दक्षिणेतील नामदेव कनकदास

विवेक मराठी    27-May-2021
Total Views |

कनकदासांचे संपूर्ण चरित्र म्हणजे टाकीचे घाव सोसून देवत्व संपादन करणार्या ईश्वरभक्ताचेच चरित्र आहे. सन 1508मध्ये कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील वाडा नामक गावात जन्मलेले संत कनकदास संत नामदेवांप्रमाणेच दीर्घायुष्य जगून वयाच्या 98 वर्षी सन 1606मध्ये वैकुंठवासी झाले.


kankdas_1  H x

संत नामदेवांचे वर्णन करताना संत तुकाराम महाराज म्हणतात - ‘फिरविले देऊळ जगामाजि ख्याति। नामदेवा हाती दूध प्याला॥

एकदा औंढ्या नावाच्या गावी एका देवळासमोर संत नामदेवांचे कीर्तन सुरू होते. नामदेवांच्या कीर्तनात प्रत्यक्ष पांडुरंग उपस्थित राहत, अशी त्यांची ख्याती असल्यामुळे कीर्तनाला अपार समाज लोटला. देवळाच्या पुजार्यांना ही बाब खटकल्यामुळे त्यांनी नामदेवांशी वाद घालायला सुरुवात केली, “देवाच्या दरवाजात कीर्तनाच्या नावाने कशाला अडथळा निर्माण करता? मुकाट्याने देवळाच्या पाठीमागे जाऊन हवे तेवढे कीर्तन करा!”

नामदेवांनी नम्रपणे देवळाच्या मागे जाऊन कीर्तन सुरू केले. त्या वेळेस परमेश्वराला आपल्या भक्ताकडे पाठ करून बसणे अशक्य झाले आणि त्याने कीर्तनरंग पाहण्यासाठी संपूर्ण देऊळच 180 अंशात फिरविले. मग भगवंत आनंदाने दरवाजातून बाहेरचा कीर्तनरंग पाहू लागले. संत कनकदासांच्या बाबतीत नेमका असाच चमत्कार सांगितला जातो.

संत कनकदास यांचे मूळ नाव होते थिमप्पा. मेंढपाळ समाजात त्यांचा जन्म झाला होता. काही लोक त्यांचा जन्म शिकार्यांच्या कुटुंबात झाला असेही मानतात. एकूण त्यांची जन्मजात शूद्र मानली जाते. त्यांच्या वडिलांचे नाव बिराप्पा आणि आईचे नाव बक्कमा. ते सोळाव्या शतकातील प्रसिद्ध संतकवी असून त्यांच्या जन्ममृत्यूच्या निश्चित तारखा उपलब्ध नाहीत. असे सांगितले जाते की, सन 1508मध्ये कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील वाडा नामक गावात जन्मलेले संत कनकदास संत नामदेवांप्रमाणेच दीर्घायुष्य जगून वयाच्या 98 वर्षी सन 1606मध्ये वैकुंठवासी झाले. कनकदासांच्या उमेदीच्या वयातच त्यांच्या आईवडिलांचा मृत्यू झाला, आणि तसेच त्यांची प्रिय पत्नीही मरण पावली. कनकदासांचे मन शोकमग्न झाले, तरीही ऐहिक संसारापासून ते पूर्णपणे उदासीन झाले नव्हते. अशा अवस्थेत त्यांना भगवान कृष्णाचा वारंवार दृष्टान्त होत असे. पण अजूनही तेकायावाचामनेहरिदास झाले नव्हते. पुढे एका लढाईचे निमित्त झाले आणि त्यात त्यांना मरणांतक जखमा झाल्या. त्या वेळेस भगवंताने त्यांनायातून बरे झाल्यास माझा पूर्णपणे दास होशील का?’ असा पुन्हा दृष्टान्त दिला. त्यानुसार कनकदासांनी बरे झाल्यानंतर हर्षातिरेकाने हे पद गायन केले -

ईश निन्न चरणासेवो आसेविंदु माडुवेनु।

दोषराशि नाशमाडो, श्रीश केशवा॥

संत नामदेवांच्या भाषेत सांगायचे तर,

चरण सोडी सर्वथा। तुझी आण पंढरीनाथा॥

नामा म्हणे केशवराजा। केला पण चालवी माझा॥

संत कनकदासांनी सर्वसंगपरित्याग केला आणि ते हंपी येथे स्वामी व्यासराय या संतपुरुषाच्या आश्रयाला आले. व्यासराय हे पुरंदरदास यांचेसुद्धा गुरू होते.

कनकदास परिभ्रमण करीत करीत उडुपीच्या केशव मंदिरात आले. मंदिराच्या पुजार्यांनी त्यांना हलक्या कुळातील व्यक्ती मानून देवळात प्रवेश करण्यास मनाई केली आणि मंदिराच्या पाठीमागे जाऊन कीर्तन करण्यास सांगितले. कनकदास विनम्रपणे मंदिराच्या पाठीमागे जाऊन गायन करू लागले. तेव्हा भगवान श्रीकृष्णाची पूर्वाभिमुख मूर्ती चक्क 180 अंशात फिरली आणि पाठीमागे असलेल्या खिडकीतून आपल्या परमभक्ताचा कीर्तनरंग श्रवण करू लागली.

त्या वेळची कनकदासांची रचना पाहा -

दार उघडा देवराया। तुझी चरणसेवा कराया॥

मगर लागली पायाला। गजेंद्रासाठी धावला॥

वाचविले प्रल्हादाला। राखले तू द्रौपदीला॥

अजामिळ पापराशी। घेता तरला तवनामासी॥

का ऐकसी धावा। माझा अंत पाहसी रावा॥

दार उघडा देवराया। तुझी चरणसेवा कराया॥

लोक अशा घटनांना चमत्कार मानतात. मात्र अशा घटना एकाच सिद्धान्ताच्या द्योतक आहेत आणि तो सिद्धान्त म्हणजे भगवंताचे भक्ताच्या जातीपातीशी, त्याने मांडलेल्या अवडंबराशी काहीच घेणेदेणे नसते; तो केवळ भक्तिभावाचा भुकेला असतो. अशा घटनांतून हेच सत्य अधिक जोरकसपणे मांडण्याची गरज होती; पण लोकांनी संत नामदेव आणि संत कनकदास यांनाच देवतुल्य करून चमत्कारी संत संबोधून देवासोबतच मखरात बसवून टाकले. या संतांनी कंठशोष करून जो उपदेश केला, त्याच्याकडे मात्र 180 अंशातून सोईस्करपणे पाठ फिरविली. अजूनही आपण जो जातीपातीचा शाप भोगत आहोत, त्याला हिंदू समाजाची हीच कमनशिबी मनोवृत्ती कारणीभूत आहे.

देवळासमोरून हाकलून लावणार्या पुजार्याशी संत कनकदासांनी मुळीच वाद घातला नाही; पण आपल्या साहित्यरचनेतून बजावून सांगितले -

ते उच्चकुलाचा दावा वेळोवेळी करतात...

पण ज्यांनी ब्रह्मानंद मिळविला आहे,

त्यांचे कुळ कोणते असावे?

तुम्ही देवाच्या मस्तकी वाहता

ते कमळाचे फूलसुद्धा चिखलातच उमलते.

काळ्या कपिला गाईच्या आचळांतून

पाझरणार्या दुधाचे भूपतीसुद्धा पान करतात.

सांगा मला, भगवान नारायण आणि भगवान शिव

यांची कोणती जात आहे?

सांगा मला, आत्मा आणि जीवाची

कोणती जात आहे?

मग व्यर्थ कुळाची चर्चा करता कशाला?

आपल्या साहित्यातसुद्धाॠषीचे कूळ आणि नदीचे मूळ शोधू नयेही म्हण तोंडी लावण्यापुरतीच उरली आहे; आचरणात याचा अनुभव दुर्लभ असतो. स्वामी विवेकानंदांनी आपल्याभक्तियोगनामक ग्रंथात नमूद केले आहे की, ‘विद्वेषपूर्ण भक्ती हीगौण भक्तीआहे. हीच भक्ती जेव्हा परिपक्व झाल्यावरपराभक्ती परावर्तित होते, तेव्हा तेथे भयावह कट्टरपंथी भावनेचा कोणताही संशय उरत नाही. यापराभक्तीने अभिभूत झालेला व्यक्ती प्रेमस्वरूप भगवंताच्या इतक्या निकट जाऊन पोहोचतो की तो घृणाभावनेचा प्रसार करण्याचे यंत्र बनून राहत नाही.’

