दक्षिणेचे तुकाराम - संत वेमना

विवेक मराठी    01-Apr-2021
Total Views |

संत वेमना यांनाआंध्रचे कबीरअसे संबोधिले जाते. संत वेमना यांची उपदेश करण्याची पद्धती पाहिली तर तुकोबारायांचे दर्शन होते. जातीपातीच्या भिंती बांधून आपल्याच बांधवांना अस्पृश्य समजून दूर लोटणार्या अहंकारी स्वजनांना जसे तुकोबारायांनी उपदेश दिले, त्याचप्रमाणे दक्षिणेत हे काम संत वेमना यांनी केले.

sant_1  H x W:

तिर्थी धोंडा पाणी। देव रोकडा सज्जनी॥

जाऊनिया तिर्था तुवा काय केले।

चर्म प्रक्षाळिले वरी वरी॥

काय धोविले बाहेरी। मन मळले अंतरी॥

रासभ धुतला महातिर्थामाजि। नव्हे जैसा तेजी श्यामकर्म॥

असे संत तुकोबारायांनी गर्जून सांगितले आहे. दक्षिणेतील तेलगू भाषेतील संत वेमना काय सांगतात ते पाहा -

सेतवंदु मुनुग क्षिति गाकि तेलु पौने?

काशि केग ग्रद्द गरुडु डगुने?

बदरि करुग वृद्धु बालुंडु गाडया

विश्वदाभिराम विनुर वेमा

म्हणजेच, कावेरीत अंघोळ केल्याने कावळा पांढरा होईल का? काशीला जाऊन गंगेत न्हाऊन कबुतर गरुड होईल का? बदरीनाथाची यात्रा केल्याने म्हातारा पुन्हा बालक होईल का?

शेवटी तुकोबाराय जसेतुका म्हणेअसे लिहितात, त्याप्रमाणे संत वेमनाविश्वदाभिराम विनुर वेमाअसे लिहितात. वास्तविक पाहता, संत वेमना यांनाआंध्रचे कबीरअसे संबोधिले जाते. तामिळ साहित्यातील संत तिरुवल्लुवर यांच्याशीही त्यांची तुलना केली जाते. मात्र त्यांची उपदेश करण्याची पद्धती पाहून माझ्या मराठमोळ्या मनाला तुकोबाच आठवले. जाता जाता कबिरांची समान उक्ती पाहू या...

जत्रा में फत्रा बिठाया तीरथ बनाया पानी।

दुनिया भई दिवानी पैसे की धुलधानी॥

संत वेमना यांना दक्षिणेचे तुकाराम म्हणण्याचे आणखी महत्त्वाचे कारण म्हणजे, प्रसिद्ध पाश्चात्त्य विद्वान जी.. ग्रियर्सन हे वेमना यांच्याबाबत असे लिहितात - ‘तेलगू साहित्यिकांत वेमना सर्वाधिक लोकप्रिय आहेत. या भाषेत क्वचितच अशी म्हण अथवा वाक्प्रचार आढळून येईल, ज्याचे जनकत्व वेमना यांच्याकडे जात नाही.’

 

आणि आपण मराठी भाषेत पाहतो, तर येथे तुकोबांच्या अनेक उक्तींनी म्हणींचे आणि वाक्प्रचारांचे स्थान पटकाविले आहे. जाता जाता संत वेमना हे शूद्र समाजातील मानले जातात, त्याचप्रमाणे संत तुकोबासुद्धा स्वतःबद्दलयाति शूद्रअसा उल्लेख करतात.

