उच्चनीच काही नेणे भगवंत...

विवेक मराठी    13-May-2021
Total Views |

देवाच्या दरबारात जातीपातीला कोणताही थारा नाही, तेथे तुमचा भक्तिभावच महत्त्वाचा आहे, असे संतांनी उच्चरवाने सांगितले आहे. प्रत्येक जातीशी कोणतातरी व्यवसाय निगडित आहे आणि आजच्या सुशिक्षित सुसंस्कृत वातावरणातील पिढी जातीपातीला फारसे महत्त्व देत नसली, तरी व्यवसायनिष्ठ उच्चनीच भावना आपल्या मनातून हद्दपार करू शकली आहे, असे अनुभवास येत नाही. भगवंताच्या दरबारातील समरसतेची काही उदाहरणे.


sant_2  H x W:

अस्पृश्यता आणि उच्चनीच भेदभाव या गोष्टी हिंदू धर्माची व्यवच्छेदक लक्षणे आहेत, असे काही लोक सांगतात. अस्पृश्यता हा हिंदू समाजावरील कलंक आहे, एवढेच नाही, तर अस्पृश्यता हा मानवतेवरील कलंक आहे असेही सांगितले गेले आहे. या जाचक रूढीमुळे आपल्याच समाजबांधवांना किती अमानुष यातनांना तोंड द्यावे लागले, हे आपल्याला अगदी जुन्या काळातील उदाहरणे देऊनही सांगता येते. त्याचप्रमाणे अस्पृश्यता निर्मूलनासाठी किती लढे उभारावे लागले, याचासुद्धा दीर्घ इतिहास आपल्यासमोर आहे. पण त्याचबरोबर सर्व मानवमात्रांत एकच आत्मतत्त्व विद्यमान आहे ईश्वराच्या दरबारात सर्वच सारखे आहेत, तेथे उच्चनीच भावनेला मुळीच थारा नाही, असे सांगणारी उदाहरणेही आपल्या हिंदू धर्मात विपुल आहेत. आपल्या धर्मग्रंथातून अशी उदाहरणे बाद केली जावी, अशी कोणतीही याचिका कधीही कोणत्याही न्यायालयात दाखल करण्यात आलेली नाही. कोणताही सुबुद्ध हिंदू समानता आणि समरसता प्रतिपादन करणारी उदाहरणे नाकारताना दिसत नाही. एका रेषेला पुसता लहान करण्यासाठी दुसरी रेषा तिच्यापेक्षाही मोठी आखण्याचाच प्रयत्नवाद सतत चालविला गेला पाहिजे, एवढेच या लेखातून नमूद करायचे आहे. ही दुसरी रेषा इतकी मोठी झाली पाहिजे की तिच्यासमोर पहिल्या रेषेचे अस्तित्व नगण्य मानले जावे. आपल्या समाजातील जाणत्या आणि मार्गदर्शक वर्गाने - ज्याला आपण आदराने संत असे संबोधतो, त्याने हाच प्रयत्नवाद सतत चालविला आहे.

संत तुकाराम आपल्या खालील अभंगातून सांगतात -

उच्चनीच काही नेणे भगवंत। तिष्ठे भावभक्ति देखोनिया॥

दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी। दैत्याघरी रक्षी प्रल्हादासी॥

चर्म रंगू लागे रोहिदासा संगे। कबिराचे मागे विणी शेले॥

सजनकसाया विकू लागे मांस। मळा सावत्यास खुरपू लागे॥

खरे तर हा अभंग फार मोठा आहे, पण उदाहरणादाखल निवडक चरण येथे दिले आहेत. देवाच्या दरबारात जातीपातीला कोणताही थारा नाही, तेथे तुमचा भक्तिभावच महत्त्वाचा आहे, असे संतांनी उच्चरवाने सांगितले आहे. प्रत्येक जातीशी कोणतातरी व्यवसाय निगडित आहे आणि आजच्या सुशिक्षित सुसंस्कृत वातावरणातील पिढी जातीपातीला फारसे महत्त्व देत नसली, तरी व्यवसायनिष्ठ उच्चनीच भावना आपल्या मनातून हद्दपार करू शकली आहे, असे अनुभवास येत नाही. उलट एखाद्याच्या व्यवसायाचा उल्लेख करून त्याच्यावर टीकाटिप्पणी आजही केली जाते.

