कोविड-१९ - अमेरिकेवर उलटलेला चिनी भस्मासुर

विवेक मराठी    21-May-2021
Total Views |

@डॉ. प्रमोद पाठक

अमेरिकेच्या मदतीने निर्माण केलेला कोरोना विषाणूचा भस्मासुर चीनने अमेरिकेवर उलटविला, तृतीय महायुद्धाची चाचणी केली. अमेरिकेसकट सर्व जगाची अर्थव्यवस्था धुळीला मिळविली. आता जगावर महासत्ता म्हणून वर्चस्व निर्माण करण्यासाठी चीन पुढचे कोणते पाऊल उचलेल यावर भारताने डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवले पाहिजे. आशियात चीनला पायबंद घालू शकणारा एकटा भारत देशच आहे. भारताने विषाणू युद्धासाठी तयार राहायची आणि त्यावर उपाययोजना सिद्ध करण्याची पर्यायी योजना आखली पाहिजे.

corona_3  H x W

आजच्या घटकेला कोरोना म्हणा, कोविड-१९ म्हणा, या विषाणूने (Virusने) सर्व जगाला विळखा घातल्याची स्थिती आहे. गेल्या दीड-दोन वर्षांत जगासमोर उभे राहिलेले हे संकट खरेच उपटसुंभासारखे पुढे आले. ते मानवी शरीरात कसे संक्रमित झाले, त्याबाबत उलटसुलट माहिती प्रकाशात येते आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका बातमीप्रमाणे एका संशोधकाने हा विषाणू हजारो वर्षे जुना असल्याचा दावा केला होता. त्याकडे कोणी लक्ष दिले नाही. याचे कारण आजच्या घडीला वैज्ञानिक जगत लोकांच्या नजरेतून एवढे पडले आहे की कुणीतरी दुसराकडे लक्ष वेधण्यासाठी असे संशोधन केलेले असावे, अशी लोकांची धरणा झाली आहे. त्यातही जर हा विषाणू इतका जुना असेल, तर आताचा पटापट कपडे बदलणारा विषाणू ही त्याची कितवी आवृत्ती आहे? पंतप्रधान मोदींनी त्याला धूर्त आणि बहुरूपी म्हटले. कारण हा विषाणू ज्या वेगाने आपले रूप पालटतो (Mutate) आहे, ते पाहता तो खरोखर लाखो वर्षांपूर्वी आजच्या विषाणूशी सहजासहजी जोडता येईल का याची खात्री नाही. नंतर त्याच्या प्राचीनतेबाबत काही चर्चा झाली नाही. तसे पाहिले, तर हा विषाणू नैसर्गिक नसून प्रायोगिक स्तरावर तयार केलेला आहे, असे दिसते.

नवे विषाणू

गेल्या दोन दशकांत जगात विषाणूंनी थैमान घातले. सुरुवात चिकनगुनियाने झाली. प्रथम चीनमध्ये त्याची साथ सुरू होऊन आग्नेय आशियातील देशांमार्गे ती भारतात पसरली होती. हे देश चीनचे शेजारी देश होते, हा केवळ योगायोग होता असे आता म्हणता येणार नाही. या साथीचे वैशिष्ट्य हे की ज्याला तो आजार व्हायचा, त्याला वर्षानुवर्षे शारीरिक अक्षमतेला सोसावे लागत असे. यात मृत्युमुखी पडणार्‍यांचे प्रमाण कमी होते. त्यावर लागू पडेल अशी उपाययोजना तयार झाली होती.

या संशोधनादरम्यान एक नवाच विषाणू निघाला म्हणा किंवा तयार केला गेला. त्याला 'सार्स' असे नाव दिले गेले. तो श्वसनसंस्था निकामी करणारा होता. २००२च्या दरम्यान हा विषाणू प्रथम चीनमध्ये पसरला. काही वैज्ञानिकांच्या मते, तो प्रयोगशाळेतून निसटला. फार झपाट्याने पसरला. ते संशोधन करताना संशोधकांना असल्या विषाणूंचा जैविक युद्धासाठी अस्त्र म्हणून वापर करता येण्याची कल्पना आली. जो प्रकार अणुऊर्जेबाबत घडला, त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आता होताना दिसते आहे. अणुऊर्जा जशी उत्पादक कामासाठी वापरता येईल, तशीच अण्वस्त्र बनवून स्फोट घडवून आणण्याची शक्यता वैज्ञानिकांना तेव्हाच आली होती.

