अपघात, घातपात आणि कॉन्स्पिरसी थिअरीज

विवेक मराठी    09-Dec-2021
Total Views |
@निमेश वहाळकर
एकीकडे देश जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती निधनाच्या धक्क्यातून सावरत असताना, शोक व्यक्त करत असताना दुसरीकडे या घटनेबाबत विविध ‘कॉन्स्पिरसी थिअरीज’देखील जन्माला आल्याचं पाहायला मिळालं. सोशल मीडियामुळे तर या थिअरीजनी अधिकच वेग घेतला. अर्थात, अशाप्रकारे रहस्यमय वळण दिलं जाण्याची ही काही पहिली वेळ नव्हे.

rawat_1  H x W:

भारताचे पहिले सीडीएस अर्थात संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत यांचे अपघाती निधन संपूर्ण देशाला चटका लावणारे ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या कार्यकाळात भारताने संरक्षण धोरण, सीमा सुरक्षा धोरण यामध्ये जे काही आमूलाग्र बदल आणि सुधारणा घडवून आणल्या त्या प्रक्रियेतील जनरल रावत हे अतिशय महत्त्वाचे साक्षीदार व सक्रिय शिलेदार होते. गेल्या सात-साडेसात वर्षांत भारताने पाकिस्तान व चीन अशा दोन्ही सीमांवर ताण-तणावाचे प्रसंग अनुभवले, दोन्ही शेजारी राष्ट्रांच्या कुरघोडींचा सामना केला व चोख प्रत्युत्तरदेखील दिलं. जम्मू-काश्मीरबाबतचे कलम 370 हटवत जम्मू-काश्मीर व लडाख या दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती झाली. ईशान्य भारतातही सीमा सुरक्षा व अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीत मोठं काम या सरकारच्या काळात झालं. अशा या महत्त्वाच्या कालखंडात जनरल बिपीन रावत भारतीय संरक्षण दलांमध्ये महत्त्वाच्या भूमिका पार पाडत होते. 2016 ते 2019 दरम्यान ते भारताचे लष्करप्रमुख होते, तर 1 जानेवारी, 2020 रोजीपासून नव्याने निर्माण करण्यात आलेल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदाची जबाबदारी रावत यांच्याकडे सोपवण्यात आली होती. संरक्षणविषयक धोरणातील मोदी सरकारच्या कामांच्या यादीमध्ये सीडीएस पदाच्या निर्मितीला मोठं महत्त्व आहे. तीनही सैन्य दलांच्या एकत्रीकरण, एकात्मता याकरिता एक प्रधान लष्करी सल्लागार नियुक्त केला जावा, हा विषय गेली तब्बल 20-21 वर्षे प्रलंबित होता. देशाचे पहिले सीडीएस म्हणून जनरल रावत यांनीही आपली कारकीर्द आणि त्या पदाची प्रतिष्ठा यांना साजेशी कामगिरी करत देशासाठी आपलं बहुमूल्य योगदान दिलं. त्यामुळे बुधवारी तामिळनाडूतील कुन्नूरमध्ये झालेली घटना देशाचं मोठं नुकसान करणारी आहे.

एकीकडे देश या धक्क्यातून सावरत असताना, शोक व्यक्त करत असताना दुसरीकडे या घटनेबाबत विविध ‘कॉन्स्पिरसी थिअरीज’देखील जन्माला आल्याचं पाहायला मिळालं. सोशल मीडियामुळे तर या थिअरीजनी अधिकच वेग घेतला. अर्थात, अशाप्रकारे रहस्यमय वळण दिलं जाण्याची ही काही पहिली वेळ नव्हे. भारताच्या आणि जगाच्या इतिहासात अशा अनेक घटना आढळतील. यामध्ये एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की, अमुक घटना घडण्यामागे त्याचे अधिकृतरित्या दिले जाणारे कारण हे खरे नसून त्यामागे तमुक शक्तींचा हात आहे वा असण्याची शक्यता आहे, अशी मांडणी करणार्‍यांचे दोन प्रकारांत वर्गीकरण करावं लागतं. पहिला प्रकार म्हणजे नुसतेच अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे लोक. आज सोशल मीडियावर अशा लोकांची संख्या प्रचंड प्रमाणात दिसून येते. आपल्याला वाटणारी शक्यता, जिला कोणताही सबळ पुरावा वा आधार नाही, ती शक्यताच निष्कर्ष मानून त्याबाबत मतप्रदर्शन करून मोकळं होणं हा यातला सोपा मार्ग असतो. मात्र दुसरा प्रकार अधिक लोकांचे लक्ष वेधून घेणारा व गांभीर्याने घेण्यास भाग पडणारा असतो. यामध्ये भाष्य करणारे लोक नावाजलेले, एखाद्या विषयातील जाणकार मानले जाणारे असतात आणि त्यांच्या भाष्याला ते एका ‘लॉजिकल एन्ड’सह सादर करतात. ज्यामुळे ही विधाने अधिक गांभीर्याने घेतली जातात. तथापि, राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्तरावरील एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचा अपघात व त्यामागील घातपाताच्या कथित शक्यता या अनेकदा चर्चेत येतात आणि कोणत्याही निष्कर्षांशिवाय हवेत विरून जातात. त्यातील अनेक गोष्टी सर्वसामान्य जनतेच्या समोर येतही नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अशा संवेदनशील विषयात आपण त्रयस्थपणे कोणताही निष्कर्ष काढणं हे सर्वार्थाने गैर ठरतं. मात्र, आंतरराष्ट्रीय राजकारण कशाप्रकारे घडत असतं, कोणकोणते घटक यामध्ये सक्रिय असू शकतात, याची कल्पना आपल्याला या सगळ्या कॉन्स्पिरसी थिअरीजमधून मिळू शकते.