 

जुन्या काळातील कसायाचा धंदाही असाच... बर्याचशा नाटकांत आणि चित्रपटांतहीबाप आहे का कसाई?” अशासारखे संवाद आपल्याला आढळतात. अशा वाक्यातून सदरचा व्यवसाय कनिष्ठ अथवा हीन प्रतीचा आहे, अशी भावना ऐकणार्याच्या मनावर नकळत बिंबविली जाते. अशा वेळी आपल्याला संतचरित्रांतील कथा कशा मार्गदर्शक ठरतात, ते पाहू या!

भक्त सदन अथवा सजन कसाई यांची कथा खूप प्रसिद्ध आहे. कसायाच्या घरी जन्मास आल्यामुळे त्यांना आपला कसायाचा व्यवसाय पुढे चालविणे भाग होते. त्यामुळे ते प्राप्त कर्म समजून आपला मांसविक्रीचा व्यवसाय करीत असत. त्यांच्याकडे तराजूच्या पारड्यात ठेवण्यासाठी वजनाचे माप उपलब्ध नसल्यामुळे ते शाळिग्राम स्वरूपातील महाविष्णूलाच दगड समजून मांस तोलून विकण्यासाठी त्याचा वापर करीत असत. एके दिवशी एक साधू त्यांच्या दुकानासमोरून चालला असताना कर्मधर्मसंयोगाने त्याची नजर त्या शाळिग्रामाकडे गेली. एक कसाई मांसविक्रीसाठी वजन म्हणून पवित्र शाळिग्रामाचा वापर करतो, हे पाहून त्यांना मनस्वी खेद झाला. अशा अपवित्र ठिकाणी तो शाळिग्राम असता कामा नये या भावनेने त्यांनी सजन कसायास तो दगड मागितला. संताने आपल्याकडे काही मागावे, हा भावनेने आनंदित झालेल्या सजन कसायाने मागचा-पुढचा विचार करता त्या साधूकडे तो शाळिग्राम ताबडतोब सोपविला.

साधूने पवित्र गंगाजलाने तो शाळिग्राम स्वच्छ करून त्याची आपल्या देवघरात स्थापना केली. पण त्याच रात्री भगवंताने त्याला स्वप्नातून दृष्टान्त दिला. भगवंत म्हणाले, “आपण मला माझ्या भक्ताकडून आणून येथे का बरे ठेवले आहे? मी माझ्या भक्ताच्या संगतीला यामुळे वंचित झालो आहे. जेव्हा जेव्हा माझा भक्त मांस तोलण्यासाठी मला हातात घेत असे, तेव्हा तेव्हा त्याच्या हाताच्या स्पर्शाने मला आनंद होत असे. त्याच्या मुखातून नामसंकीर्तन ऐकून मला ब्रह्मानंद होत असे. मला तुझ्याकडे मुळीच चैन पडत नाही. मला ताबडतोब माझ्या भक्ताच्या स्वाधीन कर!”

साधूमहाराजांनी ताबडतोब आपल्या देवघरातून तो शाळिग्राम उचलला आणि सजन कसायाकडे जाऊन त्याच्याकडे पुन्हा सोपविला. सजन कसायाने त्याला याचे कारण विचारले, तेव्हा साधू महाराज म्हणाले, “सजना, हा साक्षात भगवंत आहे! त्याला तुझीच संगती आवडते, त्यामुळे मी त्याला पुन्हा तुझ्याकडे आणले आहे.”

