जैविक युद्धाचा प्रारंभ?

विवेक मराठी    27-May-2021
Total Views |

 जगावर सत्ता गाजवण्याची स्वप्नं पाहणार्या या दोन बलाढ्य महासत्ता मनुष्यजातीच्या मुळावर उठल्या आहेत. सत्तेच्या हव्यासापायी परिणामांची पर्वा करता जैविक युद्ध खेळायलाही त्या मागेपुढे पाहणार नाहीत. तेव्हा भारतासारख्या देशाने ही महामारी म्हणजे या सत्ताकांक्षी देशांनी जैविक युद्धाच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल तर नाही ना, याचा विचार करायला हवा. सावध राहायला हवं आणि आपली रणनीती निश्चित करायला हवी.


corona_1  H x W

चीनमधील वूहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही प्रख्यात संशोधन संस्था आता ओळखली जाते ती मनुष्याच्या मुळावर उठलेल्या कोविड-19 या विषाणूचं प्रसारकेंद्र म्हणून. गेल्या सव्वा वर्षात जगभर हाहाकार माजवलेल्या आणि कोट्यवधी निरपराधांचे बळी घेणार्या या महासाथीला कोणताही नैसर्गिक विषाणू वा प्राण्यांमधून झालेलं संक्रमण कारणीभूत नसून, मनुष्यनिर्मित विषाणू जबाबदार असल्याची चर्चा आता भारतासह जगभरातल्या संशोधकांमध्ये चालू आहे. हवेतून पसरणारा विषाणू, त्याची लागण झाल्यावर दिसणारी न्यूमोनियासदृश लक्षणं आणि कोविडबाधित अनेकांचा एकेक अवयव निकामी होत त्यातच अंत होणं, यामुळे जगभर भीतीचं वातावरण निर्माण झालं. अदृश्य राहून गाठणार्या या शत्रूबद्दल सर्वसामान्यांच्या मनात दहशत निर्माण झाली. बघता बघता जनजीवन ठप्प झालं. माणसं जिवाच्या भीतीने भेदरून घरात बंदिस्त झाली, अर्थचक्राची गती हळूहळू मंदावत ठप्प होण्याच्या दिशेने पावलं टाकू लागली. जगण्यावरचा भरवसाच उडत चालला आणि नाकाद्वारे शरीरात जाणारी हवा जीवघेणा विषाणू तर वाहून नेत नाही ना, या भयगंडाने समूहमन ग्रासून गेलं. डोळ्यांना न दिसणारा आणि हवेतून पसरणारा हा विषाणू आज मानवी जीवनाला एखाद्या अजगराप्रमाणे विळखा घालून बसला आहे, हे आजचं वास्तव आहे.
  
सुरुवातीच्या काळात या महासाथीवर औषधोपचार शोधताना विषाणू निसर्गनिर्मित आहे असं मानून उपाय शोधले जाऊ लागले. मात्र या महासाथीचं उगमस्थान चीनसारखा देश असल्याने आणि त्या संदर्भात संशयाचं खात्रीत रूपांतर करणारे पुरावे हळूहळू गोळा होत गेल्याने हा विषाणू मानवनिर्मित असल्याच्या तर्काला बळकटी मिळू लागली आहे. त्याचबरोबर यातली मुख्य सूत्रधार चीनमधील वूहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी असली, तरी यात अमेरिकन संशोधकांचा सहभाग आहे, या संशोधनाला अमेरिकन संस्थांनी फार मोठं अर्थसाहाय्य केलं आहे, हेही आता स्पष्ट होऊ लागलेलं आहे.

  

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात ऑक्टोबर 2014मध्ये gain of function research या प्रकारच्या संशोधनावर - ज्यात प्रयोगशाळेत विषाणूचं उत्परिवर्तन केलं जातं, त्यावर बंदी घालण्यात आली.

  संशोधनातली नैतिकता जपण्यासाठी प्रत्येक देशातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रयोगशाळेची एक एथिकल कमिटी असते. तिने आखून दिलेले नियम पाळणं अनिवार्य असतं. अमेरिका, इंग्लंड यासारख्या देशांत या कमिटींना विशेष महत्त्व आहे. चीनमध्ये मात्र तशी परिस्थिती नाही. त्यामुळेच, अमेरिकेत gain of function researchवर बंदी आल्यावर चीनमधील वूहान प्रयोगशाळेत अमेरिकेच्या आर्थिक पाठिंब्यावर अशा प्रकारचं संशोधन चालू राहिलं.

  
हे चालू असताना वूहान लॅबसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रयोगशाळेत प्रयोगादरम्यान आवश्यक ती दक्षता घेतली जाणं हेदेखील प्रयोगामागच्या संशयास्पद हेतूला बळकटी देणारंच ठरलं.

 

 जेव्हा विज्ञानातील संशोधन हे निखळ संशोधन राहत नाही, मानवजातीच्या भल्यासाठी या मूलभूत हेतूपासून ते दूर जातं आणि सरकारच्या हातातलं शस्त्र बनतं, तेव्हा नैतिकतेचे नियम धुळीला मिळतात. इथे तर दोन महासत्ता - अमेरिका चीनच्या मदतीने हे कुकर्म करण्यात गुंतली होती.

