...आणि उत्तराची वाट बघावी

विवेक मराठी    19-May-2021
Total Views |

मोदी संघस्वयंसेवक आहेत. प्रचारक होते. संघस्वयंसेवकांची प्रेरणा डॉ. हेडगेवार असतात. डॉ. हेडगेवारांची शिकवण अशी आहे की, कोणत्याही टीकेला उत्तर द्यायचे नाही, वांझोटे वाद करीत बसायचे नाहीत. सर्व शक्ती आपल्या कामावर लावायची. ज्यांना चर्चा आणि सल्ले द्यायचे आहेत, त्यांना तेवढेच काम करायचे असते. प्रत्यक्ष काम करण्यासाठी यापैकी कुणीही पुढे येत नाही. शांतपणे आपले काम आपण करीत राहिले पाहिजे. नरेंद्र मोदी हे डॉ. हेडगेवारांचा विचार जगणारे पंतप्रधान आहेत.


bjp_1  H x W: 0

नरेंद्र मोदी सध्या विरोधक आणि हितचिंतक यांचे कठोर टीकेचे भक्ष्य झालेले आहेत. त्यांच्यावर चित्रपट करणारे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर म्हणतात, “प्रतिमा बनविण्यापेक्षा जीव वाचविणे गरजेचे आहे... सरकारने आव्हांनाचा सामना करावा आणि ज्यांनी निवडून दिले आहे, त्यांच्यासाठी काम करावे. अनेक प्रकरणांवर सरकारवर टीका करणे गरजेचे आहे. नद्यांमध्ये वाहत असलेले मृतदेह पाहून एखादी क्रूर व्यक्तीच विचलित होणार नाही. आपण संताप व्यक्त केला पाहिजे. जे काही होत आहे, त्याला सरकारला जबाबदार धरणे गरजेचे आहे.”

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी विजयी झाल्या. ममतादीदींचे अभिनंदन करताना सर्वांनी नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. ममतादीदी विजयी झाल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. नरेंद्र मोदी यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. राजकीय विश्लेषकांनी भविष्य सांगायला सुरुवात केली की, 2024च्या निवडणुकीत मोदी जिंकून येणार नाहीत.. ममतादीदींनी त्यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. या टीकेलाही मोदींनी काही उत्तर दिले नाही, ते मौन आहेत.

कोेरोनासंबंधीच्या याचिका हायकोर्टात सुनावनीला येतात, तेव्हा न्यायमूर्ती ताशेरे मारतात आणि सरकारला खडे बोल सुनावतात. त्यावर सोशल मीडियामध्ये चर्चा सुरू होते. ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा यांना मोदींना जबाबदार धरण्यात येते. मोदी त्यावर काही बोलत नाहीत, ते मौन असतात.

Oxygen Crisis Supreme Cou

विदेशी वर्तमानपत्रातून मोदींवर कडक ताशेरे झाडले जातात. भारतातील कोरोना परिस्थिती अतिभयानक आहे, असे चित्र रंगविले जाते. याला मोदी शासन जबाबदार आहे, असे म्हटले जाते. जगातील प्रमुख देशांनी आपल्या नागरिकांनी भारतात जाऊ नये, असे आदेश काढले आहेत. या संबंधीच्या बातम्या ठळकपणे दिल्या जातात.

मोदींवर हल्ला करण्यात राहुल गांधी आघाडीवर असतात. सोनिया गांधींनीदेखील टीकास्त्र सोडले. महाराष्ट्रातील शिवसेना नेते रोजच मोदींविरुद्ध काही ना काही तरी बोलतच असतात. ममताने भाजपाचा पराभव केला, याचा आनंद ते लपवून ठेवू शकले नाही. दिल्लीचे अरविंद केजरीवाल यांनी संकेत मोडून पंतप्रधानांबरोबरची बैठक टेलिकास्ट केली. मोदी हे सर्व शांतपणे पाहत आहेत. ते मौन आहेत.

