“संघ रमेशजींच्या हृदयातच” - पू. डॉ. मोहन भागवत

विवेक मराठी    20-Feb-2021
Total Views |

रमेश पतंगे यांचा अमृतमहोत्सव सोहळा संपन्न

vivek_1  H x W: 

आपल्या देशातील आपलेपणाचं अमृत हे आपल्या भेददृष्टीमुळे नासल्यासारखं झालं आहे आणि त्याला उपाय आपलेपणा हाच आहे. डॉ. हेडगेवारांनी आपल्या देशाला आपलेपणाचे अमृत द्यायचं काम केलं आणि त्याचं नाव संघ. संघ हा प्रत्येक स्वयंसेवकांचा प्राण आहे, त्याचा आत्मा आहे. स्वयंसेवक संघाचे हातपाय म्हणून काम करतात. संघ म्हणजे संकल्पनेच्या पातळीवर संपूर्ण हिंदू समाज. स्वयंसेवक या समाजासाठी आपलेपणातून जे जे कार्य शक्य होईल ते करतो. रमेश पतंगे यांच्या विविधांगी कार्यातही याच आपलेपणाचं प्रकटीकरण झालेलं दिसतंअसे रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी प्रतिपादन केले.

 
VIVEK_2  H x W:

सा. विवेकचे माजी संपादक, संविधानाचे गाढे अभ्यासक हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त विवेक समूहातर्फे प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासमवेत व्यासपीठावर रमेश मधुरा पतंगे, रमेश पतंगे अमृतमहोत्सवी समारोह समितीचे अध्यक्ष विमल केडिया, विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर, राजाभाऊ नेने स्मृती समितीचे अध्यक्ष हरसुखभाई ध्रुव, बडवे इंजीनिअरिंगचे श्रीकांत बडवे आदी मान्यवर उपस्थित होते. पूजनीय मोहनजी भागवत, देवेंद्र फडणवीस डॉ. कुकडे यांच्या हस्ते रमेश पतंगे यांना शाल आणि नंदादीप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उजळलेल्या 75 दिव्यांनी सोहळा नेत्रदीपक झाला. विवेकच्या महिला कर्मचारिवर्गाने मधुरा पतंगे यांची ओटी भरून सन्मान केला.


VIVEK_3  H x W:

 

आपल्या भाषणात सरसंघचालक पुढे म्हणाले, “रमेश पतंगे संविधानासारख्या क्लिष्ट विषयाची अतिशय साध्या, सोप्या भाषेत मांडणी करतात ते या आपलेपणातूनच. आपल्या लोकांसाठी त्यांना समजेल असं लिहायचं ही भावना त्यामागे असते. त्या आपलेपणाचं हे अमृत आहे. त्यामुळे आजचा अमृतमहोत्सव सोहळा विशेष आहे. संघाचं बीजरूप असलेले डॉ. हेडगेवार म्हणजे शुद्ध सात्त्विक प्रेम. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन समाजासाठी काम करणारे या शुद्ध सात्त्विक प्रेमाचं, अपार आत्मीयतेचं प्रकटीकरण आपल्या प्रत्येक कामात करतात. रमेशजी त्याचं एक उदाहरण आहेत.”

समरसता क्षेत्रातील त्यांच्या कार्याविषयी मोहनजी म्हणाले, “रमेशजींनी सामाजिक समरसतेच्या क्षेत्रात जे काम केलं आहे, ते आपल्या समोर आहे. या क्षेत्रात संघाने पुढे जायचं ठरवलं होतं. त्या दिशेने प्रत्यक्ष काही उभं करण्याचा पायलट प्रोजेक्ट महाराष्ट्रात उभा राहिला. त्यातील प्रमुख कार्यकर्ते रमेश पतंगे आहेत. आता लोक म्हणतात की रमेशजींच्या मागे संघ आहे. पण संघ त्यांच्या मागे नाही, तर हृदयातच आहे.”

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “संविधानात समता आहे, पण समरसतेचा उल्लेख नाही. मग तुम्ही समरसतेविषयी का बोलता? असे लोक विचारतात. समरसता असल्याशिवाय समता साधता येणार नाही. समरसता हा समतेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे असे आम्ही सांगतो. हिंदुत्व समरसता अद्वैत आहे हे रमेशजींच्या लेखनातून आमच्यापर्यंत पोहोचले. समरसताविषयक त्यांनी केलेल्या वैचारिक लेखनातून आमच्या विचारांमध्ये स्पष्टता आली.”

