आधुनिक प्रल्हाद संत हरिदास

विवेक मराठी    16-Apr-2021
Total Views |

समाजसंघटन आणि समाजसुधारणा या क्षेत्रांत कार्य करताना सर्वच संतांना आणि महापुरुषांना परधर्मी आक्रमकांच्या छळाबरोबर स्वकीयांच्या तिरस्कारालाही तोंड द्यावे लागले होते, ही गोष्ट हरिदासांच्या चरित्रातूनही दिसून येते.

Saint Haridas_1 &nbs

सध्या बांगला देश हा चर्चेचा विषय झाला आहे, पण एकेकाळी हा बांगला देश भारतभूमीचाच भाग होता आणि तेथे हिंदू धर्माची ध्वजा फडकविणार्या हरिदास ठाकूर या महान वैष्णव संताचा जन्म झाला होता. त्यांचे जन्मवर्ष इ.स. 1551 किंवा 1550 असावे. कृष्णभक्ती आंदोलनाचा प्रचार-प्रसार करण्यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ते चैतन्य महाप्रभूंचे मुख्य शिष्य होते.

हरिदास ठाकूर यांचा जन्म खुलना जिल्ह्यातील बूढन या गावात (सध्या बांगला देशात) हिंदू ब्राह्मण कुटुंबात झाला. त्याच्या वडिलांचे नाव सुमती आणि आईचे नाव गौरी असे होते. हरिदास सहा महिन्यांचे असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि आई सती गेली. मृत्यू होण्यापूर्वी हरिदासला वडिलांनी ज्या कुटुंबाकडे सोपविले होते, त्यांना निरुपायाने मुसलमान धर्म स्वीकारावा लागला होता. हरिदास मोठे झाल्यावर या कुटुंबाने त्यांची जन्मकथा त्यांना सांगून हरिनामाचा प्रसार करण्याबाबत त्यांच्या वडिलांचा अंतिम निरोप सांगितला. त्यानुसार हरिनामस्मरण हेच हरिदास यांचे जीवनध्येय बनले. मुसलमान कुटुंबात त्यांचे पालनपोषण झाल्यामुळे तेव्हाच्या समाजाने त्यांनाही मुसलमानच मानले होते. प्रभुदत्त ब्रह्मचारी यांच्या मते, हरिदास यांचा जन्म मुसलमान समाजातच झाला होता. मात्र आधुनिक भक्त प्रल्हादाप्रमाणे त्यांची कीर्ती उत्तरोत्तर वाढतच गेली.


महात्मा
हरिदास यांचे फुलिया नामक गावात वास्तव्य होते. त्या वेळी संपूर्ण देशावर मोगलांचे वर्चस्व होते. इस्लाम हाच राजधर्म बनला होता. ठिकठिकाणचे मुल्लामौलवी आणि काजी इस्लामचा प्रचार करण्यासाठी बर्यावाईट अशा सर्व मार्गांचा अवलंब करीत होते. फुलिया गावच्या परिसरात इस्लामच्या प्रचार-प्रसाराची जबाबदारी गोराई नामक एका काजीने आपल्या अंगावर घेतली होती.


जेव्हा
काजीने हरिदासांचा संपूर्ण समाजावरील मोठा प्रभाव पाहिला, तेव्हा त्याला त्यांचा हेवा वाटू लागला. इस्लामच्या प्रसारात ही फार मोठी धोंड आहे, असा त्याने विचार केला. खुद्द मुसलमान असूनही हरिदास हा कृष्णभक्तीचा प्रसार करतो, हे काजीच्या पचनी पडत नव्हते. शेवटी सरकारदरबारी तक्रार गुदरण्यात आली हरिदास यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर खटला चालविण्यासाठी त्यांना मुलुकपाटी येथे आणण्यात आले. भगवान श्रीकृष्णाचे परमभक्त हरिदासांचे दर्शन होणार, म्हणून तेथील जनतेला मोठाच आनंद झाला होता त्यांचे दर्शन घेण्यासाठी तेथे मोठा जनसागर लोटला, एवढेच नव्हे, तर जेव्हा हरिदासांना तुरुंगात आणले जाईल तेव्हा त्यांचे दर्शन आपल्याला व्हावे, म्हणून कैद्यांनीही पहारेकर्यांना काकुळतीने विनवणी केली होती. त्यामुळे सर्व कैद्यांना हरिदासांचे दर्शन घडले आणि त्यांच्याही मनात कृष्णभक्तीचा भाव निर्माण झाला. आपला उद्धार व्हावा, अशी सर्व कैद्यांनी हरिदासांच्या चरणी प्रार्थना केली. तेव्हा हरिदास म्हणाले, “जैसी स्थिती आहे तैशा परी राहे। कौतुक तू पाहे संचिताचे॥म्हणजेच आहे त्याच स्थितीत तुम्ही राहिलात तरच तुमचा उद्धार होईल! त्यांच्या उपदेशाचा अर्थ कळल्यामुळे सर्व कैदी शोक आणि आकांत करू लागले. ‘संतदर्शनाने लोकांचे कल्याण होते, पण आमचे मात्र अहित झाले!!’ असा त्यांचा विलाप ऐकून हरिदास कृपाळूपणे म्हणाले, “बंधूंनो! माझ्या येथे येण्यामुळे तुमच्या मनात जो कृष्णभक्तीचा भाव निर्माण झाला आहे, तो यापुढेही टिकवून ठेवा असा माझ्या उपदेशाचा अर्थ आहे. यामुळेच तुमचा उद्धार होणार आहे.” एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा। हरिकृपे त्याचा नाश आहे!!

जेव्हा दंडाधिकार्यासमोर हरिदासांना आणण्यात आले, तेव्हा त्यांचा प्रभाव पाहून न्यायालयात त्यांना आसन देण्यात आले. दंडाधिकार्याने त्यांना सांगितले, “बंधू, तू मुस्लीम घरात जन्मलास ही तुझ्यावरची अल्लाहची मेहेरबानी आहे. पण मुसलमानांच्या घरात जन्मल्यानंतरही तू काफिरांप्रमाणे का वागतोस? पवित्र कुराणात सांगितल्याप्रमाणे आचरण केल्यावाचून कुणालाही मुक्ती लाभत नाही. आताही वेळ आहे. तू अल्लाहपुढे नम्र होऊन तोबा, तोबा कर! कलमा पढ आणि महंमद साहेबांच्या आश्रयाला ये! अल्लाह तुझ्या सर्व पापांना क्षमा करेल.”

 

हरिदास त्यांना नम्रपणे म्हणाले, “हे पाहा, प्रत्येकाची श्रद्धा मोलाची असते आणि त्या श्रद्धेमुळेच त्याचा उद्धार होत असतो. जे डरपोक लोक इतरांच्या छळामुळे, जुलूम-जबरदस्ती अथवा शिक्षेच्या भयापोटी किंवा प्रलोभनामुळे आपली नैसर्गिक श्रद्धा सोडून देतात, त्यांना इहपरलोकी शांती लाभत नाही. प्राणदंडाच्या भयापोटी मी भगवंताच्या नामस्मरणाचा त्याग केला, तर मला नरकातसुद्धा स्थान मिळणार नाही!”

तेव्हा न्यायाधिकार्याने युक्तिवाद केला - “आपण सांगता त्या गोष्टी एखाद्या हिंदूसाठी योग्य असू शकतात. तुम्ही मुस्लीम आहात, तेव्हा तुम्हाला इस्लाम सांगतो तसेच आचरण केले पाहिजे, हेच न्यायोचित आहे!”

