भाजपाने केली कमाल

विवेक मराठी    04-May-2021
Total Views |

आसाममधील मतदाराचा नैसर्गिक कौल भाजपला मिळणे ही कठीण गोष्ट आहे. कारण इथे गेल्या शंभरहूनही अधिक वर्षे चाललेल्या बांगला देशीयांच्या अतिक्रमणामुळे एकूण लोकसंख्येच्या चाळीस टक्क्यांहूनही अधिक मुस्लीम समाज आहे. हा वर्ग एआययूडीएफच्या आणि आता युती असल्यामुळे काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिला आहे. पण केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजपाचे सरकार असल्याने विकास कामे मोठ्याप्रमाणत झाली. सरकार पुन्हा विकास करू शकते हे लोकांच्या लक्षात आणून देणे हे सोनोवाल सरकारला चांगलेच जमले आहे.

bjp_1  H x W: 0
आसाममध्ये गेल्या महिन्यात 3 टप्प्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल 2 मेला आपल्या हाती लागले. 27 मार्चला 47 जागा, 1 एप्रिलला 39 जागा आणि 6 एप्रिलला 40 जागा असे मिळून एकूण 126 जागांवर आसाम विधानसभेसाठी निवडणुका लढवल्या गेल्या. यात भाजपा, अशम गण परिषद आणि यूपीपीएल म्हणजेच युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल हे पक्ष एका बाजूला, तर काँग्रेस, एआययूडीएफ, सीपीआय-एम आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट हे पक्ष एकत्र लढत होते.

आसामच्या भौगोलिक दृष्टीकोनातून इथल्या राजकारणाचा विचार करणे आवश्यक ठरते. कारण वेगवेगळ्या भौगोलिक व्यवस्थेत इथे अनेक छोटेमोठे समाज राहतात. त्यांची सामाजिक, राजकीय गरज, संरचना वेगवेगळी असते. त्यामुळे आसामच्या संपूर्ण भूभागाला रुचेल, पटेल अशी राजकीय समीकरणे जुळवून आणणे म्हणजे चुलीवरची पोळी असते. एक ब्रह्मपुत्रा खोरे, ज्यामुळे आसामचे अप्पर आसाम आणि लोअर आसाम असे भाग पडतात आणि दुसरे बरॅक खोरे हे आसामचे दोन प्रमुख भाग आहेत. याव्यतिरिक्त काही पहाडी जिल्हेही आसामात आहेत, ज्यात प्रामुख्याने जनजातीय समाज राहतात. असमिया लोक प्रामुख्याने ब्रह्मपुत्रेच्या खोर्यात वसलेले आहेत. तसेच जनजातीय लोक - उदा., दिमासा, काचारी, बोडो, तीवा, कारबी इत्यादी जनजातींचे वेगवेगळे जिल्हे आहेत. त्यांना काही विशेष अधिकारही मिळालेले आहेत. बराक खोर्यामध्ये प्रामुख्याने बंगाली लोकांची वस्ती आढळते. हे गेली अनेक शतके तिथेच राहणारे बंगाली लोक आहेत. तसेच बिहारी, मारवाडी, गोरखाली (नेपाळी) इत्यादी अनेक समाजही आसामात विविध जागी पसरलेले आहेत. त्यांचा मतदान टक्का निवडणूक निकालांवर प्रभाव टाकतो. त्यामुळे केवळ असमिया समाज इथले राजकारण नियंत्रित करतो असे म्हणता येणार नाही.

 
asam_2  H x W:  

परंतु तरीही या सर्वांना त्रासदायक ठरणारा विषय म्हणजे बांगला देशी घुसखोरी. बराक व्हॅलीत आणि लोअर आसामात या मुस्लीम घुसखोरांचे प्रचंड प्रमाण पाहायला मिळते. निकालांचे परीक्षण करता घुसखोरीचे प्रमाण आणि यांची ताकद किती वाढली आहे याचा अंदाज येतो. परंतु त्याचबरोबर या मुस्लीम घुसखोरांच्या तावडीत आसामला जाऊ द्यायचे नाही, या सामूहिक विचाराने असामी जनतेने भारतीय जनता पक्षाला मतदान केले आहे हेही स्पष्ट दिसते आहे. सर्वच पक्षांना 16 साली मिळालेल्या जागा आणि आज हाती आलेले निकाल यांची तुलना केली, तर या आणि अशा अनेक गोष्टी स्पष्ट होतात.

