भक्तिसेतुनिर्माता स्वामी रामानंद

विवेक मराठी    18-Feb-2021
Total Views |

दलित, शोषित आणि उपेक्षित जातींना, त्याचबरोबर स्त्रियांनाही समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून स्वामी रामानंद यांनी समाजात समरसतेचे वातावरण निर्माण केले. त्यांनी बाह्य अवडंबराऐवजी आध्यात्मिक साधनेत अंतर्गत भावनांच्या शुद्धतेवर जोर दिला. अस्पृश्यतेचे उच्चनीचतेचे निर्मूलन, वैष्णव धर्मातील समानतेचे समर्थन केले. 

DEV_1  H x W: 0

भगवंताच्या भक्तीसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणे हेच संतांचे जीवनकार्य समजले जाते. पण हे विधान अर्धसत्य होय. खरा संत संपूर्ण समाजात भगवंताचे दर्शन करीत असल्यामुळे मानवकल्याणार्थ आपला देह झिजवीत असतो. आपल्या आयुष्यात हेच कर्तव्य चरितार्थ करणार्या स्वामी रामानंद यांचा जन्म तीर्थराज प्रयागमधील कान्यकुब्ज ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित पुण्य सदन शर्मा आणि आईचे नाव सुशीला देवी. काशीतील पंचगंगा घाट श्रीमठ येथे गुरू राघवानंद यांच्या मार्गदर्शनाखाली रामानंदांनी अल्पावधीतच सर्व शास्त्रे-पुराणांचा अभ्यास करून अष्टांग योगाचा आध्यात्मिक अभ्यास पूर्ण केला. त्यानंतर गुरूंच्या आज्ञेने परिव्राजक बनून देशातील स्थिती-गतीचे ज्ञान व्हावे म्हणून देशाटन केले. देशकालपरिस्थिती पाहून आपल्या अवतारकार्याचे त्यांना भान आले. ते जेव्हा मठात परतले, तेव्हा मठवासीयांना एका वेगळ्याच रामानंदाचे दर्शन झाले.

आपले गुरू हा मठ आपल्या या प्रिय शिष्याच्या स्वाधीन करतात की काय? या भयाने ग्रासलेल्या मठवासीयांनी नैवेद्य समर्पणाच्या वेळी रामानंदांना अडवणूक करणारा प्रश्न विचारला, “भगवंताचा नैवेद्य तयार करणे आणि समर्पण करणे या गोष्टी काटेकोरपणे करायला हव्यात. पण परिव्राजक बनून देशाटन करताना समाजातील नानाविध लोकांशी तुमचा जवळून संपर्क आला असेल. त्यामुळे स्पर्शदोष आणि दृष्टिदोष यापासून तुम्ही मुक्त राहू शकला आहात का?”

मठामध्ये पाळला जाणारा आचारधर्म आपण समाजात वावरताना कसे पाळू शकणार? सर्वांभूति परमेश्वर ही गोष्ट जर आपणास मान्य असेल, तर आपण असे कर्मकांड आणि जुन्या प्रथा पाळणे खरोखरच आवश्यक आहे का? कर्मठपणा पाळला, तर आपल्याला पुरीच्या जगन्नाथाचा प्रसादसुद्धा भक्षण करता येणार नाही. वास्तविक पाहता आपण पुरीतील सर्वसमावेशक जगन्नाथाचे चित्र देशभरात साकारण्याचा प्रयास केला पाहिजे.”

 

रामानंदांचे उत्तर ऐकून कर्मठ कर्मकांडाचा आग्रह धरणारे मठवासीय संतापले, पण राघवानंद शांतपणे म्हणाले, “वत्सा, तुझे विचार क्रांतिकारक आहेत, पण ते तुला जीवनभर टिकवून चरितार्थ करता येतील का? मार्गातील विघ्नांना घाबरून तू माघार तर घेणार नाहीस ना!”

महाराज, आपल्या आशीर्वादाने विघ्नेच माझ्या मार्गातून माघार घेतील असे मला वाटते!” रामानंद म्हणाले.