संत हरिदास म्हणाले, “महाराज, आपले हे म्हणणे बरोबर आहे. जर ज्याने-त्याने आपापल्या धर्मानुसार आचरण करावे असे तुम्हाला वाटते, तर मग जेव्हा एखाद्या हिंदूला बाटविण्यात येते, तेव्हा त्या बाटविणार्याला आपण शिक्षा का करीत नाही? अथवा जुलूमजबरदस्तीने किंवा प्रलोभनामुळे जेव्हा एखादा हिंदू आपला धर्म सोडून मुस्लीम बनतो, तेव्हा तुम्ही त्याला शिक्षा का करीत नाही? त्याने हिंदू धर्मानुसारच आचरण केले पाहिजे अशी सक्ती का करत नाही? जेव्हा तुम्ही हिंदूंना त्यांचा धर्म सोडून मुसलमान होण्याचा आपण आग्रह धरता, तेव्हा मुस्लिमांनाही हे असे धर्मस्वातंत्र्य मिळायला हवे. मग तुम्ही मला कलमा पढण्यास भाग का पाडता?”

न्यायाधिकारी सुजाण होते. त्यामुळे हरिदासांचा बिनतोड तर्कसंगत युक्तिवाद ऐकून ते शांत बसले. हे प्रकरण आपल्यावरच उलटले आहे ही गोष्ट गोराई काजी यांच्या लक्षात आली. तेव्हा काजी आकांडतांडव करीत म्हणाला, “या गोष्टी बकवास आहेत. आम्हाला या सर्व गोष्टी ऐकायच्या नाहीत. इस्लाम धर्मात असे लिहिले आहे की जो इस्लामच्या धर्मानुसार आचरण करतो त्याला मोक्ष मिळतो, त्याला विरोध करणार्यांना नव्हे. तू कुफ्र (अनीती) करतोस. जे लोक चुकीचे वागतात त्यांना शिक्षा करणे हेच आमचे काम आहे. मला सांग - तुला कलमा पढणे मान्य आहे की शिक्षा भोगणेे?”

 

हरिदासजी निर्भीडपणे म्हणाले, “मला काय म्हणायचे होते ते एकदा सांगितले आहे. मोठ्यातील मोठी शिक्षादेखील माझे लक्ष विचलित करू शकत नाही. जरी आपण माझ्या शरीराचे तुकडे तुकडे केले, तरी जोपर्यंत माझ्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत मी हरिनाम जपणे सोडू शकत नाही.”

जणू हा हिरण्यकशिपू आणि आधुनिक प्रल्हादाचाच संवाद होता. गोराई काजी म्हणाले, ‘शिक्षा झालीच पाहिजे. जर शिक्षा झाली नाही, तर प्रत्येक जण मनमानी करण्यास सुरुवात करेल. जेव्हा पुढच्याला ठेच लागते, तेव्हाच मागचा शहाणा बनतो. याला तर भर बाजारात फिरवून याची पाठ चाबकाने फोडून काढली पाहिजे!”

सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. काजीने सांगितलेली शिक्षाच न्यायाधीशांनी फर्मावली. भर बाजारात नेऊन हरिदासांची पाठ चाबकाने फोडून काढण्यास शिपायांनी सुरुवात केली. फटक्यागणिक हरिदासांच्या मुखातून हरिनामच बाहेर पडत होते. त्यांना फटके मारून शिपाई दमले आणि म्हणाले, “महाराज, सर्वसामान्य माणसांत एवढा छळ सोसण्याची शक्ती नसते. पण आपण देवाचे अवतार आहात. दुसरा असता तर एवढ्यात अल्लाहला प्यारा झाला असता. तुम्हाला फटके मारता मारता आमचेच प्राण कंठाशी आले आहेत. आज काजी आमचा जीव घेतल्यावाचून राहणार नाही.”

शिपायांची बिकट अवस्था जाणून हरिदास क्षणार्धात समाधीत लीन झाले. त्यांचा देह निश्चेष्ट पडला, हे पाहून शिपायांना ते मरण पावले आहेत असेच वाटले. ही बातमी कळताच काजी आनंदाने म्हणाला, “हा काफर होता. त्याला कबरस्तानात दफन करता कामा नये. तो जहन्नममध्ये गेला पाहिजे. याचा मृतदेह अंतिम संस्कार करता गंगेत फेकून द्या!!”

