बाइडेन सरकार – शुभारंभ आणि भारत-अमेरिका संबंध

विवेक मराठी    01-Feb-2021
Total Views |

बाइडेन यांच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून झालेल्या पहिल्या भाषणाचा रोख संपूर्ण अमेरिकन जनतेशी संवाद साधायचा होता. मग ते ट्रंप यांचे समर्थक असतील अथवा ट्रंप यांचे विरोधक असतील. पण फूट पाडलेल्या समाजातील जखमा भरून काढण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न होता. आपण आपल्या सत्तेचे उदाहरण न देता, आपल्या उदाहरणाची (आदर्शवादाची) सत्ता (प्रभाव) जनतेसमोर ठेवू. (“And we’ll lead, not merely by the example of our power, but by the power of our example.”) अशी ग्वाही त्यांनी भाषणात केवळ अमेरिकेलाच नाही, तर जगाला उद्देशून दिली.


Americans_4  H

सहा जानेवारी २०२१ला झालेल्या अमेरिकन कॅपिटॉल बिल्डिंगच्या आवारातील आणि प्रत्यक्ष वास्तूमधील ऐतिहासिक दंगलींमुळे
, २० जानेवारीस होणारा नवीन राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी सोहळा झाकोळला गेला होता. सहा जानेवारीस जे काही झाले, ते एखाद्या अपरिपक्व आणि तथाकथित लोकशाही देशात होऊ शकेल अशी हिंसेने सत्ता संपादन करण्यासाठीची दंगल होती. जरी दंगलखोर ते यशस्वी करू शकले नसले, तरी त्यातून आधीच निर्माण झालेली सामाजिक दुही अधिकच वाढली. अविश्वासाचे वातावरण तयार झाले. या गढूळ वातावरणात, अत्यंत कडक बंदोबस्तात, अमेरिकन कायद्यांनी ठरल्याप्रमाणे, २० जानेवारीस जो बाइडेन आणि कमला हॅरिस यांचा शपथविधी पार पडला आणि दुपारी १२ वाजून एक मिनिटाने ट्रंप हे माजी राष्ट्राध्यक्ष झाले आणि बाइडेन हे राष्ट्राध्यक्ष झाले.


बाइडेन हे जॉन केनेडींनंतरचे पहिलेच कॅथॉलिक पंथाचे ख्रिस्ती राष्ट्राध्यक्ष आहेत.
अमेरिकेतील आतापर्यंतचे बहुतेक सर्व राष्ट्राध्यक्ष प्रोटेस्टंट होते. ख्रिस्ती धर्म हा संस्थात्मक असतो. प्रोटेस्टंट पंथीयांची संस्था देशांतर्गतच असते. पण कॅथॉलिक संस्था रोमन आहे आणि ते पोपला त्यांचा गुरू मानतात. म्हणून ६०च्या दशकात जेव्हा शीतयुद्ध चालू होते, तेव्हा अमेरिकन जनतेला केनेडींवर पोपचा प्रभाव राहील का अशी काळजी वाटत होती. आता ती काळजी कुणाला वाटली नाही, कारण ४० वर्षे अमेरिकन राजकरणात असलेल्या बाइडेन जसे धर्म पाळताना लाजले नाहीत, तसेच लोकप्रतिनिधीची कर्तव्ये करताना त्यांनी धर्म मध्ये आणला नाही.


Americans_3  H

कोविड-१९च्या साथीमध्ये ज्या चार लाख अमेरिकन्सना प्राण गमवावे लागले, त्यांना शपथविधी दिनाच्या आदल्या संध्याकाळी बाइडेन आणि कमला हॅरिस यांनी विशेष श्रद्धांजली वाहिली होती. बाइडेन यांनी कॅथॉलिक चर्चमध्ये मोठ्या प्रार्थनेने शपथविधी दिनाची सुरुवात केली. त्याला त्यांनी कॅथॉलिक नसलेल्या दोन्ही पक्षांतील सिनेट हाउसमधील प्रमुखांना आमंत्रण दिले होते आणि तसे सर्व नेते तेथे उपस्थितही होते. त्यांच्या शपथविधी सोहळ्याच्या वेळेस आधी कॅथॉलिक धर्मीय प्रीस्टकडून प्रार्थना म्हटली गेली. बाइडेन यांच्या भाषणातही बायबलचा संदर्भ होता. नंतर एका तरुण कृष्णवर्णीय कवयित्रीने तिची कविता म्हणून दाखवली, तीदेखील कॅथॉलिक होती. हे सर्व लिहिताना, धर्म मध्ये आणायचा उद्देश नाही आहे. बाइडेन कुठेही गैर वागले असे म्हणायचे नाही. किंबहुना ते खूप समतोल वृत्ती ठेवूनच होते. त्यांचे पाय जमिनीवरच होते. केवळ इतकेच दाखवावेसे वाटते की अमेरिकेसारख्या देशातील राष्ट्राध्यक्ष आपले धर्माचरण करताना कमी पडत नाही आणि अमेरिकन माध्यमे-विचारवंत त्यावरून त्याच्यावर ऊठसूट शंका घेत नाहीत अथवा टीका करत नाहीत. हे केवळ बाइडेन यांच्या संदर्भातच नाही, तर आधीच्या राष्ट्राध्यक्षांच्या बाबतीतही लागू आहे.


