नमन नटवरा, विस्मयकारा..

विवेक मराठी    10-Mar-2021
Total Views |

शिवाच्या नटराज स्वरूपात विज्ञान, तत्त्वज्ञान, धर्म कला यांचा सुरेख संगम आहे. भाविक हिंदूंचा असा विश्वास आहे की जेथे श्री नटराजांचे हे नृत्य चालते, ती जागा हा विश्व तोलणारा बिंदू आहे. ‘पिंडी ते ब्रह्मांडीया न्यायाने आपल्या सर्वांच्याच हृदयात एक शिवस्थान असून तेथे आत्मस्वरूपी नटराजाचे नृत्य सर्वकाळ चाललेले असते, असा अध्यात्मविचार आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवाच्या या लोकप्रिय रूपाची वैशिष्ट्ये सांगणारा आणि या रूपातील होयसळकालीन शिल्पांची माहिती देणारा लेख.


Nataraja in the hoysala t

शिव, शंकर, महादेव, महेश्वर, गंगाधर, महाकाल, चंद्रशेखर, नीलकंठ इत्यादी विविध नावांनी प्रसिद्ध असलेले भगवान श्री शिवशंकर फार प्राचीन कालापासून भारतीय जनमानसाच्या श्रद्धेचा विषय आहेत. उग्र आणि शांत अशा दोन्ही स्वरूपांमध्ये महादेवांची उपासना केली जाते. ‘रुद्रो वा एष अग्नी: तस्यै ते तनुवौ घोराऽन्या शिवाऽन्याअसे वेदांमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे. म्हणजे रुद्र हा साक्षात अग्नी असून त्याची दोन स्वरूपे आहेत - एक, घोर म्हणजे भयंकर दुसरे, शिव म्हणजे सौम्य, कल्याणकारक!

 सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा....https://www.facebook.com/VivekSaptahik

श्री शंकरांचे मूर्तिस्वरूपात पूजन करण्याची परंपरा तर आपल्याकडे त्याही पूर्वीपासून अस्तित्वात आहे, असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. सिंधु-सरस्वती संस्कृती काळातल्या मोहें-जो-दडो ह्या शहरातल्या उत्खननात सापडलेल्या एका मातीच्या सीलवर शिंगांचा मुकुट घातलेल्या एका भव्य पुरुषाचे अंकन आहे. तो एका आसनावर ध्यानस्थ बसलेला आहे आणि त्याच्या आवतीभोवती गेंडे, वाघ, वृषभ इत्यादी पशू आहेत. ह्या प्रतिमेला पशुपती शिव किंवा प्रोटो शिवा म्हणजे आद्य शिव असे म्हटले जाते.

 

पुढे भारतात जसजसे मंदिरस्थापत्य आणि मूर्तिशास्त्र प्रगत होत गेले, तसतशा शिवांच्या मूर्ती अधिकाधिक शिल्पसमृद्ध होत गेल्या. शैव संप्रदायानुसार शिव हे सृष्टीचे मूळ चैतन्य आहे. सृष्टी, स्थिती, संहार, विलय आणि अनुग्रह या शिवांच्याच पाच क्रिया आहेत. ह्या विविध क्रिया करतानाचे शिवांचे भावविभ्रम भारतीय शिवमंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरले गेले आहेत. प्रख्यात भारतीय मूर्तिशास्त्रज्ञ गोपीनाथ राव ह्यांनी शिवागम शास्त्रे आणि शिल्पशास्त्रे ह्यांचा समग्र अभ्यास करून शिवमूर्तींचे विविध प्रकार सांगितलेले आहेत. त्यात अनुग्रहमूर्ती, नृत्यमूर्ती, संहारमूर्ती, योगमूर्ती, सुखासनादी मूर्ती इत्यादी प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रतिमेची लक्षणे काय असावीत ते सांगितलेले आहे.

 सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा....https://www.facebook.com/VivekSaptahik
 

भारताच्या दक्षिणेतील राज्यांमध्ये अनेक भव्य शिवमंदिरांमधून अशा शिवांच्या विविध भावमुद्रा असलेल्या अत्यंत सुरेख शिवमूर्ती आपल्याला आजही बघायला मिळतात. एका वृक्षाखाली ध्यानस्थ बसलेले आदियोगी दक्षिणामूर्ती शिव, देवी पार्वतीशी विवाहबद्ध होणारे कल्याणसुंदर शिव, प्रकृती आणि पुरुष यांचे अद्वैत दर्शवणारे अर्धनारीनटेश्वर शिव, देवी पार्वतीच्या मांडीवर बसलेल्या बाल कार्तिकेयासमवेत सुखासनावर बसलेले कुटुंबवत्सल सोमस्कंदमूर्ती शिव, साक्षात यमाच्या छाताडावर लाथ मारणारे कालारी शिव, अंधकासुराचा वध करणारे रौद्र रूपातले शिव, तारकासुराच्या तीन मुलांनी बांधलेली नगरे एकाच बाणात उद्ध्वस्त करणारे त्रिपुरांतक शिव.. किती म्हणून रूपे सांगावी?

 

Nataraja in the hoysala t

भगवान शिवशंकरांच्या ह्या सर्व रूपांमध्ये भारतीय शिल्पकारांचे, कलाकारांचे आणि भक्तांचे एक आवडते रूप म्हणजे नृत्यमग्न शिवांचे - म्हणजे नटराजाचे. शिवांची जी विविध रूपे आहेत, त्यांपैकी नर्तकरूपातील शंकरांना नटराज असे म्हणतात. ‘नट्म्हणजे संस्कृतमध्येनृत्य करणेआणि नटराज म्हणजे सर्व नटांचा (नर्तकांचा) राजा. नृत्यमग्न अवस्थेतल्या श्री शिवशंकरांना नटेश, नटेश्वर नर्तेश्वर असेही म्हटले जाते. भारतीय मूर्तिकारांचे हे अत्यंत आवडते रूप. दक्षिण भारतातल्या शिवमंदिरांमधून आपल्याला एकाहून एक सुंदर आणि भव्य अशा अक्षरशः हजारो श्री नटराज मूर्ती दिसून येतात. विशेषतः तामिळनाडूमध्ये चोळ राजांनी बांधलेल्या भव्य शिवालयांमधून खूप सुरेख नटराज मूर्ती कोरलेल्या आहेत.

 
 सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा....https://www.facebook.com/VivekSaptahik
 

श्री शंकरांचे नटराज रूप हे अखिल विश्वाच्या नियमबद्ध हालचालींचे लयबद्ध प्रतीक आहे. भगवान शंकर जेव्हा तांडव नृत्य करतात, तेव्हा ते नृत्य सृष्टी (निर्माण) स्थिती, संहार, तिरोभाव (विश्रांती) आणि शेवटी अनुग्रह (मोक्ष) या त्यांच्या पंचक्रियांचे प्रतीक मानले जाते. शिव डमरू वाजवतात तेव्हा सृष्टीचे सर्जन होते, त्यांची अभयमुद्रा हे स्थितीचे, हातातला अग्नीप हे नाशाचे, सभोवतालचे प्रभामंडळ हे तिरोभावाचे उचललेला पाय हे अनुग्रहाचे प्रतीक समजले जाते, म्हणूनच अगदी स्वित्झर्लंडमधल्या भौतिकशास्त्रात प्रगत संशोधन करणार्या अत्याधुनिक पार्टिकल लॅबमध्येदेखील नटराजाची भव्य मूर्ती विराजमान आहे. प्रख्यात भारतीय कलाइतिहासतज्ज्ञ आनंद कुमारस्वामी ह्यांनीदि डान्स ऑफ सिवाह्या जगद्विख्यात शोधनिबंधात शिवाच्या नटराज स्वरूपाचे फार सुरेख आणि अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नटराज हा आद्य नर्तक, नृत्याची अधिष्ठात्री देवता, नृत्यकलेचा प्रवर्तक आणि पहिला नृत्यगुरू आहे. तो नर्तन करणारा आहे, नर्तन करवणारा आहे आणि स्वतःचेच नृत्य पाहाणारा रसिक प्रेक्षकही आहे. अखिल ब्रह्मांड हाच शिवाचा रंगमंच आहे.

