सहकारमित्र आबासाहेब

विवेक मराठी    18-May-2021
Total Views |

आबासाहेब हे सहकारी बँकिंग एकूणचसहकारया संकल्पनेचे कार्यप्रणालीचे आग्रही असे निस्सीम चाहते होते. डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या संस्थांपकांपैकी ते एक होते. बँकेच्या उभारणीच्या काळात आणि नंतर दशकभर बँकेच्या प्रगतीत त्यांनी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले. तसेच नंतरही त्यांनी डोंबिवली नागरी सहकारी बँकेशी आपली नाळ कधी तुटू दिली नाही.


dombivali_2  H

आपल्या परिचयातील निरनिराळ्या व्यक्ती आपल्याला जेव्हा भेटतात, जेव्हा केव्हा आठवतात, स्मरणात राहतात, तेव्हा त्या मन:प्रक्रियेत बर्याचदा काही रूपकेही डोकावत असतात. काही व्यक्ती पर्वताप्रमाणे अडीग वाटतात, काही सूर्यासारख्या तळपत्या, तर काही चंद्रासारख्या शीतल, काही समुद्राप्रमाणे रौद्र भासतात, तर काहींचे व्यक्तित्व धबधब्यासारखे अंगावर येते, असे बरेच काही. एखादे रूपक डोळ्यासमोर येणे म्हणजे इतर रूपकांतील गुणवैशिष्ट्यांचा अभाव असे ते नसते, पण एखादे रूपक प्रकर्षाने मनात येते. आमच्या मित्रमंडळींत यावर एकदा गप्पा चालू असताना अशी चर्चा झाली की आबासाहेब पटवारी अनेकांना एखाद्या खळाळत्या झर्यासारखे वाटत असावेत. झरा कधी कुठे जोरात वाहतो, कुठे शांत संथ, कुठे क्षणिक लुप्त होतो पुढे कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी उसळत पुन्हा प्रकटतो. तो पूर्णपणे थांबला असे कधीच होत नाही. आबासाहेबांचा प्रवास अनेक वळणे घेत ज्या असंख्य काठांना त्यांच्या कर्तृत्वाच्या ओलाव्याने समृद्ध करत गेला, त्या प्रवासातील सुरुवातीच्या वळणांवरील एक म्हणजे डोंबिवली बँक. तो काठही तसा नवीनच होता. मुंबईच्या उपनगरांतील संघपरिवारातील ठिकठिकाणच्या मंडळींनी एकत्र येत त्यांच्या त्यांच्या ठिकाणी सहकारी बँका स्थापन करण्याचा तो कालखंड होता. 1970च्या सुमारास डोंबिवलीतही असे प्रयत्न सुरू होते. त्यातून डोंबिवली बँकेची स्थापना झाली या बँकेशी आबासाहेब जोडले गेले, ते कायमचेच.

