विचाराच्या प्रेरणा जागविल्या जात नाहीत. रामायण, महाभारत ही महाकाव्ये जगात अभ्यासली जातात, मात्र आपल्या देशात ती शिक्षणात नसतात. मी एका ठिकाणी वाचले की रशियामध्ये वधुवर लग्न झाल्यानंतर लगेच शहीदांच्या स्मारकात जातात आणि शहीदांना अभिवादन करून आपली राष्ट्रभक्ती व्यक्त करतात. आपल्या देशाला इतका मोठा इतिहास आहे, पण तो सर्वांनाच माहीत असतो असे नाही. आपल्या इतिहासाचे स्मरण करावे व उद्याच्या नागरिकांना स्वत:च्या विकासाबरोबर राष्ट्रविकासात सहभागी होण्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने आमच्या संस्थेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात विविध उपक्रम राबविले जात आहेत. गांधी जयंती 2 ऑक्टोबरपासून हे उपक्रम सुरू झाले असून 15 ऑगस्ट 2022पर्यंत ते चालू राहतील. ‘भारताचा गौरवशाली इतिहास’ हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू असून इ.स. 707 ते 1947 अशा साडेबाराशे वर्षांतील महत्त्वाच्या व्यक्ती आणि घटना, प्रसंग, लढायांचे दूरगामी परिणाम यांचे विविध माध्यमांतून पुन:स्मरण केले जाईल. या व्यापक कालखंडातील प्रसंग, व्यक्तीचे जीवन याविषयी विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. रांगोळी, भित्तिचित्रे, निबंध, एकपात्री, वक्तृत्व, लेखन, हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्याला विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला.
 

madhu chavan_3
 
आपण लवकरच ‘रन फॉर नेशन’चे आयोजन करत आहात, त्यामागे काय उद्देश आहे?
 
 
येत्या 16 जानेवारीला आपण ‘रन फॉर नेशन’चे आयोजन करत असून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांतील विविध वयोगटांतील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतील. आताच्या अंदाजानुसार 2500 विद्यार्थी सहभागी होतील. वयोगटानुसार स्पर्धेचे अंतर निश्चित करण्यात येणार आहे. स्पर्धा मार्गावर आपल्या देशातील विविध महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यात येणार आहेत. या प्रतिमांच्या माध्यमातून आपल्या देशाचा स्वातंत्र्यलढा उभा करण्यात येणार आहे. सामाजिक व राष्ट्रीय भाव जागविणे हा रन फॉर नेशनमागील उद्देश आहे. आपल्या वैयक्तिक जीवनात आपण यशस्वी होऊ, त्याचबरोबर राष्ट्रविकास हीसुद्धा आपली जबाबदारी आहे, याची जाणीवजागृती व्हावी यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. अशी एक स्पर्धा आयोजित करण्याने फार फरक पडत नाही, त्यासाठी सातत्याने विविध प्रकारचे उपक्रम करावे लागणार आहेत याची मला जाणीव आहे, म्हणून 24 जानेवारी रोजी संस्थेने राहुटीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. संस्थेत ज्युनिअर कॉलेजच्या एकूण बावीस तुकड्या आहेत. बावीस राहुट्या उभारण्यात येतील. प्रत्येक राहुटीला एक नाव असेल. आपल्या देशातील पर्वत, नद्या, प्रदेश, शहरे यांच्या नावे ओळखल्या जाणार्‍या राहुटीत इतिहासातील एक प्रसंग मुले नाट्यमय पद्धतीने साकार करतील. सावरकरांची अंदमानमधील शिक्षा, छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला चवदार तळ्याचा सत्याग्रह, लोकमान्य टिळकांचे मंडालेच्या कारागृहातील जीवन, महात्मा गांधीजींची दांडी यात्रा, महात्मा फुलेंनी सुरू केलेली शाळा अशा विविध प्रसंगांतून आपला इतिहास जागविला जाईल. 25 जानेवारी रोजी सर्व सांस्कृतिक कार्यक्रम होईल. कथाकथन, नाटक, सादरीकरण अशा विविध प्रकारांतून स्वातंत्र्यलढा आणि देशाचा गौरवशाली इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला जाईल. आपल्या देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळाले नसून बाराशे वर्षांचे अथक परिश्रम त्यामागे आहेत, ही जाणीव सदैव आपल्या मनात राहावी यासाठी हा प्रयत्न आहे.
 


madhu chavan_2
 
याशिवाय अन्य काही उपक्रम राबविले जाणार आहेत का?
 