नरेंद्र मोदी मौन का आहेत? या सर्वांना ते उत्तर का देत नाहीत? असे प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतात. मौन राहणे हा मोदींचा स्वभाव आहे, याची बहुधा अनेकांना माहिती नसावी. त्याची काही उदाहरणे पाहण्यासारखी आहेत. ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना गोध्रा प्रकरणावरून गुजरातमध्ये मुसलमानांविरुद्ध मोठा हिंसाचार झाला. हजारो मुसलमान त्यात मारले गेले. हा हिंसाचार मोदींच्या आशीर्वादाने घडला, असा आरोप त्यांच्यावर ठेवून त्यांना हत्यारे ठरविण्यात आले. मोदींनी तेव्हा या आरोपाला काही उत्तर दिले नाही.


bjp_1  H x W: 0

मुस्लीमविरोधी ही मोदींची प्रतिमा बनविण्याचा योजनापूर्वक प्रयत्न झाला. सोनिया गांधीनी त्यांनामौत का सौदागरअसे म्हटले. मोदी जेव्हा राष्ट्रीय राजकारणात आले, तेव्हा मान्यवरांनी जाहीर घोषणा केली होती, मोदी जर पंतप्रंधान झाले तर आम्ही देश सोडून जाऊ. मोदींनी तेव्हा काही उत्तर दिले नाही, ते मौन राहिले. मोदींकडे उत्तर देण्यासारखे काही नाही असा अनेकांचा समज झाला. परंतु मोदींचा राजकीय प्रवास पाहिला, तर त्यांनी विरोधकांना झोपविण्याची उत्तरे दिली आहेत, हे आपल्याला लक्षात येईल.

 

आरोपांना उत्तर देण्याऐवजी मोदी सकारात्मक कामांच्या मागे लागले. विकासाचा मुद्दा त्यांनी अग्रक्रमाचा केला. विकासाचे गुजरात मॉडेल त्यांनी उभे केले. अर्थशास्त्रज्ञ त्याची चर्चा करू लागले. गुजरातमध्ये चोवीस तास वीज हे त्यांनी करून दाखविले. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजना आखल्या. त्या पूर्ण केल्या. गुजरातला भ्रष्टाचारमुक्त करण्यात त्यांनी मोठा पुढाकार घेतला. ‘मी पैसा खात नाही आणि कुणाला खाऊ देत नाहीयाचा अंमल त्यांनी करून दाखविला.

 

मोदी संघस्वयंसेवक आहेत. प्रचारक होते. संघस्वयंसेवकांची प्रेरणा डॉ. हेडगेवार असतात. डॉ. हेडगेवारांची शिकवण अशी आहे की, कोणत्याही टीकेला उत्तर द्यायचे नाही, वांझोटे वाद करीत बसायचे नाहीत. सर्व शक्ती आपल्या कामावर लावायची. ज्यांना चर्चा आणि सल्ले द्यायचे आहेत, त्यांना तेवढेच काम करायचे असते. प्रत्यक्ष काम करण्यासाठी यापैकी कुणीही पुढे येत नाही. शांतपणे आपले काम आपण करीत राहिले पाहिजे. नरेंद्र मोदी हे डॉ. हेडगेवारांचा विचार जगणारे पंतप्रधान आहेत.

 