rawat_1  H x W: 
उदाहरण घ्यायचं झाल्यास आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक, नावाजलेले लेखक ब्रम्हा चेल्लानी यांनी जनरल रावत यांच्या अपघातानंतर केलेले ट्विट व त्यावर विविध स्तरांतून आलेल्या प्रतिक्रिया. भारत - चीन सीमेवर गेल्या वीस महिन्यांहून अधिक काळ तणावाची स्थिती असताना ही दुर्घटना घडली असून रावत यांचा हेलिकॉप्टर अपघात हा 2020च्या प्रारंभी तैवानचे लष्करप्रमुख जनरल शेन यी मिंग यांच्या हेलिकॉप्टर अपघाताशी मिळताजुळता असून या दोन्ही अपघातांत चीनच्या आक्रमणाविरोधात लढणार्‍या महत्वाच्या व्यक्ती मृत्युमुखी पडल्या, अशा आशयाचे ट्विट चेल्लानी यांनी केलं. ‘या दोन्ही घटनांमधील समानतेचा अर्थ यामध्ये काही समान धागा आहे अथवा यामध्ये बाह्य शक्तींचा हात आहे, असा होत नाही’ असं म्हणत चेल्लानी यांनी सावध पवित्रादेखील घेतला. मात्र, यातून जो सुप्त अर्थ ब्रम्हा चेल्लानी यांना मांडायचा होता, तो मांडला गेलाच. याही पुढील महत्त्वाची घटना म्हणजे, ‘ग्लोबल टाइम्स’ या चीन सरकारद्वारा नियंत्रित इंग्रजी वृत्तपत्राच्या ट्विटर हॅण्डलने चेल्लानी यांचं ट्विट रिट्विट केलं. यामध्ये आपली टिप्पणी जोडताना ग्लोबल टाइम्सने म्हटले की, भारत आणि रशिया हे रशियन एस-400 क्षेपणास्त्र यंत्रणेच्या निमित्ताने एकत्र येत असताना, जिला अमेरिकेचा तीव्र विरोध असताना, या हेलिकॉप्टर दुर्घटनेत अमेरिकेची काही भूमिका असल्याचा संशय चेल्लानी यांच्या वक्तव्यामध्ये आहे! ‘ग्लोबल टाइम्स’वर मग अर्थातच ब्रम्हा चेल्लानी यांनी टीका केली आणि चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्राची विकृत मानसिकता यातून दिसून येत असल्याचे ते म्हणाले.

rawat_1  H x W:
आता जनरल रावत यांच्या या हेलिकॉप्टर दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईलच आणि काय निष्पन्न होईल, हे या क्षणी आणि एखाद्या त्रयस्थ व्यक्तीने सांगणे अर्थातच असमंजसपणाचे ठरेल. मात्र, दुसर्‍या बाजूला अशा विविध ‘कॉन्स्पिरसी थिअरीज’ जन्म घेऊ लागल्या आहेत, वेगवेगळे निष्कर्ष - अनुमान काढले जाऊ लागले आहेत आणि पुढे बराच काळ ही चर्चा होत राहणार आहे, याचीही आपण नोंद घेतली पाहिजे. भारताच्या व जगाच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या ताश्कंदमधील मृत्यूचे गूढ अद्याप कायम आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपद व देशाच्या पंतप्रधान पदाच्या स्पर्धेतील दावेदार मानले जाणारे काँग्रेस नेते माधवराव सिंदिया, राजेश पायलट, खुद्द इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांच्या अपघाती मृत्यूंबाबतदेखील असे विविध मतप्रवाह आहेत व त्याबद्दल आजही अधूनमधून चर्चा होत असते. इतकंच काय, आंध्र प्रदेशचे माजी आणि तत्कालीन अतिशय लोकप्रिय मुख्यमंत्री डॉ. वायएसआर रेड्डी यांच्या हेलिकॉप्टर अपघाताबाबतही संशय उपस्थित करण्यात आला होता. पाकिस्तानचे हुकूमशहा जनरल झिया उल हक यांचा राष्ट्रप्रमुखपदी असताना पाकिस्तानमध्येच विमान अपघातात झालेला मृत्यू आणि त्यामागील कथित रहस्यांची चर्चा आजही होत असते. या आणि अशा अनेक घटनांचे दाखले यासाठी देता येतील. मात्र, या कोणत्याही उलटसुलट मतप्रवाहांना सबळ पुराव्यावर आधारित सत्याच्या स्तरावर जाता आलेलं नाही. कारण इतिहासातील अनेक गुपितं इतिहासाच्या पोटात लपलेली असतात. अनेक स्तरांवरील अनेक घटक या प्रक्रियेत काम करत असतात आणि त्यामुळे अखेरीस उरतात त्या केवळ ‘कॉन्स्पिरसी थिअरीज’.

या सार्‍या गदारोळात एवढे मात्र निश्चित आहे की जनरल बिपीन रावत यांच्या निधनाने भारताने आपला एक कर्तबगार, कर्तव्यदक्ष सेवक गमावला आहे. या अपघाताची सखोल चौकशी होऊन योग्य ती कारवाई होईल आणि यापुढे कधी अशा दुर्दैवी घटनांतून आपल्याला राष्ट्रउभारणीतील महत्त्वाचे शिलेदार गमवावे लागणार नाहीत, अशी अपेक्षा व्यक्त करूयात. जनरल बिपीन रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली!