मानवकल्याणाचे ‘महायोगी’ गोरखनाथ

विवेक मराठी    04-Feb-2021
Total Views |

माणसातील उच्च-नीच हा भेदभाव गोरक्षनाथांना मुळीच मान्य नव्हता. सर्व वर्णांच्या गरीब-श्रीमंत मनुष्यांना ते समान दृष्टीनेच पाहत असत. त्यांनी केवळ हिंदूंमधील सर्व समाजघटकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला नसून यवनांनाही आपल्यात सामावून घेण्याचेही प्रयत्न केले होेते. गोरक्षनाथांचा हे विश्वचि माझे घरअसाच विचार होता.


gorkhnath_1  H

नेपाळपासून सिंहलद्वीप (श्रीलंका) आणि कामरूपपासून पंजाबापर्यंत आपला प्रभाव निर्माण करणारे गोरखनाथ म्हणजेच गोरक्षनाथ हे महायोगी सिद्धपुरुष होते. ते नाथपंथाचे प्रवर्तक होते. भगवान शिवप्रवर्तित योगमार्गाचा अनुनय करत असल्यामुळे त्यांनी बहुतेक बौद्ध योगसिद्धान्तांना शैव रूप प्रदान केले आहे. गोरक्षनाथांच्या अवतारकार्याच्या काळात भारतात राजकारण
, धर्म आणि संस्कृती याविषयी समाजात मोठी उलथापालथ झालेली दिसते.

 

महायोगी गोरखनाथांना समजून घेण्यासाठी त्यांच्या पूर्वीचा आणि त्यांच्या नंतरचा काळ नीट लक्षात घ्यावा लागतो. ‘‘गोरखनाथांची सावली भारताच्या 500 वर्षांच्या काळावर दाट पसरली आहे. त्यामुळे तो 500 वर्षांच्या काळ आपण गोरखनाथांच्या माध्यमातून जाणून घेऊ शकतो’’ असे थोर अभ्यासक रांगेय राघव यांनी गोरखनाथ और उनका युगया आपल्या डॉक्टरेटच्या शोधनिबंधात सांगितले आहे. यासाठी तत्कालीन राज्यव्यवस्था, राजकारण, धर्म आणि तत्त्वज्ञान, कला याचबरोबर अन्य विषयांचे अध्ययन आवश्यक मानले आहे. एक महत्त्वाचा विषय आपण लक्षात घेतला पाहिजे की, त्या काळातील धार्मिक चळवळी नीट लक्षपूर्वक पाहिल्या, तर त्या सामाजिक अथवा राजकीय चळवळीच होत्या; मात्र त्यांचा आधार येथील महान तत्त्वज्ञान होते आणि मानवकल्याण हाच धार्मिक चळवळींचा हेतू होता. लौकिक कल्याणाकडे दुर्लक्ष करून मानवाचे पारलौकिक कल्याण साधले जाईल, असा कोणत्याही संताचा अथवा सत्पुरुषाचा उपदेश नव्हता. पारलौकिक कल्याणाचा उद्देश समोर ठेवून आपला लौकिक व्यवहार चोख ठेवावा, असाच संतांचा उपदेश होता.

 

गोरक्षनाथ महायोगीच नव्हते, तर अत्यंत उच्च कोटीचे विद्वान होते. त्यांनी संस्कृत आणि अन्य भाषांतही साहित्य निर्माण केले आहे. त्यांचे ग्रंथ योग आणि वैद्यक या शास्त्रांचे गूढ ज्ञान कथन करतात. यामध्ये गोरक्ष-कल्प, गोरक्षसंहिता, विवेकमार्तंड, नाडीज्ञान प्रदीपिका, महार्थमंजिरी, योगचिंतामणी, योगमार्तंड, योगशास्त्र, योगसिद्धासनपद्धती, हठयोग, हठसंहिता, आत्मबोध आदी साहित्यरचनांचा समावेश आहे. गोरक्षनाथांची विस्तृत माहिती देणारा जयराज साळगावकर यांचा द गोरखनाथ इनलाइटनमेंटहा इंग्लिश ग्रंथ अतिशय उपयुक्त मानला पाहिजे. या ग्रंथात गोरक्षनाथांनी चारही युगांत अवतार घेतल्याचा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे पेशावर येथे गोरक्षनाथांचा जन्म झाला असून त्यांनी गोरखपूर, द्वारका आणि काठियावाड येथे भ्रमण केले होते असाही अर्थ काही इतिहासकारांनी लावलेला आहे. डॉ. हजारीप्रसाद द्विवेदी यांनी गोरक्षनाथांचे महापुरुषअसे सार्थ वर्णन केले आहे. त्यांनी आक्रमक मुस्लिमांनाही मानवकल्याणाचा बोध करून नाथपंथात पीरपरंपरा निर्माण केली.

