तिसर्‍या सिद्धान्ताच्या दिशेने

विवेक मराठी    16-Mar-2021
Total Views |

गांधी घराण्याचा अस्त म्हणजे काँगे्रसचा अस्त, काँग्रेसचा उदय म्हणजे गांधी घराण्याचा उदय असे समीकरण झालेले आहे. लोकशाही देशांचा प्रवास त्या त्या देशाच्या स्वभावाप्रमाणे होतो, तोे सिद्धान्ताप्रमाणे होत नाही. आपल्या देशातील लोकशाही राजवटीचा आणि काँग्रेसचा प्रवास आपल्या देशाच्या स्वभावाप्रमाणे होताना दिसतो आहे.


congress_1  H x

घराणेशाहीचा उदय आणि अस्त कशा प्रकारे होतो, याबद्दल वेगवेगळे सिद्धान्त मांडले जातात. इस्लामी खिलाफत आणि युरोपातील राजघराणे यांचा इतिहास पाहिला असता एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे एखादे राजघराणे जास्तीत जास्त पाच वर्षे राज्य करीत राहते. दोन-अडीचशे वर्षांतच या राजघराण्याचा शेवट होतो. अब्बासीद खिलाफत दीर्घकाळ मध्यपूर्वेत होती. हलाकू खान याने .. 1258मध्ये तिचा शेवट केला. फ्रान्सचे लुई कॅपेट घराणे असेच दीर्घकाळ सत्तेवर होते. 1789च्या फ्रेंच क्रांतीने त्याचा शेवट केला. रशियाचे रोमानोव घराणे सुमारे तीनशे वर्षे सत्तेवर होते, त्यालाझारशाहीम्हणतात. 1917 साली तिचा शेवट झाला. मंगोलियन चंगेजखान याच्या घराण्याची सत्ता जेमतेम अडीचशे वर्षे टिकली. भारतातील मोगल घराणेदेखील तीनशे-सव्वातीनशे वर्षे टिकले. घराण्याचा अंत होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.

लोकशाही राजवटीत घराणेशाही येत नाही, म्हणजे लोकशाहीच्या सिद्धान्तात येत नाही. परंतु भारतात लोकशाहीचे सिद्धान्त वेगळे आहेत आणि भारताच्या लोकशाहीच्या सिद्धान्तात लोकशाही येते. केंद्रात नेहरू घराणे आहे आणि वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळी घराणी आहेत. उत्तर प्रदेश-बिहारमध्ये यादव घराणे आहे. आंध्रमध्ये रेड्डी घराणे आहे. महाराष्ट्रात पवार आणि आता ठाकरे घराणे आहे. ही सर्व लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेली घराणी आहेत. राजघराण्यातील राजा स्वतःला देवाचा प्रतिनिधी मानत असे, मी फक्त देवाला जबाबदार आहे आणि माझा कायदा अंतिम आहे, असे तो सांगत असे. ब्रिटनमधील राजानेही हेच सांगितले, फ्रान्समधील राजेही हेच सांगत होते, आणि रशियातील झारही हेच सांगत होते. लोकशाहीतील राजघराणी यात थोडा बदल करतात आणि ती म्हणतात, ‘आम्ही जनताजनार्दनाला जबाबदार आहोत, त्यांनी आम्हाला सत्ता दिलेली आहे’. दोन्ही राजवटीत जनार्दन एकच आहे. एक आकाशात आहे आणि एक जनतेत आहे.

जनार्दनाचा हवाला घेऊन चालणारी ही घराणी कुठवर राज्य करू शकतात, त्याचा एक चिनी सिद्धान्त आहे. ‘घराणेशाहीचे वर्तुळअसे या सिद्धान्ताचे नाव आहे. चिनी इतिहासात हा एक महत्त्वाचा सिद्धान्त गणला जातो. या सिद्धान्ताप्रमाणे ईश्वरी आदेशाने एका घराण्याची चीनमध्ये सत्ता सुरू होते. सत्तेचा वापर लोककल्याणासाठी केला पाहिजे, असा ईश्वरी संकेत असतो. जेव्हा हा संकेत मोडला जातो, तेव्हा भ्रष्टाचार सुरू होतो, लोकसंख्यादेखील खूप वाढते, दुष्काळ पडू लागतात, अन्नधान्याची टंचाई निर्माण होते, लोकांची बंडे सुरू होतात, यानंतर युद्ध सुरू होते. या गृहयुद्धात खूप विध्वंस होतो. त्यानंतर नवीन राजघराण्याचा उदय होतो. या राजघराण्याला परमेश्वराचा अध्यादेश प्राप्त होतो आणि नव्याने त्याचे राज्य सुरू होते. हे राज्यदेखील वरील घराण्याप्रमाणे लयाला जाते, असा हा घराण्याचा उदय आणि अस्ताचा चिनी सिद्धान्त आहे.


