“गतिविधींच्या कामातून विकास शक्य होईल” - सरसंघचालक

विवेक मराठी    05-Feb-2021
Total Views |

संघकाम हे नित्यनूतन असून त्यात कालानुरूप बदल घडवून समाजपरिवर्तन करण्यासाठी संघ नेहमीच तयार असतो. संघकामाचा एक भाग म्हणून देशभर विविध गतिविधी काम करीत आहेत. एकच विषय घेऊन त्यावर सातत्याने काम करत अपेक्षित डदल घडवून आणणे हे गतिविधीचे काम. कोकण प्रांतातील गतिविधीच्या कार्यकर्त्यांशी सरसंघचालकांनी संवाद साधला आणि गतिविधीच्या कामाची आगामी दिशा स्पष्ट केली. गतिविधीच्या माध्यमातून सामाजिक विकास साध्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


RSS_1  H x W: 0

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नऊ दशकांहून अधिक काळ समाजजीवनात काम करत आहे. भारतमातेच्या परमवैभवासाठी कटिबद्ध असणारे संघस्वयंसेवक समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत असतात. जी जी समस्या समोर येईल, जो जो प्रश्न उपस्थित होईल त्यांची उत्तरे शोधत समाज एकरस बनवण्याचा हा प्रयत्न असतो. डॉ. हेडगेवार जन्मशताब्दीनंतर देशभर सेवा कार्यांचे जाळे निर्माण झाले. शिक्षण, आरोग्य, संस्कार, संस्कृती, स्वावलंबन अशा विविध बिंदूंवर काम करणारे लाखो उपक्रम आणि प्रकल्प आज संघस्वयंसेवक देशभर चालवत आहेत. तरीही मागील काही वर्षांपासून विविध गतिविधींचे काम देशभर सुरू झाले आहे. धर्मजागृती, पर्यावरण, समरसता, कुटुंबप्रबोधन, ग्रामविकास, गोसेवा आणि सीमा सुरक्षा अशा सहा गतिविधींचे काम देशभरात चालते. प्रत्येक गतिविधीचे कार्यक्षेत्र निश्चित आहे, कार्यपद्धती निश्चित आहे. तात्कालिक समस्यांबरोबरच दीर्घकालीन कार्यसूचीही निश्चित केलेली आहे. रा.स्व. संघाच्या प्रत्येक प्रांतात हे काम चालू आहे. 29 जानेवारी रोजी वेलिंग (गोवा) येथे पू. सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी कोकण प्रांतातील गतिविधींच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीतून कामाची दिशा स्पष्ट झाली. तेव्हा मार्गदर्शन करताना मोहनजी म्हणाले की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहा गतिविधींद्वारे आपण समाजाच्या आचरणात बदल घडवून आणू शकतो. या बदलातूनच देशाचा विकास शक्य आहे.”

पू. सरसंघचालकांच्या कोकण प्रांत प्रवासात प्रांतातील सहा गतिविधींच्या कार्यकर्त्यांबरोबर बैठक झाली. या बैठकीत सर्व गतिविधींच्या प्रमुखांनी आपल्या कामाची माहिती दिली. धर्मजागृती ही देशात सर्वात जुनी गतिविधी आहे. वीस वर्षांहून अधिक काळ या विषयात संघ काम करत आहे. तर सर्वात अलीकडे पर्यावरण गतिविधीचे काम सुरू झाले आहे. या सहाही गतिविधींचे उद्दिष्ट काय? लक्ष्य काय? व्यवहार काय? या तीन बिंदूंवर मोहनजींनी उपस्थित स्वयंसेवक बंधूंशी संवाद साधला. प्रत्येक गतिविधीची काम करण्याची पद्धती प्रदेशानुसार वेगळी असणे स्वाभाविक असले, तरी देशभर समान सूत्र आहे हे या निमित्ताने अधोरेखित झाले.

