कोरेगाव भीमा सत्याचा शोध

विवेक मराठी    24-May-2021
Total Views |

कोरेगाव भीमाच्या एक दिवसाच्या लढाईचा आधार घेऊन मराठे विरुद्ध महार, महार विरुद्ध पेशवे - म्हणजे ब्राह्मण अशी मांडणी केली गेली. त्यासाठी विविध आख्यायिकांना आणि दंतकथांना खरा इतिहास म्हणून समोर मांडले गेले. परिणामी सामाजिक विद्वेष उफाळून आला. या सर्व गोष्टींची पूर्वपीठिका लक्षात घेऊन शिवाजी कोकणे यांनी सुसंगतपणे इतिहासातील घटनाक्रम मांडला आहे.

book_1  H x W:

एक जानेवारी 2018 हा दिवस महाराष्ट्र राज्यातील सामाजिक सलोख्याला आणि बंधुतेला तडा देणारा ठरला. कोरेगाव भीमा येथे इंग्रज आणि मराठे यांची लढाई झाली, या गोष्टीला या दिवशी दोनशे वर्षे पूर्ण झाली, म्हणून एक कार्यक्रम आयोजित केला गेला. त्या कार्यक्रमात दोन समाजगटांत संघर्ष झाला. पुढे दोन-तीन दिवस महाराष्ट्रात जातीय दंगली झाल्या. या घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एक आयोग गठित केला असून त्याचा तपास सुरू आहे. हे सर्व विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे कोरेगाव भीमा या विषयावर अनेक संशोधक अभ्यासक लिखाण करू लागले असून ॅड. शिवाजी कोकणे यांचेकोरेगाव (भीमा) शौर्यदिवस सत्य की विपर्यासहे संशोधनात्मक पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. विषय इंग्रज आणि मराठे यांच्या छोट्या लढाईचा असला, तरी त्यांच्या पार्श्वभूमीचा पट खूप मोठा आहे. त्या लढाईकडे बघण्याची दृष्टी दोनशे वर्षांत कशी बदलली आहे आणि त्याला जातीय रंग कसा आला आहे, हे सर्व समजून घेण्यासाठी ॅड. शिवाजी कोकणे यांचे पुस्तक उपयुक्त आहे. या पुस्तकाच्या लिखाणामागचा उद्देश सत्यशोधनाचा आहे. त्यामुळे ते 1818च्या आधी 180 वर्षांपासूनचा मराठ्यांच्या इतिहास मांडतात. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू महाराज, बाजीराव पेशवे असे महत्त्वाचे पराक्रमी पुरुष आणि त्यांनी निर्माण केलेले साम्राज्य यांचा विस्ताराने समावेश केला आहे.