शपथविधी सोहळा हा अमेरिकन लोकशाहीचा सोहळा असतो.
त्याला पारंपरिक पद्धतीने मावळता राष्ट्राध्यक्ष-उपराष्ट्राध्यक्ष, हयात असलेले माजी राष्ट्राध्यक्ष-उपराष्ट्राध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, सर्व राष्ट्रीय स्तरावरचे लोकप्रतिनिधी आणि निमंत्रित मान्यवर उपस्थित असतात. ह्या वर्षी, ट्रंप यांनी ते हरले हे शेवटपर्यंत जाहीरपणे कधीच मान्य केले नाही आणि शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्याचे टाळून सकाळीच त्यांच्या नवीन घरी फ्लोरिडाला प्रस्थान केले. अर्थात एक ट्रंप, सोडले तर बाइडेन यांच्या विरोधातील विरोधी पक्षीय रिपब्लिकन नेते आणि माजी राष्ट्राध्यक्ष या कार्यक्रमास हजर होते. तरीदेखील या सर्व घटनातून सामाजिक दुही परत परत जाणवणे अपरिहार्य होते आणि त्याच वेळेस नेत्याची भाषा आणि संदेश कसा असतो ते महत्त्वाचे असते.


बाइडेन यांच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून झालेल्या पहिल्या भाषणाचा रोख संपूर्ण अमेरिकन जनतेशी संवाद साधायचा होता.
मग ते ट्रंप यांचे समर्थक असतील अथवा ट्रंप यांचे विरोधक असतील. पण फूट पाडलेल्या समाजातील जखमा भरून काढण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न होता. आपण आपल्या सत्तेचे उदाहरण न देता, आपल्या उदाहरणाची (आदर्शवादाची) सत्ता (प्रभाव) जनतेसमोर ठेवू. (“And we’ll lead, not merely by the example of our power, but by the power of our example.”) अशी ग्वाही त्यांनी भाषणात केवळ अमेरिकेलाच नाही, तर जगाला उद्देशून दिली. सर्व अमेरिकन जनतेला एकत्र येण्याची हाक देत असताना बाइडेन यांनी खालील वचन अमेरिकन जनतेला दिले -


My fellow Americans, I close the day where I began, with a sacred oath before God and all of you. I give you my word, I will always level with you. I will defend the Constitution. I’ll defend our democracy. I’ll defend America and I will give all, all of you. Keep everything I do in your service, thinking not of power, but of possibilities, not of personal interest, but the public good. And together we shall write an American story of hope, not fear. Of unity, not division. Of light, not darkness. A story of decency and dignity, love and healing, greatness and goodness. May this be the story that guides us. The story that inspires us and the story that tells ages yet to come that we answered the call of history. We met the moment. Democracy and hope, truth and justice did not die on our watch, but thrived. That America secured liberty at home and stood once again as a beacon to the world. That is what we owe our forebears, one another and generations to follow.

 

थोडक्यात मराठीत सांगायचे, तर त्यांनी भाषणाच्या शेवटी, देवाची शपथ घेऊन परत वचन दिले की ते प्रामाणिकपणे जनतेच्या हिताचेच करतील, राज्यघटनेस आणि लोकशाही सांभाळतील, अमेरिकेचे संरक्षण करतील. व्यक्तिगत स्वार्थ न सांभाळता सामजिक हित जपतील. अमेरिकेची कथा ही आशावादी असेल, भीती दाखवणारी नसेल, समाजाला जोडणारी असेल, समाज फोडणारी नसेल, ज्याच्यात भारदस्तता आणि आदर्शवाद असेल, एकमेकांवर आस्था असेल, प्रेम असेल. लोकशाही आणि आशावाद, सत्य आणि न्याय यांचा आपल्या सत्तेत नाश होणार नाही याची काळजी घेतली जाईल. अमेरिकेने घरी स्वातंत्र्य सांभाळले आणि जगासाठी आदर्श बनली हे आपल्याला आत्ताच्या तसेच येणार्‍या पिढ्यांना आदर्श ठेवा म्हणून करून दाखवायचे आहे.