समरसता गतिविधीचे काम भेदभावमुक्त समाजरचना तयार करण्याचे आहे. विषमता पसरवणार्या घटना थांबवण्यासाठी प्रयत्न करणे, आपल्या आचरणात योग्य ते बदल करून भेदभावविरहित कुटुंबरचना उभी करण्यासाठी प्रयत्नशील राहणे अशा स्वरूपाचे हे काम असून प्रत्यक्ष व्यवहारातून भावजागृती करण्यावर आपण भर दिला पाहिजे, असे मार्गदर्शन मा. मोहनजींनी केले. कोकण प्रांतात संविधान दिनानिमित्ताने 327 कार्यक्रम झाले, त्यासंबंधीही या बैठकीत निवेदन करण्यात आले. “हा समाज आपला आहे, त्यामुळे सर्वच महापुरुष आपले असून त्यांची जयंती-पुण्यतिथी सर्वांनी मिळून केली पाहिजे. सर्व समाजाला एकत्र आणण्यासाठी ते प्रभावी माध्यम असेलअसेही सरसंघचालकांनी सांगितले.

पर्यावरण सरंक्षण ही काळाची गरज आहे. या गतिविधीच्या कामासंबंधी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, “हरित घर या संकल्पनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाने झाडे लावावी. पाण्याची, विजेची बचत करावी, ओल्या कचर्यापासून घरातच कंपोस्ट खत तयार करावे. प्लास्टिकचा वापर कमी व्हावा यासाठी अधिकाधिक जनजागृती व्हावीअसे मार्गदर्शन करून पाणी वाचवा, झाडे लावा, प्लास्टिकचा वापर कमी करा या तीन मुद्द्यांच्या आधारे अधिक कार्यविस्तार करावा असेही सरसंघचालकांनी सुचवले.

पर्यावरणाइतकाच महत्त्वाचा विषय म्हणजे ग्रामविकास हा होय. कोकण प्रांतातील ग्रामविकास गतिविधीचे काम चालू असून मागील काही दिवसांत 71 गावांत मेळावे झाले. पंचशक्ती आणि सप्तसंपदाच्या आधारे आपण ग्रामविकास करू शकतो. स्वयंपूर्ण गाव निर्माण करण्यासाठी स्थानिक पातळीवरील संधीचा जास्तीत जास्त उपयोग केला, तर स्थलांतर थांबेल, अशी चर्चा झाली. या विषयात मार्गदर्शक करताना जल, जंगल, जमीन, जन, ऊर्जा, जीव आणि गोविकास या बिंदूंचा शाश्वत विचार करून ग्रामविकासाचे स्वप्न प्रत्यक्षात आणावे असे सरसंघचालकांनी सांगितले.

कुटुंबप्रबोधन गतिविधीचा आढावा घेताना प्रांतात 27 जिल्ह्यांत काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. भारतीय जीवनपद्धतीचे महत्त्वाचे अंग असणार्या कुटुंबव्यवस्थेला आलेले व्यंग दूर करण्यासाठी प्रबोधन आवश्यक असून प्रांतात जास्तीत जास्त घरांमध्ये कुटुंबप्रबोधन गतिविधीचे काम पोहोचले पाहिजे. भारतीय संस्कृती आणि संस्कार याची ओळख नव्या पिढीला करून दिली पाहिजे अशी अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली.

कोकण प्रांतात गोसेवा गतिविधीअंतर्गत गो-आधारित शेतीचे अर्थात जैविक शेतीचे प्रशिक्षण दिले जाते. एकूण 135 कार्यकर्ते या कामात सक्रिय असून प्रत्येक शेतकर्याच्या घरात एक देशी गाय असावी, असे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून गोसेवा गतिविधी काम करत आहे. दीपावलीच्या काळात 41 शेतकर्यांनी 102776 गोमय दिवे तयार केले होते. “गोसेवा गतिविधीच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. गोसेवा गतिविधीच्या माध्यमातून प्रत्येक घरात गाईचे महत्त्व पोहोचले पाहिजे आणि गो-आधारित शेतीचे प्रमाण वाढले पाहिजेअसे सरसंघचालकांनी सांगितले.

एकूणच काय, तर कोकण प्रांतातील गतिविधीच्या सर्व स्वयंसेवक कार्यकर्यांसाठी पू. सरसंघचालकांचा सहवास आणि मार्गदर्शन पुढील काळासाठी खूपच उपयोगी होणार आहे. समाजजीवनात ज्या ज्या समस्या आहेत, त्या दूर करण्यासाठी आणि सबळ, समर्थ, बलशाली भारत उभा करण्यासाठी अशा बैठकातील मार्गदर्शन हे पाथेय असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे.

RSS