 

त्यानुसार हरिदासांचा देह गंगेला अर्पण करण्यात आला. मात्र गंगेच्या पावन प्रवाहात टाकल्याबरोबर काही वेळाने हरिदासांच्या देहात पुन्हा चेतना आली आणि सर्व लोकांनी हा चमत्कार पाहून हरिनामाचा जयजयकार केला. हरिदासांना शिक्षा सुनावणार्या न्यायाधिकार्याचे आणि काजीचे तोंड काळे झाले. म्हणतात ना - ‘तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले। म्हणोनि रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले॥

फुलिया गावच्या परिसरात या संतपुरुषाच्या छळामुळे मोठा जनरोष उसळला. तेव्हा जनसमुदायाला शांत करण्यासाठी न्यायाधिकारीच संत हरिदासांना शरण गेला आणि त्याने क्षमा मागितली. हरिदासांनीही उदार मनाने त्यांना क्षमा केली. अशा रितीने काजीचा डाव उलटला. हरिदासांचा विनाश तर झाला नाहीच, उलट त्यांचा महिमा अधिकच वाढीस लागला. त्यांचा महिमा पाहून जुनाट पुराणमतवादी पंडितांचा जळफळाट होऊ लागला.

 

हरिनदी या गावातील एक अहंकारी ब्राह्मण हरिदासांना भेटून म्हणाला - “अरे, बोलूनचालून तू मुस्लीम. तुलाहरे कृष्णमहामंत्राचा जप करण्याचा अधिकार कोणी दिला? तू स्वतः अधर्म करीत आहेस आणि जे लोक तुझे भक्त म्हणवून तुझी उपासना करतात, तेसुद्धा पापच करतात. शास्त्रात असे लिहिले आहे की जेथे असे पाप घडते, तेथे दुष्काळ, अकाल मृत्यू, भीती आणि दारिद्य्र यासारख्या गोष्टी नांदतात. तू हरिजप करणे सोडले नाहीस, तर हा सारा देश अशुद्ध अपवित्र होईल.”

हरिदास अत्यंत नम्रपणे म्हणाले, “विप्रवर! मी मूढ मनुष्य आहे. मी शास्त्र जाणत नाही. आपल्यासारख्या विद्वानांच्या तोंडून ऐकले आहे की या द्विजाव्यतिरिक्त कोणालाही वेदांचा अभ्यास करण्याचा अधिकार नाही, परंतु भगवंतांनी अगदी पापयोनी मानलेल्यांना, किरात, हूण, यवन या सर्वांना नामजपाचा अधिकार दिलेला आहे.

अपिचेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक

क्षिप्रं भवति धर्मात्मा।

हरिदासांचा युक्तिवाद ऐकून तो ब्राह्मण अधिकच खवळला म्हणाला, “अरे, शास्त्रात जपाचे मानसिक, उपांशु आणि वाचिक असे तीन प्रकार आहेत आणि तू हा जो मोठमोठ्याने ओरडून वैखरी जप करतोस ना, तो अत्यंत हीन आणि नीच प्रकार आहे!”

 

हरिदास नम्रपणे म्हणाले, “महाराज! मला स्वतःला काही माहीत नाही, परंतु माझे गुरुदेव श्री अद्वैताचार्य यांच्या तोंडून मी शास्त्राचे रहस्य थोडेसे ऐकले आहे. गुरूने सिद्ध केलेला विधिवत दिलेला जो गौप्य मंत्र असतो, त्याच्या जपालाच हे नियम लागू होतात, पण भगवन्नामस्मरणासाठी शास्त्रात कोणतीही पद्धत नमूद केलेली नाही. भगवंताचे नाम कसेही आणि कुठेही घेतले, तरी जिवाचा उद्धारच होतो.

नारद पुराणात भक्त प्रल्हादांनीच हे सांगितले आहे -

हरिनामाणी स्थला शतगुनाधिक जप:

आत्मामंच पुण्यत्ययज्ञजपान श्रोत्रां पुनाति च।

 

केवळ मानसिक जप करण्यापेक्षा उच्च स्वरात हरिनाम संकीर्तन करण्याचे फळ शंभर पटीने अधिक असते. कारण यामुळे नाम घेणार्याबरोबरच ते ऐकणार्यांचाही उद्धार होतो. वैष्णवांचा द्वेष करणार्या मनुष्याबरोबर - मग तो ब्राह्मण कुळात जन्मलेला का असेना, संभाषण वर्ज्य आहे असे शास्त्रातही सांगितले आहे.”