तेव्हा राघवानंद गंभीरपणे म्हणाले, “मठातील आचारधर्म पाळला जाणे अनुचित नव्हे. पण रामानंदाला जो आत्मसाक्षात्कार झाला आहे, तो पाहता मी त्याला आश्रमीय परंपरांच्या बंधनातून मुक्त करीत आहे.”

मग त्यांनी आपल्या प्रिय शिष्याला आशीर्वाद दिला -

करो पुत्र विमुखों को भक्तिपरापण।

करें सभी श्री रामचरित्र का गायन॥

 

त्यांना जे आत्मज्ञान झाले आहे, ते जगाच्या कल्याणासाठी प्रसारित करण्याची गुरूंनी आज्ञा केली. जाता जाता या ठिकाणी सहजच .पू. श्रीगुरुजींच्या चरित्रातील एका प्रसंगाची आठवण होते. गुरुजींच्या असीम कर्तृत्वाचा परिचय असूनही स्वामी अखंडानंदांनी आपल्या निर्वाणाची चाहूल लागल्यानंतर मठाची भावी काळातील कोणतीही जबाबदारी त्यांच्यावर सोपविली नव्हती. याबाबत अन्य कुणी पृच्छा केली असता, “गोळवलकर हा नागपुरास परतून डॉ. हेडगेवारांचे कार्य पुढे चालविणार आहेअसे सांगितले होते. असे महान पुरुष महान कार्यासाठीच जन्माला येतात, हेच यावरून दिसते.

 

राघवानंदांना आपल्या प्रिय शिष्याचे अवतारकार्य ज्ञात असल्यामुळे एका अर्थाने त्यांच्या समर्थ पंखांसाठी त्या काळात संपूर्ण आकाश मुक्त केले. तो काळ कोणता होता? .. 1299 ते 1448 या स्वामी रामानंदांच्या अवतारकाळात उत्तर भारतात मुस्लीम आक्रमकांचे चांगलेच बस्तान बसले होते. दिल्लीत आणि भारतभरात अन्यत्रही मुस्लिमांची सत्ता बळकट बनली होती. सर्वसामान्य हिंदू जनतेमध्ये आणि हिंदू राजांमध्येही संघटनसूत्राचा अभाव असल्यामुळे मुसलमानांच्या टोळधाडीचा सामना करण्यास ते असमर्थ बनले होते. मुस्लीम सत्तेला उखडून टाकण्याचे प्रयास बर्याचशा ठिकाणी तुरळक स्वरूपात चालले असूनही ते संघटित नसल्यामुळे अपयशी ठरत होते.

 

मुसलमान शासकांनी अगदी उच्छाद मांडला होता. हिंदू मंदिरे पाडून तेथे मशिदी बांधणे आणि हिंदू अध्यात्मग्रंथांची जाळपोळ करणे हे त्यांचे अंगीकृत कार्य झाले होते. जुलमाने आणि जबरदस्तीने हिंदूंना बाटविणे, त्यांच्या मुलीबाळींना भ्रष्टविणे हे कार्य जोमाने चालू होते. दुःखाने नमूद करावेसे वाटते की, आताची सकिना बेगम अथवा जमिला खातून यांच्या पूर्वज सत्यवती अथवा जानकी या नावानेच ओळखल्या जात होत्या, हे निश्चित! मुसलमानांच्या विरोधात उभे राहणार्यांना यमसदनास पाठविले जात होते. या हैदोसामुळे संपूर्ण हिंदू समाजाला निराशा आली होती न्यूनगंडाने ग्रासलेले होते. अशा काळात श्री रामानंदांची भक्ति चळवळ उभी राहिलेली आहे. त्यामुळे याच राजकीय सामाजिक पार्श्वभूमीवर या भक्तिचळवळीचा अभ्यास केला गेला पाहिजे.

