अजाण की स्लीपर सेल?

विवेक मराठी    19-Feb-2021
Total Views |

21 वर्षांची दिशा भारतीय राज्यघटनेनुसार सज्ञान आहे. मतदानासाठी लायक आहे. ती शेतकरी आंदोलनाच्या आडून खलिस्तानवाद्यांना अप्रत्यक्ष मदत करते, आंदोलनाची दिशा स्पष्ट करणारे व आंतरराष्ट्रीय सहभागासाठी मार्गदर्शक ठरेल असेटूलकिटतयार करण्यात सहभागी होते, त्या मुलीच्या वयावरून गळे काढणे हे एकाच वेळी हास्यास्पद आणि चीड आणणारे आहे.

disha_1  H x W:

शेतकरी आंदोलनाशी संबंधित बहुचर्चितटूलकिटबनवण्यात आणि हे आंदोलन आंतरराष्ट्रीय आहे असे भासवण्यात सहभागी झालेल्या दिशा रवीला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आणि एकच हलकल्लोळ माजला. तिच्या वयाकडे सहानुभूतीने पाहावे अशी तिच्या समर्थकांची हास्यास्पद अपेक्षा आहे. दिशा ज्या वयाची आहे, त्या वयात किंवा त्याहूनही आधीच्या वयात समाजासाठी विधायक कामे केलेली अनेक भारतीय नावे डोळ्यासमोर आहेत. या वयातला जोश, ऊर्जा, काहीतरी करत राहण्याची ऊर्मी योग्य दिशेला वळली की शतकानुशतके लक्षात राहतील अशी कामे होतात; ज्यांची दिशाच चुकते, त्यांची दिशा रवी होते.
 

21 वर्षांची दिशा भारतीय राज्यघटनेनुसार सज्ञान आहे. मतदानासाठी लायक आहे. ती शेतकरी आंदोलनाच्या आडून खलिस्तानवाद्यांना अप्रत्यक्ष मदत करते, आंदोलनाची दिशा स्पष्ट करणारे आंतरराष्ट्रीय सहभागासाठी मार्गदर्शक ठरेल असेटूलकिटतयार करण्यात सहभागी होते, त्या मुलीच्या वयावरून गळे काढणे हे एकाच वेळी हास्यास्पद आणि चीड आणणारे आहे.

मुळात हे कृषी आंदोलन अखिल भारतीय होता पंजाबकेंद्री झाले आहे. ज्या मुद्द्यांसाठी ते चालू आहे, ते पंजाबमधल्या अडत्यांचे, श्रीमंत जमीनदारांचे मुद्दे आहेत. एका प्रदेशापुरते सीमित झालेल्या या आंदोलनासाठीआंतरराष्ट्रीय शेतकरी आंदोलनअसा ट्विटरच्या दुनियेत हॅशटॅग वापरून, जागतिक स्तरावर भारताला आणि केंद्र सरकारला बदनाम करण्याचा हा पद्धतशीर आखलेला डाव आहे. जगातल्या खलिस्तान समर्थकांकडून - ‘पोएटिक जस्टिस फाउंडेशनकडून त्यांना यासाठी भरपूर आर्थिक साहाय्य मिळत असल्याच्या पुराव्यासहित बातम्या आहेत. त्यामुळेच आणखी कितीही काळ दिल्लीच्या सीमेवर बसून राहायची या आंदोलकांची तयारी आहे. हे नावाचे उरलेले शेतकरी आंदोलन खलिस्तानवाद्यांनी हायजॅक केले आहे, हे उघड गुपित आहे. पंतप्रधानांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत संवादासाठी तयार असल्याचे सांगितल्यावरही आणि शेतकर्यांना चर्चेसाठी आमंत्रण देऊनही तोडगा दृष्टिपथात येत नाहीये तो त्यामुळेच. म्हणूनच तंत्रज्ञानात तरबेज नव्या पिढीला हाताशी धरून समाजमाध्यमांमधून आंदोलनाची हवा कायम राखणे, आभासी जगात का होईना, त्याला आंतरराष्ट्रीय आंदोलन म्हणत अखिल जगताच्या समर्थनाचा देखावा निर्माण करणे अशी खेळी आंदोलनकर्ते खेळत आहेत. वास्तविक, यावरूनही हे आंदोलन पंजाबमधल्या शेतकर्यांसाठी नाही हा निष्कर्ष काढता येतो. या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्या प्रसिद्ध व्यक्तींची निवड केली, त्यावरून आंदोलकांचा हेतू उघड होतो. त्यांच्या माध्यमातून लाखोंपर्यंत हा विषय पोहोचवणे हेच त्यांचे उद्दिष्ट आहे.

