अभियंता तरुणाची यशस्वी अंजीरशेती

विवेक मराठी    12-Feb-2021
Total Views |

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खोर-डोंबेवाडी गावचे समीर डोंबे यांची कहाणी अफलातून आहे. ‘इंजीनिअर ते अंजीर उत्पादक शेतकरीहा त्यांचा प्रवास प्रेरक आहे. समीर यांनी अंजीर प्रक्रिया उद्योगातपवित्रकहा ब्रँड नावारूपाला आणला आहे. नुकतेच भारतीय डाक विभागाने या प्रयोगशील शेतकर्याच्या नावाने पोस्ट स्टँप तयार करून त्याचा गौरव केला आहे.


krushi_4  H x W

पुणे  जिल्ह्यातील खोर-डोंबेवाडी हे सहा हजार लोकसंख्येचे डोंगरकुशीतले गाव. या गावात कांदा, डाळिंब, अंजीर ही पिके घेतली जातात. अंजीर हे त्यातील मुख्य पीक. पारंपरिक शेतीमुळे शेतकरी उभा राहणार नाही, असे या गावातील शेतकर्यांचे मत आहे. अंजीर हे कमी पाण्यावर येणारे काटक फळझाड आहे.
 

दौंड परिसरातील हवामान अंजीर लागवडीस पोषक आहे. त्यामुळे खोर-डोंबेवाडी गावात आज बहुतांश शेतकरी अंजिराची शेती करताहेत. सध्या या गावात 250 हेक्टर क्षेत्रावर अंजीर उत्पादन घेतले जाते. आजअंजिराचे गावम्हणून खोर-डोंबेवाडी गावाची ओळख निर्माण झाली आहे. गावातील नवीन पिढी मोठ्या मेहनतीने आणि आत्मविश्वासाने शेतीत उतरत आहे.

 

समीर मोहनराव डोंबे हे त्यातील एक मुख्य नाव. अवघ्या तीस वर्षांच्या या युवकाने आपल्या शेतीत आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. समीर यांची पाच एकर शेती आहे. या शेतीच्या माध्यमातून नव्या पिढीतल्या या भूमिपुत्राने आपल्या सुख-समृद्धीचा पाया घातला आहे.

 

समीर यांनी पुण्यातील आघाडीच्या विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीई मेकॅनिकलची पदवी घेतलेली आहे. विशेष म्हणजे दहावीत, बारावीत गावात प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान मिळवला आहे.

 


krushi_2  H x W 

ज्ञानाचा शेतीत उपयोग

बीईची पदवी घेतल्यानंतर समीर यांनी पुण्यातील एका जर्मन कंपनीत दीड वर्ष काम केले. तिथे मिळणार्या पगारात त्यांना आर्थिक सुबत्ताही आणता आली असती, पण शेतीचा लळा मात्र त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. अवघ्या दीड वर्षांत ठाम निश्चय करत त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन शेतीची कास धरली. गावाकडे परतल्यानंतर त्यांनी शेतीची माहिती, अभ्यास करायला सुरुवात केली. यातून त्यांच्या अंजीरशेतीचा जन्म झाला. प्रथम त्यांनी अडीच एकरात अंजिराची लागवड केली होती, आज ती पाच एकरांत पसरली आहे. आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतीत करत त्यांनी अल्पावधीत अंजीरशेती यशस्वी करून दाखवली आहे. खर्च वजा जाता ते वर्षाकाठी लाखो रुपयांची कमाई करत आहेत.

 

प्रक्रिया उद्योगाची उभारणी

झपाटून जाऊन काम करणे, सूक्ष्म निरीक्षण-अभ्यासातून शेतीत नवननवे प्रयोग करणे हे समीर यांचे गुण आहेत. या गुणामुळेच त्यांच्यातला कृतिशील शेतकरी तयार झाला आहे. या वैशिष्ट्यांमुळे आज त्यांच्या शेतावर स्वर्ग अवतरला आहे. अशा देखण्या शेतीवर समीर यांचा अंजीर शेतीचा प्रक्रिया उद्योग उभा आहे. या उद्योगासाठी त्यांना मुद्रा योजनेतून 35 लाखाचे अर्थसाहाय्य मिळाले.

