सामूहिक शेतीचे रोल मॉडेल

विवेक मराठी    31-Mar-2021
Total Views |

शेती व्यवसाय हा तोट्याचा धंदा आहे, शेतीत करिअर करण्यास नवीन शेतकर्यांची पिढीही तयार नाही, शेती करून कुणाचे चांगले झाले आहे? अशी समाजात चर्चा असताना शेती क्षेत्र संकटात असतानाही, सोलापूर जिल्ह्यातील काही सजग शेतकरीपुत्रांनी एकत्र येऊन प्रायोजकाची स्वतः जबाबदारी घेऊन दौंड तालुक्यातील मळद येथे 130 एकरावर डाळिंबाच्या सामूहिक शेतीचा यशस्वी प्रयोग राबविला आहे. हा प्रयोग शेतकर्यांच्या आर्थिक उन्नतीचा राजमार्ग ठरत आहे.


krushi_1  H x W

शेतीची, शेतकर्यांची बिकट परिस्थिती नवीन नाही. स्वातंत्र्यपूर्व काळातही हा प्रश्न भेडसावत होता. आजही तो काही प्रमाणात आहे. समाजात शेतीचे तुकडीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे शेती करणे अवघड काम बनले आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीनुसार (2012-13) राज्यात एकूण शेती कसणार्यांपैकी 78.8 टक्के शेतकरी अत्यल्प अल्पभूधारक गटात मोडतात. अशा शेतकर्यांना अल्प उत्पादनाच्या कमी भावाच्या प्रश्नाला सामोरे जावे लागते. त्यातच शेतीचा वाढलेला उत्पादन खर्च, मजुरीचे दर, वीजदर, बी-बियाणांचे खतांचे वाढते भाव पाहता त्या प्रमाणात पिकांना योग्य भाव मिळत नाही. अल्प उत्पन्नामुळे असंख्य तरुण शेती करण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळे येत्या काळात शेतीपुढे हे एक मोठे आव्हान उभे राहणार आहे.

शेतीबाबत शंका पसरविणारे अनेक लोक आहेत. पण शेतीला आधार देणारे शेतीत मॉडेल निर्माण करणारे शेतकरी नेते दुर्मीळ आहेत. जमिनीचे आरोग्य बिघडत असल्यामुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे पिकावरील कीड नियंत्रणासाठी औषधांचा मारा जमिनीतून खतांचा वापर गरजेपेक्षा जास्त झाल्यामुळे अशा फळांचे भाजीपाल्यांचे सेवन केल्यामुळे मानवी शरीरावर दूरगामी परिणाम दिसून येत असतानाही या बाबतचे गांभीर्य ना समाजात, ना प्रशासनामध्ये दिसून येते. हे वास्तव स्वीकारून शेतीमध्ये मॉडेल बनविण्याचा ध्यास घेतलेल्या सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकर्यांनी दौंड तालुक्यातील मळद येथील 130 एकरावरील डाळिंब शेतीचे मॉडेल देशाला नक्कीच दिशादर्शक ठरू शकेल.


शेती
व्यवसायातील पारंपरिक मागासलेपणा संपल्याशिवाय या क्षेत्राचा विकास होणार नाही, हा विचार उराशी बाळगून सोलापूर जिल्ह्यातील शेतकरीपुत्र एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे हे शेतकरीपुत्र सामूहिक शेतीच्या प्रवाहात उतरले आहेत. अभ्यास, टीमवर्क तयार करून सामूहिक शेतीच्या विकासाला गती देत आहेत. काळानुसार पावले उचलून आपल्या सामूहिक शेतीचे मॉडेल जगाच्या नकाशावर कसा पोहोचेल यासाठी प्रयत्न करत आहेत. शेती-मातीत राबणे हे या शेतकर्यांचे एकमेव भांडवल आहे.