 

हे ऐकून तो ब्राह्मण म्हणाला, “हे केवळ नाममहिमा वाढविण्यासाठी सांगण्यात आलेले आहे. जर केवळ नामस्मरणानेच उद्धार झाला असता, तर एवढ्या शास्त्र-ग्रंथांची रचना का बरे झाली असती?”

 

हरिदास अत्यंत नम्रपणे म्हणाले, “महाराज, एकाग्रचित्ताने आणि श्रद्धेने नामस्मरण केले असता वेद-शास्त्र-पुराणे यांची काहीच गरज भासत नाही. भगवंताचे नामच या सर्वांचे मूळ आहे.”

 

त्या वेळी तो ब्राह्मण अत्यंत आवेशाने म्हणाला, “केवळ नामानेच सर्व घडत असेल, तर मी आपले नाक आणि कान कापून घेईन!”

अशी आख्यायिका आहे की, त्या ब्राह्मणाचे नाक आणि कान खरोखरीच गळून पडले. संत एकनाथ महाराजांनीही असेच सांगितले आहे की, ‘नामाविण मुख सर्पाचे ते बीळ। जिव्हा नये काळसर्प आहे॥म्हणजेच आपल्या इंद्रियांनी नामसंकीर्तन घडावे आणि ते घडत नसेल तर आपली सर्व इंद्रिये निरुपयोगी आहेत, असाच या संतवचनाचा अर्थ समजून घेतला पाहिजे.

 

समाजसंघटन आणि समाजसुधारणा या क्षेत्रांत कार्य करताना सर्वच संतांना आणि महापुरुषांना परधर्मी आक्रमकांच्या छळाबरोबर स्वकीयांच्या तिरस्कारालाही तोंड द्यावे लागले होते, ही गोष्ट हरिदासांच्या चरित्रातूनही दिसून येते. संत तुकारामांच्या चरित्रात वर्णन केले आहे त्याप्रमाणेच संत हरिदास यांचे वैराग्य भ्रष्ट करण्यासाठी विघ्नसंतोषी लोकांनी एका वेश्येला पाठविले होते. त्या वेश्येने सतत तीन दिवस प्रयत्न करूनही हरिदासांचा तपोभंग करण्यात तिला अपयश आले. शेवटी आपल्या कृत्याची लाज वाटून ती वेश्याच त्यांना शरण आली त्यांच्या उपदेशाने तिनेही वैराग्य धारण करून आपला उद्धार साधला.

संत हरिदास यांनी आपला बराचसा काळ श्री चैतन्य महाप्रभूंच्या सान्निध्यात नवद्वीप येथे व्यतीत केला आणि मग महाप्रभूंच्या आज्ञेनेच ते जगन्नाथपुरीला परतले. तेथेच ते एक कुटी बांधून भगवंताचे नामस्मरण करीत राहू लागले.

 

श्रीक्षेत्र जगन्नाथपुरीतील तोटा गोपीनाथजी मार्गावर आजही हरिदास महाराजांची सुंदर समाधी आपल्याला दिसते. तेथील पुरातन बकुळ वृक्षालासिद्ध बकुळअसे संबोधिले जाते. दर वर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी हरिदासजींचा विजयोत्सव साजरा केला जातो.
 

(संदर्भ पूज्य श्री प्रभुदत्त ब्रह्मचारी विरचित चैतन्य चरितावली, त्रिदंडी पूज्य श्री नारायण गोस्वामी यांचे ग्रंथसाहित्य आणि श्री चैतन्य चरित्रामृत, तसेच गीता प्रेस, गोरखपूर यांचा कल्याण मासिकाचा भक्त चरितांक, जानेवारी 1952.)