पर्यावरणतज्ज्ञ म्हणून ज्या ग्रेटाची भलामण करण्यात येते, तिने तिच्या नवतंत्रज्ञानाबद्दलच्या समजशक्तीबाबत प्रश्नचिन्ह उभे राहील अशी घोडचूक केली आणि त्यामुळेच भारतातले युवा या जाळ्यात ओढले गेले आहेत हेे समोर आले.


तंत्रज्ञानातील
क्रांतीने आजवर सर्वार्थाने कष्टप्रद असलेली आंदोलनाची, चळवळीची प्रक्रिया एकदम सोपी करून टाकल्यासारखी वाटत आहे. वैचारिक बांधीलकी, विचारांची तर्कशुद्ध मांडणी, त्यासाठी लागणारी शारीरिक क्षमता हे आंदोलनातील सहभागासाठी आवश्यक असणारे मुद्दे गौण ठरत आता डिजिटल स्मार्टनेस हाच एकमेव निकष ठरू लागला आहे. तशा स्मार्ट मुलांना हेरून त्यांना जाळ्यात अडकवणे आणि एका महत्त्वपूर्ण आंदोलनाचा ते अतिमहत्त्वपूर्ण भाग असल्याचे भासवणे हा खेळ चालू आहे.


पर्यावरणाशी
संबंधित या आभासी चळवळीचे भारतात नेतृत्व करणारी दिशा रवी, शेतकर्यांच्या आंदोलनासाठी टूलकिट बनवण्यात का सहभागी होते? आंदोलकांनी हाती घेतलेले शेतकर्यांचे प्रश्न हे पर्यावरणविषयक प्रश्न आहेत का? पर्यावरणाची इतकी चिंता असेल, तर पंजाबमधला शेतकरी पीक कापणीनंतर शेतातले पीक जाळतो, त्यातून पर्यावरणाला किती हानी पोहोचते याची या पर्यावरणवाद्यांना कल्पना आहे? भातासारख्या पिकामुळे पाण्याचा किती अतिरिक्त उपसा पंजाबमध्ये होतो, त्यातून तिथले पाण्याचे स्रोत कसे आटत/संपत चालले आहेत, याची त्यांना जाणीव आहे? या विषयात त्यांनी तेथील शेतकर्यांमध्ये जाणीवजागृती/प्रबोधन केले आहे? याची उत्तरे नकारार्थी असतील, तर भारतातल्या या ग्रेटा समर्थकांना पर्यावरणवादी समजण्याची चूक आपण करायची का?

भारतातली युवा पिढी ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर असलेली पिढी समजली जाते. त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाचा फायदा कोण आणि कशासाठी करून घेत आहेत, याची एक झलक टूलकिटचे गुपित फुटल्यामुळे दिसली. दिशा रवीसहित आतापर्यंत जी तीन नावे समोर आली आहेत, ते तिघेही उच्चशिक्षित आहेत. टेक्नोसॅव्ही आहेत. या माध्यमातून फुटीरतावादी शक्तींना आपण साथ आणि बळ देतो आहोत याची त्यांना कल्पना नसेल अशी शक्यता वाटत नाही. तसे असते, तर दिशा रवीने या टूलकिटमुळे आपण कोणत्या भारतीय कायद्याच्या कचाट्यात येऊ शकतो, हे सांगितले नसते. तेव्हा परिणामांची पूर्ण कल्पना असूनही केलेला हा अविचार आहे. एक प्रकारे या आंदोलनातील स्लीपर सेलची भूमिकाच ते बजावत आहेत.


या
निमित्ताने काही गोष्टींबाबत सजग होण्याची वेळ आली आहे. आभासी जगात रममाण झालेल्या तरुण पिढीशी सुसंवाद असणे ही आजची सगळ्यात मोठी निकड आहे. तसेच, ज्यांनी आतापर्यंत समाजोपयोगी प्रश्नांवर यशस्वी आंदोलन वा चळवळी उभारल्या, त्यासाठी उत्तम संघटन उभारण्याची आणि थेट मैदानात उतरून प्रश्नांना भिडण्याची ज्यांची परंपरा आहे, त्यांनीही सतत विकसित होणारे, झपाट्याने बदलत असलेले नवतंत्रज्ञान आणि विविध समाजमाध्यमे याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला हवे. त्याचा विधायक कामात परिणामकारक वापर करायला हवा आणि आपल्या तरुणाईला असे स्लीपर सेल बनण्यापासून रोखायला हवे.