 
 
VIVEK_1  H x W:

रमेशजींच्या संविधानविषयक लेखनाविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, “भारतीय संविधानाची तत्त्वे सर्वांना समजावीत यासाठी पतंगे यांनी विशेष प्रयत्न केले. लोकशाही ही खर्या अर्थाने हिंदुत्वाचा विचार आहे. लोकशाहीत सर्वात महत्त्वाची आहे ती सहिष्णुता आणि ही सहिष्णुता हिंदू विचारांचा महत्त्वाचा स्तंभ आहे. त्यामुळे भारतीय लोकशाही जगातील प्रगल्भ लोकशाही झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातील तत्त्वे भारतीय विचारपरंपरेतून घेतली.”

सध्या चालू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस म्हणाले, “सध्या कोणताही विचार करता वेगवेगळ्या समाजगटांत तेढ निर्माण करण्यासाठी योजनापूर्वक परिषदा घेऊन, त्या माध्यमातून निर्नायकी आंदोलने करून देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न विदेशी शक्ती करत आहेत. अशा वेळी रमेशजींसारख्या विचारवंतांच्या कामाचे मोल लक्षात येते.”

पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे यांनी आपल्या भाषणात रमेशजींच्या कार्याचा वेध घेतला. ते म्हणाले, “रमेशजींनी स्वत: केलेले लेखन, संपादित केलेले अनेक ग्रंथ, स्मृतिग्रंथ पाहिले की अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषवण्याचे श्रेय त्यांना मिळू शकेल एवढे मोठे काम आहे. आपल्या लेखनाच्या माध्यमातून ते सर्वदूर पोहोचले. हे सहजसाध्य झालेले नाही. यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर संघर्ष करावा लागला. विरोधी विचारांच्या गटांसमोर जाऊन त्यांच्या तोंडावर आपली विचारधारा स्पष्टपणे मांडण्याचे साहस त्यांनी सातत्याने दाखवले.”

सत्काराला उत्तर देताना रमेश पतंगे म्हणाले की, “डॉ. हेडगेवार हे माझ्या सर्व लेखनाची, जीवनाची प्रेरणा आहेत. मी त्यांना पाहिलेलं नाही. पण मला पडणारे प्रश्न मी अंत:करणपूर्वक त्यांना विचारतो आणि त्यांच्याकडून मला उत्तरं मिळतात. त्यांनी मांडलेला संघ आणि त्यांनी जगलेला संघ यांचा माझ्या जीवनावर खोलवर परिणाम झाला आहे आणि म्हणून मला जी काही शक्ती प्राप्त होते, ती मी सर्व डॉक्टरांना अर्पण करतोअशा शब्दांत त्यांनी आपल्या कार्यऊर्जेचे रहस्य सांगितले.

पतंगे यांनी दामूअण्णा दाते, मुकुंदराव पणशीकर या वरिष्ठांचे तसेच विमल केडिया, दिलीप करंबेळकर या सहकार्यांचे आपल्या प्रवासातील महत्त्व विशद केले. ते म्हणाले, “सामाजिक समरसता मंच, भटके विमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद अशा अनेक विषयांत मी प्रारंभापासून आहे. हे सर्व दामूअण्णा दाते यांच्यामुळे शक्य झालं. त्यांचं सहकार्य नसतं, तर आज माझं काहीही अस्तित्व नसतं. दामूअण्णांसमोर कोणताही विषय मांडला की ते सकारात्मक प्रतिसादच देत असत. दामूअण्णांच्या रूपाने जणू संघ माझ्यामागे पर्वतासारखा ठामपणे उभा राहिला. हे जे बळ असतं, ते संघात काम केल्याशिवाय समजणार नाही. त्यामुळे मी केलेल्या कामाचं श्रेय मी दामूअण्णा, मुकुंदराव पणशीकर यांच्यासारख्यांना - म्हणजेच संघाला अर्पण करतो.

कामामध्ये आनंद मानणारे सहकारी मला विवेकमध्ये भेटले, हे मी माझं भाग्य मानतो. त्यांच्यामुळेच मी एवढं कार्य करू शकलोअसेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

