काळाची हाक

विवेक मराठी    16-Apr-2021
Total Views |

कोरोनावर आपल्याला मात करायची आहे आणि या लढाईत आपण सारेच सैनिक आहोत. नरेंद्र मोदी आपले उत्तम नेतृत्व करीत आहेत. त्यांनी चार गोष्टी सांगितल्या आहेत - मास्क वापरा, नेहमी हात धुवा, सामाजिक अंतर ठेवा आणि कोरोनाची लस घ्या. त्याचे आपण सर्वांनी त्याचे काटोकोर पालन केले पाहिजे.

corona_1  H x W

आपला देश अतिशय प्राचीन आहे. वयच मोजायचे झाले, तर ते कोणी पाच हजार वर्षे सांगतात, तर कोणी दहा हजार वर्षे सांगतात. फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका यांच्या संविधानांचा इतिहास लिहिताना ओघाने युरोपमधील अन्य देशांचे वाचन करावे लागले, तेव्हा एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे आपल्या देशाच्या वयाचा विचार करता रशिया-अमेरिकेसहित सगळे देश ही लहान बालके आहेत. त्यांच्या संस्कृतीचा विकास अजून व्हायचा आहे. तंत्रज्ञानात आणि औद्योगिक विकासात आणि त्यामुळे आर्थिक विकासात हे सगळे देश आपल्यापेक्षा फार पुढे आहेत. परंतु देश टिकून ठेवण्यास जे सत्त्व लागते, जी आंतरिक ऊर्जा लागते, ती म्हणावी तितकी सशक्त नाही. त्यांच्या देशाचा स्थैर्याचा आधार राजसत्ता आहेत, म्हणून ते एकखांबी आहेत.

सध्या जगभर कोरोना विषाणूने हाहाकार माजविलेला आहे. भारतातही दुसर्या लाटेने प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण केलेले आहे. आपल्या संस्कृतीने गेल्या पाच हजार किंवा दहा हजार वर्षांत अशी संकटे झेललेली आहेत. म्हणून कवी इक्बाल म्हणून गेला की, ‘बात कुछ ऐसी है की, हस्ती मिटती नहीं हमारी।अस्मानी संकटांबरोबर सुलतानी संकटांचा सामना आपण केलेला आहे. आणि या सर्वांवर मात करून जसे आम्ही हजारो वर्षांपूर्वी होतो, तसेच आजही आहोत. संस्कृतीचा आणि जीवनमूल्यांचा कधीही खंडित होणारा एक प्रवाह आपल्या देशात वाहत असतो. आमची गंगा कधी आटत नाही.

या कोरोना संकटाशी आपल्याला लढायचे आहे. विदेशी आक्रमकांशी रणांगणात लढावे लागते. शस्त्राने लढावे लागते. कधी माघार घ्यावी लागते, तर कधी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. कोरोना विषाणूचे संकट थोडे वेगळे आहे. हा विषाणू साध्या डोळ्यांनी दिसत नाही. सामान्य औषधांना हा दाद देत नाही. आपल्या पुराणात हिरण्यकश्यपूची कथा सांगतात. त्याला वर मिळाला होता की, तो शस्त्राने मरणार नाही, मनुष्याच्या हातून मरणार नाही, दिवसा-रात्री तो मरणार नाही. त्याला मारण्यासाठी अर्धा सिंह आणि अर्धा माणूस असा नरसिंहाचा अवतार निर्माण व्हावा लागला. दिवसही नाही आणि रात्रही नाही, अशा सांजवेळी नरसिंहाने त्याचे पोट फाडले. ही आपली विजिगीषू वृत्ती आहे.

कोरोनावर आपल्याला मात करायची आहे आणि या लढाईत आपण सारेच सैनिक आहोत. नरेंद्र मोदी आपले उत्तम नेतृत्व करीत आहेत. त्यांनी चार गोष्टी सांगितल्या आहेत - मास्क वापरा, नेहमी हात धुवा, सामाजिक अंतर ठेवा आणि कोरोनाची लस घ्या. हा लेख लिहीत असताना त्यांनी कोरोना लसीचा उत्सव म्हणून साजरा करा असे म्हटले आहे. आपण सर्वांनी त्याचे काटोकोर पालन केले पाहिजे.

ही वेळ पक्षीय राजकारण करण्याची नाही. लसीचे राजकारण, रेमडेसिवीरचे राजकारण, ऑक्सिजनचे राजकारण अजिबात करू नये. जे करत असतील, त्यांना साथ देऊ नये. त्यांची वक्तव्ये ऐकू नयेत. लढाईच्या रणधुमाळीत लक्ष्य फक्त विजयाचेच असले पाहिजे, अन्य कशावर लक्ष जाता कामा नये. कोरोना संपल्यावर राजकारण करायला वेळच वेळ आहे. तेव्हा एकमेकांचे हिशोब पूर्ण करण्याच्या मागे लागावे, आता फक्त लढायचेच आहे आणि मोदींनी सांगितलेल्या शस्त्रांनीच लढायचे आहे, याचा विसर पडू देऊ नये.

या काळात अनेक लोक जीभ सैल सोडून भन्नाट वक्तव्ये करीत असतात. ‘कोरोनात मरणारे त्याच लायकीचे असतात.. कोरोना इंजेक्शन घेऊ नये, त्यात अनेक त्रुटी आहेत.. मास्क अजिबात वापरू नये, त्याचा आणि कोरोनाचा काहीही संबंध नाही.. कोरोनाग्रस्तांचा आकडा बनावट आहे, तो मुद्दाम फुगवून सागण्यात येतो.’.. एकदा जीभ सैल सोडली की ती उधळलेल्या घोड्याप्रमाणे कुठे जाईल हे सांगता येत नाही. अशी वक्तव्ये ऐकू नयेत, वाचू नयेत. सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्टही पाहू नयेत.

एकमेकांना साहाय्य करून परस्परांची काळजी घेत आरोग्याच्या सर्व नियमांचे पालन करीत आपल्याला चालायचे आहे. यासाठी मानसिक एकजुटीची गरज आहे. कोण कुठल्या पक्षाचा आहे आणि तो काय सांगतो, याचा विचार करण्याची ही वेळ नाही. शत्रूशी लढताना आपले बळ एकीत असते. आरोग्याला घातक विषाणूशी लढताना मानसिक आणि भावनिक ऐक्यात आपले बळ असते. आपल्या देशाची ही सांस्कृतिक परंपरा आहे. तिच्यावर आपलेच लोक जेव्हा आघात करतात, तेव्हा अशा सर्व लोकांना दृश्य स्वरूपातील कोरोना विषाणू समजून त्यांच्यापासून दूर राहिले पाहिजे. आपल्या सर्वांनी निर्धार केला पाहिजे की, आपल्याला कोरोनाचे युद्ध जिंकायचे आहे. युद्धामध्ये अनेक बंधने येतात. सामान्य सुखसोयींना दूर ठेवावे लागते, त्याचा आरडाओरडा करू नये. सहनशीलता ही आमची ताकद आहे. काही काळ अडचणी सहन करू, पण निर्धार पक्का ठेवू. ही काळाची हाक आहे.