एखादी व्यक्ती ज्या संस्थेत कार्यरत असते, तिचे त्या संस्थेशी असलेले नाते किती निकोप बनलेय हे ती व्यक्ती त्या संस्थेतून कार्यनिवृत्त होताना कशी वागते त्यानंतरही त्या संस्थेबाबत कसे हृदभाव बाळगत असते, कशी व्यक्त होते यावरून कालौघात उलगडत जाते. आबासाहेब पटवारी डोंबिवली नागरी सहकारी बँक हे नाते या निकषांवर अतिशय हृद्य आणि निकोप असल्याचे सर्वांनाच अनुभवास येत गेले. आबासाहेब हे बँकेच्या संस्थापकांपैकी एक. 1979पर्यंत आबासाहेब संचालक म्हणून कार्यरत होते. त्यापैकी 1970 ते 1976 या पहिल्या काही वर्षांत आबासाहेब हे या बँकेत कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते. बँकेच्या नवीन उभारणीचीच ही वर्षे होती. बँकेच्या अन्य संस्थापक संचालकांप्रमाणेच आबासाहेबांनीही, साहजिकच पूर्णपणे नवीन असलेले अधिकारी कर्मचारी या सर्वांना बरोबर नेत, टीम बांधत नेण्याच्या कालखंडातील हा पहिला टप्पा कौशल्याने हाताळला. कार्यकारी संचालक हे पद तसे वेगळ्या कसरतीचे असते. त्या पदावरील व्यक्ती संचालक मंडळात सहभाग घेताना अनेकदा अधिकारी-कर्मचारी यांचेही प्रतिनिधित्व करते अधिकारी-कर्मचारी यांच्याबरोबर दैनंदिन कामावर देखरेख करत असताना ती प्रसंगी संचालक मंडळाचे प्रतिनिधित्व करत असते. याशिवाय बँकेसारखी संस्था त्यातही ती नवीन असताना समाजातील निरनिराळ्या घटकांच्या भिन्न भिन्न प्रकारच्या अपेक्षा व्यक्त होत असतात. अगदी नोकरी मिळणे, कर्ज मिळणे इथपासून ते विविध व्यावसायिक सेवांसाठी एम्पॅनलमेंट होणे, जाहिराती मिळणे अशा अनंत प्रकारच्या त्या अपेक्षा असतात. त्या अपेक्षांचे सुयोग्य व्यवस्थापन (expectation management) करणे ही एक व्यावसायिक कसरतच असते. संचालक मंडळासह आबासाहेबांनी त्यांच्या टीमने ती बुद्धिचातुर्याने सांभाळली.

डोंबिवली बँकेत कार्यकारी संचालक म्हणून जबाबदारी घेण्याआधी त्यांना अशा प्रकारच्या कामकाजाचा अनुभवही होता. ते तत्पूर्वी जिथे नोकरी करत होते, तेथील कर्मचार्यांच्या पतपेढीमध्ये (को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये) त्यांनी अशाच प्रकारची जबाबदारी पेलली होती. त्यांचे एम.कॉम. जी.डी.सी.. हे लौकिक शिक्षणही या कामांसाठी उपयुक्त ठरत होते.

एकाच संस्थेत वा क्षेत्रात स्वतःला अडकवून ठेवणे हा त्यांचा स्वभाव नसावा. सुमारे दशकभर डोंबिवली बँकेत व्यतीत केल्यानंतर त्यांच्या इच्छेप्रमाणे शिवरायजी तेलंग यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्यांनी साप्ताहिक विवेक या आजच्या दर्जेदार नामांकित साप्ताहिकासाठी काम करणे सुरू केले. एका सुप्रतिष्ठित साप्ताहिकासाठी काम करत असतानाही त्यांची डोंबिवली बँकेशी असलेली भावनिक नाळ कधीच तुटली नाही. आयुष्याच्या अगदी शेवटशेवटच्या वर्षांपर्यंत ते या बँकेशी निगडित राहिले, नित्य संपर्कात राहिले.