 

नटराजाची मूर्ती सामान्यत: पुढील स्वरूपात कोरलेली आढळते - एका पद्मपीठावर अपस्मार किंवा मूलयक नावाचा एक बुटका, कुरूप पुरुष पालथा पडलेला असतो. हा अपस्मार म्हणजे अविद्येचे, अज्ञानाचे अहंकाराचे प्रतीक. चतुर्भुज किंवा त्याहूनही अधिक हात असलेला श्री नटराज आपला उजवा पाय त्याच्या पाठीवर देऊन मंदस्मित करीत एका पायावर उभा असतो. नटराजाच्या मूर्तीला संपूर्ण व्यापणारे एक प्रभामंडळ पद्मपीठापासून सुरू होते. त्या प्रभामंडळाला बाहेरच्या बाजूला ज्वालांकुर असतात. नटराजाने डावा पाय उचलून धरलेला असतो. शरीर त्रिभंगात असते. मूर्तीच्या सर्वात मागच्या बाजूच्या हातात एक डमरू डाव्या हातात अग्नीत असतो. पुढच्या बाजूचा उजवा हात अभयमुद्रेत डावा हात दंडहस्त वा गजहस्त मुद्रेत उचललेल्या पायाकडे निर्देश करत असतो.

 

 

नटराजाच्या मस्तकावर कलात्मकरित्या बांधलेल्या जटांचा मुकुट असतो. मुकुटावर नाग, कवटी, गंगा, चंद्रकोर असतात. नृत्यमग्न शिवाच्या जलद हालचालीमुळे जटामुकुटातून काही बटा मोकळ्या सुटून मानेमागे वार्यावर भुरभुरत असतात. मागचे दोन्ही हात मस्तकाचा वरचा भाग हे बहुधा प्रभावळीला स्पर्श करीत असतात. नटराज त्रिनेत्र सालंकृत असतात. गळ्यात अनेक हार, बाहुभूषणे, हाता-पायात वाळे, कंकणे हातापायांच्या बोटांत अंगठ्या असतात. कटिवस्त्र म्हणून कधी मृगाजिन तर कधी व्याघ्रचर्म दाखवलेले असते. शिवाच्या गळ्यात यज्ञोपवित असते. नृत्य कशा प्रकारचे आहे त्याप्रमाणे त्यांची मुद्रा रौद्र किंवा शांत असते.

 

आपल्या लेखात आनंद कुमारस्वामींनी म्हटलेय की शिवांची अनेक नृत्ये आहेत. विविध शैवागमातल्या माहितीप्रमाणे श्री शंकरांचे 108 प्रकारचे नृत्यप्रकार आहेत. चिदंबरमच्या नटराज मंदिरामध्ये पूर्व गोपुराच्या आतल्या बाजूला हे नृत्याचे 108 प्रकार शिल्पबद्ध केलेले आहेत. अशीच 108 नृत्य कारणे तंजावूरच्या बृहदीश्वर मंदिराच्या दुसर्या मजल्यावर शिखराच्या आतल्या बाजूला भिंतीवर कोरलेली आहेत.