या सजन कसायाच्या कथेत आणखी चमत्काराचे वर्णन आहे, पण त्याचा उल्लेख येथे करण्याचे कारण नाही. भगवंताचे दुसरे भक्त सावता माळी यांची कथा प्रसिद्धच आहे. पण याच कथेशी नाते जोडणारी भक्त मणिदास माळी यांची एक कथा आहे. मणिदास माळी हे जगन्नाथपुरीत राहत असत. यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्य एकामागून एक मरण पावले. पण त्याचा खेद बाळगता मणिदासांनी असा विचार केला की, ‘भगवंताने मला या संसारबंधनातून मुक्त केले आहे आणि आता भगवंताच्या नामाचे संकीर्तन हेच माझे एकमेव काम राहिले आहे.’ असा विचार करून त्यांनी साधुवेष धारण केला. सतत भगवंताच्या नामसंकीर्तनात तल्लीन झाल्यामुळे त्यांच्या शरीरात अष्टसात्त्विक भावांचा उदय झाला. ते सतत श्री जगन्नाथाच्या मंदिरात जाऊन नामसंकीर्तनसेवा करीत असत.

त्या मंदिरात ठरलेल्या वेळी पुराणिक येऊन कथा करीत असत. एके दिवशी पुराणिकाची कथा अगदी रंगात आली असताना तेथे भक्त मणिदास माळी जाऊन पोहोचले आणि मोठ्या हर्षोल्हासाने भगवंताच्या नामाचा गजर करू लागले. हे पाहून पुराणिकाला मोठा संताप आला. पुराणिकाच्या हृदयात जर खरे भगवंताचे प्रेम असते, तर त्याच्याही मनात अष्टसात्त्विक भाव दाटून आला असता; पण तेथे केवळ अहंकार असल्यामुळे तो तामसी भावाने संतापला. त्याने मणिदासाला पुराणकथेत अडथळा आणल्याबद्दल खूपच शिव्या घातल्या. तो आणि त्याची मंडळी एवढ्यावरच थांबली नाहीत. मणिदासाला त्यांनी चांगलेच बुकलून काढले. एवढा मार खाल्ल्यानंतर मणिदास माळी देहभानावर आले. त्यांना झाल्या गोष्टीचा फारच खेद वाटला. ते तेथून निघून गेले आणि एका मठात जाऊन एका कोपर्यात बसून राहिले. त्या दिवशी भगवंताचा दर्शन-प्रसाद झाल्यामुळे त्यांचे जेवणखाणसुद्धा झाले नाही आणि ते तसेच उपाशीतापाशी कोपर्यात पडून राहिले.

sant_1  H x W:

त्याच क्षणी पुरीच्या नरेशांच्या स्वप्नात जाऊन श्री जगन्नाथ भगवंतांनी दृष्टान्त दिला. भगवंत म्हणाले, “हे राजा, तुझ्या मंदिरात आज माझ्या भक्तावर अन्याय आणि अत्याचार झाला आहे. तुझ्या पुराणिकबुवांनी आणि शिष्यमंडळींनी भक्त मणिदासाला मारहाण करून हाकलून लावले आहे. मला आज त्यामुळे त्याचे दर्शन घडले नाही आणि त्याच्या नामसंकीर्तनापासूनही वंचित राहावे लागले आहे. मला त्या पुराणिकबुवाची कथा मुळीच आवडत नाही. त्याला लक्ष्मीमंदिरात कथा करण्यास सांग. माझ्या मंदिरात मला माझ्या भाविक भक्ताचे केवळ नामसंकीर्तनच ऐकायची इच्छा आहे.”

 

त्याच वेळी मठातही मणिदास ग्लानीत पडले होते. त्यांना जाणवले की, स्वतः जगन्नाथ भगवंत त्यांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवीत आहेत आणि त्यांना सांगत आहेत, “हे मणिदास! तू उपाशी राहिल्यामुळे मलाही आज उपवास घडला आहे. चल, ऊठ आणि हा महाप्रसाद ग्रहण कर!”

मणिदास खडबडून जागे झाले. त्यांच्यासमोर महाप्रसादाची थाळी ठेवलेली होती. आपल्यामुळे भगवंताचा उपवास घडल्याचा त्यांना खूप खेद झाला. त्याने तत्काळ भोजन केले. तेवढ्यात तेथे स्वतः पुरीनरेशांचे आगमन झाले. त्यांनी मणिदासांना आपल्या हाताने धरून मंदिरात नेले आणि नामसंकीर्तन करण्याची विनंती केली.

