सिमलीपालचा वणवा आपण काय शिकणार?

विवेक मराठी    17-Mar-2021
Total Views |

विविध लहानमोठे जीव, झाडं, पशु-पक्षी, इतर नैसर्गिक स्रोत यांचं एक संतुलित मिश्रण म्हणजे जंगल. तो आपल्या देशाचा एक नैसर्गिक वारसा असतो, आपल्याला जीवन देणारे नैसर्गिक स्रोत याच जंगलातून उगम पावतात. आपल्या आजूबाजूच्या परिसरात असलेल्या लहान-मोठ्या जंगलपट्ट्यांमध्येही वणवा ही आपल्याकडेही दर वर्षी दिसणारी घटना आहे. परंतु अशा घटनांकडे किती जागरूकतेने किंवा गांभीर्याने पाहिलं जातं, याबद्दल विचार केला तर निराशा हाती येते. याला आपली पर्यावरण निरक्षरता आणि पराकोटीची अनास्था मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे.

 
mundale_3  H x

गेले दोन आठवडे ओडिशामधील जंगलात लागलेल्या वणव्यामुळे ही गोष्ट लक्षात आली की आपण जागतिक घडामोडींविषयी जितके जागरूक असतो (अर्थात, सोशल मीडियामुळे आणि सोशल मीडियावरच), तितके आपल्या आजूबाजूला घडणार्या घटनांबद्दल आणि त्याच्या परिणामाबद्दल नसतो. ॅमेझॉन किंवा ऑस्ट्रेलिया, किंवा जगातील इतर प्रसिद्ध ठिकाणी वणव्यामुळे होणारा विनाश पाहिला की त्याच्या तीव्रतेबद्दल असलेलं लोकांमधील गांभीर्य सोशल मीडियावर ओसंडून वाहायला लागतं. पण आपल्यापैकी किती लोकांना आपल्या आजूबाजूच्या परिसरात लागलेल्या वणव्याचं गांभीर्य जाणवतं? अशा घटनांचा आपल्या भवितव्यावर काय परिणाम होणार आहे याबद्दल काळजी किंवा भीती आपल्यापैकी किती लोकांना जाणवते? अशा घटनांकडे किती जागरूकतेने किंवा गांभीर्याने पाहिलं जातं, याबद्दल विचार केला तर निराशा हाती येते. याला आपली पर्यावरण निरक्षरता आणि पराकोटीची अनास्था मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे.

आपल्यापैकी बरेच लोक समजतात तसं जंगल हे फक्त वन्य प्राण्यांचं निवासस्थान किंवा तिथे असणारं वन्य जीवन नसतं. तो आपल्या देशाचा एक नैसर्गिक वारसा असतो, आपल्याला जीवन देणारे नैसर्गिक स्रोत याच जंगलातून उगम पावतात. विविध लहानमोठे जीव, झाडं, पशु-पक्षी, इतर नैसर्गिक स्रोत यांचं एक संतुलित मिश्रण म्हणजे जंगल. या परिसंस्थेमध्ये सर्वच घटक एकत्रपणे नांदतात. पर्यावरण संतुलन हा या सगळ्या जीवसृष्टीचा प्राण आहे, हे चांगलं जंगल पाहिलं की लगेच लक्षात येतं. पण या शांततेला कधी कधी वणवा लागतो. तसं तर पूर्ण देशात वणवा ही काही नवीन गोष्ट नाही, पण उत्तर भारतात वणवा प्रकर्षाने जाणवतो. भारताच्या उत्तराखंड या राज्यात वणवा पेटणं ही नेहमीची बाब झाली आहे. आपल्या राज्यापुरता विचार केला तर सह्याद्रीच्या परिसरात, किंवा अगदी लहान गावांमध्येही शेतीच्या आजूबाजूच्या परिसरात असलेल्या लहान-मोठ्या जंगलपट्ट्यांमध्येही वणवा ही आपल्याकडेही दर वर्षी दिसणारी घटना आहे.

 
mundale_2  H x

वणवा म्हणजे जंगलात, कुरणात किंवा गवताळ प्रदेशात नैसर्गिक अथवा अनैसर्गिक कारणांमुळे लागलेली अनियंत्रित आग. वणवा एकदा पेटला की जंगल अगदी महिनाभरही जळत राहू शकतं.

वणवा पेटण्याचं नैसर्गिक कारण खालीलपैकी कोणतंही असू शकतं -

आकाशातून पडणारी वीज (हे फार कमी बघायला मिळतं आपल्याकडे).

उन्हाळ्यातील उष्णतेने कोरडी पानं गवत पेटल्याने.

मोठी झाडं पडताना झालेल्या घर्षणामुळे.