असाच प्रसंग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या जीवनात आलेला आहे. गृहयुद्ध सुरू झालेले आहे, हजारोंनी अमेरिकन जवान मरत आहेत, कोट्यवधी रुपयांची संपत्ती नष्ट होत आहे. अशा वेळी बिनकामाचा राष्ट्रपती म्हणून त्यांच्यावर टीका झाली, सल्ल्यांचा पाऊस पडला. एकाने सल्ला दिला की, अन्नधान्यावर खर्च करता सैन्याला खायला मिळेल अशी योजना मी तयार केली आहे. त्यांनी आपली योजना अब्राहम लिंकन यांच्यापुढे मांडली. तो म्हणाला कीही योजना अमलात आणली तर आपले सैन्य गलेलठ्ठ होतील.” लिंकन त्याला म्हणाला,“तेे जाडे झाले तर लढणार कसे? मला सडपातळ सैनिकांची आवश्यकता आहे.” सल्ला देणार्या व्यक्तींविषयी लिंकनचे मत असे होते की, सल्ला देणार्यांनी एकत्र येऊन प्रतिपक्षाला कसे गारद करता येईल याचा विचार केला पाहिजे. राज्याच्या प्रमुख कार्यकारी अधिकार्याने (म्हणजे राष्ट्राध्यक्षाने) काय करायला पाहिजे, हे सांगण्याचा आवाज जेवढा कमी होईल तेवढे बरे. आणि नेहमीप्रमाणे अब्राहम लिंकनने एक कथादेखील सांगितली.

 

वादळात सापडलेला एक शेतकरी देवाची प्रार्थना करताना म्हणाला, “हे परमेश्वरा ढगांच्या कडकडाटांच्या आवाजापेक्षा विजांचा प्रकाश तू मला दाखव, त्यामुळे मला वाट चालणे सोयीचे जाईल. तू आवाज कमी कर आणि प्रकाश दाखव.” आपल्या देशातील विरोधकांची स्थिती अशी आहे. आवाजाचा गडगडाट आहे, कामाच्या मात्र ठणठणाट आहे.

 

सर्व विपरीत वातावरणात जो शांत असतो आणि मौन धारण करतो, तो सर्वात सामर्थ्यशाली ठरतो. भगवद्गीतेच्या दहाव्या आध्यायातील 38वा श्लोक असा आहे -

 

दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम्।

मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम्॥

भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात, ‘दंडनीती मी आहे आणि विजयनीतीदेखील मीच आहे. गोपनीय भावात मी मौन आहे. आणि ज्ञानवानांतील ज्ञान मीच आहे.’ श्रीकृष्णाने या आध्यायात जे सांगितले आहे, ते मोदींना लागू पडते, असे मला वाटते. मौन धारण करणारे मोदी कृतीने उत्तर देतात. ही कृती पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करण्याची असते, दहशतवादी अड्ड्यावर हवाई हल्ला करण्याची असते, आणि भारत-पाक सीमेवर चिनी सैनिकांना यमसदनास पाठविण्याची असते. मोदी बोलत नाहीत, मोदी कृती करतात. एक संस्कृत सुभाषितकार म्हणतो, ‘तोंडातून सतत शब्द काढण्यामुळे गाणारे पक्षी बंदिवान होतात. काहीही बोलणारा बगळा कधीही बंदिवान होत नाही. त्याला पिंजर्यात आणून कोणी ठेवीत नाही.’

 

पंचतंत्रामध्ये बडबड्या कासवाची कथा आहे. या कासवाला आकाशातून जग बघायचे होते. दोन राजहंस एक काठी घेऊन आले. कासवाला म्हणाले की, तोंडाने ही काठी पकडून ठेव, परंतु तोंड अजिबात उघडू नकोस. काठीची दोन टोके चोचीत धरून राजहंस उडाले. काठीला लटकलेले कासव बघून मुले घोळका करून गलबला करायला लागले. कासवाला ते सहन झाले नाही. काही बोलण्यासाठी त्याने तोंड उघडले आणि ते खाली येऊन आपटले आणि मेले. ही पंचतंत्रातील कथा आहे. नको त्या वेळी तोंड उघडू नये, शांत राहावे. मोदी असे शांत आहेत.

 

या सर्वाला त्यांचे उत्तर कोणते असेल, हे सांगणे फार अवघड आहे. अफजलखानाच्या स्वारीला उत्तर कोणते, हे अफजलखानाचे पोट फाडल्यावर जगाला समजले. अफजलखानाला काय उत्तर द्यायचे हे शिवाजी महाराजांनाच माहीत होते, तसे नरेंद्र मोदींचे आहे. यासाठी आपणही शांत आणि मौन राहून उत्तराची वाट बघितली पाहिजे.