krushi_2  H x W

मळदमधील प्रयोग

पुणे शहरापासून जवळपास 70 कि.मी. अंतरावर (पुणे-सोलापूर महामार्गावर) मळद हे दौंड तालुक्यातील गाव आहे. या गावात माजी . कमलताई ढोले-पाटील यांच्या कुटुंबाची 142 एकर शेती आहे. 2016 साली महाधन (दीपक फर्टिलायझर) कंपनीने ढोले-पाटील यांच्याबरोबर 10 वर्षांचा करार केला. या कंपनीने 2016 साली 70 एकरावर (अंतर - 14 9 फूट) आणि त्यानंतर 2018 साली 60 असे एकूण 130 एकरांवर (अंतर - 13 7 फूट) डाळिंबांची (जात भगवा) लागवड केली. 2020 सालापर्यंत महाधन कंपनीने ही शेती केली. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील फार्म रोव्हर फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला दीपक फर्टिलायझर कंपनीने 2026 सालापर्यंत संपूर्ण शेती करार करून दिली. कृषिभूषण अंकुश पडवळे, अमरजीत जगताप, महेश घाटगे आणि कमलताई गडदे हे चार जण सकारात्मक विचार डोळ्यांसमोर ठेवून सदरील करार शेतीच्या यशासाठी प्रयत्न करताहेत.


मंगळवेढा
तालुक्यातील खुपसंगी गावातील कृषिभूषण अंकुश पडवळे कष्टाळू, जिद्दी, मेहनती प्रयोगशील शेतकरी म्हणून परिचित आहेत. महा ऑरगॅनिक अँड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशनचे (मोर्फाचे) ते अध्यक्ष आहेत. तसेच पडवळे यांनी दुष्काळी भागात केलेल्या, राज्य देश पातळीवरील कामामुळे गटशेतीतील त्यांच्या कामामुळे त्यांना 25पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत. या माध्यमातून विषमुक्त सेंद्रिय शेतमालास शाश्वत बाजारपेठ मिळवून देण्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवार यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करत आहेत. नुकतीच पडवळे यांनी मुंबई येथे पवार यांच्या पुढाकारातून सेंद्रिय शेतीबाबतचे धोरण बदलण्याबाबत सेंद्रिय शेती उत्पादनांच्या मार्केटिंगबाबत चार मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घडवून राज्यात सेंद्रिय शेतीला गती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू केला आहे. मळदच्या सामूहिक शेतीसाठी पडवळे आपल्या अनुभवाचा ज्ञानाचा उपयोग करत आहेत. तरुण शेतकरी अमरजीत जगताप यांची पंढरपुरात डाळिंब शेती आहे. उत्कृष्ट डाळिंब नियोजनातून त्यांनी प्रगती साधलेली आहे. त्यांनाडाळिंबरत्नपुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. मोर्फाचे ते विद्यमान संचालकदेखील आहेत. याबरोबरच महेश घाटगे कमलताई गडदे यांचीही या प्रकल्पात साथ मिळत आहे. हे सर्व जण आपल्या शेतीवरच अवलंबून राहता सामूहिक शेतीद्वारे आपले अस्तित्व सिद्ध करत आहेत, याचा या चौघांना सार्थ अभिमान आहे.




