सेन्सेक्सची वाढ : खरी की फुगवटा?

विवेक मराठी    17-Feb-2021
Total Views |

शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने उच्चांकाची नवी पातळी गाठल्यानंतर सर्वसामान्य गुंतवणूकदाराच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. सेन्सेक्सची ही उसळी म्हणजे नुसताच फुगवटा आहे की त्यामागे काही सयुक्तिक कारणे आहेत? या चढ-उताराचे दीर्घकालीन परिणाम काय असतील? नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पाच्या शेअर मार्केटवर उमटलेल्या पडसादाचा अर्थ काय? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुंतवणूक करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे का? या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.

 
eco_1  H x W: 0
 

17 जानेवारी 2020 रोजी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 41,945वर बंद झाला, तर 23 मार्च 2020 रोजी तो 25,981वर बंद झाला - म्हणजे अवघ्या अडीच महिन्यांत तो 39%ने कोसळला.

 

शेअर बाजाराची गंमत ही आहे की 20%नी उतरलेला सेन्सेक्स पुन्हा त्याच पातळीवर येण्यासाठी तो 25%नी वाढावा लागतो. 39%नी उतरलेला सेन्सेक्स पुन्हा त्याच पूर्वपातळीवर येण्यासाठी 62%ची वाढ व्हायला हवी. मात्र सेन्सेक्स 9 फेब्रुवारी 2021ला - म्हणजे केवळ साडेदहा महिन्यांत 51,329वर बंद झाला, म्हणजे 3 मार्च 2020 ते 9 फेब्रुवारी 2021 या अवघ्या साडेदहा महिन्यांत सेन्सेक्सने 97%ची उसळी मारली.

 

शेअर बाजारात गुंतवणूक करणार्यांचा मनात नेहमी एक प्रश्न येत असतो, ‘हीच योग्य वेळ आहे का गुंतवणूक करायला?’ याचे उत्तर आहे, जर आपण दीर्घकाळ गुंतवणूक करणार असाल तर कुठलीही वेळ योग्यच आहे. कारण कुठल्याही 10 वर्षांच्या कालखंडात शेअर बाजाराने सरकारी रोख्यांच्या (Government Securitiesच्या) व्याजदरापेक्षा किंवा बँकांच्या मुदत ठेवींपेक्षा किमान 2% अधिक परतावा दिला आहे. मात्र जर आपण शेअर बाजाराचा सेन्सेक्स कमी असताना किंवा आपल्याला गुंतवणूक करायची असलेला शेअर उतरला असताना गुंतवणूक केली असेल, तर कित्येकदा हा परतावा 80% ते 90%सुद्धा मिळालेला आहे.

 

आता हेच बघा, अगदी म्युच्युअल फंडाच्या सेन्सेक्स फंडात किंवा निफ्टी फंडात जर कोणी मार्च 2020मध्ये गुंतवणूक केली असती, तर वर्षभरातच त्याची गुंतवणूक 90%नी वाढली असती. अर्थातती योग्य वेळसाधणे क्वचितच शक्य होते, त्यामुळे फार कमी गुंतवणूकदारांना असा भरघोस परतावा मिळतो. शेअर बाजारात गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी आपल्या गृहकृत्यदक्ष पत्नीकडून काही शिकायला हवे. ती ज्याप्रमाणे कोथिंबीर स्वस्त झाली की पाटोड्या किंवा कोथिंबिरीच्या वड्या करते किंवा मटार स्वस्त झाले की मटारच्या करंज्या करते किंवा टोमॅटो स्वस्त झाल्यावर घरी सॉस करून ठेवते, तद्वतच शेअर मार्केटचा निर्देशांक कमी झाला असताना किंवा आपल्याला घ्यायच्या शेअरची किंमत कमी झाल्यावर शेअर खरेदी करायला हवी.

जानेवारी 2020पासून कोरोना/कोविडच्या केसेस येऊ लागल्या आणि पुढील तीन-चार महिन्यांत अर्थव्यवस्था केवळ कोलमडलीच नाही, तर लॉकडाउनमुळे अर्थचक्र पूर्णतः थांबले. याचे दूरगामी परिणाम होणार, हे मार्च महिन्याच्या शेवटी दिसू लागले. 24 मार्च 2020ला पहिला लॉकडाउन लावण्यात आला, पण तोवर सेन्सेक्स 35%नी कोसळलाही होता. शेअर बाजार भविष्यांतील घटनांचा अंदाज वर्तमानात करतो असे म्हणतात. कोविडचा अर्थव्यवस्थेवर किती भीषण परिणाम होणार आहे याचा अंदाज शेअर बाजाराने आधीच लावला होता, हे यावरून दिसून येते.