विमल केडिया दिलीप करंबेळकर यांनी आपल्या भाषणात पतंगेंबरोबर काम करतानाचे अनेक अनुभव सांगितले. विमल केडिया यांनी 13 जुलै 1995च्या एका घटनेचा उल्लेख केला. “त्या वेळी संघाची महाराष्ट्र प्रांताची समन्वय बैठक होती. त्या बैठकीला सर्व क्षेत्रांतील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. त्या बैठकीच्या दोन बौद्धिक वर्गांपैकी सकाळचा बौद्धिक वर्ग श्रीपती शास्त्रीजी यांचाकार्यकर्ताया विषयावर असणार होता, तर दुपारचा बौद्धिक वर्ग अटलबिहारी वाजपेयींचाहिंदुत्व आणि समरसताया विषयावर होणार होता. मात्र अटलजी अपरिहार्य कारणामुळे येऊ शकणार नसल्याची सूचना आदल्या दिवशी मिळाली. त्यामुळे या विषयावर कोण बोलणार याची शोधाशोध सुरू झाली. त्या वेळी मी, रमेशजी आम्ही सर्व मधल्या फळीतील कार्यकर्ता होतो आणि रात्री निश्चित झाले की रमेश पतंगे तो विषय मांडतील. रमेशजींनी त्या दिवशी वर्गातहिंदुत्व आणि समरसताया विषयाची परखड, स्पष्ट शब्दात मांडणी केली. समरसता विषयात आपण कुठे कमी पडतो हेही त्यांनी दाखवून दिले. श्रोत्यांमध्ये आमचे अनेक वरिष्ठ होते. त्या दिवशीच्या भाषणात खर्या अर्थाने समरसतेचा भाव प्रस्थापित झाला असे मला वाटते. आणि आजचा हा सोहळा केवळ रमेशजींचा अमृतमहोत्सव नसून तो समरसतेचा भाव महाराष्ट्र प्रांतात प्रस्थापित झाला, त्याचाही आज रजतमहोत्सव आहेअसे त्यांनी सांगितले.

विमलजी पुढे म्हणाले की, “मी, मनु आणि संघया पुस्तकात त्यांनी छोट्या छोट्या उदाहरणांतून अतिशय महत्त्वाचा विषय मांडला आहे. त्या पुस्तकात माझाही काही ठिकाणी उल्लेख केला आहे. मी महानगर कार्यवाह म्हणून अनेक घरांमध्ये जात असे, त्या वेळी त्या घरांतील माता, बहिणी मला सांगायच्या कीमी, मनु आणि संघमधून आम्हाला तुमचा परिचय झालेला आहे. रमेशजींच्या लेखनाचे सामर्थ्य मी त्या वेळी अनुभवले.”

दिलीप करंबेळकर म्हणाले, “अनेक वेळा आपण कार्यक्रमात म्हणतो की सत्कार व्यक्तीचा नाही, तर विचारांचा असतो. पण या कार्यक्रमाच्या बाबतीत ही वस्तुस्थिती आहे. याचे कारण रमेश पतंगेंच्या जीवनामध्ये आणि विवेकच्या अस्तित्वामध्ये एकच वैचारिक ध्येय आहे. आणीबाणीनंतर संघामध्ये एक वैचारिक परिवर्तन झाले. संघामधील आंतरिक हिंदुत्वाची आणि एकात्मतेची भूमिका सर्व समाजाला त्याच्या परिभाषेतून पटवून देण्यात रमेश पतंगेंची आणि अन्य कार्यकर्त्यांची महत्त्वाची भूमिका होती. या परिवर्तनाला विरोध करणार्यांविषयी मनात द्वेष ठेवताही बदल घडवता येऊ शकतोे, हे रमेश पतंगेंनी त्यांच्या आचारातून, विचारातून आणि मांडणीतून सिद्ध केले. परिवर्तन आणि विद्रोह या दोन टोकांच्या भूमिकांपैकी परिवर्तनवादी भूमिका काय असू शकते, याचा परिचय रमेश पतंगेंनी लेखनातून करून दिला.”

या सोहळ्यात पतंगे यांचे दोन प्रातिनिधिक सत्कारही करण्यात आले. भालिवली येथील विवेक रूरल अँड डेव्हलपमेंट सेंटर या संस्थेच्या वनवासी भगिनींनी त्यांना पारंपरिक तारपा वाद्य देऊन, तर मध्य प्रदेश उत्तर प्रदेश येथून प्रकाशित होणार्या स्वदेश या हिंदी भाषिक मासिकाचे समूह संपादक अतुल तारे यांनी शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला.

या सोहळ्याला संघपरिवार, राजकीय, वैचारिक, सामाजिक, उद्योग, साहित्य अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. सा. विवेकच्या कार्यकारी संपादक अश्विनी मयेकर यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. कवयित्री संजीवनी तोफखाने यांनी खास या सोहळ्यासाठी लिहिलेले गीत निलेश ताटकर यांनी सादर केले, तर केतकी भावे-जोशी यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. मुख्य सोहळ्याआधी मान्यवरांसमवेत काही निवडक व्यक्तींचा अल्पोपाहाराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

- सपना कदम-आचरेकर