लेखक नार्ल वेंकटेश्वर राव यांचावेमनाहा ग्रंथ साहित्य अकादमीने प्रकाशित केला आहे. त्यात ते म्हणतात की, ‘तेलगू काव्यशास्त्राचे प्रमाणपुरुष अप्प कवी यांच्या नियमानुसार कोणत्याही कारणाशिवाय आणि परीक्षेवाचून शूद्राची कविता अस्वीकार्य मानली जावी.’ एका अर्थाने हे अप्प कवी म्हणजे त्या काळातील गाथा बुडवायला निघालेलेरामेश्वरभट्ट म्हणावे लागतील. पण ज्याप्रमाणे जनमानसात तुकोबांची गाथा तरली आणि अजूनही तरून आहे, त्याचप्रमाणे संत वेमना यांच्या उक्तींना तेलगू भाषेत लोकोक्तीचे स्थान मिळाले आहे. आजही तुकोबारायांनाविद्रोही तुकारामम्हणून संबोधले जाते, तसेच संत वेमना यांनादेखील विद्रोही कवी मानले जाते. त्यांच्या मूर्तिपूजेच्या विरोधातील कठोर वचनांमुळे त्यांना मूर्तिभंजकही मानले जाते. संतांची अशी वचने पाहून समाजशत्रूंना आनंदाच्या उकळ्याच फुटत असतात आणि येथील समाजावर संस्कृतीवर विखारी टीका करण्यासाठी अशा समाजसंघटक संतांच्या वचनांचा आधार घेण्याचे दुष्कर्म ते उजळ माथ्याने करू पाहतात; पण आपले मूल सुधारावे म्हणून ज्याप्रमाणे आई त्याला टोचून बोलते, त्याचप्रमाणे माउलीची ममता धारण करूनच या संतांनी आपला समाज सुधारावा म्हणून अशी कटू शब्दांनी टीका केली आहे, हे सत्य त्या समाजशत्रूंना उमगत नाही. आजही आपण अशा संतांच्या वाणीकडेममतामयी मातेच्यादृष्टीकोनातूनच पाहिले पाहिजे. याच प्रकाशात नार्ल वेंकटेश्वरराव यांच्या पुढील अवतरणाचा विचार करायला हवा - ‘वेमना यांनी वेद आणि वैदिक बली-प्रथा, पुराण आणि त्यामधील काल्पनिक नायक, धर्मशास्त्र आणि त्यातील सामाजिक न्यायाचा असमान स्तर यांचा, एवढेच नव्हे, तर आध्यात्मिक प्रेरणा हाच ज्यांचा स्रोत आहे आणि ज्यांना खोडून काढणे अशक्य आहे अशा धार्मिक ग्रंथांचा उपहास केला आहे. ते पूर्णपणे मूर्तिभंजक आहेत आणि कोणत्याही प्रकारच्या मूर्तिपूजेचे विरोधक आहेत. जे या सर्व गोष्टी तर्कसंगत आहेत असे मानतात, अशांचाही वेमना कठोरपणे विरोध करतात. ते सामाजिक विद्रोही आहेत. जातीपातीच्या समर्थकांशी त्यांनी सतत लढा दिलेला आहे. अस्पृश्यता हा मानवाच्या दृष्टीने अक्षम्य अपराध आहे. त्यामुळे त्यांनी सदैव त्याचा विरोधच केला आहे. याच कारणामुळे सनातनी कर्मठ लोकांनी त्यांना पाखंडी आणि अश्रद्ध मानले आहे.’

 

मुळात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, धर्माच्या नावावर ज्यांनी पाखंड आणि अवडंबर माजविले होते, अशांच्या विरोधात कार्य केल्यामुळेच वेमना यांना पाखंडी ठरविण्याचा प्रयास समाजातील तत्कालीन ठेकेदारांनी केला होता. असे कार्य तर संत तुकारामांनीही केले आणि बजावून सांगितले -

 

तुका म्हणे अवघे सोंग। तेथे कैचा पांडुरंग॥

संत वेमना काय सांगतात ते पाहा. ते ओरडून सांगतात -

तुम्ही अपवित्र आहात,

मला शिवू नका!

पण हा भेद कोण करू शकतो?

जो निष्कलंक जन्माला आला असा कोण आहे?

प्रत्येकाच्या शरीरात पापाचेच मंदिर आहे!’

संत वेमना सांगतात -

सर्वांत आवडीची वस्तू कोणती? जीवन!

पण लोक हजारो जिवांच्या प्राणापेक्षाही सुवर्णाला अधिक मोल देतात.’

याच प्रकारे उपदेश करताना तुकाराम महाराज सांगतात -

निक्षेपिले धन। तेथे गुंतलेसे मन॥

नाशिवंतासाठी। तुका म्हणे करिसी आटी॥

जातीपातीच्या भिंती बांधून आपल्याच बांधवांना अस्पृश्य समजून दूर लोटणार्या अहंकारी स्वजनांना उपदेश करताना वेमना म्हणतात -

जे शूद्र कुळातच जन्माला आले

ते आपल्या बांधवांना नीच मानतात

आणि आपल्याला द्विज मानतात.

ज्यांच्या हृदयात पापाची वासना आहे

तेच खरोखर शूद्र अधम आहेत

त्यांच्या हृदयात आहे खरी अस्पृश्यता

म्हणून ते अस्पृश्यांना नावे ठेवतात.

पण तेसुद्धा द्विज बनू शकतात

जीवन आणि जातीला उत्तम विचारांनी नवीनता देऊन.