krushi_4  H x W

कृषिभूषण अंकुश पडवळे सांगतात, “आम्ही शेती-मातीत राबणारे शेतकरी आहोत, भांडवलदार नव्हे. शेतात घाम गाळताना, राबताना जे अनुभवले, जे दु: सोसले, निराशा अनुभवली, त्यातून आत्मीय भावनेने एकत्र आलो आहोत. सामूहिक शेती शेतकरीच यशस्वी करू शकतात, याबाबत आम्हाला ठाम विश्वास आहे. हे काम भांडवलदार कंपन्याचे नाही. आम्हीफार्म रोव्हर फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली. त्या अंतर्गत मळद येथे 2020 ते 2026पर्यंत 130 एकर डाळिंब शेती कराराने घेतली आहे. त्यासाठी वर्षाकाठी महाधन कंपनी मूळ मालक ढोले-पाटील यांना 70 लाख रुपये भाड्याच्या रूपात द्यावे लागणार आहेत. यामध्ये करारानुसार वाढ होतही जाणार आहे. एकूणच खर्चाचा मोठा भार आम्ही स्वीकारला आहे. कितीही संकटे आली, तर कधीच आम्ही थकणार नाही. शेतीचे हे नवे रूप आम्हाला नावारूपाला आणायचे आहे. या वर्षी मोठी अतिवृष्टी झाली. त्यामुळे राज्यातील 80%पेक्षा जास्त बागांचे नुकसान झाले. पण आम्ही आमच्या शेतीतील अनुभवाचा वापर करून आम्ही आमची बाग सुस्थितीत ठेवू शकलो. पुढल्या वर्षी आम्ही यामध्ये आणखी सुधारणा करून गुणवत्तापूर्ण जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचे नियोजन आत्तापासूनच सुरू केले आहे.”


अमरजीत
जगताप म्हणाले, “डाळिंब शेती कसायला घेतली, तेव्हा बागेत झाडंझुडपं वाढली होती. भरपूर मेहनत करून, मजूर लावून बाग पूर्ववत केली. 14 ऑक्टोबर 2020 रोजी ढगफुटी झाली. तेव्हा मळद परिसरातील फळबागा अक्षरशः जमीनदोस्त झाल्या होत्या. पण काटेकोर नियोजन केल्यामुळे आमच्या बागेला फटका बसला नाही. त्यानंतर अनेक शेतकरी आमच्या बागेला भेट देऊ लागले. नवी उमेद, नवी आशा उराशी बाळगून आम्ही प्रत्यक्षात डाळिंब शेती हाती घेतली आहे. आम्ही टाकलेले पाऊल जरी खडतर असले, तरी यातून संधीचे सोने करू.”



krushi_3  H x W

115 एकरांवर आच्छादन

कंपनीच्या संचालकांनी कृषितज्ज्ञांशी, अभ्यासकांशी चर्चा करून, सूचनांचा विचार करून डाळिंब शेतीचे नवीन डिझाइन तयार केले आहे. त्यासाठी हुशार कृषी पदवीधरांची, मेहनत करणार्यांची टीम तयार केली आहे.


व्यवस्थापक
नीलकंठ जाधव म्हणाले, “130 एकरांवरील डाळिंबाचे उत्पादन निर्यातीसाठी घेतले जात आहे. त्यामुळे धुके, ढगाळ हवामान आणि दुपारी उन्हाचा कडाका यामुळे डाळिंबाला तडे जात आहेत. या विचित्र हवामानापासून डाळिंबाचे संरक्षण करण्यासाठी 80 एकर बागेलाच प्रोटेक्शन पेपरचे, तर 30 एकरांवर फळांना वर्तमानपत्राचे आच्छादन घालण्यात आले आहे. विशेष म्हणजे 22 एकरांवर आंतरपीक म्हणून शेवग्याची (जात - ओडिसी) लागवड करण्यात आली आहे.”


जैविक
स्लरी निर्मिती प्रकल्प

जमिनीत सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर व्हावा आणि ग्राहकांना विषमुक्त फळ मिळावे, या हेतूने कंपनीने जैविक स्लरी निर्मिती प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पातून दर आठवड्याला सुमारे पंधरा हजार लीटर स्लरी तयार केली जाते. संपूर्ण बागेला प्रत्येक पाण्याबरोबर स्लरी दिली जाते. मनुष्यबळाचा कमीत कमी वापर करून यांत्रिक पद्धतीने जैविक स्लरी निर्मिती केली जाते. स्लरी बनविण्यासाठी प्रामुख्याने देशी खिलार गाईचे मूत्र शेण यांचा वापर केला जातो. त्यासाठी देशी खिलार गायीचे शेण गोमूत्र विकत आणले जाते. सध्या देशी गाईचे शेण साडेतीन रुपये किलो, तर गोमूत्र 5 रुपये लीटर दराने मिळते, असे कंपनीच्या व्यवस्थापकाने सांगितले.