अप्पर आसामात भाजपाला 16 साली 33 जागा मिळाल्या होत्या, त्या वाढून आता तिथे 36 जागा भाजपाच्या पदरात पडल्या आहेत; पण त्याचबरोबर लोअर आसामात गेल्या वेळी मिळालेल्या 15 जागांऐवजी आता 13 जागांवर भाजपाला समाधान मानावे लागले आहे. बराक खोर्यात भाजपाने सहा जागा मिळवल्या आहेत, तर पर्वतीय क्षेत्रांत गेल्या वेळेपेक्षा 1 जागा वाढून आता 5 जागी भाजपाची सत्ता आलेली आहे. भाजपाला 33.2% टक्के मतदान झाले आहे.

काँग्रेसला बराक खोर्यात 16 साली 3 जागा होत्या, त्याच्याऐवजी आता 4 जागा मिळवण्यात यश आले आहे. लोअर आसामात 12च्या 15 अशी 3 जागी त्यांनी आघाडी घेतली आहे, तर अप्पर आसामात 10 जागांवर काँग्रेसने विजय मिळवलेला आहे. अशा 29 जागा त्यांनी जिंकल्या आहेत. 29.7% मतदान इथे कामी आले.

 

asam_4  H x W:  

एआययूडीएफला बराक खोर्यात गेल्या वेळेपेक्षा 1 जागा जास्त मिळून 5 जागा मिळाल्या. लोअर आसामात 6ऐवजी 9 जागी त्यांना विजय मिळाला. अप्पर आसामात 3ऐवजी दोनच जागांवर समाधान मानावे लागले. एकूण 16 जागी बद्रुद्दीन अजमल विजयी झाला आहे. 9.29% मते या पक्षाला मिळली आहेत. बराक खोर्यातील आणि लोअर आसामातील काँग्रेस आणि एआयडीयूएफ यांचे वाढते वर्चस्व हा नव्या सरकारसाठी काळजीचा विषय असणार आहे.

असोम गण परिषद पक्षाला मात्र या वेळी 9 जागांवरच विजय मिळवता आला आहे.

युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल म्हणजेच यूपीपीएलने 12 बोडो जनजातीय क्षेत्रांपैकी 6 जागा जिंकून बीपीएफला जबर धक्का दिला. मागील तीन निवडणुकांमध्ये सर्व 12 जागा जिंकलेल्या बीपीएफला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे, तर दोन जागा जिंकून भाजपाने बोडो काउन्सिल जिल्ह्यांत आपले अस्तित्व प्रस्थापित केले आहे. काँग्रेस आणि एआययूडीएफशी हातमिळवणी केल्याचा प्रचंड तोटा बोडोलँड पीपल्स फ्रंट या पक्षाला अशा प्रकारे सहन करावा लागला आहे.

या वेळी तिन्ही प्रमुख पक्षांचा निश्चित विजय असलेल्या जागाही प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. म्हणजे भाजपाने 35 जागांवर 25000पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवलेला आहे. मागच्या निवडणुकीत अशा जागा 22 होत्या. काँग्रेसच्या अशा जागा 15 आहेत, ज्या 16 साली केवळ तीनच होत्या. एआययूडीएफनेही 16पैकी 12 जागा अशाच प्रचंड फरकाने जिंकल्या आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने एका जागेवर आपले खाते उघडले आहे, ही राष्ट्रवादी मंडळींना काळजी वाटणारीच बाब आहे. भाजपाने 2016च्या विधानसभा आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती झालेली आपल्याला 2 तारखेला लागलेल्या या निकालांवरून स्पष्ट दिसते आहे.

एआययूडीएफ आणि काँग्रेस या पक्षांनी मुस्लीमबहुल भागांत आपला सगळा जोर लावूनही जनतेने आज भाजपाच्या गळ्यात जी विजयश्रीची माळ घातली आहे, त्याची कारणमीमांसा या लेखात करू.

 

कोणताही निवडणूक परिणाम केवळ लोकांच्या सकारात्मक भावनांचा परिपाक नसतो. त्यात आणखी अनेक मुद्दे असतात. उदा., इथे सोनोवाल सरकारने केलेली विकासकामे महत्त्वाची ठरली, त्याचबरोबर अहोमिया संस्कृती रक्षण, आतापर्यंत केलेल्या घुसखोरी प्रतिबंधक कामाचे बक्षीस, तसेच यापुढील कामांसाठी भाजपा सरकारला ताकद देण्याचे काम या निवडणुकीद्वारे आसामी जनतेने केलेले दिसते.