पण ज्यांच्या पापी मेंदूत उत्तम विचार उपजत नाही

ते स्वतःला भूदेव म्हणून मिरवितात

आम्ही पवित्र आहोत, ज्ञानी आहोत,

सर्व शास्त्र जाणतो असा टेंभा मिरवितात

पण गरिबातील गरीब माणूससुद्धा

या अहंकारी माणसांपेक्षा उत्तम आहे.

ब्राह्मण असा विचार करतो,

यज्ञोपवित धारण केल्यामुळे माझे शूद्रत्व लोपले आहे

पण जेव्हा त्याचा मृत्यू ओढवतो

तेव्हा ते ब्राह्मणत्व त्याला सोडून जाते

हे तो स्वतः कसे विसरून गेला आहे?’

संत तुकाराम महाराज सांगतात -

टिळा टोपी उंच दावी। जगी मी एक गोसावी॥

अवघा वरपंग सारा। पोटी विषयांचा थारा॥

मुद्रा लाविता कोरोनि। मान व्हावयासी जनी॥

तुका म्हणे ऐसे किती। नरका गेले पुढे जाती॥

संत वेमना सांगतात - ‘केवळ पोथ्यापुराणे वाचून कोणी सभ्य आणि सुसंस्कृत होत नाही. त्याच्या मनातील खुजेपण दूर झाले पाहिजे. गाढवाने आपल्या पाठीवरून अत्तराचा भार वाहून नेला म्हणून तो पूज्य ठरत नाही.’

संत तुकाराम सांगतात -

वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा।

येरांनी वहावा भार माथा॥

साकरेच्या गोण्या बैलाचिये पाठी।

तयाशी शेवटी करबाडे॥

संत वेमना समाजातील अवडंबरावर प्रहार जरी करीत असले, तरी त्यांना समाजापासून आपला वेगळा वर्ग निर्माण करण्याची इच्छा नाही; उलट सर्वांनी एकमेकांचा हात धरून समरसतेने एकाच वाटेवरून वाटचाल करावी, असेच त्यांचे मत आहे. ते सांगतात -

जगातील सर्वांना एकाच थाळीत जेवायला वाढा

सर्व भेदभावांचा त्याग करून

एकच गोपाळकाला जेवा

हात उंचावून सर्वांना आशीर्वाद द्या -

सर्व जण एकोप्याने राहावेत!’

काल्याच्या अभंगात याच भावनेचा परिपोष झाला आहे आणि तुकाराम महाराज सांगतात -

काला वाटू एकमेका। वैष्णव निका संभ्रम॥

तुका म्हणे काला। कोठे भेद देखिला॥

समाजातील धनवंतांना उपदेश करताना वेमना म्हणतात -

सदा दयाळू आणि उदारपणे वागा

आपल्या दरवाजावरून गरिबाला हाकलू नका.

जो केवळ धन जमवितो

आणि त्याचा सदुपयोग करणे जाणत नाही,

तो शेतामधील बुजगावणे होय,

ज्याला घाबरून पक्षी दूर पळतात,

ज्याच्या चारी बाजूला समृद्धी असते

पण त्या समृद्धीचा त्याला काही उपयोग नसतो.’

संत तुकारामांचे हेच सांगणे नव्हे काय? ते सांगतात -

जोडोनिया धन उत्तम व्यवहारे। उदास विचारे वेच करी।

भूतदया गाई पशूंचे पालन। तान्हेल्या जीवन वनामाजि॥

तुका म्हणे हेचि आश्रमाचे फळ। परमपद बळ वैराग्याचे॥

यामुळेच नार्ल वेंकटेश्वर राव आपल्या ग्रंथात असे म्हणतात की, ‘मनुष्यधर्म हाच यांचा धर्म आहे. प्रेम, मानवी सौहार्द आणि स्नेह हाच यांचा संदेश आहे. ज्यामध्ये जात, धर्म, सिद्धान्त आणि संप्रदाय, वर्ग आणि वर्ण यांच्यावर आधारित कोणताही भेदभाव केला जाणार नाही, अशा विश्वबंधुत्वाची स्थापना करणे हाच यांचा उद्देश आहे. आस्तिक आणि नास्तिक या सर्वांसाठी वेमना यांचा हाच संदेश आहे. जो आपल्या बरोबरच्या माणसांचे दुःख आपले दुःख आहे असे मानतो तोच मनुष्य म्हणवून घेण्याच्या योग्यतेचा आहे, याच एका उदात्त घोषणेत वेमना यांच्या सर्व उपदेशाचे सार सामावले आहे.’