 

आपल्याला विशिष्टाद्वैत संप्रदायाचे रामानुजाचार्य माहीत आहेत. याच संप्रदायात चौदा पिढ्यांनंतर रामानंदाचार्यांचा अवतार झाला. रामानुजाचार्य यांनी क्षीरसागरात शेषावर शयन करणार्या चतुर्भुज महाविष्णूंना आपले आराध्य मानले होते आणि त्यांचीच उपासना करण्याचा समाजाला उपदेश केला होता. पण कालचक्र पालटलेले पाहता, बदललेल्या काळात समाजाने मानवरूपात अवतरित झालेल्या दोन भुजांच्या मर्यादापुरुषोत्तम कोदंडधारी प्रभू रामचंद्रांचीच उपासना करावी, असा स्वामी रामानंदाचार्यांनी समाजाला उपदेश केला. त्याचबरोबर समाजाला महाबली हनुमानाची उपासना करण्याची त्यांनी शिकवण दिली. हनुमंतांचा भीमपराक्रम समाजात जागृत करण्यासाठी हिंदी भाषेत स्वामी रामानंदांनी हिंदी भाषेत सुंदर आरती रचली -

 

आरती कीजै हनुमान लला की।

दुष्ट दलन रघुनाथ कला की॥

जाके बल गरजे महिं काँपै।

रोग सोग जाके सिमाँ चाँपे॥

अंजनीसुत महाबलदायक।

साधुसंत पर सदा सहायक॥

 

याचेच प्रतिबिंब आपणसत्राणें उड्डाणे हुंकार वदनी, करी डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनीया रामदासविरचित मराठी आरतीत पाहू शकतो. त्यामुळे एका अर्थाने रामानंदांचे हे कार्य समर्थ रामदासांच्या कार्याला समांतर असेच जाणारे आहे.

लोकभाषांचा स्वीकार हे रामानंदांचे आणखी एक महत्त्वपूर्ण कार्य मानावे लागेल. त्यांच्यापूर्वी देववाणी संस्कृतमध्ये निरूपण करण्याचीच परंपरा होती. मात्र रामानंदांनी आपली साहित्यरचना करताना हिंदी भाषेचाच अवलंब केला. नंतर तुलसीदासांनी अवधी भाषेत रामचरितमानस लिहिले. त्याचबरोबर कबीर, रैदास, मीरा, धन्ना, पीपा या सर्वांनीच लोकभाषेत काव्यरचना करून सर्वसामान्यांना भक्तीचा अधिकार मिळवून दिला. याच कारणाने रामानंदांची भक्तिचळवळ सर्वसमावेशक बनली. मागास समजल्या जाणार्या जातीजमातीतही संत जन्माला आले सर्व भाषांमध्ये भक्तिरचना होऊ लागल्या.

 

रामानंदांचे प्रमुख शिष्य बारा असून त्यांना द्वादश भागवत असे संबोधले जाते. ‘भक्ती द्रविड ऊपजी, लाओ रामानंदअसे रामानंदांबाबत म्हटले जाते; म्हणजे दक्षिण भारतातून उत्तर भारतात भक्तीचा प्रवाह आणण्याचे श्रेयही त्यांनाच दिले आहे. त्यांच्या शिष्यवर्तुळात एकीकडे जातपात, अस्पृश्यता, कर्मकांडाचे अवडंबर या गोष्टींना अजिबात मानणारे आणि निर्गुणभक्तीचे महत्त्व प्रतिपादन करणारे संत कबीरदास, संत रैदास, संत सेना न्हावी आणि संत पीपा नरेश अशी मंडळी होती; त्याचबरोबर दुसरीकडे भगवंताचा अवतारवाद मानणारे आणि मूर्तिपूजेचे समर्थक स्वामी अनंतानंद, भवानंद, सुरसुरणंद, नरहरियानंद हे सगुणोपासक आचार्य होते. सगुण आणि निर्गुण अशी प्रभू रामचंद्राची दोन रूपे आहेत आणि आपल्याला आवडेल त्या स्वरूपात आपण त्यांची उपासना करू शकतो, असे त्यांचे मत होते.