 याव्यतिरिक्त, वैयक्तिक हितासाठीसुद्धा जंगलात वणवे पेटवले जातात.

वणवा का लागतो?

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जून महिन्याच्या शेवटपर्यंत वणवा लागण्याची शक्यता असते. पाऊस पडेपर्यंत वणवा लागू शकतो. वणवा तीव्र उष्णतेने लागू शकतो. सुकलेल्या पाला-पाचोळ्यावर जेव्हा तीव्र सूर्यकिरण पडतात, तेव्हा आग लागू शकते. ही आग हळूहळू पसरते आणि त्या वेळी जर वाहणारा वारा जोरात असेल, तर त्या वार्यामुळे रौद्र रूप धारण करते. कधी तर या आगीचं रूप खूप भयानक असतं आणि आग आटोक्यात आणताना वन विभागाची, त्या भागातील गावकर्यांची पार दमछाक होते.

वणवा ही अनेकदा एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्यामुळे कोणाचा यावर ताबा राहत नाही किंवा ताबा ठेवता येत नाही. पण सध्याचा अनुभव बघता, बरेचदा वणवा माणसाच्या निष्काळजी वृत्तीमुळे किंवा निव्वळ स्वार्थामुळेही लागतो.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या अहवालाप्रमाणे वर्ष 2012मध्ये भारताच्या अर्ध्या जंगलामध्ये वणवा लागला होता, ज्यामुळे जंगलांचं मोठं नुकसान झालं होतं.

95 टक्के वणवा हा मानवी हलगर्जीपणामुळे आणि माणसाच्या स्वार्थी आणि चुकीच्या वृत्तीमुळे लागतो. अनेकदा जंगलात सुकलेल्या पानांचा जाळ करताना तो आवरण्याच्या पलीकडे जाऊन नुकसान होतं. काही लोक नवीन चांगलं गवत उगवावं म्हणून शिवाराचा आणि सुकलेल्या जमिनीचा काही पट्टा पेटवून देतात. यामुळेसुद्धा वणवा लागतो. मधाचं पोळं जाळताना आगीचा उपयोगसुद्धा वणव्याला निमंत्रण देतो.


mundale_1  H x  

वन विभाग यातून मार्ग कसा काढतो?

वन विभाग मोठ्या संख्येने कामगार वन देखरेखीच्या कामासाठी नियुक्त करतो. त्याव्यतिरिक्त लागणारे कामगार रोजंदारीवर गरजेप्रमाणे बोलवले जातात. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, नागरिक सुरक्षा आणि राज्य आपत्ती निवारण दल यांच्या तीन तुकड्यांबरोबर हे सर्व लोक काम करतात.

आग विझवण्यासाठी जुने प्रचलित उपाय आधी वापरले जातात. हिरव्या तुटलेल्या फांद्यांनी आग विझवता येते. पण ही एक वेळ घेणारी आणि मोठी प्रक्रिया आहे. शिवाय यात आग विझवणार्या लोकांच्या जिवालाही धोका असतो, कारण आग कधीही विकराळ रूप घेऊ शकते आणि यात चांगल्या झाडांचं नुकसान होण्याचीही भीती असतो. परिस्थिती अगदीच हाताबाहेर जायला लागली असं वाटलं, तर भारतीय हवाई दलाची मिग-17 जातीची दोन विमानं वणव्यावर पाण्याचा वर्षाव करतात. हे विशेषत: उत्तराखंडमध्ये बघायला मिळतं. तिकडे श्रीनगरमधील भीमताल तलावावरून आणि गरवाल येथून विमानाने पाणी पुरवलं जातं. सरकार लोकांना वणव्याविषयी जागृत करीत असतं. लोकांना जंगलात काडेपेटी आणि आग उत्पन्न करणार्या गोष्टी नेण्यास मनाई केली गेली आहे.

किती आणि केवढं नुकसान

वणवा लागल्याने मनुष्यहानी होणं हे आपल्याकडे अगदी दुर्मीळ आहे. परंतु, वृक्षसंपदेची हानी मात्र मोठ्या प्रमाणात होते हे मात्र नक्की. वणव्यामुळे होणारं मुख्य नुकसान तर मातीच्या दर्जाचं, पाण्याचं, बी-बियाणांचं आणि निसर्गाचं होतं. वणव्यामुळे एकूणच वनजीवन उद्ध्वस्त होतं, प्राण्यांना आणि पक्ष्यांना आपलं निवासस्थान परत उभारायला लागतं. वेगाने पसरणार्या आगीमुळे वायुप्रदूषण होतं, तो आणि आजूबाजूचा परिसर धुराने भरून जातो आणि त्याचे परिणाम पुढील काही काळ हवेत राहतात. अनेकदा माणसाला आणि पशु-पक्ष्यांना श्वास घेताना त्रास होतो. श्वासाचे आजार या वेळी जाणवतात. वातावरण अंधुक आणि अस्वच्छ जाणवतं. हे बदललेलं वातावरण पूर्ववत करणं हे माणसाच्या ताकदीच्या बाहेर जातं.