 

आज या प्रकल्पातून अंजिरापासून नावीन्यपूर्ण जॅमची पल्पची निर्मिती करताहेत. विशेष म्हणजे बाजारपेठेत आपल्या उत्पादनाची योग्य ओळख व्हावी, म्हणून त्यांनीपवित्रकहा ब्रँड बाजारात आणला आहे. पवित्रक - अंजिराचे संस्कृत नाव. पवित्रक ब्रँडची उत्पादने भारताच्या सर्व प्रमुख शहरांत उपलब्ध आहेत. या प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून गावातील 22 मजुरांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला आहे.


krushi_1  H x W 

फळबागेवरील कीटकनाशकांचा खर्च टाळण्यासाठी विषमुक्त शेती उत्पादनासाठी समीर स्वतःच कीटकनाशकांची निर्मिती करीत आहेत. त्यामध्ये नीमतेल, करंजतेल, दशपर्णी अर्क या गोष्टींचा समावेश आहे. या सर्व गोष्टींमुळे अंजिराचे एकरी उत्पादन भरघोस वाढून अधिकाचा लाभ मिळत आहे.

 

प्रक्रिया उद्योगाच्या संदर्भात बोलताना समीर म्हणाले, “आज कृषिक्षेत्राचा व्याप झपाट्याने वाढत आहे. शेतीसमोर अनेक आव्हाने जशी आहेत, तसे उपायदेखील आहेत. अंजिराचे उत्पादन वाढल्यानंतर आणि दरामध्ये होणारी घसरण लक्षात घेतल्यानंतर त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी अतिरिक्त शेतीमालावर प्रक्रिया केंद्राकडे मी वळलो. आज शेतकर्यांकडे फळबागा असून उपयोगी नाहीत, तर तेथे सुसंघटित शेतीचे वर्षभर चालणारे प्रकल्प असायला हवेत हे माझ्या लक्षात आले. यातून मी अंजीर प्रक्रिया उद्योगाला सुरुवात केली.”

 

अंजीर प्रक्रिया उद्योगामुळे गाव-शिवारातील अंजीर उत्पादकांना मोठा फायदा झाला आहे. समीर कंपनीसाठी लागणारा कच्चा माल शेतकर्यांकडून बाजारभावाप्रमाणे खरेदी करतात. यामुळे शेतकर्यांसाठी वाहतुकीची सोय आणि वेळेची बचत झाली आहे.

विक्रीचे व्यवस्थापन

शेतीमाल विकणे चांगला दर मिळवणे या शेतकर्यांसमोर प्रमुख समस्या आहेत. शेतकर्यांनी आपल्या मालाच्या विक्रीचे व्यवस्थापन प्रभावीपणे केले पाहिजे, तरच आपण बाजारपेठेत टिकाव धरू शकतोअसे समीर डोंबे म्हणाले.

 

समीर पुढे सांगतात कीगुणवत्ता ही माझ्या मालाची ओळख आहे. फळाचे उत्तम पॅकिंग केल्याने प्रभावीपणे मालाची विक्री करता येत आहे. त्यासाठी स्वतः मी विपणन व्यवस्था निर्माण केली आहे. आज मी सुपर मार्केटच्या माध्यमातून टाटा, बिर्ला, रिलायन्स अशा आघाडीच्या उद्योग समूहांशी जोडलो गेलोय ते गुणवत्तेमुळेच. मला या ठिकाणी बाजारपेठेच्या तुलनेत दीडपट लाभ मिळतोय. विशेष म्हणजे ग्राहकांना सेंद्रिय मालाची खात्री पटावी म्हणून पॅकिंगवरपीजीएस ग्रीनहा सेंद्रिय प्रमाणीकरण प्रक्रियेचा लोगोही वापरतो. या माध्यमातून मी गेल्या पाच-सात वर्षांत स्वतःचा ग्राहक वर्ग तयार केला आहे.