कोरेगाव भीमा येथील लढाईच्या निमित्ताने अनेक आख्यायिका आणि दंतकथा प्रस्तुत केल्या गेल्या. कोरेगाव भीमाजवळ वडू हे गाव आहे, तेथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक आहे. या दोन गावांचा इतिहास एकमेकांत मिसळून नव्या परिप्रेक्ष्यात इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला गेला. कोरेगाव भीमाच्या एक दिवसाच्या लढाईचा आधार घेऊन मराठे विरुद्ध महार, महार विरुद्ध पेशवे - म्हणजे ब्राह्मण अशी मांडणी केली गेली. त्यासाठी विविध आख्यायिकांना आणि दंतकथांना खरा इतिहास म्हणून समोर मांडले गेले. परिणामी सामाजिक विद्वेष उफाळून आला. या सर्व गोष्टींची पूर्वपीठिका लक्षात घेऊन शिवाजी कोकणे यांनी सुसंगतपणे इतिहासातील घटनाक्रम मांडला आहे. या पुस्तकाची मांडणी करताना शिवाजी कोकणे यांनी अनेक पुरावे मांडले असून त्यात इंग्रजांच्या कागदपत्रांचा समावेश आहे, त्याचप्रमाणे विदेशी प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झालेली माहितीसुद्धा पुरावे म्हणून सादर केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोरेगाव भीमा येथील जयस्तंभाला भेट दिली होती, त्या वेळी त्यांनी केलेल्या भाषणाचा समावेश या पुस्तकात केला असून ब्रिटिशांच्याफोडा आणि राज्य कराया नीतीवर त्यांनी भाष्य केले आहे. मात्र मागील काही वर्षे हे भाषण चुकीच्या पद्धतीने समाजमाध्यमांतून प्रसारित होते. कोरेगाव भीमा येथील लढाई ही महार विरुद्ध पेशवे म्हणजे ब्राह्मण अशी झाली आणि त्यात पेशवे पराभूत झाले, पाचशे महारांनी 28000 पेशव्यांचा पराभव केला असे मिथक निर्माण केले. या मिथकाचा फोलपणा स्पष्टपणे मांडण्याचे काम या पुस्तकातून झाले आहे. या लेखनामागची लेखकाची भूमिका ही कोणत्याही एका समूहाची बाजू उचलून धरण्याची नसून सत्य माहिती जगासमोर मांडणे ही आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पुरावे शोधून त्यांनी विविध मिथकांचा खोटेपणा सिद्ध केला आहे. सिद्धनाक ही व्यक्तिरेखा आणि त्यांच्याभोवती निर्माण केलेले ऐतिहासिक वलय शिवाजी कोकणे यांनी पुराव्यांच्या आधारे तपासले आहे आणि त्यासंबंधी आपली भूमिका स्पष्ट शब्दांत मांडली आहे. कोरेगाव भीमा येथे झालेल्या लढाईचे निमित्त करून जे सामाजिक वाद निर्माण केले जातात, त्यामागे उभ्या असणार्या विघटनकारक शक्तीही लेखकाने मोठ्या कौशल्याने अधोरेखित केल्या आहेत.

लेखक सत्याचा विपर्यास दाखवून थांबत नाहीत, तर एका घटनेचा होणारा राजकीय, सामाजिक आणि सांविधानिक परिणामही सांगतात. मूळ इतिहास आणि त्याचा विपर्यास यांच्या धूसर सीमारेषा स्पष्ट करताना, इतिहासाचे विकृतीकरण साधार स्पष्ट करताना लेखक जास्तीत जास्त सामाजिक समन्वयाची भूमिका घेताना दिसतो. आपल्या मनोगतात लेखकाने म्हटले आहे की, हे पुस्तक केवळ ऐतिहासिक तथ्य मांडण्यासाठी लिहिले असून कोणाच्याही किंवा कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणे किंवा अपमान करणे हा उद्देश नाही. समाज नेहमी शौर्याचा आदर करतो. कोरेगाव येथे लढलेल्या शूरांचा मी आदर करतो. त्यांनाही वंदन करतो. त्यांच्या पराक्रमास हे पुस्तक समर्पित आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने कोणाही भावना दुखावल्या जाऊ नयेत या दृष्टीकोनातून फक्त सत्य मांडले आहे. 272 पानांच्या या महत्त्वपूर्ण पुस्तकातून लेखकाने सामाजिक भूमिकेतून सत्याचा शोध घेतला आहे. गतकालीन घटना आणि त्याचा सामाजिक तेढ, सामाजिक विसंवाद निर्माण करण्यासाठी होणारा वापर या विषयावर सर्व समाजाने गंभीरपणे चिंतन करणे आवश्यक आहे, अशा चिंतनासाठी हे पुस्तक उपयोगी ठरेल यात शंका नाही.

पुस्तकाचे नाव - कोरेगाव (भीमाशौर्यदिवस

सत्य की विपर्यास

लेखक - ॅड. शिवाजी कोकणे

प्रकाशक - माई पब्लिकेशन, उदगीर

पृष्ठे - 272 किंमत - 425 रु.