 

मात्र त्यानंतर लॉकडाउनच्या काळातसुद्धा सेन्सेक्स थोडाफार वर चढत होता, याचे कारण भारत सरकारने कोविडचा सामना करण्यासाठी उचललेली पावले, 12 मे 2020 रोजी जाहीर केलेल्याआत्मनिर्भर भारतया अभियानाची सुरुवात, जगातील प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत भारतातील कोविडने मृत्युमुखी पडण्याचे कमी प्रमाण, तसेच कुठल्याही टीकेने खचून जाता कोविडची लस भारतातील औषध कंपन्यांनी बनवावी यासाठी भारत सरकारने केलेला पाठपुरावा, या अशा एका पाठोपाठ एक केलेल्या अनेक उपायांचा परिणाम सेन्सेक्स वाढीवर झाला.

 

सध्या सेन्सेक्सने उच्चांकाची नवी पातळी गाठली असली, तरी हेसुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे की आजमितीस ट्रॅव्हल / टूरिझम/हॉटेल असे अनेक उद्योग अजूनही पूर्वपदावर आलेले नाहीत, पण त्या मार्गावर या उद्योगांची वाटचाल सुरू आहे, म्हणून सेन्सेक्स अजून काही काळ तरी अशीच वृद्धी दाखवेल, अशी आशा आहे.

 

सेन्सेक्स वाढीचे महत्त्वाचे आणखी एक कारण म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतातील शेअर बाजारात फार मोठ्या प्रमाणावर केलेली गुंतवणूक. वैयक्तिक गुंतवणूकदार गुंतवणूक करताना खूपसा अभ्यास किंवा विचार करीत नसले, तरी संस्थागत गुंतवणूकदार मार्केटचा अभ्यास केल्याशिवाय गुंतवणूक करीत नाहीत. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांना भारतातील शेअर बाजारात आणि पर्यायाने भारतातील उद्योगांत का गुंतवणूक करावीशी वाटली असेल, याचा विचार करता पुन्हा आपल्याला तेच उत्तर मिळते की भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने पूर्वपदावर येते आहे, म्हणून.

 

वाढलेला सेन्सेक्स हा फुगवटा आहे का?

17 जानेवारी 2020 ते 9 फेब्रुवारी 2021 - म्हणजे जवळपास वर्षभरात सेन्सेक्सची वाढ 22% झाली. मा. अर्थमंत्र्यांनी संसदेत अर्थसंकल्प जाहीर करण्यापूर्वी, म्हणजे 29 जानेवारी 2020ला सेन्सेक्स 46,285वर बंद झाला होता, म्हणजे ही वाढ होती केवळ 10%. यावरून सध्याची सेन्सेक्समधील वाढ ही अकल्पित किंवा अवास्तव नाही, असे दिसून येते. 2008च्या जागतिक मंदीच्या वेळेस जसे जगातील सर्व शेअर बाजार कोसळले, तसे काही आता होण्याची शक्यता दिसत नाही.

सेन्सेक्स ऐतिहासिक उच्च पातळीवर जाण्याची काही प्रमुख कारणे आहेत -

* कोविडचा ओसरलेला प्रभाव

* कोविडच्या लसीचे उत्पादन आणि लसीचे अनुकूल परिणाम

* अमेरिकेत बदललेली राजवट

* भारतातील राजकीय स्थैर्य

* अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणणाराच नव्हे, तर अर्थव्यवस्थेला चालना देणारा 2021-22चा अर्थसंकल्प.