हीच उंची संत कनकदासांनी गाठलेली आहे. त्यामुळे कनकदासांना जातिगत भेदभावाचा दाहक अनुभव आला असला, तरी समाजाबाबत अपत्यभाव बाळगूनच त्यांनी अशा सर्व भेदभावांवर कडाडून हल्ला चढविला आहे. कनकदासांच्यानरसिंहस्तुती’, ‘नलचरित्रे’, ‘मोहनतरंगिणी’, ‘हरिभक्तिसारआणिरामधान्यचरित्रेया साहित्यरचना विशेष प्रसिद्ध आहेत. तथाकथित खालच्या जातीतील संबोधिले गेलेल्या या संतपुरुषाची ही सर्व साहित्यरचना साहित्यिक दृष्टीने आणि पारमार्थिक अनुभवकथनाच्या दृष्टीनेही अत्यंत उच्च दर्जाची आहे. कनकदासांचे संपूर्ण चरित्र म्हणजे टाकीचे घाव सोसून देवत्व संपादन करणार्या ईश्वरभक्ताचेच चरित्र आहे. त्याच्या चरित्रांतून संत तुकारामांची लडिवाळ भक्ती, समाजपरिवर्तनाची तीक्ष्ण उत्तरे, जनसामान्यांना उपदेश आणि ईश्वरप्राप्तीविषयीची आर्तता सारखीच डोकावत राहते. ज्या समाजातील लोकांना वेदाभ्यासच वर्ज्य मानला जात होता, अशा समाजात जन्म घेऊनवेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा। येरांनी वहावा भार माथा॥असे स्पष्टपणे बजावण्याचे सामर्थ्य या संतकवीच्या शब्दांत आहे. जी वेदना संत चोखामेळा यांना पोखरत जाते, तीच वेदना आणि तोच कळवळा आपल्याला कनकदासांच्या साहित्यात आढळतो. उदाहरणार्थ,

जोहार मायबाप जोहार। तुमच्या महारांचा मी महार॥

हीन याती माझी देवा। कैसी घडे तुझी सेवा॥

मज दूर दूर हो म्हणती। तुज भेटू कवण्या रिती॥

चोखा म्हणे देवा। नको मोकलू केशवा॥

संत कनकदास म्हणतात - ‘मी प्रत्येक भक्ताच्या घरचा दास आहे. हे श्रीशा, श्रीरंगा, मी तुझ्या घरचा दास आहे. मी अनेक दासांच्या घरचा नीच कुळात जन्मलेला दास आहे. मी यातिहीन दास आहे. हे रंगा, हे पतितपावना! मी जातिबाह्य दास आहे. हे आदिकेशवा, माझे रक्षण कर आणि मला मुक्ती प्रदान कर!’

या ठिकाणी केवळ भावच नव्हे, तर शब्दसुद्धा फारसे निराळे उपयोगात आणलेले नाहीत. केवढी ही एकात्मता, केवढी ही एकरूपता, केवढी ही समरूपता आणि केवढी ही समरसता!

कनकदासांच्या साहित्यात पुढे जाऊन आपल्याला संत रामदासांचीसुद्धा भेट होते. आपल्यासारख्या गांजलेल्या अन्य जिवांना धीर देताना संत कनकदास सांगतात - ‘आता तुमची जी अवस्था आहे त्याबद्दल चिंता करू नका! तो केशव सर्व जिवांचा सांभाळ करतो! पर्वताच्या शिखरावर उगवलेल्या झाडाचे तो पोषण करतो! जंगलातील पशुपक्ष्यांचे तो पोषण करीत नाही का? पाषाणाच्या पोटात दडलेल्या बेडकाचेही त्या भगवंताने पोषण केले नाही का?’ या वेळी आपल्याला सहजच ती छत्रपती शिवराय आणि संत रामदास यांची कथा आठवते. आपण लाखांचे पोशिंदे आहोत हा अहंकार शिवरायांच्या मनातून काढून टाकण्यासाठी रामदासांनी पाथरवटाला मोठ्या शिळेचे दोन भाग करण्यास सांगितले आणि त्या शिळेच्या अंतरंगात पाणी त्यात आनंदाने बसलेला बेडूक शिवरायांना पाहायला मिळाला होता. ही कथाच जणू कनकदासांच्या साहित्यरचनेत प्रकटलेली दिसते.