आसाममध्ये 2017 सालापासून NRC म्हणजेच राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी लागू झाली. परंतु विविध कारणांनी प्रकल्प मोठ्या प्रमाणात चुकत गेला आणि परिणामी शेवटी भाजपा सरकारला या कामात अपयश पचवावे लागले, असे सध्यातरी दिसते आहे.


पुढे
गेल्या वर्षी CAA म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाला. याविषयीही आसामी जनतेच्या मनात बर्याच शंका, दुविधा, राग आहे असे चित्र दिसू लागले होते. सरकारविरोधी लहर निर्माण होऊन काँग्रेस आणि बद्रुद्दीन अजमलची ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट या पक्षांना त्याचा भरघोस फायदा होईल अशी शक्यता निर्माण झाली होती. त्यातच 2016 आणि 2019चा अनुभव लक्षात घेऊन काँग्रेसने एआययूडीएफशी हातमिळवणी करून चांगली खेळी केली असे म्हणता येऊ शकते. परंतुईशान्य भारताचे अमित शाहअसे ज्यांना म्हटले जाते, ते हिमंता बिस्वा सरमा आणि मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी एकजूट होऊन सर्व शक्तीनिशी हा डाव हाणून पाडला, हे आज आलेल्या निकालांद्वारे स्पष्ट होते. इतर सर्व निवडणुकांप्रमाणेच या निवडणुकीतही स्थानिक नेतृत्व आणि राष्ट्रीय नेतृत्व यांचा सुंदर मेळ बसलेला आपल्याला पाहायला मिळाला आहे.



asam_3  H x W:

भाजपचे चाणक्य हिमंता बिस्वा सरमा

हिमंता बिस्वा सरमा हे ईशान्येचे चाणक्य म्हणून नावाजले जातात, याला बरीच कारणे आहेत. एचबीएस म्हणजेच हिमंता यांनी असमिया समाजाला समजावून सांगितले की हिंदू बंगाली स्थलांतरितांना नागरिकत्व दिले जाणे आसामच्या संस्कृतीसाठी धोकादायक नाही. परंतु त्याचबरोबर मुस्लीम बांगला देशी घुसखोर आसाम संस्कृतीच्या नाशास कारण ठरत आहेत, हेही त्यांनी लोकांसमोर मांडले. परिणामी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात असणारी स्थानिक नाराजी मोठ्या प्रमाणात मावळली. इतकेच नव्हे, तर मुस्लिमांध पक्ष एआययूडीएफशी गेलेल्या काँग्रेसची हक्काची पारंपरिक मतेही भाजपाला मिळाली, असेच आज भाजपाला मिळालेल्या 60 जागांमुळे आपल्याला म्हणता येते.

हिमंता बिस्वा सरमा यांनी केवळ आपल्याच निवडणूक क्षेत्रात प्रचाराचे काम केले नाही, तर संपूर्ण आसामातील प्रत्येक निवडणूक क्षेत्रात त्यांचा संपर्क होता. तिथल्या समाजाची जडणघडण, पक्षबांधणी, विरोधी पक्षांची बलस्थाने, क्षीणस्थाने यांचा सखोल अभ्यास, भाजपाच नव्हे, तर सर्वच पक्षीय नेत्यांशी असणारे व्यक्तिगत संबंध, त्यानुसार त्यांनी पक्षाला यश मिळवून देण्यासाठी बनवलेल्या वैकल्पिक योजना, धोरणे अगदी शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत केलेली बूथ व्यवस्था अशा कित्येक बाबतीत आपल्याला हिमंताजींचे व्यवस्थापन कौशल्य पाहायला मिळते. भाजपचा विजय सुनिश्चित करण्यासाठी असे अनेक छोटेमोठे मुद्दे उपयोगी ठरले. आपल्या जालूकबारी क्षेत्रातून ते 110000 मताधिक्याने निवडून आले. हिमंता बिस्वा सरमा हे भाजपाच्या या यशाचे मॅन ऑफ मॅच आहेत असे म्हटले, तर खचितच वावगे ठरणार नाही.