 
हे स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. संपूर्ण समाजाने ते साजरे करावे आणि स्वातंत्र्यचळवळीचा अर्थ समजून घेऊन आपापल्या क्षेत्रात त्याचे प्रकटीकरण करावे, अशी कल्पना आहे. त्यानुसार आम्ही 25 जानेवारी रोजी सरपंच परिषद आयोजित करत असून अंदाजे बाराशे सरपंच/उपसरपंच या परिषदेत उपस्थित राहणार आहेत. सरपंच म्हणून असणारी जबाबदारी, शासकीय योजना, ग्रामविकास संकल्पना इत्यादी विषयांवर या परिषदेत चर्चा घडवून आणली जाणार आहे. ग्रामविकास हे राष्ट्रविकासाचे एकक आहे, हे लक्षात घेऊन ही परिषद आयोजित करत आहोत. या परिषदेस केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री कपिल पाटील व लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे उपस्थित राहणार आहेत. या परिषदेच्या माध्यमातून आम्ही जे गाव चालवतात, गावाचा विकास घडवून आणतात अशा सरपंच, उपसरपंच मंडळींचे सामाजिक व राष्ट्रीय भान जागृत करण्याचा प्रयत्न करत आहोत. 6 फेब्रुवारी 2022 रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील शिक्षक, प्राध्यापक मंडळींची शिक्षण परिषद आयोजित करत आहोत. या परिषदेस महाराष्ट्राचे मा. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित राहणार असून अविनाश धर्माधिकारी, अनिरुद्ध देशपांडे, डॉ. सदानंद मोरे इत्यादी मान्यवर या परिषदेत मांडणी करणार आहेत.आपली प्राचीन शिक्षणपद्धती, मेकॉलेने भारतीय संस्कृतीविषयी व शिक्षणाविषयी नोंदवून ठेवलेले मत आणि नवीन शैक्षणिक धोरण इत्यादी विषयांवर या परिषदेत चर्चा होणे अपेक्षित आहे. सध्या जे शिक्षण दिले जाते, ते व्यक्तिविकासकेंद्री आहे. त्या शिक्षणात समाज, राष्ट्र यांना फार कमी स्थान आहे. भारतात शिक्षण घ्यायचे आणि परदेशात निघून जायचे अशी पद्धत सध्या रूढ झाली आहे. आपल्या व्यक्तिगत विकासाबरोबर आपण या समाजाचे, राष्ट्राचे देण लागतो, ही भावना विसरली गेली आहे. ही भावना पुन्हा जागृत करण्यासाठी शिक्षकाचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. नवीन शैक्षणिक धोरणात जे अपेक्षित आहे, ते शिक्षकांना समजावून सांगणे आणि नव्या पिढीला राष्ट्रीय विचाराचे बाळकडू देण्यासाठी शिक्षकाचे प्रबोधन आवश्यक आहे. आज तरुणांनी स्वभिमुखतेकडून समाजाभिमुखतेकडे जाणे आवश्यक आहे. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, सेनापती बापट, सुभाष चंद्र बोस परदेशात शिक्षणासाठी गेले आणि इथे परत येऊन समाजकारण, राजकारण केले, हे पुन्हा नव्याने सांगायचे असेल तर शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे, हे लक्षात घेऊन आपण ही परिषद आयोजित करत आहोत.
 
 
कोकणाचा इतिहास पाहिला तर असे लक्षात येईल की, पूर्वी सैन्यदलात आणि पोलीस दलात कोकणी माणूस खूप मोठ्या प्रमाणावर होता. दुसरे महायुद्ध, 1962, 1965 आणि 1971च्या युद्धात कोकणातील व्यक्तींनी पराक्रम गाजविला आहे. आज कोकणातील माणूस सैन्यदलात कमी प्रमाणात आहे. या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यात देशाच्या संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत आम्ही माजी सैनिकांचे एकत्रीकरण करणार आहोत. त्याचप्रमाणे सद्य:स्थितीत जे कोकणपुत्र सैन्यदलात कार्यरत आहेत, त्यांच्या पालकांनाही आम्ही या कार्यक्रमात निमंत्रित करणार आहोत. या निमित्ताने कोकणाची खंडित झालेली परंपरा पुन्हा सुरू होण्यासाठी युवकांना प्रोत्साहित करणार आहोत. अशा विविध उपक्रमांचे नियोजन आम्ही करत आहोत. जेव्हा राष्ट्रावर संकट येते, आणीबाणीचा प्रसंग येतो, तेव्हा आपली राष्ट्रभक्ती उफाळून येत असते. ती कायम धगधगत राहावी, यासाठी तरुणांनी सैन्यदलात प्रवेश केला पाहिजे या भूमिकेतून हे सैनिकांचे एकत्रीकरण करत आहोत.
 

madhu chavan_4 
 
याशिवाय आणखी काय विशेष असेल?
 
 
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे झाली, तशीच देशाचे संविधान लागू होऊनही 72 वर्षे झाली आहेत. ते लक्षात घेऊन आम्ही विद्यार्थी संविधान साक्षर व्हावेत यासाठी रमेश पतंगे यांनी लिहिलेल्या ‘स... संविधानाचा’ या पुस्तकाच्या आधारे विविध स्पर्धा घेत आहोत. तसेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे चित्रण करणारे पोस्टर आणि भारतमातेची भव्य मूर्ती आम्ही संस्थेत ठेवली आहे. बाराशे वर्षांचा गौरवशाली इतिहास साकार करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याचबरोबर आपला वारसा असणारे रामायण-महाभारत या ग्रंथांतील प्रसंग, भारतीय संत, ऋषी-मुनी, समाजसुधारक, लेखक, विद्वान, जनजातीचे क्रांतिकारक इत्यादींची माहिती मिळेल आणि आपण कोणत्या देदीप्यमान गौरवशाली देशाचे नागरिक आहोत, याची तरुण पिढीला सतत जाणीव होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. या निमित्ताने मी असे सांगेन की जरी आमची संस्था पुढाकार घेऊन हा उपक्रम करत असली, तरी हा विषय सर्व समाजाचा आहे. अशा प्रकारे उपक्रम करून देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करावा, असे आम्ही अन्य संस्था, महाविद्यालये यांना आवाहन करतो.
 
 
या उपक्रमाची सांगता कधी असेल?
 
 
आताच्या नियोजनाप्रमाणे 14 ऑगस्ट 2022 रोजी देशाचे उपराष्ट्रपती महोदय आमच्या उपक्रमाच्या सांगता सोहळ्यास यावेत अशी आमची कल्पना आहे. आमचे तसे प्रयत्न चालू आहेत.