  
संशोधन काळात विषाणू प्रयोगशाळेच्या बाहेर पडणं, त्याचं संक्रमण होणं हा कदाचित अपघात असू शकेल (एखाद्या कम्युनिस्ट राजवटीकडून संपूर्ण मानवी आयुष्यावर विपरीत परिणाम करणार्या अपघाताची खरी माहिती केवळ राजवटीच्या प्रतिमेवर डाग लागू नये म्हणून लपवणं हे इतिहासात यापूर्वीही चेर्नोबिल आण्विक प्रकल्प अपघाताच्या वेळी जगाने अनुभवलं आहे. त्या वेळीही सोव्हिएत रशियाने माहिती लपवण्याचा अतोनात प्रयत्न केला होता, परंतु त्याही वेळी सत्य कालांतराने समोर आलंच.) आणि विषाणू अपघाताने बाहेर पडल्यावर तो असंख्य वेळा उत्परिवर्तित झाल्यावर त्यावर तत्काळ उपाययोजना करणं हेदेखील संशोधकांच्या आवाक्याबाहेरचं असू शकेल... तरीही हा विषाणू प्राण्यांमार्फत संक्रमित झालेला नाही, (वटवाघळामार्फत कोरोना विषाणूचं संक्रमण झालं अशी आवई उठवली जात असली, तरी तो काळ वटवाघळांच्या शीतनिद्रेचा - हायबरनेशनचा असल्याने ही शक्यताही बर्याच अंशी मोडीत निघते.) वा मनुष्याव्यतिरिक्त कोविड-19 हा विषाणू तंतोतंत स्वरूपात अन्य कोणत्याही प्राणिमात्रांत सापडलेला नाही, हे वास्तव तो मनुष्यनिर्मित असण्याच्या आणि त्यामागच्या कुटिल कारस्थानाच्या तर्काला बळकटी देणारं आहे.
 

 एकदा तो मनुष्यनिर्मित असल्याची कुजबुज चालू झाल्यावर ते दडपण्याचे प्रयत्नही संबंधित देशांकडून झाले. या विषयात गुंतलेल्या संशोधकांनीलॅन्सेटसारख्या जगप्रसिद्ध मेडिकल जर्नलमधून लेख लिहून/मुलाखती देऊन, कोरोना व्हायरस हा मनुष्यनिर्मित विषाणू असल्याचा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र वूहान लॅबमधल्या प्रसिद्ध संशोधक डॉ. शी झेंग ली या अमेरिकेतील विषाणू संशोधक डॉ. राल्फ बेरीक यांच्या सहकारी होत्या, ही बाबही आता पुढे येत आहे.

  
जेव्हा हे प्रकरण अंगाशी येऊ लागलं, तसं त्याला कोरोना व्हायरस म्हणता चिनी व्हायरस म्हणत, या पापाचं बिल एकट्या चीनच्या नावावर फाडायला अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष पुढे आले. आणि चीननेही त्या काळात वूहानहून जास्तीत जास्त विमानोड्डाणाला परवानगी देत हे संक्रमण जगभर पसरायला हातभार लावला. तो अजाणतेपणी असेल असं म्हणणं म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात राहणं ठरेल.
   
2015च्या सुमारास चीनमधून प्रकाशित होणार्या एका मेडिकल जर्नलमध्ये लिहून ठेवलं आहे - ‘इथून पुढे अन्य देशांशी युद्धासाठी संरक्षण दल, दारूगोळा, शस्त्रास्त्रं यांची गरज भासणार नाही. इथून पुढचा जमाना हा जैविक युद्धाचा असेल. त्याची तयारी केली पाहिजे.’ यातून चीन जैविक युद्धासाठी स्वतःला सज्ज करत असल्याचा इशारा मिळतो, तसंच अशी तयारी करणारा तो एकटाच देश नाही, हेही लक्षात येतं.

 

 या महामारीत आपली पोळी भाजून घेणार्या आणि औषधनिर्मितीच्या क्षेत्रात स्वतःचा एकछत्री अंमल निर्माण करण्यासाठी वाटेल ती पातळी गाठण्यात जराही डगमगणार्या आंतरराष्ट्रीय औषध कंपन्या आपलं उखळ पांढरं करून घेण्यात गुंतल्या आहेत. लसनिर्मितीच्या दरम्यान औषधकंपन्यांमध्ये खेळलं गेलेलं राजकारण हा त्याचाच पुरावा आहे.

 

 जगावर सत्ता गाजवण्याची स्वप्नं पाहणार्या या दोन बलाढ्य महासत्ता मनुष्यजातीच्या मुळावर उठल्या आहेत. सत्तेच्या हव्यासापायी परिणामांची पर्वा करता जैविक युद्ध खेळायलाही त्या मागेपुढे पाहणार नाहीत. तेव्हा भारतासारख्या देशाने ही महामारी म्हणजे या सत्ताकांक्षी देशांनी जैविक युद्धाच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल तर नाही ना, याचा विचार करायला हवा. सावध राहायला हवं आणि आपली रणनीती निश्चित करायला हवी.