 

समीर यांच्या अंजीरशेतीची ओळख महाराष्ट्रभर पसरली आहे. त्यांच्या प्रकल्पाला भेट देण्यासाठी विविध ठिकाणांवरून शेतकरी येत असतात. राज्यांतर्गत प्रक्षेत्र भेट शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत अकोला, वर्धा, यवतमाळ या ठिकाणांवरून आलेल्या शेतकर्यांना अंजीरशेतीचे, तसेच प्रक्रिया उद्योगाचे मार्गदर्शन समीर करत असतात.


krushi_3  H x W

 
 टाळेबंदीत वीस टन अंजिराची विक्री

लॉकडाउनच्या काळात शेतीमालाची विक्री करणे ही एक मोठी समस्या होती. या काळात मालाची कशी विक्री केली हे सांगताना समीर म्हणाले, “माझा पूर्वीपासूनच सतत ग्राहकांशी थेट संपर्क-संवाद होता. टाळेबंदीच्या काळात याचा मला मोठा फायदा झाला. यामुळेच मी माझ्या शिवारातल्या 40 शेतकर्यांच्या अंजिरांनाही बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. मालाची विक्री करण्यासाठी व्हॉट्सअॅपवर ग्राहकाच्या ऑर्डर्स स्वीकारल्या. पुण्यातील सोसायट्यांवर लक्ष केंद्रित करून तब्बल वीस टन अंजिरांची सुरक्षित विक्री केली. या खडतर काळातही 13 लाखांचा व्यवसाय झाला.

 

भविष्यातील नियोजन

अंजीरशेतीतून मिळालेले समाधान, प्रक्रिया उद्योगात यशस्वी झालेला प्रयोग लक्षात घेऊन समीर यांनी आगामी काळातही नवनिर्मितीचा ध्यास घेतला आहे. याबाबत समीर सांगतात, “शाश्वत शेती केली तर त्यातून पुरेसा आर्थिक लाभ होतो, हे मला स्वानुभवातून शिकायला मिळाले. अंजीरापासून जॅम, पल्प अशा प्रकारची उत्पादने मी घेतोच आहे, शिवाय येत्या काळात सुके अंजीर निर्मितीचे, वाईन निर्मितीचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले आहे. त्याचबरोबर शेतकर्यांना त्यांचे सामूहिक उत्पादन आणि विपणन यामधून फायदा करण्याकरिता शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना करण्याचा माझा मानस आहे.”

 

डोंबे-पाटील फूड्स प्रा.लि. कंपनीच्या माध्यमातून असंख्य शेतकर्यांशी ते जोडले गेले आहेत. त्यामुळे शेतकरी उत्पादक गट स्थापनेला गटाच्या विकासासाठी मोठी मदत होणार आहे. भारतीय डाक विभागाने केलेल्या गौरवाबद्दल सांगताना समीर म्हणाले, “मी फार मोठा नशीबवान आहे की माझा भारतीय डाक विभागाच्या स्टँपवर फोटो झळकतोय. भारतीय डाक सेवेनेमाय स्टँपही योजना सुरू केली आहे. त्या अंतर्गत माझा नावाचा स्टँप तयार झाला आहे. एका शेतकरीपुत्राचा यातून गौरव झाला आहे, याचे समाधान मला आहे. याबद्दल मी भारतीय डाक विभागाचे आभार मानतो. माझे वय लक्षात घेता मला आणखी फार मोठा पल्ला गाठायचा आहे.”

 

समीर यांना शासनाचे विविध स्वयंसेवी संस्थांचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. जगजीवन राम अभिनव किसान पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिनिष्ठ पुरस्कार हे त्यातील हे मुख्य पुरस्कार आहेत.

 

समीर डोंबे यांनी लहान वयात शेतीत जे बदल घडवून आणले आहेत ते कौतुकास्पद आहे. आजच्या तरुणांनी समीर यांचा आदर्श घेऊन वाटचाल केली पाहिजे.

 

संपर्क : समीर डोंबे

अंजीर उत्पादक शेतकरी,

डोंबेवाडी, ता. दौंड.

95524 35003