राजा म्हणाला, “मणिदास, भगवंतांना केवळ आपले नामसंकीर्तनच हवे आहे. आपण निःसंकोच येथे नामसंकीर्तन करा. पुराणिकबुवा आपली कथा लक्ष्मीमंदिरात करतील.”

हे ऐकून मणिदासांना अत्यंत आनंद झाला ते नामसंकीर्तनात तल्लीन होऊन नाचू लागले. तेव्हापासून जगन्नाथ मंदिरातील कथा बंद झाली लक्ष्मीमंदिरात कथा करण्याची परंपरा सुरू झाली.

जगन्नाथपुरीपासून दहा कोसांवर पीपलीचटी नावाच्या गावात रघू केवट नावाचा एक नावाडी राहत असे. तो मच्छीमारीचा व्यवसाय करीत असे. तो भगवंताचा महान भक्त असूनही जिवांची हिंसा करतो म्हणून लोक त्याची टर उडवीत. हेच लोक मनसोक्त मत्स्याहार करीत असत. पण टिंगलटवाळी मनावर घेऊन रघूने आपला व्यवसाय बंद करण्याचे ठरविले. पण व्यवसाय बंद झाल्यामुळे रघूसह त्याच्या पत्नीला आणि आईला उपाशी राहावे लागले.

आपल्या कुळाचा व्यवसाय बंद केल्याबद्दल आई आणि पत्नीने रघूलाच नावे ठेवली. त्यांचे बोलणे ऐकून शेवटी रघू नाइलाजाने मासेमारी करण्यासाठी गेला. पण जाळ्यातील माशांच्या तोंडूनही हरिस्मरण ऐकून त्याचे मन द्रवले आणि तो वनात जाऊन ध्यानास बसला. तेथे त्याला भगवंताचे दर्शन झाले आणि भगवंताने प्रसन्न होऊन वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा रघूने वरदान मागितले की, ‘अंतसमयीसुद्धा भगवंताच्या नामाचा विसर पडता कामा नये.’

त्याने कोणत्याही प्रकारची धनसंपदा मागितली नाही. रघूने वैराग्य धारण केल्याची बातमी गावात पसरली, तेव्हा लोक त्याची अधिकच थट्टा करू लागले. गावच्या जमीनदाराच्या कानावर जेव्हा ही गोष्ट गेली, तेव्हा त्यानेही रघूचे दर्शन घेतले. त्याच्या चेहर्यावरील अपूर्व तेज पाहून तो खरा सत्पुरुष असल्याची जमीनदाराची खात्री पटली. रघूने आपल्याला काहीच नको, असे जमीनदाराला सांगितले. तेव्हा जमीनदाराने रघूच्या पत्नी आईसाठी रोज शिधा देण्याची सोय केली. गावातील लोक रघूला भगवंताचा प्रसाद म्हणून रोज अन्नदान करू लागले आणि त्याच्या मुखातील नामसंकीर्तन ऐकून तल्लीन होऊ लागले.

रघूला आपल्या भोजनाची मुळीच चिंता नसल्यामुळे त्याला बरेच उपासतापास पडत असत. त्याच सुमारास पुरीत एक चमत्कार घडला. तेथे जगन्नाथांच्या आरशात पडलेल्या प्रतिबिंबास नैवेद्याचा ग्रास देण्याची प्रथा होती. भोगमंडप नाव दिलेल्या ठिकाणी तो आरसा लावलेला होता. एके दिवशी पुजार्यास त्या आरशात जगन्नाथाची प्रतिमाच दिसेनाशी झाली. त्याने घाबरून ही बाब राजाच्या कानावर घातली. महाराजांना आपल्या हातून एखादा अपराध घडल्यामुळेच असे झाले असावे, असे वाटले आणि त्यांनी देवाच्या सभामंडपात धरणे दिले. तेव्हा भगवंतांनी राजाला स्वप्नात दृष्टान्त दिला. भगवंत म्हणाले, ‘हे राजा, तुझी काहीच चूक नाही. मी माझा भक्त रघू केवट याच्या हातूनच प्रसाद ग्रहण करण्याचे ठरविले आहे. मी जर तुझ्या मंदिरात भोजन करावे असे वाटत असेल तर माझ्या भक्ताला त्याच्या कुटुंबासहित येथे घेऊन ये आणि त्याची येथेच संपूर्ण व्यवस्था कर. यामुळे तोसुद्धा उपाशी राहणार नाही आणि मीसुद्धा भोजन करीन.”

