भारतीय म्हणून एकत्र उभे राहण्याची वेळ

विवेक मराठी    05-Feb-2021
Total Views |

भारताला आणि विद्यमान सरकारला नामोहरम करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर किती तपशिलात कूटकारस्थाने आखली जात आहेत, याची जाणीव जशी जगाला झाली तशी भारतीयांनाही झाली. या आंदोलनापासून आतापर्यंत स्वत:ला दूर ठेवणार्या अनेक भारतीय सेलिब्रेटींनाही ती झाली.

bjp_1  H x W: 0

गेल्या
2 महिन्यांहून अधिक काळ दिल्लीच्या सीमेवर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनात खलिस्तानी चळवळीला बळ देणार्या कॅनडास्थित संघटना सक्रिय आहेत आणि त्याच आंदोलनाला आर्थिक बळ पुरवत आहेत, हा अंदाज आंदोलक जरी धुडकावून लावत असले तरी ते उघड गुपित होते. ते अनेकांनी वेगवेगळ्या माध्यमांतून सप्रमाण सिद्ध करून दाखवले होतेच, तरीही ते अमान्य करण्याची आंदोलनकर्त्यांसह अनेक राजकीय पक्षांमध्ये अहमहमिका लागली होती. आणि अगदी अनपेक्षितपणे सगळ्या जगासमोर आंदोलकांचे बिंग फुटले, तेही या कटात सहभागी करून घेतलेल्या, आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या एका सेलिबे्रटीने केलेल्या चुकीमुळे.
सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा....https://www.facebook.com/VivekSaptahik
 गेल्या 26 जानेवारीला लाल किल्ल्यावर आंदोलकांनी घातलेला हैदोस, राष्ट्रध्वजाचा अवमान करण्यापर्यंत त्यांची गेलेली मजल सर्वसामान्य भारतीयांनी दूरचित्रवाहिन्यांवरून पाहिली आणि या घटनेमुळे आजवर शेतकरी आंदोलनाविषयी मनाच्या एका कोपर्यात तोवर टिकून राहिलेल्या सहानुभूतीला जोरदार धक्का बसला. केंद्र सरकारच्या गृह खात्याने आंदोलकांविरोधात त्वरेने कारवाई तर केलीच, त्याच वेळी हे आंदोलन शेतकरी हितासाठी नसून 2-3 राज्यांतल्या अडत्या/दलालांसाठी देशाला वेठीस धरणे आहे, अशी सर्वसामन्यांचीही भावना झाली.
 

या घटनेनंतर काही संघटना आंदोलनातून बाहेर पडल्या. या सगळ्या घडामोडींमुळे आंदोलन बॅकफूटवर जायला लागल्याचे दिसताच सूत्रधारांनी नवी खेळी सुरू केली, ती म्हणजे विविध क्षेत्रांतील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भारताबाहेरील व्यक्तींना ट्विटरच्या माध्यमातून यात सहभागी करून घेणे. या आंदोलनाविषयी काळजीयुक्त ट्वीट करायला लावणे. हॉलिवूड पॉपस्टार रिहाना, मिया खलिफा, पर्यावरण कार्यकर्ती म्हणून अल्पावधीतच बोलबाला झालेली स्वीडनची ग्रेटा थर्नबग अशा सेलिब्रेटींना यात उतरवून मैदानातल्या लढाईला बळ देण्याचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर केंद्र सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा आंदोलकांचा डाव होता. (या एका ट्वीटसाठी रिहानाने काही लाख डॉलर्स घेतल्याचे डावीकडे झुकलेल्या माध्यमसंस्थाच म्हणत आहेत.) मात्र सहभागी सेलिब्रेटीच्या अतिउत्साहामुळे वा अपरिपक्वपणामुळे तो उघडकीस आला. नंतर ग्रेटाने आपल्या ट्विटर हँडलवरून ही सर्व ट्वीट्स मागे घेतली, तरी आंदोलनाचे खरे रूप सगळ्या जागासमोर आलेच. हे नियोजनबद्ध आंदोलन आहे याची अटकळ असली, तरी ग्रेटामुळेे हेटूलकिटसर्वांसाठी खुले झाले.

 

भारताला आणि विद्यमान सरकारला नामोहरम करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर किती तपशिलात कूटकारस्थाने आखली जात आहेत, याची जाणीव जशी जगाला झाली तशी भारतीयांनाही झाली. या आंदोलनापासून आतापर्यंत स्वत:ला दूर ठेवणार्या अनेक भारतीय सेलिब्रेटींनाही ती झाली. यानंतरच, ‘देशाचे प्रतिमाहनन करणार्या या कारस्थानाविषयी उघडपणे बोलले पाहिजे, देश तुटू देता कामा नये, शेतकरी प्रश्न हा देशाचा अंतर्गत मामला आहेहे ठणकावून सांगण्यासाठी अनेकांनी ट्वीट करून, ‘भारताचे हित कशात आहे ते भारतीय जाणतात, अन्यांनी त्याची काळजी करू नयेहा संदेश दिला.