भारतातील
गांधी घराण्याला हा सिद्धान्त तंतोतंत लागू करणे कठीण आहे. परंतु सध्याचा त्यांचा कालखंड हा उताराचा कालखंड आहे. 2014च्या आणि 2019च्या निवडणुकीत या घराण्याला विशेष यश मिळालेले नाही, केंद्रातील सत्ता मिळाली नाही. 2024 साली ही सत्ता कशी मिळवायची याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. त्यांचा प्रयत्न यशस्वी व्हावा म्हणून त्यांना सल्ला देणारी मंडळीदेखील भरपूर आहेत. देशावर या घराण्याची सत्ता काँग्रेस नावाच्या पक्षाच्या माध्यमातून राहिली. काँग्रेस म्हणजे गांधी घराणे असे समीकरण झाले. गांधी घराण्याशिवाय काँग्रेस नाही आणि काँग्रेसशिवाय गांधी घराणे नाही, अशी एकात्मता दोघांत निर्माण झाली.

यामुळे गांधी घराण्याचा अस्त म्हणजे काँगे्रसचा अस्त, काँग्रेसचा उदय म्हणजे गांधी घराण्याचा उदय असेही समीकरण झालेले आहे. लोकशाही देशांचा प्रवास त्या त्या देशाच्या स्वभावाप्रमाणे होतो, तोे सिद्धान्ताप्रमाणे होत नाही. आपल्या देशातील लोकशाही राजवटीचा आणि काँग्रेसचा प्रवास आपल्या देशाच्या स्वभावाप्रमाणे होताना दिसतो आहे. गांधी घराण्याला सत्ता मिळत गेली, त्याचे कारण स्वातंत्र्यचळवळीच्या पुण्याईचे पाठबळ, तसेच तेव्हाची काँगे्रस ही देशातील अनेक विचारधारांना आपल्यात सामावून घेणारी काँग्रेस होती. दलित, मुस्लीम, उच्चवर्णीय, बहुभाषिक, वेगवेगळ्या जाती-जमातीचे नेते अशी सर्व मंडळी काँग्रेस नावाच्या एका व्यापक छत्रीखाली येत राहिली. यामुळे सत्तेवर येण्यासाठी आवश्यक असलेली मते काँग्रेसला मिळत राहिली. या सर्वांना बांधून ठेवणारी स्वतःची विचारसरणी करण्याचा प्रयत्न नेहरू-गांधी घराण्याने केला. या विचारधारेला त्यांनी नाव दिले - ‘सेक्युलॅरिझम’.


स्वातंत्र्य
प्राप्त होत असताना काँग्रेसला विचारधारा देण्याचे काम महात्मा गांधींनी केले. महात्मा गांधी कट्टर हिंदू होते. हिंदुत्वात सर्वांचा समावेश आहे किंवा सर्वसमावेशकता हेच हिंदू धर्माचे सर्वात मोठे लक्षण आहे, असे त्यांनी मानले. त्यांनी मुसलमानांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला, त्यात त्यांना यश आले नाही. हे गांधींचे हिंदुत्व नेहरू-गांधी घराण्याने सोडून दिले. त्यांनी सेक्युलॅरिझमचा अर्थ केला घटनेचे 370 कलम, मुसलमानांसाठी वेगळा कायदा, हज यात्रेला सबसिडी, मदरशांना अनुदान, पाकिस्तानविषयी नरमाईचे धोरण, पाकिस्तानी दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यास नकार, हिंदू संकल्पना आणि हिंदू श्रद्धा यांचा विरोध, रामजन्मभूमीविषयी मुस्लीमधार्जिणी भूमिका. या भूमिकांमुळे हळूहळू काँग्रेसची प्रतिमा, नेहरू-गांधी घराण्याची प्रतिमा हिंदूविरोधी होत गेली आणि हिंदू भाजपाच्या मागे उभा राहू लगला. केवळ मुसलमानांच्या मतांवर सत्ता मिळविता येत नाही, मिळविता येणे शक्यही नाही, हे नेहरू-गांधी घराण्याला आकलन झाले नाही. काल झाले नाही आणि आजही होत नाही.