कनकदासरूपी नामदेवालाही तिरुपतीला आल्यावर सावता माळ्यासारखा एक माळी भेटला, जो जातीने दलित होता. त्याचे नाव संत रंगदास. वेंकटाचलाच्या शिखराच्या पायाशी असलेल्या एका बागेत ते आनंदाने काम करत असत.

आपल्याला भगवंताचे दास म्हणवून घेणार्या कनकदासांनी या संताच्या पायाशी बसून दास्यभक्तीचे धडे गिरविले. त्यांनी संत रंगदासांना प्रश्न विचारला - ‘दास दीक्षा कशाला म्हणतात?’

तेव्हा संत रंगदासांनी उत्तर दिले - ‘दासभाव समजून घेण्यास अत्यंत साधी आणि सोपी गोष्ट आहे. जे त्याज्य आहे त्याचा त्याग करणे आणि जे ग्राह्य आहे त्याचा स्वीकार करणे म्हणजेच दास भाव होय.’

कनकदासांनी विनम्रपणे हा भाव तपशिलातून विस्तार करून सांगण्याची विनंती केली. तेव्हा संत रंगदास उत्तरले - ‘आपल्या मनातून काम, क्रोध, लोभ अशा काट्यांप्रमाणे सलणार्या सर्व विकारांना बाहेर काढून टाकले पाहिजे. मग या मनाच्या बागेत केवळ सत्कर्म आणि पुण्यस्वरूपच फुले सतत उमलत राहतील. ईश्वराने सर्जन केलेल्या सर्व प्राणिमात्रांबाबत मनात दयाभाव ठेवला पाहिजे. कायावाचामने कोणाचेही अहित चिंतू नये. सुख-दु:, मानापमान, लाभ-हानी अशा सर्व प्रसंगी भक्ताने स्थितप्रज्ञता धारण केली पाहिजे. केवळ सत्याचाच पथ अनुसरला पाहिजे. या मार्गावरून गेल्यानेच अतिशय सुंदर संस्कारांचा जन्म होतो.’

रंगदासांचा हा उपदेश ऐकून संत कनकदासांना परमानंद झाला आणि त्यांना मनोमनगुरूमानून नमस्कार केला. आपणही याच उपदेशाचे स्मरण ठेवत याच मार्गावरून वाटचाल करण्याचा संत कनकदासांप्रमाणेच निर्धार केला पाहिजे, म्हणजे जसे तिमय्याचाकनकदासझाला, तसेच आपल्याही जीवनाचे सोने होईल.

लेखाचा शेवट करताना संत कनकदासांच्यारामध्यानचरित्रेया ग्रंथातील एक रंजक कथाभाग सांगण्याचा मोह आवरत नाही. एकदा तांदूळ आणि नाचणी (रागी) या दोन धान्यांत कोण अधिक श्रेष्ठ आहे? असा वाद निर्माण झाला. तांदूळ हा तेव्हा धनिकांचा आहार मानला जात होता आणि नाचणी हा गोरगरिबांचा. अशा वेळी भगवान रामचंद्रांना निवाडा करण्यास विनंती केली गेली. भगवान रामचंद्रांनी सांगितले -‘गरिबांचे भोजन असलेले नाचणी हेच धान्य सर्वश्रेष्ठ आहे. कारण ते अकिंचनांच्या पोटाची खळगी भरते. धनिक तर तसेही खाऊनपिऊन तृप्त असतात.’

कदाचित याचमुळे भगवान रामचंद्रांनाभये प्रकट कृपाला, दीनदयाला...’ असे संत तुलसीदासांनी म्हटले असावे.