 

कुमारस्वामींनी शिवाच्या ज्या तीन नृत्यांविषयी लिहिलेय, ती म्हणजे कैलासावर पार्वतीला रत्नरखचित सुवर्णासनावर बसवून शिवांनी केलेले सात्त्विक प्रणयनृत्य, दुसरे स्मशानात वीरभद्र रूपात आपल्या गणांसह शिवांनी केलेले रौद्रभीषण आणि भयावह असे तांडवनृत्य आणि तिसरे म्हणजे नटराज स्वरूपात त्यांनी केलेले नादंन्त नृत्य. चिदंबरमच्या गर्भगृहात आहे ती हे नादंन्त नृत्य करणारी नटराजाची मूर्ती.

 

पण नृत्य कुठलेही असो, रौद्र किंवा शांत, नृत्यमग्न शिवांच्या प्रत्येक शिल्पात एक प्रकारच्या गतीचा आभास होणे अपेक्षित असते. किंबहुना तो गतीचा आभास जितका प्रत्ययकारक, तितकी ते शिल्प घडविणार्या शिल्पकाराची कला भारी!

 

कर्नाटकच्या चालुक्य, होयसळ आणि विजयनगर साम्राज्याच्या काळातही अनेक शिल्पसमृद्ध मंदिरांची निर्मिती झाली. ह्या मंदिरांमधूनदेखील शिवशंकरांच्या अनेक नृत्यमूर्ती आहेत. त्यातल्या काहींची ओळख आपण आज करून घेऊ. ह्यातली बहुतेक शिल्पे हळेबिडू इथल्या होयसळेश्वर आणि शांतलेश्वर ह्या जोड देवळांतली आहेत. ही दोन्ही मंदिरे विष्णुवर्धन राजाच्या प्रमुख सेनापतीने राजा विष्णुवर्धन आणि त्याची पत्नी शांतलादेवी ह्यांच्या नावाने 1121मध्ये बांधायला घेतली, असे तत्कालीन शिलालेखात उल्लेख आहेत. दोन्ही मंदिरे शंकरांना समर्पित आहेत. दोन्ही मंदिरांना मिळून बाहेरच्या तारकाकृती जगतीवर एकच प्रदक्षिणापथ आहे आणि त्या प्रदक्षिणापथावरून चालताना मंदिराच्या मंडोवरावरची अनुपम शिल्पे बघता येतात. मंदिरे शिवांची असल्यामुळे साहजिकच श्री शंकरांच्या विविध भावस्थितीतल्या मूर्ती ह्या मंदिरावर कोरलेल्या आहेत. आगमशास्त्रात लिहिलेले शिवमूर्तींचे जवळजवळ सर्व प्रकार ह्या मंदिराच्या भिंतीवर कोरलेले आहेत. त्यातल्या ह्या काही श्री शंकरांच्या देखण्या नृत्यमूर्ती.

 


Nataraja in the hoysala t 

संहारमूर्ती

 

पहिली मूर्ती आहे ती खरी आहे संहारमूर्ती. गजासुराचा वध केल्यानंतर श्री शंकर त्याचे कातडे सोलून ते मस्तकावर धारण करून नाचले, अशी कथा आहे. ते नृत्य ह्या शिल्पात दाखवलेले आहे. इथे शिवाच्या पायाखाली अपस्मार पुरुष नाही, तर गजासुराचे मस्तक आहे. वरच्या दोन्ही हातांनी गजासुराचे कातडे उचलून धरलेले आहे. त्याखालच्या दोन्ही हातांमध्ये अनुक्रमे त्रिशूल आणि डमरू आहेत. त्याखालच्या एका हातात एका राक्षसाचे मस्तक आहे, तर दुसर्या हातात एक शस्त्र. सगळ्यात खालचे हात नृत्यमुद्रेत आहेत. चेहरा एकाच वेळी रौद्रही आहे आणि शांतही. शिवांच्या पायाकडे खाली उजव्या बाजूला नंदी जरासा सावरूनच बसलेला आहे, तर डावीकडे दोन मृदंगवादक आहेत. मूर्तीवरची आभूषणे, श्री शंकरांचा नृत्यमग्न डौल, लांबसडक बोटे सर्वच शिल्पकाराने अतिशय कुशलतेने दाखवलेले आहे. ही मूर्ती बघताना त्या शिल्पामधली अंगभूत लय आपल्यालाही जाणवते.