सध्या
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांची धामधूम चालू आहे. काँग्रेसने तेथे इंडियन सेक्युलर फ्रंटशी हातमिळविणी केलेली आहे. ही फ्रंट मुस्लिमांची फ्रंट आहे. काँग्रेसचे नेते आनंद शर्मा म्हणतात, “या पक्षाबरोबर आघाडी करणे हे काँग्रेसच्या गांधीवादी आणि नेहरूवादी विचारांच्या विरोधी आहे.” अशी आघाडी केल्यामुळे हिंदू मतदारांवर त्याचा काय परिणाम होईल, हे निवडणूक निकाल लागल्यानंतरच समजेल.

 

इंदिरा गांधींनंतर राजीव गांधी, नंतर सोनिया गांधी आणि आता राहुल गांधी, प्रियांका गांधी ही नेहरू-गांधी घराण्यातील राजमंडळी आहेत. राजीव गांधीच्या काळातच हिंदू मतदार काँग्रेसपासून दूर गेला. सोनिया गांधींच्या काळात सहानुभूतीमुळे हिंदू समाजातील काही वर्ग सोनिया गांधींच्या मागे उभा राहिला. 2014 साली ही सहानुभूती संपली. आपण हिंदू आहोत, जानवेधारी हिंदू आहोत, मंदिरात जाणारे हिंदू आहोत, प्रेम करणारे हिंदू आहेत, कुणाचाही द्वेष करायचा नाही, सर्वांचा आदर करायचा हे मानणारा आहे हे राहुल गांधी यांनी सांगायला सुरुवात केली. सर्वसमावेशक हिंदूची प्रतिमा तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून त्यांनी महाराष्ट्रात काँग्रेसला हिंदुत्ववादी शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी व्हायला लावले. हिंदुत्वाशी माझे काही भांडण नाही, असा संदेश त्यांना द्यायचा आहे.


भाजपाशी
मुकाबला करण्यासाठी हिंदुत्वाची एक वेगळी स्पेस निर्माण करण्याचा प्रयत्न करताना ते दिसतात. त्यांनी हिंदुत्वाच्या मार्गावरून वाटचाल करण्याचे ठरविले असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे. त्यांच्या भाषेत सांगायचे तर हेनरम हिंदुत्वआहे. परंतु ही वाटचाल घराण्याची नौका बुडण्यापासून वाचवेल का? आतापर्यंतचे सर्व संकेत असे आहेत की ही फार अवघड गोष्ट आहे. मुसलमानांचा विचार केला तर दोन-तीन विषय अत्यंत ज्वलंत आहेत. पहिला विषय समान नागरी कायद्याचा आहे. दुसरा विषय लोकसंख्यावाढ नियंत्रणाचा आहे. आणि तिसरा विषय मदरशांतून दिल्या जाणार्या शिक्षणाचा आहे. यापैकी कुठल्याही विषयावर हिंदूंशी बोला, तो अत्यंत काळजीच्या सुरात भविष्यकालीन चिंता सांगेल. राहुल गांधी या विषयांना स्पर्श करतील का? त्यांनी जर स्पर्श केला, तर खर्या अर्थाने सर्वधर्मसमभावाचे - ज्याला काँग्रेससेक्युलॅरिझमम्हणतात, त्याचे पालन होईल. राजीव गांधींसारखी दोन दरडींवर पाय ठेवणारी भूमिका घराणे वाचविणार नाही. शहाबानो प्रकरणात मौलवी खूश आणि रामलल्लाच्या मंदिराचे टाळे काढून साधुसंत महंतही खूश, निवडणुकीत मात्र आपटी.


राजघराण्याच्या
अंताचा इतिहाससिद्ध सिद्धान्त आपण बघितला आणि दुसरा चिनी सिद्धान्तही बघितला. राहुल गांधी तिसर्या सिद्धान्ताची मांडणी तर करीत नाहीत ना? भविष्यात याचे उत्तर मिळेल.