 
gorkhnath_2  H

मानवकल्याण हेच गोरखनाथांचे अवतारकार्य होते. मात्र या असामान्य व्यक्तिमत्त्वाच्या भोवताली अनेकविध चमत्कार आणि पूरन भगत, रसालू गूगा, भर्तृहरी, गोपीचंद, मैनावती, मत्स्येंद्रनाथ, जालंधरनाथ यांच्याशी संबंधित अनेक आख्यायिकांचा मोठा गराडा झालेला आहे. त्यामुळे गोरखनाथांच्या ऐतिहासिक काळाबद्दलही निश्चित निवाडा करता येत नाही. विविध अभ्यासकांची मते लक्षात घेतल्यावर नववे ते अकरावे शतक असा त्यांचा कालखंड निश्चित करावा लागतो. या काळात बौद्ध तत्त्वज्ञानात अनेकविध संप्रदाय निर्माण झाले होते आणि यवनांनी भारताचे शोषण करण्यासाठी आपली पावले या दिशेने वळविलेली होती. हिंदू धर्मात सामाजिक घडामोडीचा तो काळ होता. अशा वेळी गोरक्षनाथांनी या भारतभूमीचे नेतृत्व केले आहे. येथील आध्यात्मिक चेतना, सांस्कृतिक एकता, सामाजिक एकात्मता आणि धार्मिक सौहार्द यांचे रक्षण करण्यातील त्यांचे योगदान अतुलनीय मानले पाहिजे. संत ज्ञानेश्वरांची गुरुपरंपरा वर्णन करताना गोरक्षनाथांचा उल्लेख होतो. ही परंपरा गोरक्षनाथ - गहिनीनाथ - निवृत्तिनाथ - ज्ञानेश्वर अशी मानली जाते. त्यामुळे अकरावे शतक हा गोरक्षनाथांचा कार्यकाळ मानता येतो.

महायोगी मत्स्येंद्रनाथांच्या कृपाप्रसादाने गोरक्षनाथांचा जन्म झाला होता. त्यांच्या जन्माच्या संदर्भात चमत्कारकथेचा येथे उल्लेख करण्याचे कारण नाही. आपले कान छेदून त्यात मुद्रा धारण करण्याच्या विधीमुळे नाथपंथीयांना कानफाटे योगीम्हणूनही ओळखले जाते. इतिहासाचे अभ्यासक जॉर्ज डब्ल्यू. ब्रिग्स यांचे गोरखनाथ अँड द कानफाटा योगीजहा अभ्यासपूर्ण ग्रंथ प्रसिद्धच आहे. यात त्यांनी असे नमूद केले आहे की, गोरखपंथीय योग्यांची अवहेलना करण्यासाठी आक्रमक मुसलमान त्यांना कानफाटाम्हणून संबोधित असत. नंतर समाजात हे नाव रूढ झाले. योगी मंडळींना समाजात मान असला, तरीही आपल्या घराण्यात ही योगी-बैरागी परंपरा येऊ नये म्हणून लहान मुलांना कानफाटे योग्यांपासून दूर ठेवण्याची पद्धतही काही भागात होती. या योगविद्येबाबत गूढ निर्माण झाले असल्यामुळे बारा वर्षांच्या मुलाला योग्याने आपल्यासोबत नेऊ नये म्हणूनही आपण विभूतीचा प्रसाद ग्रहण न करता तो उकिरड्यावर फेकल्याचा बहाणासुद्धा गोरक्षनाथांच्या लौकिक मातेकडून केला गेला असावा. आपण मुलाला जन्मानंतर धर्मकार्याला अर्पण करण्याचे मत्स्येंद्रनाथांना वचन देणारी आई नंतर पुत्रमोहात सापडली असावी. पण गोरक्षनाथांचे अवतारकार्य गुरू मत्स्येंद्रनाथ यांना माहीत असल्यामुळे त्यांच्या लौकिक मातेला बोध करून त्या बालकाला आपल्याकडे सोपविण्यास त्यांनी सांगितले असावे, असे आपण मानू शकतो आणि बारा वर्षे उकिरड्याच्या ढिगार्‍याखाली लपलेल्या बाल गोरक्षनाथांच्या चमत्कारी जन्मामागचे गूढ आपल्या लक्षात येऊ शकते.