Nataraja in the hoysala t 

 

पद्मपीठावर नृत्यमग्न शिवमूर्ती

 

दुसरी नृत्यमूर्ती आहे ती बारा हात असलेली. इथे शिव पद्मपीठावर नृत्य करत आहेत. पायाखाली अपस्मार पुरुष नाही. बारा हातांपैकी काही हात नृत्यमुद्रेत आहेत, तर उरलेल्या हातांमध्ये खटवांग आणि त्रिशूळासहित विविध आयुधे आहेत. एका हातात शिव हे आदियोगी आहेत हे दर्शवणारी अक्षमाला आहे, तर दुसर्या हातात पात्र आहे. मूर्तीच्या पायाशी एका बाजूला नृत्यमुद्रेत भृंगी आहे, तर दुसर्या बाजूला नंदी आहे. शेजारीच वादक आहेत. इतक्या सगळ्या गोष्टींनी भरलेले असूनसुद्धा शिल्प कुठेही बोजड अथवा स्टॅटिक वाटत नाही. गतीचा आभास निर्माण करण्यात शिल्पकार यशस्वी झालेला आहे. ह्या शिल्पातली मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे श्री शंकरांच्या मुखावरचे भाव. धर्मांध मुसलमानी आक्रमकांनी मूर्तीचे नाक भंग करून मूर्तीचे पावित्र्य हरण करायचा प्रयत्न केला असला, तरी मूर्तीच्या मुखावरचे शांत, सात्त्विक भाव आजही लपत नाहीत.
 




Nataraja in the hoysala t 

 

चौदा भुजांची शिवमूर्ती

तिसरी मूर्ती तर निव्वळ अप्रतिम आहे. मूर्ती चौदा हातांची आहे. वरच्या एका डाव्या हाताने शिवांनी त्रिशूळाच्या टोकाने अंधकासुराला भोसकले आहे. डावीकडच्या एका हातात धनुष्य आहे, तर उजवीकडच्या एका हातात बाण. विशेष म्हणजे सहसा डावीकडच्या सर्वात वरच्या हातात असणारा डमरू ह्या शिल्पात उजवीकडच्या सगळ्यात खालच्या हातात आहे. प्रभावळीवर कीर्तिमुख आहे. शिवांच्या डोक्यावर छत्र आहे आणि पायाखाली अपस्मार पुरुष. तो मान वर करून उठायचा प्रयत्न करतोय, पण श्री शंकरांनी आपल्या पायाखाली त्याला जाम दाबून ठेवलेय. आपल्या मनातले अहंकार आणि अज्ञान असेच परत परत उफाळून येते, पण आपण त्याला सतत दाबून ठेवले पाहिजे असाच संदेश जणू हे शिल्प देतेय. शंकरांच्या पायाशी नंदी आणि भृंगी आहेत. नंदीच्या अंगावरची घुंगरांची माळदेखील फार सुरेख कोरली आहे. अत्यंत रेखीव, प्रमाणबद्ध आणि देखणे असे हे शिल्प आहे.

 

शिवाच्या नटराज स्वरूपात विज्ञान, तत्त्वज्ञान, धर्म कला यांचा सुरेख संगम आहे. भाविक हिंदूंचा असा विश्वास आहे की जेथे श्री नटराजांचे हे नृत्य चालते, ती जागा हा विश्व तोलणारा बिंदू आहे. पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने आपल्या सर्वांच्याच हृदयात एक शिवस्थान असून तेथे आत्मस्वरूपी नटराजाचे नृत्य सर्वकाळ चाललेले असते, असा अध्यात्मविचार आहे. श्री शंकराची नृत्यशिल्पे बघून आपण हाच बोध घेणे अपेक्षित आहे.


सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा....https://www.facebook.com/VivekSaptahik