dombivali_1  H

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने हा संपर्क अधिक दृढ होत असे. डोंबिवली बँकेत संचालक मंडळाचा वार्षिक अहवाल तयार झाला की तो प्राधान्याने सर्व माजी संचालकांना पाठविला जातो बँकेची वार्षिक सभा व्हायच्या पुरेशा आधी, बँकेच्या सर्व माजी संचालकांचे एक अनौपचारिक एकत्रीकरण केले जाते. वार्षिक अहवाल वर्षभरातील घडामोडी याबाबत माजी संचालकांशी चर्चा करणे, त्यांच्या सूचना मार्गदर्शन घेणे, त्यांना काही माहिती वा खुलासे हवे असतील तर ते देणे असे या बैठकीचे स्वरूप असते. सुमारे दोन-तीन तास चालणार्या या अनौपचारिक बैठकीत बव्हंशी सर्व माजी संचालकांबरोबर आबासाहेबही कटाक्षाने उपस्थित असत. अशा बैठकीत त्यांचा सहभाग जिज्ञासापूर्ण सकारात्मक असे. या बैठकीनंतर होणार्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्येसुद्धा (AGMमध्येसुद्धा) आबासाहेब उपस्थित असत. अनेकदा सभा संपताना ते अधिकारी, कर्मचारी संचालक यांच्या कौतुकाचा अभिनंदनाचा ठराव मांडत. तो टाळ्यांच्या गजरात मंजूर होई. त्यांना सभेला येण्यास बराच उशीर झाला असेल वा काही कारणांनी लवकर जायचे असेल, तर ते कधीकधी इतर सभासदांबरोबर मागच्या एखाद्या रांगेत बसून काही काळ सभा ऐकून परस्पर निघूनही जात. पण कधीही वार्षिक सभेतून घरी गेल्यानंतर त्याच दिवशी वा फार तर दुसर्या दिवशी, सभा उत्तम झाली असे सांगणारा त्यांचा फोन येणार, हे नक्की. एखाद्या वार्षिक सभेला त्यांना येता आले नाही, तरी सभा नेहमीप्रमाणेच नीट संपन्न झाली हे कळल्यानंतर ते आवर्जून फोन करत असत. वार्षिक सभेतील कामकाजात काही नवीन विषयांचा वा नवीन माहितीचा उल्लेख आला, तर तो विषय ते सभेमध्ये नंतरही पूर्णपणे समजून घेत. एका सहकारी बँकेवर सायबर हल्ला झाल्यावर त्याबाबत डोंबिवली बँकेने काय खबरदारी घेतली आहे याचे विवेचन बँकेचे नवीन तरुण संचालक योगेश वाळुंजकर यांनी केले. विषय तसा मुळात तांत्रिक काहीसा क्लिष्ट होता, तरी आबासाहेबांनी सभेनंतर योगेशजींचा फोन नंबर मिळवत तो विषय सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांनी हा विषय खूप सोपा करत छान समजावला असे कौतुकही केले. डोंबिवली बँकेकडून दर वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये धर्मादाय निधी वितरण आणिसमाजमित्रतसेचसहकार मित्रया दोन पुरस्कारांचे वितरण असा जाहीर कार्यक्रम केला जातो. महाराष्ट्रातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणार्या या कार्यक्रमाचे स्वरूप खरोखरच हृद्य असते. या वर्षभरातील अशा अन्यान्य कार्यक्रमातही आबासाहेब आवर्जून उपस्थित असत. बँकेच्या वर्धापन दिनी त्यांचा अभिनंदनाचा फोन बँकेच्या मुख्य शाखेस भेट यात कधीही खंड पडला नाही. असे आणखीही काही प्रसंग लिहिता येतील.

 

आबासाहेबांना सहकारी बँकिंग क्षेत्राविषयी श्रद्धापूर्ण आत्मीयता होती. एकदा पी. चिदंबरम यांनी देशातील सर्वच सहकारी बँकांबद्दल एक सरसकट स्वरूपाचे टीकात्मक अन्यायकारक विधान केले तेही संसदेत. त्याचा निषेध करणारे सहकारी बँकांबाबतची वस्तुस्थिती सांगणारे निवेदन काही प्रमुख मराठी, हिंदी इंग्लिश दैनिकांत छापून आणण्याचा प्रयत्न आम्ही काही मंडळी करत होतो. त्याला काही प्रमाणात यशही आले. तेव्हा आबासाहेब मुलाकडे अमेरिकेत होते. आमचे प्रयत्न आबासाहेबांना कळल्यावर त्यांनी अमेरिकेतून फोन करून त्या कल्पनेचे प्रयत्नांचे कौतुक केले.

आबासाहेब हे सहकारी बँकिंग एकूणचसहकारया संकल्पनेचे कार्यप्रणालीचे (Theory and practice of cooperationचे) आग्रही असे निस्सीम चाहते होते.