 

एकदा हिंदू बाटून दुसर्या धर्मात गेला की मग तो स्वधर्मात परतू शकत नाही, अशी तत्कालीन हिंदू समाजात भ्रामक समजूत होती. डॉ. उदय प्रताप सिंह यांनी आपल्या ग्रंथात नमूद केले आहे की, ‘जबरदस्तीने इस्लाम धर्मात ओढले गेलेल्या हिंदूंना पुन्हा स्वधर्मात आणण्यासाठी परावर्तन संस्काराचा विधी रामानंद यांनी प्रचलित केला. हे त्यांचे ऐतिहासिक पाऊल होते. बाटलेल्या 34 हजार राजपूतांना अयोध्येचे राजे हरिसिंह यांच्या पुढाकाराने पुन्हा स्वधर्मात आणले.’ (अनुचिंतन एवं अनुसंधान, पृ. 97)

भक्ति आंदोलन और भक्ति काव्यया ग्रंथात शिवकुमार मिश्र असे सांगतात, “रामानंद हे निःसंदेह उत्तर भारतातील सांस्कृतिक नवजागरणाचे अग्रदूत होते. गौतम बुद्ध यांच्यानंतर अभावानेच एखाद्या धार्मिक आणि सांस्कृतिक पुढार्याला एवढ्या विशाल समुदायाचे नेतृत्व आणि मार्गदर्शन करण्याचा गौरव लाभला असेल. आपल्या देशातील विखरून जाणार्या आणि विषयुक्त होणार्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाला त्यांनी नवसंजीवनी प्रदान केली. जातपात, वर्ग आणि वर्ण यांच्या भिंती पाडून त्यांनी भक्तिमार्ग सर्वांसाठी सुगम केला आणि आपल्या समाजाला संस्कृतीच्या मृतप्राय होणार्या बौद्धिक तसेच भावात्मक चेतनेला नवजीवन प्रदान केले. सवर्ण-अवर्ण, शूद्र-चांडाळ, मुसलमान या सर्वांनाच त्यांनी पोटाशी धरले रामनामाचा मंत्र देऊन सर्वांना समान निष्ठा आणि समान लक्ष्य यांच्या बळकट सूत्राने बांधले.”

 

रामानंदांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल भाष्य करताना डॉ. बदरी नारायण श्रीवास्तव यांनी आपल्या शोधनिबंधात असे लिहिले आहे की, ‘ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी वानरसेनेला सागर ओलांडून लंकेत जाण्यासाठी सेतू बांधला होता, त्याचप्रमाणे भवसागरातून प्राणिमात्रांना तरून जाता यावे यासाठी रामानंदांनी दुसरा सेतूच निर्माण केला.’

 

याच संदर्भात आचार्य पृथ्वीसिंह आझाद यांनी स्वामी रामानंद यांचे महत्त्व विशद करताना असे लिहिले आहे की, ‘स्वामी रामानंद आणि गुरू रविदास यांच्या माध्यमातून सुलतानांच्या धर्मांधतेचा मुकाबला करण्याची शक्ती पददलित जनतेला लाभली. रामानंद यांनी ज्या सेतूची निर्मिती केली तो सेतू होता - ‘हरिभजन, रामभक्ती.’ समानता हाच रामानंदांचा नारा होता आणि त्यातच त्या युगातील संपूर्ण समस्यांचे निराकरण करण्याचे सामर्थ्य होते.’

 

स्वामी रामानंद यांनी आपल्याश्रीवैष्णव-मताब्ज-भास्करया ग्रंथात असे स्पष्टपणे सांगितले आहे की, सर्व जण शरणागत होण्याचे अधिकारी आहेत. कुल-बल-शक्ती-धन याची येथे मुळीच गरज नाही. भगवंताच्या चरणी आपल्याला केवळ विशुद्ध आत्मसमर्पण करण्याचीच गरज असते.