corona_2  H x W

या संशोधनाला पाठबळ देणार्‍या देशांत फ्रान्स, कॅनडा यांचा आणि प्रमुख्याने अमेरिकेचा समावेश होता. जगात आपले निर्विवाद वर्चस्व असावे अशी अमेरिकेची प्रबळ इच्छा असते. अमेरिका सदैव निरनिराळी शस्त्रे आणि संरक्षण उपकरणे शोधण्यात अग्रेसर राहिली आहे. यापुढचे महायुद्ध जैविक शस्त्राद्वारे लढले जाईल हे लक्षात घेऊन जैविक शस्त्रनिर्मितीत जगाच्या पुढे राहावे, हे अमेरिकेच्या धोरणात चपखल बसते. विषाणू प्रयोगशाळेतून निसटण्याच्या घटना, त्यांच्या प्रसाराचा वेग पाहता अमेरिकेला ते झेंगट स्वत:च्या गळ्यात बांधून घ्यायचे नव्हते. कृत्रिम जीव तयार करण्यासंदर्भात अमेरिकेत जे चर्वितचर्वण झाले, ते आपण पाहिलेच आहे. संयुक्त राष्ट्र संघटना जैविक युद्धासाठी शस्त्रे तयार करण्याच्या विरोधात आहे. भारतासारखे देश त्या विरोधात रान माजवतील. चीन हा त्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त देश होता. हुकूमशाही देशात गुपिते अधिक सुरक्षित राहू शकतात. तेथे वैज्ञानिकांना मानवताविरोधी प्रकल्पात राबविले, तरी ते तोंड उघडायला सहजासहजी धजत नाहीत, कारण जिवाची भीती असते. या सर्व गोष्टी लक्षात घेता अमेरिकेने विषाणू संशोधन करण्यासाठी चीनला भरघोस मदतीचा हात दिला.

 

corona_5  H x W

विषाणूंवरील संशोधनात महत्त्वाची गोष्ट त्या देशांतील वैज्ञानिकांच्या लक्षात आली की विषाणू बाहेर पडू नये यासाठी अत्यंत उच्च दर्जाची सुरक्षा उपाययोजना (biosafety level 4, BSL–4) उभारण्याची आवशकता होती. ते काम चीनला जमणारे नव्हते. त्यासाठी प्रगत पाश्चात्त्य देशांनी चीनला मदत केली. कडक सुरक्षा असलेली प्रयोगशाळा निर्माण करायला अमेरिकेने भरघोस आर्थिक आणि वैज्ञानिक साहाय्य पुरविले. नव्याने पुढे आलेल्या माहितीप्रमाणे डोनाल्ड ट्रंपच्या शेजारी उभा राहून अनेकदा त्याचा प्रतिवाद करण्यामुळे लोकांच्या डोळ्यात भरलेला जैव वैज्ञानिक अंथोनी फाउची हाही त्यात सामील होता. विषाणूंवरील संशोधनासाठी वुहानचे अतिप्रगत केंद्र सुरू करण्यात आले.

चीनला प्राधान्य

१९६०-६५नंतर अमेरिकेच्या लक्षात आले की छोट्या, कमी किमताच्या वस्तू अमेरिकेत तयार केल्या तर परवडणार्‍या नाहीत. त्यासाठी दुसरे देश शोधले पाहिजेत. अमेरिकेसमोर दोन पर्याय होते - भारत अणि चीन. हे आकाराने मोठे आणि मनुष्यबळाने समृद्ध होते. भारताला चीनने १९६०च्या दशकात पी एल ४८० कलमानुसार धान्य आणि इतर सामग्रीचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा केला होता. चिनी आक्रमणाच्या वेळी अमेरिका भारताच्या पाठीशी उभा होता. भारतीय राज्यकर्ते आणि विचारवंत डाव्या विचारसरणीमुळे भारले गेल्याने त्या वेळी अमेरिकेकडे उपेक्षेने पाहिले गेले. अमेरिकेचे राजदूत मॉयनिहान यांनी त्या प्रकाराला उबगून "At least say 'thank you' for the aid" असे उद्गार भारताला उद्देशून काढले होते. त्यामुळे अमेरिका दुरावला होता. अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या मर्जीतले हेन्री किसिंजर यांनी प्रथम भारतातील परिस्थितीचा अंदाज घेतला. नंतर भारतातून गुप्तपणे बीजिंग गाठले. साम्यवादी माओत्झे डोंगने किसिंजरचे उत्तम स्वागत केले. अमेरिकेने आर्थिक आणि तांत्रिक मदतीचा ओघ चीनकडे वळविला. दळणवळणाची संसाधने, यंत्रसामग्री आणि भांडवल पुरवठा केला. सुमारे चार दशके चीनने अमेरिकेला कमी किमतीच्या उत्पादनांचा भरघोस पुरवठा केला. भारताने समाजवादाच्या कैफात बुडून ती संधी गमावली. त्याच वेळी भारतातील उच्च बुद्ध्यंकाचे मनुष्यबळ अमेरिकेने पळविले.