भारतरत्न
लता मंगेशकर, भारतरत्न सचिन तेंडुलकर, सुप्रसिद्ध क्रिकेटपटू अनिल कुंबळे यासह अनेक जण पुढे सरसावले. त्यांची ही कृती अनपेक्षित तरी प्रशंसनीय होती. देशाविषयीच्या त्यांच्या आस्थेचे, प्रेमाचे प्रतीक होती. अशांची संख्या वाढायला हवी. त्यातून सर्वसामान्यांना देशहितासाठी जाहीरपणे प्रकट होण्याचे बळ, प्रेरणा मिळेल.

 

"will you be part of the largest protest in human history?' अशी हेटलाइन असणार्या या टूलकिटचे AskIndiaWhy आणि Global Farmers Strike - First Wave असे हॅशटॅग होते. भारतातील वातावरण आणि सरकारविषयीची प्रतिमा दूषित करण्यासाठी किती नियोजनबद्ध आखणी होती, ते त्यात नमूद केलेल्या तारीखवार नियोजनातून उघड झाले. या परदेशी सेलिब्रेटींचे ट्वीट हा त्या नियोजनाचाच एक भाग होता, तोही बराच आधी ठरलेला. हिंसाचाराला प्रोत्साहन देणारे हे टूलकिट बनवल्याप्रकरणी आता दिल्ली पोलिसांनी अज्ञातांविरोधात एफ.आय.आर. दाखल केला आहे.

 

आंदोलकांबरोबर चर्चेच्या 11 फेर्या झाल्यानंतरही आणि त्यांच्या मागण्यांपैकी निम्म्या मागण्या मान्य झाल्यानंतरही आंदोलकांशी सरकारचा संवाद हवा, अशी मागणी विरोधकांकडून केली जाते तेव्हा या मानभावीपणाचे आश्चर्य वाटते. ज्या मुक्त बाजारपेठेची मागणी भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांच्यासह अनेकांची होती, एवढेच नव्हे तर राकेश टिकैत यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून या 3 नवीन कायद्यांचे स्वागत केले होते, ते या विषयात आता अशी भूमिका का घेत आहेत? केंद्रीय कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी ज्या मुक्त बाजारपेठ संकल्पनेसाठी कृषी कायद्यात बदल होण्याची आवश्यकता प्रतिपादली होती, ते शरद पवार अचानक आंदोलकांच्या पक्षात कसे गेले? ज्या भूमिपुत्रांच्या नावावरून हे आंदोलन सुरू आहे, त्यांचा यात प्रत्यक्ष सहभाग किती आणि त्यांच्या मताला स्थान किती? शरद पवारांसारख्या धूर्त राजकारणी व्यक्तीने आंदोलनाला पाठिंबा दर्शवल्यावरही महाराष्ट्रासह देशाच्या अन्य भागातला शेतकरी या आंदोलनात का सहभागी होत नाही? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधायची ही वेळ आहे. समोर आलेल्या टूलकिटमुळे आंदोलनकर्त्यांचे नियोजनबद्ध कारस्थान उघडकीस आले, तसे या प्रश्नांच्या उत्तरातूनही अनेक गोष्टींचा उलगडा होईल. जे कायदे पूर्णपणे शेतकरी हिताचे आहेत, ज्यावर चर्चा होण्यासाठी आणि योग्य ते बदल करण्यासाठी सरकारने या कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे, त्या सरकारशी वा सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या तज्ज्ञांच्या समितीशी चर्चा करण्याचा आडमुठेपणा का केला जातो आहे, याचा जाब विचारण्यासाठी भारतीय नागरिकांनी पुढे येण्याची वेळ आली आहे.

शेतकर्यांचा बुरखा पांघरून चालू असलेल्या, या माध्यमातून सर्वसामान्यांच्या मनात शेतकरीवर्गाविषयी तेढ उत्पन्न करणार्या या आंदोलनाचा संपूर्ण पर्दाफाश करण्यासाठी जास्तीत जास्त भारतीयांनी डोळ्याला डोळा भिडवून उभे राहायला हवे. त्याची सुरुवात तर झाली आहे. पण त्यात सातत्य हवे आणि आपापल्या माध्यमातून निर्भीडपणे अशा विघटनकारक शक्तींना जाब विचारण्याची ताकदही.

 

कारण हा विषय कोण्या एका सरकारच्या अस्तित्वाशी निगडित नाही... देशाच्या अस्तित्वाशी, जाणीवपूर्वक मलीन केल्या जाणार्या प्रतिमशी निगडित आहे. तेव्हा भारतीय म्हणून या अपप्रवृत्तींविरुद्ध एक होऊ या.