आसाममधील मतदाराचा नैसर्गिक कौल भाजपला मिळणे ही कठीण गोष्ट आहे. कारण इथे गेल्या शंभरहूनही अधिक वर्षे चाललेल्या बांगला देशीयांच्या अतिक्रमणामुळे एकूण लोकसंख्येच्या चाळीस टक्क्यांहूनही अधिक मुस्लीम समाज आहे. हा वर्ग एआययूडीएफच्या आणि आता युती असल्यामुळे काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिला आहे. आणि याचा फायदा होऊन या दोन्ही पक्षांचा मतदान टक्का वाढल्याचे आपल्याला या निवडणुकीत दिसून आले. गेल्या वेळी अनेक जागांवर या दोन्ही पक्षांचे उमेदवार अगदी काठावर निवडून आलेले होते किंवा एकमेकांसमोर उभे ठाकून काठावर हरले होते. त्यामुळे ती अनिश्चितता टाळून विजयाकडे वाटचाल करावी, यासाठी आपल्या मूल्यांना बाजूला सारून आसाम काँग्रेसने मुस्लीम कट्टरतावादी पक्ष एआययूडीएफशी हातमिळवणी केलेली आपल्याला पाहायला मिळाली. आसाम काँग्रेसचे माजी अध्यक्ष कै. तरुण गोगोई यांनी ही गोष्ट कधीही मान्य केली नव्हती. पण राहुल गांधी आणि प्रियांका वाडरा यांची काँग्रेस स्वार्थ साधण्यासाठी कोणत्याही थराला जाऊन जनतेचे स्वास्थ्य आणि स्थैर्य यांना वेठीला धरावयास बिलकुल कचरत नाही, ही बाब आता सामान्य असामी जनतेच्या लक्षात आलेली असल्याचे या निवडणुकीच्या निमित्ताने परत एकदा सिद्ध झालेले आहे. त्यामुळे मतांचे गणित 1+1 = 2 इतके सोपे नसते, हेही आता राहुलजींच्या लक्षात आले असावे, अशी आशा आपण करू शकतो. एकुणात एआयडीयूएफला या युतीचा फायदा झाला आणि काँग्रेसला हा फायदा उचलता आलेला नाही, उलट भविष्याच्या दृष्टीकोनातून यामुळे आसाम काँग्रेसचे नुकसानच झाले, असे म्हणायला वाव आहे.

गेल्या पाच वर्षांत भाजपाने ज्या पद्धतीने राज्यकारभार चालवला, त्याचाही मोठा फायदा भाजपाला झालेला दिसून आला आहे. चायबागान जिल्ह्यात मी स्वतः फिरले आहे. तिथे चहाबागेतील मजुरांची मजुरी हा खूप मोठा मुद्दा होता. भाजपाने तो सोडवला. जवळपास 50 लाख मते, जी 25 विधानसभा निवडणूक क्षेत्रांत विभागलेली आहेत, ती आपोआप भाजपाकडे आली. वास्तविक पाहता या क्षेत्रात अखिल गोगोई या डाव्या कम्युनिस्ट विचाराच्या नेत्याची चांगली संघटनात्मक पकड आहे. परंतु त्याच्या रायजोर पार्टीच्या 29 उमेदवारांपैकी केवळ अखिल गोगोई स्वतः निवडणुकीत जिंकून येऊ शकला.


bjp_1  H x W: 0 

तसेच अनेक विकासात्मक बदल - उदा., रस्ते बांधणी, बाकी सुविधांची निर्मिती इत्यादी बदल गेल्या 5 वर्षांत मोठ्या वेगात घडवलेले दिसतात. प्रत्येक मुलासाठी अंगणवाडी, गरोदर महिलांना 6000 रुपये देणे, त्यांची अंगणवाडीतील मुलांची पोषण व्यवस्था या केंद्र सरकारने दिलेल्या सुविधा आणि अशा अनेक राष्ट्रीय योजना खेडोपाडी पोहोचतात, हे मी स्वतः पाहिलेले आहे. सोनोवाल सरकारने या सुविधा इथल्या लोकांपर्यंत पोहोचवल्या, ज्याचा भरघोस फायदा त्यांना आपल्या 60 जागा टिकवण्यासाठी झाला आहे, हे अगदी ठळकपणे जाणवते. आसाम सरकारने ज्या पद्धतीने कोविडशी दोन हात केले, तीही उल्लेखनीय अशीच कामगिरी आहे. आसामचे डबल इंजीन सरकार म्हणजे केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजपाचे सरकार असल्याचे फायदे लोकांच्या लक्षात आणून देणे हे सोनोवाल सरकारला चांगलेच जमले आहे, हे या यशाचे एक प्रमुख कारण म्हणता येते.

आता मुख्यमंत्री कोण होणार, मंत्रीमंडळात कोणाला स्थान मिळणार असे मुद्दे ऐरणीवर येत आहेत. भाजपा कोणालाही निराश करणार नाही. सर्वांना आपापल्या कर्तृत्वाप्रमाणे योग्य ते बक्षीस आणि जबाबदारी दिली जाईल, याची खात्री जाणत्या अभ्यासकांना वाटते आहे.