चीनची चढती कमान

सुमारे २०१२पासून उच्च अधिकाराच्या जागेवर असणार्‍या वैज्ञानिकांना आणि राजकारण्यांना चीनमध्ये चाललेल्या संशोधनाची कल्पना आली होती. ते संशोधन अत्यंत गुप्त राहायला पाहिजे याबाबत त्यांच्यात एकवाक्यता असल्याने ते पुढे आले नाही. गेल्या दशकात चीनची चढती कमान राहिली. आर्थिकदृष्ट्या चीन अमेरिकेची बरोबरी करण्यास सरसावला. चीनने आर्थिक साम्राज्यविस्ताराचे धोरण अमलात आणायला सुरुवात केली. डोनाल्ड ट्रंपने चीन विरोधात पवित्रा घेताच चीनने नख्या काढायला सुरुवात केली. जैविक अस्त्र प्रगतीतील काम चीनमध्ये चालले असताना त्यावर उपाय शोधण्याचे संशोधन चीन करत असणार. त्याची माहिती चीनने मदत करणार्‍या प्रगत देशांपासून लपवून ठेवली, असे दिसते.


corona_4  H x W

अपघाती स्फोट

कितीही सुरक्षित यंत्रणा उभारली, तर काही तरी कारण घडून ती उघडी पडते. तसेच कोरोनाच्या बाबतीत झाले. ऑक्टोबर–नोव्हेंबर २०१९च्या दरम्यान वुहान संशोधन केंद्रातील कोणातरी कर्मचार्‍याला कोरोनाचा लागण झाली. त्याच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरने कोरोनाच्या उपद्रवक्षमतेची थोडी वाच्यता करताच त्याला नाहीसे करण्यात आले. तोपर्यंत बाण सुटला होता. कोरोनाचा संसर्ग होऊन भर रस्यात मरून पडणार्‍या एका दुर्दैवी जिवाला जगाने चित्रवाहिन्यांवर पाहिले. त्यानंतर चीनमध्ये दवाखाने ओसंडून जाताना दिसत होते. मरणार्‍यांच्या नातेवाइकांना शासन जे अस्थिकलश देत होते, त्यांचे आकडे बाहेर येत नव्हते. नातेवाइकांना माध्यमांसमोर येण्यावर बंदी होती. कोरोनाची साथ पसरत होती, त्या वेळी चीनने डाव साधला. थेट वुहानमधून अमेरिकेला विमाने ये-जा करू लागली. अमेरिकेने जे विषाणू तंत्रज्ञान प्रगत करण्यास चीनला मदत केली होती, त्याचा प्रयोग चीनने अमेरिकेवर केला. अमेरिकेने सर्व प्रकारे मदत देऊन निर्माण केलेला कोरोनाचा भस्मासुर चीनने अमेरिकेवर उलटविला. ते गुपित उघडे पडू नये, म्हणून या प्रयोगात ज्या मोठमोठ्या वैज्ञानिकांचा सहभाग होता, ते चीनशी हातमिळवणी करून केलेले पाप झाकण्याच्या लटपटी करत होते. वैज्ञानिक जगतात अत्यंत प्रतिष्ठा असणार्‍या संशोधनपर मासिकांमध्ये बुद्धिभेद करणारे लेख प्रसिद्ध करत होते. काही काळ चीनला सहानुभूती दाखविण्याची लाट युरोपातील देशांत आली. चीनने तिचा फायदा उचलला. मानवतावाद ओसंडून वाहणारे अत्यंत भोट असणारे इटलीतील नागरिक चिनी नागरिकांचे रस्त्यांवर मुके घेतानाची दृश्ये आपण त्या वेळी पाहिली आहेत. चीनने इटलीतील नागरिकांचा प्रायोगिक जनावरांसारखा - गीनीपिगसारखा वापर करून घेतला. पहिल्या लाटेत इटलीत कोरोनाने मरणार्‍यांची संख्या फार जास्त होती.

त्या वेळी असे दिसले की कोरोनाची साथ फक्त वुहानपुरती मर्यादित ठेवण्यात चीनला यश आले. थोड्याच काळात चीनने नागरिकांवरील निर्बंध सैल केले. चीनच्या बाबतीत कुठलीही माहिती कितपत विश्वासार्ह मानायची, हा प्रश्नच आहे. चीनने लस उशिराने बाजारात आणली. तिची उपयुक्तता अनिश्चित आहे. त्या लसीचे प्रयोग पाकिस्तानी नागरिकांवर केल्याचे पुढे आले. चीनने जगासमोर सादर केलेली लसच आपल्या नागरिकांना दिली की त्यांच्यासाठी खास वेगळी उपाययोजना होती, हा एक वेगळा विषय आहे. तूर्तास एवढेच म्हणता येईल की अमेरिकेच्या मदतीने निर्माण केलेला कोरोना विषाणूचा भस्मासुर चीनने अमेरिकेवर उलटविला, तृतीय महायुद्धाची चाचणी केली. अमेरिकेसकट सर्व जगाची अर्थव्यवस्था धुळीला मिळविली. आता जगावर महासत्ता म्हणून वर्चस्व निर्माण करण्यासाठी चीन पुढचे कोणते पाऊल उचलेल यावर भारताने डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवले पाहिजे. आशियात चीनला पायबंद घालू शकणारा एकटा भारत देशच आहे. भारताने विषाणू युद्धासाठी तयार राहायची आणि त्यावर उपाययोजना सिद्ध करण्याची पर्यायी योजना आखली पाहिजे.

drpvpathak@yahoo.co.in