Americans_2  H  

बाइडेन यांचे भाषण हे अमेरिकेच्या दुखर्‍या जखमेवर फुंकर मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता. त्यात येणारे यश हे अमेरिकेस आणि अमेरिकेच्या जागतिक प्रभावामुळे इतरत्रसुद्धा चांगले ठरू शकेल. तरीही अजून दिल्ली दूर आहे असेच म्हणावेसे वाटते. शपथविधी झाल्यावर, आठवड्यानंतर हा लेख लिहीत असतानादेखील आजच अमेरिकन Department of Homeland Securityची सूचना बातमीमध्ये दिसते की जो बाइडेन अध्यक्ष झालेले ज्यांना मान्य नाही अशा अमेरिकन नागरिकांकडून अमेरिकेत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. अर्थात अमेरिकन सुरक्षा व्यवस्था डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून आहे आणि तसे काही घडणार नाही, अशी आशा करू या.

राष्ट्राध्यक्ष झाल्या झाल्या बाइडेन यांनी आधीच्या सरकारचे अनेक निर्णय रद्द तरी केले अथवा स्थगित तरी केले. त्यातील काही प्रमुख निर्णयांपैकी ज्याचा भारताला फायदा होऊ शकतो, तो म्हणजे स्थलांतरितांबाबतचा निर्णय. ट्रंप सरकारने आधी मुस्लीम राष्ट्रातील स्थलांतरितांवर बंदी आणली होती. तसेच अनेक भारतीय ज्या एच-वन व्हिसावर येतात, त्यामध्ये त्यांच्या वैवाहिक जोडीदारासही ट्रंप यांनी काम करण्यावर बंदी आणली होती. बाइडेन यांच्या धोरणामुळे आता जोडीदारास असे काम करणे सोपे जाऊ शकेल. दुसरे प्रमुख धोरण पॅरिस करारसंदर्भात आहे. ट्रंप यांनी त्यातून अमेरिकेस बाहेर काढले होते. आता बाइडेन यांनी पॅरिस करारामध्ये अमेरिकेचा परत प्रवेश निश्चित केला आहे. परिणामी कराराच्या अंतर्गत असलेली तंत्रज्ञाने जी प्रगत राष्ट्रांकडून विकसनशील राष्ट्रांना मिळणे गरजेचे आहे, ते सहज शक्य होईल. ओबामाच्या काळात इराणबरोबर अमेरिकेने केलेला करार ट्रंप यांनी रद्द केला होता. परिणामी भारताला इराणकडून तेल घेणे अवघड झाले होते. आता ते परत सुकर होऊ शकेल. ही आणि अशी इतर काही धोरणे नक्की किती सहजतेने परत सक्रिय होतात, यावर भारताला होणारा फायदा तर ठरेलच, तसेच बाइडेन त्यांच्या स्थानिक अमेरिकन राजकारणात किती प्रभावी ठरू शकत आहेत, हेदेखील समजेल.

बाइडेन यांच्या भाषणाशी आणि एकूणच बाइडेन यांच्या सरकारशी अमेरिकेत जन्मलेल्या भारतीय पिढीचे चांगलेच नाते आहे. बाइडेन यांचे प्रमुख भाषण लेखक (Speech Writer) हे अमेरिकेत जन्माला आलेले विनय रेड्डी आहेत. बाइडेन यांचे शपथविधी भाषण लिहिण्यात विनय रेड्डी यांचा सक्रिय सहभाग होता. बाइडेन यांच्या सरकारमध्ये कमला हॅरिस यांच्यासहित भारतीय वंशाचे २२ चेहरे आहेत. ते विविध खात्यांमध्ये उच्चपदस्थ म्हणून काम करणार आहेत. अर्थात नजीकच्या अनेक अमेरिकन धोरणांवर भारतीय वंशीयांचा प्रभाव दिसणार आहे. कमला हॅरिस यांच्या व्यतिरिक्त डॉक्टर विवेक मूर्थी यांचा प्रभाव लगेच दिसू शकेल, कारण ते अमेरिकेचे सर्जन जनरल होणार आहेत आणि बाइडेन यांच्या कोविड टास्क फोर्समध्ये ते प्रमुख आहेत.