पर्जन्यमापक
आर्द्रता यंत्र

अत्यंत कमी खर्चात आणि विज्ञानाला शेतीला उपयुक्त ठरणारी गोष्ट कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी पर्जन्यमापक यंत्राद्वारे साकारली आहे. हे यंत्र मळदच्या शेतात बसवण्यात आले आहे. पर्जन्यमापक यंत्रामुळे शेतात, शिवारात किती पाऊस झाला त्याचे मोजमाप करून पिकांचे नियोजन करण्यात येत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जून 2020 ते जानेवारी 2021पर्यंत झालेल्या पावसाच्या नोंदी ठेवण्यात आल्या आहेत.


हवामान
बदलांमुळे आर्द्रता आणि ढगाळ वातावरण यामुळे हंगामी पिकांबरोबरच फळबागांमध्येही विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला दिसून येत आहे. त्यामुळे संभाव्य धोके लक्षात घेऊन आर्द्रतामापक यंत्र बसविण्यात आले. वातावरणातील आर्द्रता लक्षात घेऊन डाळिंबावर प्रतिबंधात्मक फवारणी केली जाते. निर्यातक्षम डाळिंब उत्पादनाचे औषधाचे वेळापत्रक विकसित केले आहे असेही त्यांनी सांगितले.


6 कोटी 20 लाख लीटर क्षमतेचे शेततळे

डाळिंब शेती ही बहुतांशी पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असते. पावसाच्या अनियमिततेमुळे अशा शेतीमधून मिळणारे उत्पन्न खात्रीशीर राहत नाही. त्यामुळे शाश्वत पाणी उपलब्ध होणे आवश्यक असते. कंपनीने शेततळ्याचा पर्याय शोधून डाळिंब शेतीला पाण्याची सोय केली आहे. कंपनीचे चार एकरावर सुमारे 6 कोटी 20 लाख लीटर क्षमतेचे शेततळे आहे. बागेला काटेकोर पाणी उपलब्ध व्हावे यासाठी 11 प्लॉटमध्ये त्याची विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक प्लॉटला किती लिटर पाणी दिले जाते, याची नोंद ठेवण्यात येते. शेततळ्यात 5 विहिरींद्वारे पाणी टाकण्यात येते. डाळिंब शेतीला गरजेनुसार अथवा वातावरणानुसार ठिंबक सिंचनाद्वारे पाणी दिले जाते.

 

डाळिंब सामूहिक शेतीची वैशिष्ट्ये

1. सामुदायिक शेतीमुळे डाळिंबास भविष्यात पूर्वनिर्धारित भाव मिळेल.

2. डाळिंब प्रक्रिया उद्योगाला वर्षभर कच्चा माल मिळेल.

3. लहान शेतकर्यांनादेखील निर्यात करण्याची संधी मिळेल.

4. प्रतिहेक्टर कराव्या लागणार्या खर्चाचे नियोजन करता आले.

5. स्पर्धात्मक बाजारात टिकाव धरण्यासाठी फायदेशीर.

 


मल्चिंग, प्रोटेक्शन नेटद्वारे पाणीबचत

कृषिभूषण अंकुश पडवळे सांगतात, “डाळिंब शेतीतील पाण्याची गरज शेतकर्यांनी समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आम्ही अत्यंत काटेकोरपणे पाण्याचे नियोजन करीत आहोत. गरजेएवढे पाणी देऊन आम्ही तेलकट डागावर नियंत्रण मिळविले आहे. उसाच्या पाल्याचे मल्चिंग करून प्रोटेक्शन नेट टाकून आम्ही पाण्याची 35% बचत केली आहे. तसेच प्रत्येक पाण्याबरोबर जिवाणू स्लरी वेस्ट डिकंपोझर देत असल्याने जमीन भुसभुशीत राहून झाडात पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता तयार होते.”