कोकणातील सहकारी बँकांचे संघटन हेही काम त्यांच्या जिव्हाळ्याचे झाले होते. कोकण नागरी सहकारी बँक्स असोसिएशन या संस्थेसाठीही त्यांनी आपल्या सर्व क्षमता यथायोग्य रितीने उपयोगात आणल्या. कोकणातील नागरी सहकारी बँका या गोव्याच्या सीमेपासून गुजरातच्या सीमेपर्यंतच्या लांबलचक पट्ट्यात पसरलेल्या. पार सावंतवाडी अर्बन को-ऑप. बँकेपासून दुसरीकडे जव्हार अर्बन को-ऑप. बँक ते डहाणू अर्बन को-ऑप. बँक असा हा विस्तार. या बँका भिन्न भिन्न राजकीय पक्षांशी, विभिन्न राजकीय वा सामाजिक नेतृत्वांशी निरनिराळ्या विचारसरणींशी जवळीक असलेल्या, सर्व जातिधर्मांचे पदाधिकारी असलेल्या. पण त्यांच्यातील स्नेहभाव वाखाणण्याजोगा. अशा सुमारे चाळिसेक नागरी सहकारी बँकांना एकत्र आणून त्यांची बनलेली कोकण नागरी सहकारी बँक्स असोसिएशन ही एक कौतुकास्पद उपलब्धी आहे. या असोसिएशनच्या वार्षिक सभा अन्यही बैठका, ट्रेनिंग्ज, कर्मचारी क्रीडा स्पर्धा या आलटून पालटून पार देवगडपासून वसई-डहाणूपर्यंत होत असतात. अगदी उतारवयातही आबासाहेब या लांबच्या ठिकाणच्या कार्यक्रमांनाही प्रयत्नपूर्वक हजर राहत. या असोसिएशनचे एक नियतकालिकही निघते, ‘सार्थ कोकणया नावाने. या नियतकालिकाच्या संपादनाचे काम आबासाहेब कैक वर्षे नेटाने करत होते. त्यासाठी बँकिंगमधील नवनवीन विषय निवडणे, त्यावर लेख लिहिण्यासाठी संभाव्य लेखकांना प्रेमाग्रहाने प्रवृत्त करणे, सभासद बँकांबाबतच्या प्रासंगिक बातम्या, निवेदने त्यांच्या उल्लेखनीय कार्यक्रमांचे फोटो मिळवणे हे काम ते चिकाटीने सातत्याने अनेक वर्षे करत होते. आणि विशेष म्हणजे हे सर्व करत असताना ते कुठल्याच सहकारी बँकेत संचालक वा पदाधिकारी नव्हते.


dombivali_3  H  
 

असे आपणा सर्वांचे आबासाहेब वयोपरत्वे वृद्धापकाळाने आपल्यातून देवाघरी गेले. अशा व्यक्तींसंबंधात मृत्युलेख वा आठवणी लिहिताना त्या व्यक्तीच्या गुणवैशिष्ट्यांचा उल्लेख करणे हे इतरांसाठी प्रामुख्याने पुढील पिढीतील कार्यकर्त्यांसाठी मोलाचे ठरते.

आबासाहेबांच्या अनेक गुणविशेषांपैकी जास्त उल्लेखनीय वाटलेले गुण म्हणजे सदोदित उत्साही कार्यतत्पर अशी सकारात्मक देहबोली, उत्तम प्रकारे सांभाळलेले आरोग्य आणि शिडशिडीत पण कणखर देहयष्टी, सहकार-शैक्षणिक-सामाजिक-सांस्कृतिक-धार्मिक-साहित्यिक अशा असंख्य क्षेत्रांतील व्यक्ती संस्था यांच्याशी असलेला अफाट नित्यसंपर्क, निसर्गप्रेम आणि संगणकापासून स्मार्टफोनपर्यंतचे हर तर्हेचे नवतंत्रज्ञान उतारवयातही आत्मसात करण्याची जिद्द!

 

अशा या बहुमार्गी सार्वजनिक जीवनयात्रेच्या यथार्थ संपन्न सांगतेला डोंबिवली बँक परिवारातर्फे आदरयुक्त श्रद्धांजली!

 

9819866201

- अध्यक्ष, डोंबिवली नागरी सहकारी बँक