अमेरिकेत भारतीयांची लोकसंख्या अमेरिकन लोकसंख्येच्या साधारण ०.८५% इतकीच आहे. आणि तरीदेखील राष्ट्रीय प्रशासनात आणि मंत्रीमंडळात इतके भारतीय चेहरे दिसणे ह्यामधून भारतीयांचे शिक्षण आणि कर्तृत्व दिसतेच, तसेच एकूणच त्यांच्यावर असलेला विश्वासही दिसतो. हे नक्कीच अभिमानास्पद आहे. अर्थात ते अमेरिकन असल्याने त्यांचे विचार आणि राष्ट्रीय स्वार्थ हे अमेरिकन हिताशी जोडलेले असणार आणि ते योग्यही आहे. फक्त तसा स्वार्थ जोपर्यंत भारतीय राजकारणात हस्तक्षेप करत नाही तोपर्यंतच.


Americans_1  H

बाइडेन यांचे सेक्रेटरी ऑफ स्टेट (परराष्ट्र मंत्री) अॅंथनी ब्लिंकेन यांना त्यांच्या पदासाठी सिनेटमध्ये सुनावणीच्या वेळेस विरोधी पक्षातीला सिनेटर मिट रोमनी यांनी अमेरिका-भारत संबंध यावरून प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना ब्लिंकेन म्हणाले की क्लिंटन यांच्या काळात चालू झालेले अमेरिका-भारत संबंध, दोन्हीकडे कुणाचेही राज्य असले तरी वृद्धिंगत होत गेले आहेत आणि बाइडेन यांच्या नेतृत्वाखालीदेखील ते आणखी वृद्धिंगत होतील. बाइडेन यांच्या डेमोक्रॅटिक पक्षात असे काही भारतीय वंशीय आणि काही अभारतीय राजकारणी आहेत, जे त्यांच्या टोकाच्या डाव्या विचारसणीमुळे, भारतीय डाव्यांशी वैचारिकतेने जवळ आहेत आणि परिणामी मोदी सरकारच्या विरोधात असल्याचे बर्‍याचदा दिसते आणि जाणवते. काश्मीर आणि सी.ए.ए. संदर्भात हे भारताच्या विरोधात गेले आहेत. बाइडेन सरकारवर अशा टोकाच्या डाव्यांचा किती प्रभाव पडतो, यावर परराष्ट्र धोरण आणि विशेषत: अमेरिका-भारत संबंध याचे दृश्य परिणाम दिसू शकतात.

आज अमेरिकेस चीनकडून सैनिकी, आर्थिक नीती आणि विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात खूप मोठे आव्हान आहे. ट्रंप सरकारने चीनच्या बाबतीत जे धोरण ठेवले, त्यापेक्षा बाइडेन सरकारचे वेगळे धोरण असण्याची शक्यता कमी आहे. पण वरकरणी प्रतिक्रिया देताना ती ट्रंप यांच्यापेक्षा वेगळी दिसेल. थोडक्यात, रिपब्लिकन अथवा डेमोक्रॅट्स दोघेही चीनला विश्वासार्ह समजत नाहीत. म्हणून भारताची तेथे आवश्यकता आहे. तीच गोष्ट पर्यावरणीय बदलावरील पॅरिस करारासंदर्भात भारत असण्याची गरज आहे. त्या व्यतिरिक्त भारताने ज्या पद्धतीने कोरोना साथ हाताळली आणि आता ज्या वेगात लसीकरण चालू झाले आहे, भारत आजूबाजूच्या देशांना मदत करत आहे, त्यावरून भारताची म्हणून एक प्रतिमा तयार झाली आहे, जिच्या विरोधात जाणे अमेरिकेसदेखील अवघड आहे.

थोडक्यात, राष्ट्रे स्वत:चा स्वार्थ पाहून आंतरराष्ट्रीय मैत्री करत असतात. आज भारत-अमेरिका मैत्रीची गरज जशी भारतास आहे, तशीच - किंबहुना अधिकच अमेरिकेस आहे. नुकतेच अमेरिकेचे बाइडेन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलीवन यांनी मोदी सरकारचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना फोन करून बाइडेन यांचा भारत-अमेरिका मैत्रिसंबंध अधिक दृढ करण्याचा उद्देश सांगितला. म्हणूनच हे संबंध दृढ होतील हे नक्की. फक्त त्याचा वेळ आणि त्याचे यशापयश येणारा काळच ठरवेल.