 

आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की वणवा ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामुळे वनामधील अनावश्यक गोष्टी संपून जातात नवीन अंकुर फुटण्यास मदत मिळते. वनाला एक नवीन रूप वणव्यामुळे प्राप्त होतं. मातीचा दर्जा सुधारतो आणि कीड संपण्यास मदत होते.

अर्थात, बहुतांश वेळा वणवे मानवनिर्मित असतात. वणव्यांची नक्की कारणं विस्तीर्ण पसरलेल्या जंगलात शोधणं जवळपास अशक्यच आहे, कारण वणवा लागायला काही वेळा नैसर्गिक कारणंही असली, तरी त्याआड वणवे लावून माणसातील स्वार्थी प्रवृत्ती आपली संधी साधत असतात. हे होऊ नये यासाठी आपण फक्त दक्ष राहिलं पाहिजे आणि समाजातील पर्यावरणीय निरक्षरता दूर करण्यासाठी कायम प्रयत्नशील राहिलं पाहिजे. तर त्याचा सकारात्मक परिणाम दिसू शकेल.

भारतात जंगलांना आगी अनेकदा मुद्दाम लावल्या जातात. अशा प्रकारे आग लावून शेतीसाठी जमीन मिळवली जाते किंवा शिकारीसाठी अनुकूल परिस्थिती तयार केली जाते. लाकडाच्या वापरासाठीही जंगलाला आग लावली जाते.

या आगीतून मोठ्या प्रमाणात वनसंपदेची हानी होते, कारण एकदा लागलेला वणवा वार्याच्या दिशेप्रमाणे आणि वेगानुसार पसरत जातो. त्यात मध्ये येणारे वृक्ष, इतर वनस्पती, वन्य जीव, पक्षी इत्यादींची हानी होते, या पशुपक्ष्यांच्या स्थलांतरामुळे जे नुकसान होत असतं, त्याची भरपाई होण्यास मोठा कालावधी लागतो.

जिथे मोह मोठ्या प्रमाणावर दिसतो, तिथे मोहाची फुलं वेचताना स्पष्ट दिसावं आणि सोपं जावं म्हणून आग लावली जाते, अनेक ठिकाणी चराईकरिता चांगलं गवत यावं या हेतूनेसुद्धा आग लावली जाते, (आग लावल्यावर चांगलं भरपूर गवत उगवतं, हा त्यामागचा उद्देश), ज्याचं रूपांतर वणव्यात होत असतं आणि एकदा वणव्याने पेट घेतला की त्याला कुठल्याही संरक्षित, अतिसंरक्षित जंगलाचं भान नसतं, हे सांगायला नको. काही वेळेला आपसांतील वादांचा परिणाम होऊन त्यामुळे वाईट हेतू ठेवून बदल्याच्या भावनेतूनसुद्धा आगी लावण्याचे प्रकार झाले आहेत. म्हणजे, इथेही माणूस आपल्या स्वार्थासाठी जंगलाचा आणि इतर नैसर्गिक स्रोतांचा नाश करायला मागेपुढे बघत नाही, हाच अनुभव येतो.

जंगलात लागणार्या / लावल्या गेलेल्या या आगीमुळे पर्यावरणाची हानी तर होतेच आहे, तसंच कार्बन डायऑक्साइडही वातावरणात वाढतो आहे. हा हरितगृह वायू आहे त्याचा प्रतिकूल परिणाम विश्वाच्या तापमानवाढीमध्ये दिसून येतो. हा हरितगृह वायू वातावरणातून कसा बाहेर काढता येईल याच्यावर गांभीर्याने संशोधन होतं आहे. पण जंगलांची व्याप्ती वाढवली, तर बर्याच मोठ्या प्रमाणावर हा वायू नैसर्गिकपणे झाडात कैद होईल तापमानवाढीची समस्या कमी होईल.

त्यामुळे वणव्यावर नियंत्रण राखायचं असेल, तर माणसाला आपला स्वार्थ बाजूला ठेवून, पर्यावरणाचा समतोल राखून आपला विकास करण्याची प्रक्रिया अनुसरायला लागणार आहे. जोपर्यंत बहुसंख्य माणसांच्या मानसिकतेत हा बदल होत नाही, तोपर्यंत आपण अशा नैसर्गिक आणि मानवनिर्मित वणवे लागण्याच्या घटनांचे साक्षीदार आणि गुन्हेगार होतच राहणार आहोत.