राजाने त्या दृष्टान्तानुसार मंदिराच्या दक्षिणेस रघूच्या कुटुंबाची सर्व व्यवस्था करून दिली. आयुष्यभर रघू केवटाने तेथेच वास्तव्य केले.

आपल्याला संत रोहिदास चांभार माहीत आहेत, पण संत रामदास चांभार हे महान भगवद्भक्त गोदावरीच्या तिरावरील कनकावती नगरीत राहत होते. ज्याप्रमाणे सजन कसाई मांसविक्रीसाठी भगवान शाळिग्रामाचा वजनाप्रमाणे उपयोग करीत, त्याचप्रमाणे आपल्या हत्यारांना धार लावण्यासाठी रामदास चांभार शाळिग्राम दगड म्हणून वापरत असत. गावातील पंडिताने त्यांचे कृत्य पाहून तो दगड मागून नेला आपल्या देवघरात त्याची स्थापना केली.

पण भगवंताने पंडिताच्या स्वप्नात जाऊन त्यांना दृष्टान्त दिला. भगवंत म्हणाले, “पंडितजी, तुमची ही अवडंबरयुक्त पूजा मला नको आहे. माझा भक्त आपली हत्यारे धार लावण्यासाठी माझा उपयोग करतो तीच मला त्याने निष्कपट भावनेने केलेली पूजा वाटते. मला माझ्या भक्ताचा वियोग सहन होत नाही. मला पुन्हा रामदास चांभाराच्या दुकानात नेऊन त्याच्या स्वाधीन करा!”

पंडिताने तो शाळिग्राम रामदास चांभाराच्या स्वाधीन करून सांगितले की, “हा साधा दगड नसून साक्षात भगवंत आहे. त्याच्याच इच्छेने मी हा परत करीत आहे.”

हे ऐकून रामदास चांभारांनी शाळिग्रामाची देवघरात स्थापना केली आणि ते म्हणाले, “हे भगवंता, मी नीच जातीतील माणसाने तुझी उपेक्षा केल्यामुळे तू मला दर्शन देता केवळ त्या ब्राह्मणास दर्शन दिले! तूसुद्धा माझी उपेक्षा केलीस याचा मला खेद होतो. मला माझ्या अपराधांची क्षमा कर.”

आपल्या भक्ताचे हा शोक आणि खेद पाहून भगवंताने त्याला दर्शन दिले. भगवंत म्हणाले, “रामदास! मी आपल्या भक्ताची कधीच उपेक्षा करीत नाही. तू जातीचा चांभार असलास तरी तू ब्राह्मणच नव्हे, तर देवतांसाठीही पूज्य आहेस!”

वाचकहो! या लेखातील कथा आपणास चमत्कार वाटतील, पण मला तसे वाटत नाही. कारण या सर्व कथांतून भगवंत स्वमुखाने सांगतो, “मला कोणत्याही प्रकारचा उच्चनीच भेदभाव मान्य नाही. ज्याचा भाव आणि भक्ती महान आहे, तोच माझा महान भगवद्भक्त आहे, एवढेच मी जाणतो.”

अशी अगणित उदाहरणे आपल्याला सापडतात. ही उदाहरणे समाजासमोर ठेवून समरसतेची रेषा अधिक ठळक आणि वृद्धिंगत करणे, हेच समाजसंघटक संतांनी आपले जीवनकर्तव्य मानले होते, हेच खरे!