50 लोकांना कायमस्वरूपी रोजगार

मळदच्या या सामुदायिक शेतीमुळे 50 लोकांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध झाला आहे. विशेष गरजेनुसार अनुभवी कामगार 100 लोकांना गावातच रोजगाराच्या संधी मिळाली आहे. कंपनीकडे आज व्यवस्थापक, सुपरवायझर, इरिगेशन, सिक्युरिटी असे विभाग आहेत. दररोज 40 महिला, 10 पुरुष मजूर दोन ड्रायव्हर कामाला असतात.


विपणन
व्यवस्था

कोणतेही उत्पादन बाजारपेठेत आणायचे, इथपासून ते त्याचे पॅकेजिंग, वितरण, किंमत ठरविणे, लोकांपर्यंत त्याची माहिती पोहोचविणे ही महत्त्वाची कामे आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन कंपनीने ग्राहकांचा देशातील परदेशातील वैशिष्ट्यपूर्ण बाजारपेठांचा शोध घेऊन मालाची विक्री करण्याचे धोरण अंगीकारले आहे. आपला माल विकला जावा यासाठी गुणवत्तापूर्ण मालाचे उत्पादन घेत आहे. यंदा कंपनीने 450 टन डाळिंब उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. एप्रिल 2021 या महिन्यात प्रत्यक्षात माल बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.


krushi_5  H x W

भविष्यातील नियोजन

आजच्या काळात शेती परवडत नाही असे म्हणून चालणार नाही. त्यासाठी शेतकर्यांनी स्वत: व्यवसायिक झाले पाहिजे, हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून आम्ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये नावीन्यपूर्णसामूहिक शेतीचा प्रयोग यशस्वी करत आहोत. हा सर्व प्रयोग जैविक शेतीवर आधारलेला आहे. त्यामुळे या प्रयोगाच्या यशाची पदचिन्हे दिसत असून येत्या काही दिवसात आम्ही आणखी 550 एकर एकरांवर सामूहिक शेती प्रयोग राबविणार आहोत. या करारातून आम्ही बाजारपेठेला वर्षभर डाळिंब पुरवठ्याचे नियोजन करीत आहोत. त्यामुळे बाजारातील भाव चढ-उताराचा धोका कमी होईल, तसेच शाश्वत भाव मिळेलअसे कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी सांगितले.


डाळिंब या फळामध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे बाजारपेठेत या फळास चांगली मागणी आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योगातील संधी ओळखून आगामी काळात सोलापूर जिल्ह्यात डाळिंब प्रक्रिया उद्योग सुरू करणार आहोत. ज्यूस, ड्रिंक, कँडी अशी उत्पादने असतीलअसेही पडवळे यांनी सांगितले.


कृषिभूषण
अंकुश पडवळे त्यांच्या सहकार्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मळद येथे संघटित डाळिंब सामूहिक शेतीचे उत्कृष्ट मॉडेल विकसित केले आहे. या शेतीला जैविक शेतीची जोड दिली जात आहे. त्यामुळे हा प्रयोग राज्यातील शेतकर्यांसाठी राजमार्ग ठरेल हे मात्र नक्की.


प्लॉटला
मान्यवरांच्या भेटी

राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेसाहेब यांनी प्लॉटला भेट देऊन प्लॉटमध्ये चालत असणार्या अनेक प्रयोगांची माहिती घेतली. तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी भेट देऊन पाणी व्यवस्थापन, मल्चिंग जिवाणू स्लरी युनिटमधील माहिती घेतली. तसेच पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आपल्या व्यग्र दिनक्रमातूनही प्लॉटवर येऊन दीड तास पाहणी केली.


कृषिभूषण अंकुश पडवळे - 9764354089

डाळिंबरत्न अमरजीत जगताप - 9637130053