जी. लक्ष्मीनारायण आपल्यावेमनाया ग्रंथात असे म्हणतात - ‘सतराव्या शतकातील हा महान बुद्धिवादी आणि मानवतावादी संत त्याच्या काळातील अनेक कुप्रथांच्या विरोधात एकाकी लढा देत राहिला आणि तत्कालीन समाजात व्यापलेल्या अनेक द्वंद्व भावांनी आणि विरोधाभासांनी त्रस्त झालेल्या लोकांच्या जीवनात त्यांनी समरसता आणली.’

संत वेमना हे निर्गुणोपासक शिवयोगी होते. शिव हा निराकार, अलख आणि अमूर्त आहे अशी त्यांची धारणा होती. ते खर्या अर्थाने लोकसंत होते. त्यांनी दक्षिणेचे आध्यात्मिक नेतृत्व केले. ‘हरीचे भजन करणारा हा हरीचा होऊन जातोअसा सिद्धान्त उत्तर भारतात जेव्हा स्वामी रामानंदांचे शिष्य कबीर, रैदास आणि सेना करीत होते, तेव्हाशिवाला भजणारा हा शिवाचा होऊन जातोअसे सांगत वेमना आणि त्यांची प्रभावळ आपला उपदेश चरितार्थ मांडीत होते. त्यांचा काळ म्हणजे धार्मिक आणि आध्यात्मिक मार्गात माजलेले कर्मठपणाचे अवडंबर दूर सारून भक्तिमार्गाची स्थापना करण्याचा काळ होता. या काळात उत्तर भारतात वैष्णव आणि दक्षिण भारतात शैव संतांनी सामाजिक चेतनेची जागृती घडवून आणली. या काळात देवदासी प्रथेला घाणेरडे रूप आले होते आणि पवित्र देवालयांतही वासनेने व्यभिचाराने हातपाय पसरले होते. अशा वेळी वेमना यांनी शुद्ध भक्तिमार्गाचा आणि आत्मस्वरूप शिवाच्या उपासनेचा प्रचार केला.



sant_1  H x W:

संत वेमना यांचा जन्म नेल्लूर जिल्ह्यातील मूगचिंतल गावात वीरशैव संप्रदायातच झाला होता. काही वेळा ते स्वतःलाकापूतर काही वेळारेड्डीअसे म्हणतात. विद्वान लोक असे सांगतात की, त्यांच्या काळी या दोन्ही जातीजमाती एकच मानल्या जात होत्या. पत्नी रत्नावलीच्या मोहापोटी पावसाच्या वादळी रात्री नदीतून प्रेताला पकडून पोहत जाणार्या आणि खिडकीला लोंबणार्या सर्पाला धरून आलेल्या संत तुलसीदासांनी जशी विषयभोगांकडे पाठ फिरविली होती; विषयलोलुप जीवनाचा त्याग करून भगवान बुद्धांनी श्रमण बनून ज्ञानाचा शोध घेतला होता; तशाच प्रकारे विषयवासना आणि लालसा यांनी व्यापलेल्या जीवनाचा त्याग करून वेमना हे सिद्धयोगी झाले होते. संत वेमना यांनी सर्वसंगपरित्याग करून दिगंबरावस्था धारण केली. ते स्मशानातच राहू लागले. जीवनाच्या शेवटी त्यांनी मौन धारण केले होते. मिळेल ते उष्टे अन्न खाऊन ते राहत आणि जमिनीवरच झोपत. सदुसष्टाव्या वर्षी त्यांनी पामूर नावाच्या एका गावाजवळील गुंफेत समाधी घेतली. अनंतपूर येथे कटारूपल्ली गावात त्यांची समाधी आहे. त्यांच्या पदांची संख्या तीन हजारांच्या जवळपास आहे. त्यांनी लोकभाषेतच आपला उपदेश कथन केला आहे. संत वेमना यांनी आपल्या अनुयायांना जे सात प्रमुख नियम सांगितले होते, तेच सांगून आपण समारोप करू या -

- चोरी करू नका.

- दुसर्याचे अंतःकरण दुखवू नका.

- दुसर्याच्या समृद्धीमुळे त्याचा द्वेष करू नका.

- जीवमात्रांवर दया करा.

- सदैव ईश्वराचे चिंतन करा.

- क्रोधाचा त्याग करा.

- जे मिळेल त्यात संतुष्ट राहा.