 

रामानंदांचे शिष्य कबीरदासांनी मुसलमानांचे पाखंड आणि गोवध यांच्या विरोधात अनेकदा कानउघाडणी केली. त्या वेळेस दिल्लीवर मुस्लीम शासक सिकंदर लोदी याचे शासन होते. कबीरदासांच्या आणि रामानंदांच्या अनुयायांची संख्या पाहून लोदीलाही केवळ हात चोळत बसावे लागले होते. मनात असूनही कबीरदासांना कोणतीही शिक्षा फर्मावता आली नाही. जेव्हा पंजाबात संत कबीर यांच्याप्रमाणेच गुरू नानक देव निर्गुण भक्तीचा प्रचार-प्रसार करीत होते, त्या काळात आक्रमक बाबराने श्रीराममंदिराचा विध्वंस करून तेथे मशीद बांधली होती. नानक देव यांनी बाबराच्या या कृतीची कठोर शब्दांत निर्भर्त्सना केली होती. मात्र नानक देवांचे समाजातील स्थान एवढे मोठे होते की बाबराला त्यांच्या केसालाही धक्का लावता आला नाही. रामानंदांबाबत शीख बांधवांना अत्यंत आदर असल्यामुळे संत नामदेवांप्रमाणे स्वामी रामानंदांची पदेसुद्धा गुरू ग्रंथसाहेब यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत.

 

दलित, शोषित आणि उपेक्षित जातींना, त्याचबरोबर स्त्रियांनाही समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून स्वामी रामानंद यांनी समाजात समरसतेचे वातावरण निर्माण केले. बाह्य अवडंबराऐवजी आध्यात्मिक साधनेत अंतर्गत भावनांच्या शुद्धतेवर जोर दिला. अस्पृश्यतेचे उच्चनीचतेचे निर्मूलन, वैष्णव धर्मातील समानतेचे समर्थन केले. “जाति-पाँति पूछै नहिं कोई, हरि को भजै सो हरि का होईहा महामंत्र देणार्या रामानंदांनी कर्ता सुधारक बनून सर्व जातीपातींमध्ये 25 हजार शिष्यांचा मोठा भक्तसमुदाय उभा केला. आपल्या समाजात भक्तीचा आणि समरसतेचा भाव जागविणे सोपे आहे, पण तो टिकवून ठेवणे महाकठीण आहे हे जाणून असल्यामुळे रामानंदांनी सातत्यपूर्ण प्रयासांची कास धरली. त्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी मठांची आणि आखाड्यांची स्थापना केली आणि तेथे वेगवेगळ्या आचार्यांची नियुक्ती केली. त्याचबरोबर त्यांनी आपल्या शिष्यसमूहातअवधूतअथवाबैरागीया नावाने संबोधिले जाणार्या साधूंचा मोठा दळभार निर्माण केला. या दळाने सतत देशभरात भ्रमण करीत राहून जनजागृती आणि रामभक्तीचा प्रसार करावा, अशी शिस्त त्यांनी घालून दिली.

 

धर्मपाल सिंहल यांनीगुरू रविदास जीवनी एवं दर्शनया ग्रंथात रामानंदाचार्यांना सामाजिक क्रांतीचे अग्रदूत संबोधले आहे. ते म्हणतात - ‘इतिहासातील या तमोयुगात सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, गरीब, दुर्बळ असाहाय्य जनांसाठी दीपस्तंभ बनलेले स्वामी रामानंद केवळ भगवद्भक्त नव्हते, तर सामाजिक, आर्थिक, राजनीतिक ऊहापोहाबाबत दीर्घ चिंतन करून नवे निष्कर्ष काढणारे आणि समाजाचा मार्ग प्रकाशित करणारे एक महात्मा होते. त्यांनी सर्वसामान्य जनतेला भक्तीचा अधिकार मिळवून दिला, उच्चनीचतेचा कृत्रिम भेदभाव संपुष्टात आणण्याचा उपक्रम राबविला, रामनामाची पावन गंगा अगदी पार झोपडीपर्यंत नेली, समाजातील ठेकेदारांना ललकारले आणि मानवतावादी अध्यात्मवादी चिंतनाला बळ दिले.’

 

अशा रितीने आपल्याला लाभलेल्या 111 वर्षांच्या दीर्घायुष्याचा सदुपयोग स्वामी रामानंदांनी सर्वसामान्यांसाठी भक्तिसेतूची निर्मिती करण्यासाठीच केला, असे दिसते.