अर्थसंकल्प आणि सेन्सेक्स

भारताच्या अर्थमंत्री मा. निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारीला सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे वर्णनदिशादर्शक, अभूतपूर्व आणि अर्थव्यवस्थेला गती देणारा अर्थसंकल्पअसे करावे लागेल. मा. अर्थमंत्र्यांनी रस्ते, महामार्ग, बंदरे, विमानतळ अशा पायाभूत सोयींसाठी केलेली मोठी तरतूद, आरोग्याच्या क्षेत्रात मागील वर्षीच्या तुलनेत केलेली घसघशीत 137%ची वाढ, भांडवली खर्चात केलेली मोठ्या प्रमाणातील वृद्धी, विमा कंपन्यातील विदेशी गुंतवणूकदारांची हिस्सेदारी 49%वरून वाढवून 74% करणे, भारत पेट्रोलियम, पवनहंस, आयुर्विमा महामंडळ, दोन सरकारी बँका आणि एक सरकारी विमा कंपनी यातील निर्गुंतवणुकीतून 1,75,000 कोटी रुपये उभे करणे अशा महत्त्वाकांक्षी घोषणा अर्थसंकल्पात आहेत. आधारभूत किमतीत अभूतपूर्व अशी वाढ करण्याची घोषणा त्यांनी केली आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राजकोषीय जबाबदारीचा - एफ आर बी एमचा नियम बाजूला सारून वित्तीय तूट 3.5%वरून वाढून 9.5% होईल असे गृहीत धरले आहे. यामुळे विकासकार्यांसाठी सरकार अधिक रक्कम खर्च करू शकेल आणि त्यातून रोजगारास चालना मिळेल.

eco_1  H x W: 0 

या अभूतपूर्व अर्थसंकल्पाचे स्वागत शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने जोरदार उसळी मारून केले. माजी अर्थमंत्री चिदंबरम यांनी लिहिलेल्या एका लेखात जरी अर्थसंकल्पालासंवेदनाहीनअसे म्हटले असले, तरी भारतीय अर्थव्यवस्थेवर या अर्थसंकल्पाचे दूरगामी परिणाम होणार, हे नक्की.

शेअर बाजारात गुंतवणूक करणार्यांना सावधगिरीच्या सूचना

1. Fundamentally strong म्हणजे मूलभूत सशक्त कंपन्यांतच गुंतवणूक करा.

2. सर्व बचत शेअर बाजारात गुंतवू नका. एकूण बचतीपैकी 80/100 वजा तुमचे वय एवढे टक्केच गुंतवणूक शेअर बाजारात करा. उदा., वय 40 असल्यास 40% ते 60%हून अधिक बचतीची गुंतवणूक शेअर बाजारात करू नका.

3. कर्ज काढून शेअर बाजारात आपले पैसे लावू नका.

 

4. कुणीतरी दिलेल्या टिपांवर किंवा सल्ल्यांवर विश्वास ठेवून कुठल्या तरी कंपनीचे शेअर घ्यायचे असे करू नका. स्वतःचा अभ्यास करूनच गुंतवणूक करा.

5. नामांकित कंपन्यांत किंवा आर्थिक स्थैर्य असणार्या कंपन्यांतच सुरुवातीस गुंतवणूक करा.

6. अभ्यास करणे किंवा रोज थोडा वेळ शेअर बाजाराकडे तसेच आपल्या गुंतवणुकीच्या वर / खाली जाण्याकडे वेळ देणे शक्य नसल्यास म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजनांत गुंतवणूक करा. जोखीम कमी घ्यायची असल्या इंडेक्स फंडात किंवा बाँड फंडात गुंतवणूक करा.

7. वेगवेगळ्या क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये - उदा., औषध उत्पादन करणार्या, बँक, वाहन उद्योग, माहिती तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा.

 

8. स्टॉप लॉस म्हणजे शेअर एका विशिष्ट किमतीहून खाली आल्यावर नुकसानीचा विचार करता ते विकून टाका.

9. गुंतवणूक दीर्घ मुदतीसाठी करा.

 

10 नीट अभ्यास झाल्याशिवायडे ट्रेडिंग’ - म्हणजे शेअर सकाळी घेणे आणि दिवसभरात दुसर्या दिवशी विकून टाकणे हा उद्योग करू नका.

शेअर बाजाराची सध्याची स्थिती बघता, निर्देशांकात आणखी वृद्धी होईल अशी लक्षणे दिसताहेत. 51 हजारावर गेलेला सेन्सेक्स हा फुगवटा नसून कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारल्याने निर्देशांक चढत आहे, तेव्हा घाबरण्याचे कारण नाही.

लेखक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे वित्त सल्लागार तसेच इर्डा  अर्थात विमा नियामक आणि विकास प्राधिकरण या भारतातील विमा क्षेत्रावर कायद्याचे नियंत्रण ठेवणार्या नियामक मंडळाचे माजी सदस्य आहेत.