gorkhnath_3  H

आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की केवळ वयाच्या बाराव्या वर्षीच ते मत्स्येंद्रनाथ यांचे शिष्य बनले होते आणि त्यांनी वैराग्य धारण केले होते. त्यांनी हिमालयाच्या गिरिकंदरात भ्रमण केले आणि तेथे योगसाधना केली. मात्र त्यांचे संपूर्ण जीवन समाजसन्मुखच राहिले आहे. एकांतप्रिय असलेल्या या योग्याने समाजकल्याणासाठी आपले आयुष्य वेचले आहे. त्यांचा शिष्यसंप्रदाय आपण पाहिला
, तर भारतातील मोठमोठ्या राजघराण्यावर त्यांचा प्रभाव पडलेला दिसतो. उज्जैन नरेश महाराज चंद्रसेन यांचे पुत्र राजा भर्तृहरी यांना गोरक्षनाथांनीच गुरुपदेश केला होता. गौडबंगाल प्रदेशाचे शासक गोपीचंद यांची राजमाता मैनावती ही भर्तृहरी यांची बहीण होती. गोपीचंद यांनीही पुढे योगदीक्षा घेतली, तेव्हा गोरक्षनाथांनी त्यांना कृपाशीर्वाद दिला होता. सियालकोटचे राजा पूरण हेसुद्धा गोरक्षनाथांचे शिष्य होते. ते पुढे चौरंगीनाथ या नावाने प्रसिद्ध झाले. हीर-रांझा ही पंजाबची अमर प्रेमकथा आहे. या कथेतील रांझाला गोरक्षनाथांनीच दीक्षा दिली होती. रांझाने जेथे योगसाधना केली, ती जागा गोरख-टीलाया नावाने प्रसिद्ध असून हे स्थान झेलम नदीच्या किनार्‍यावर आहे. मेवाड येथे मेवाड राज्य संस्थापक बाप्पा रावळ यांची एक तलवार जपून ठेवण्यात आलेली आहे आणि ही तलवार त्यांना गुरू गोरक्षनाथ यांनी दिलेली आहे व मोठमोठ्या शिळासुद्धा या तलवारीच्या प्रहाराने खंडित होत, असे मानले जाते. बाप्पा रावळ यांच्या काळातील नाण्यांवरही गुरू गोरक्षनाथांचे चित्र अंकित केल्याचे आढळते. याचे वर्णन जर्नल ऑफ एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल’ (1926-27) यामध्ये केलेले आहे. प्राचीन काळात हिंदू राज्य संस्थापनेची प्रेरणा देणार्‍या गोरक्षनाथांचेच गोरखपूर येथील गोरक्षपीठ हे ब्रिटिशांच्या काळापासून रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाचे केंद्र बनले होते आणि आता त्याच पंथाचे महंत योगी आदित्यनाथ यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत राममंदिराच्या उभारणीसाठी भूमिपूजन झाले आहे, हा दैवी योगायोगच म्हणावा लागेल.

गोरक्षनाथांचे वैराग्य इतके प्रभावी होते की मायामोहामुळे भोगविलासात रममाण झालेले आपले गुरू मत्स्येंद्रनाथ यांनाही चलो मछिंदर गोरख आयाअसे बजावून त्यांनी गुरुनिष्ठा चरितार्थ केली होती. रानी लूना चमारी, आसाम किंवा ओदिशा येथील रानी सुंदरन झांगचे रांझा (तेरावे शतक), राजपुताना येथील गूगा पीर, पेशावर येथील बाबा रतन (अकरावे अथवा बारावे शतक), राजा अजयपाळ, बाल नाथ आदींचेही गुरू मानले जातात. गोरक्षनाथांचे सर्वांत जुने मंदिर अल्लाउद्दीन खिलजीने पाडले होते, असे मानले जाते. शिखांच्या आदिग्रंथातही गोरक्षनाथांचा उल्लेख आहे. गुरू नानक देव यांना गोरक्षनाथांनी योगी बनावे असे सुचविले होते.

गोरक्षनाथांनी नेपाळमध्ये प्रवास केला होता. तेथे गोरक्षनाथांचे अनुयायी मोठ्या संख्येने होते, पण तेथील राजघराणे या अनुयायांना द्वेषभावनेने छळत होते. त्यांना अत्याचारापासून मुक्त करण्यासाठी गोरक्षनाथ नेपाळला गेले. पण तेथे त्यांचा नीट आदरसत्कार न झाल्यामुळे ते रागावले आणि त्यांच्या कोपामुळे नेपाळमध्ये दुष्काळ पडला होता. तेव्हा नेपाळनरेश गुरू मत्स्येंद्रनाथांना शरण आले. त्यांच्या सांगण्यावरून गोरक्षनाथांनी ढगांना पाऊस पाडण्याचा आदेश दिला आणि नेपाळमधील दुष्काळ संपला, असे म्हटले जाते. ब्रिग्स यांचे असे मत आहे की, गोरक्षनाथांनी नेपाळमधील नेवारिया शासन संपुष्टात आणले आणि ती भूमी गोरखा समाजाला सोपविली. आपली शक्ती दाखवून देण्यासाठीच गोरक्षनाथांनी तेथे 12 वर्षांचा दुष्काळ पाडला होता.

गुरू गोरक्षनाथ हे दीनदलितांचे तारणहार होते आणि सर्वांचे भले व्हावे या दृष्टीकोनातूनच समाजसेवा करीत होते. त्यांच्या काळात देशात सामंतशाही असल्यामुळे अनेक कुप्रथा आढळून येत होत्या. त्या समाजातून नाहीशा करण्याचे प्रयत्न गोरक्षनाथांनी चालविल्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या मनात त्यांच्याविषयी अढळ स्थान निर्माण झाले होते.


माणसातील उच्च-नीच हा भेदभाव गोरक्षनाथांना मुळीच मान्य नव्हता. सर्व वर्णांच्या गरीब-श्रीमंत मनुष्यांना ते समान दृष्टीनेच पाहत असत. त्यांनी केवळ हिंदूंमधील सर्व समाजघटकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला नसून यवनांनाही आपल्यात सामावून घेण्याचेही प्रयत्न केले होेते. गोरक्षनाथांचा
हे विश्वचि माझे घरअसाच विचार होता. गोरखपूर आणि गोरखा जातीशी त्यांच्या नावाचा संबंध जोडला जातो. गोरखपूरच्या गोरक्षपीठात आजही मकरसंक्रांतीचा मोठा उत्सव होतो आणि तेथे सर्व धर्म-जाति-वर्णांच्या मनुष्यांना खिचडीचा प्रसाद दिला जातो. ही फार पुरातन परंपरा आहे. गोरखनाथ एक महान क्रांतदर्शी योगी होते. त्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर कधीच भिस्त ठेवली नव्हती. कठोर साधनेच्या माध्यमातून मनुष्याने ज्ञानप्राप्ती करून घेतली पाहिजे असे ते मानत. ज्या काळात ब्राह्मणवादाचे आणि सामंतशाहीचे वर्चस्व होते, त्या काळात सर्व माणसे समान आहेत असा विचार त्यांनी मांडला होता. गुरुपरंपरेतून मिळालेला हाच मानवकल्याणाचा संदेश भूतां परस्परे पडों । मैत्र जीवांचे ॥अशा सोप्या भाषेत संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीतून मांडलेला आहे. याची मूळ प्रेरणा हे गोरक्षनाथच आहेत, हे निश्चित!